आमचे पशुमित्र निबंध मराठी-Aple Pashumitra Nibandh Marathi
आमचे पशुमित्र निबंध मराठी-Aple Pashumitra Nibandh Marathi

आमचे पशुमित्र निबंध मराठी – Aple Pashumitra Nibandh Marathi

कित्येक लाख वर्षांपूर्वी माणूस भटक्या होता. शिकार करून तो अन्नसाठा करीत होता. साधारणपणे चाळीस हजार वर्षांपूर्वी माणसाने अग्नीचा शोध लावला. त्याचा उपयोग करून तो अन्न शिजवायला, उष्णता मिळवायला आणि रानटी जनावरांना पळवून लावायला शिकला. नंतर तो शेती करायला शिकला तसेच त्याला जनावरांना माणसाळवणे आणि आपल्या उपयोगासाठी पाळणे हे सुद्धा जमू लागले. सर्वप्रथम माणसाने कळपात राहून शिकार करणा-या रानटी कुत्र्यांना माणसाळवले असे म्हणतात. त्यानंतर गाय, बैल, म्हैस, घोडे, गाढवे, उंट, हत्ती असे प्राणी तो पाळू लागला आणि आपल्या उपयोगासाठी वापरू लागला.

हे सर्व पशू आमचे चांगले मित्र आहेत. गाय आणि म्हैस आपल्याला दूध देतात. बैलाचा उपयोग आपण बैलगाडी ओढण्यासाठी आणि शेतामधील औत ओढण्यासाठी करतो. घोड्यांचा उपयोग वाहन म्हणून आणि घोडागाडी ओढण्यासाठी म्हणून होतो. जुन्या काळी घोड्याच्या पाठीवर बसून लढण्याची प्रथा होती. त्यामुळे सैन्यात खास घोडदळ असे, त्या घोडदळातले सैनिकही घोडेस्वारी खास शिकलेले असत. त्याशिवाय गाढवांचा उपयोग सामान लादून नेण्यासाठी होतो.

आपल्या इथले कुंभार आणि धोबी ह्यांच्याकडे त्यांचे सामान लादून न्यायला मुद्दामहून गाढवे पाळलेली असतात. आपल्या इथे गाढवाला तसे निर्बुद्ध किंवा तुच्छ लेखले जात असले तरी मध्यपूर्वेतील खडकाळ प्रदेशात मात्र तो एक चिवट प्राणी मानला जातो. आपल्या इथे एखाद्या माणसाने गुन्हा केला तर गाढवावर उलटे बसवून त्याची गावात धिंड काढली जाते.

परंतु बायबलमध्ये असा उल्लेख आहे की येशू ख्रिस्त हा जेरूसलेममध्ये गाढवावर बसून आला होता. ह्यावरून आपल्याला कळते की देशोदेशीच्या प्रथा भिन्न असतात. उंट हा प्राणी सगळीकडे आढळत नाही परंतु तो वाळवंटात खूपच कामाचा ठरतो. त्याच्यामुळे वाळवंटातील प्रवास, सामानाची वाहतूक करता येते तसेच उंटीणीचे दूधही वाळंवटातील लोकांना पिता येते. आता हत्तीबद्दल म्हणाल तर पूर्वीचे राजेमहाराजे आपल्या सैन्यात खास हत्तीदळ ठेवीत असत. तसेच राजाला उच्चासनावर बसण्यासाठी म्हणून हत्तीच्या अंबारीचा उपयोग होत असे.

वेगवेगळ्या देवस्थानांमध्येही हत्ती पाळण्याची आणि हत्तीवरून देवाची पालखी काढण्याची प्रथा अजूनही आहे. त्याशिवाय शेळ्या, कोंबड्या आणि मेंढ्या ह्यांचेही पालन केले जाते. शेळीपासून दूध मिळते, मेंढीपासून लोकर मिळते तर कोंबड्यांचा उपयोग खाण्यासाठी आणि अंड्यांसाठी होतो.

माणूस कुत्रा आणि मांजरसुद्धा पाळतो बरे का ! कुत्रा माणसाच्या घराची राखण करतो. धनगराचा कुत्रा त्याच्या मेंढ्यांची राखण करतो. तर मांजर घरात उंदीर शिरला तर त्याला मारते. म्हणूनच हे सर्व प्राणी अत्यंत उपयोगाचे आहेत. ते जणू माणसाचे मित्रच आहेत. त्यांच्यामुळे माणसाला उपजीविकेचे साधन मिळते.

पुढे वाचा:

Leave a Reply