भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध – Bhartatil Vansanpatti Essay Marathi
वने हा निसर्गाचा एक अमूल्य वारसा आहे. हीच नैसर्गिक संपत्ती देशाला नैसर्गिक सौंदर्य प्रदान करते. वनसंपत्ती कायम टिकावी म्हणून वनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सृष्टीच्या प्रारंभापासूनच मानव आणि निसर्गाचे घनिष्ठ संबंध आहेत. याच वनांनी मानवाच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय केली. फळे त्याचे अन्न, झाडांची पाने म्हणजे त्याचे वस्त्र, झाडांची लाकडे व पाने यापासून बनविलेली झोपडी म्हणजे त्याचे घर होते. जेव्हा मानवाने सर्वप्रथम अग्निचा शोध लावला तेव्हा त्याने आधी झाडाची वाळलेली पाने आणि लाकडे पेटवून प्रकाश उत्पन्न केला. जेव्हा लेखन कलेचा विकास झाला तेव्हा त्याने झाडाच्या सालीपासून कागद तयार केला. ज्याला ताडपत्र म्हणत असत. आपले प्राचीन साहित्य याच ताडपत्रावर, भोजपत्रावर लिपीबद्ध करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्राचीन काळातही वनांचे महत्त्व कमी नव्हते. या नैसर्गिक संपत्तीमुळे मानवी जीवन मोहक आणि सुगंधित होत राहिले.
निसर्गाची सर्वोत्तम भेट म्हणजे वने होत. वनांअभावी मानवी अस्तित्वाची कल्पना करणे व्यर्थ होय. वनाशी मानवाचा संबंध त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असतो. लहानपणी वनातून मिळालेल्या लाकडापासून तयार केलेल्या झोक्यावर झोके घेतो. तरुणपणी लाकडापासून तयार केलेल्या शय्येवर झोपतो, म्हातारपणी लाकडाच्या काठीच्या आधाराने चालतो. आयुष्य संपल्यावर लाकडावरच त्याला अग्नीस अर्पण करतात. असा त्याचा शेवट होतो.
चिकित्सा क्षेत्रातही वनसंपत्ती फार उपयुक्त ठरते. वनापासून आपणास जड़ीबुटी मिळतात त्यापासून जीवनरक्षक औषधे तयार करण्यात येतात. कडूलिंब, आवळा, लिंबू, तुळस, आंबा, जांभूळ इत्यादी वृक्षांची पाने, फळे, फुले, साल, मुळे यांच्यापासून औषधे तयार करतात. कडूलिंब व तुळस तर औषधी गुणांची खाणच आहे. यांच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे शारीरिक रोग दूर होतात. फुले केवळ नैसर्गिक सौंदर्यातच भर टाकतात असे नसून मधमाशा फुलांमधून मध गोळा करतात जो औषधी असतो. आयुर्वेदात मधाचे खूप महत्त्व सांगितले आहे. आयुर्वेदिक औषधांचे सेवन मधातूनच बव्हंशी केले जाते.
नैसर्गिक सौंदर्याची खाण असण्याबरोबरच वने वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान पण आहे. वनात चहूकडे पसरलेली हिरवळ, पक्ष्यांची मधुर किलबिल, जलचर प्राण्यांची जलक्रीडा, हत्तींची मदमस्त चाल, सिंहाचे आपल्या शिकारीमागे धावणे, वन्य प्राण्यांच्या क्रीडा, हजारो रंगीबेरंगी पक्ष्यांचे दाणे टिपणे व आकाशात स्वच्छंद विहार करणे. पक्ष्यांचे झाडांच्या फांद्यावर झुलणे, गेंड्याचा जलविहार, नील गाईंचे निर्भयपणे गवत खाणे इत्यादी वन पर्यटकांच्या आकर्षणाचे महत्त्व आहे. वनाकडे पर्यटक आपोआप ओढले जातात. पर्यटन हा राष्ट्रीय उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनसंरक्षण आवश्यक आहे. आजकाल भारतातही वन्य प्राण्यांवरील चलचित्रपट तयार होत आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार आणि भारताला परकीय चलन मिळते.
वने आपणास लाकडाचा पुरवठा करतात. इंधन, इमारतीसाठी, फर्निचरसाठी, घराच्या सजावटीसाठी, खिडक्या, दरवाजे, टेबल, खुर्सा, कागद, आगपेट्या, खेळाचे सामान, रेल्वे, जहाजे इत्यादी तयार करण्यात लाकूड वापरले जाते. या सर्व वस्तूंचे उत्पादन, संग्रह, व्यापार, परिवहन, खरेदी विक्री इत्यादी मुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो.
सर्व प्राणी जगताचे जीवन वृक्षांवरच अवलंबून आहे. पावसाशी वनांचा निकटचा संबंध आहे. जिवंत राहण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो आपणास वृक्षांपासूनच मिळतो. आपल्या उच्छवासाद्वारे, वाहनांद्वारे कारखान्यांद्वारे जो कार्बनडाय ऑक्साईड हा विषारी वायू बाहेर पडतो त्याचे शोषण वृक्षांद्वारे केले जाते. मोबदल्यात ते आपणास प्राणवायू देतात. वृक्ष जमिनीची धूप थांबवितात. झाडांची पाने जमिनीची उत्पादनशक्ती वाढवितात. वृक्ष दलदल थांबवितात.
ही वनसंपत्ती आपल्या खाद्य समस्येचे निवारण करते. वृक्षांपासून आपणास अनेक प्रकारची फुले, फळे प्राप्त होतात. आदिवासी जमातींचे लोक जंगलातच राहतात. भारतात प्राचीन काळापासून काही विशिष्ट वृक्षांची पूजा होते. त्यांना तोडणे पाप समजले जाते. उदा. पिंपळ, उंबर, तुळस इ. त्यावरून हे कळते की, भारतीय लोक वनसंपत्तीचे, महत्त्व जाणत होते. साहित्यात आपणास वृक्षारोपणाची अनेक उदाहरणे सापडतात. ‘शाकुंतल’ नाटकातील शंकुतला वृक्षारोपण करून त्यांची निगा राखताना दिसते. अनेक राजांनी रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली होती. हे वृक्ष थकलेल्या प्रवाशांना सावली देत.
भारतात सातत्याने लोकसंख्या वाढत असल्यामुळे तिच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जंगलांची बेसुमार कापणी होत आहे. देशाचा मौल्यवान वारसा नष्ट करून राहण्यायोग्य जागा निर्माण केली जात आहे. या कटाईमुळे जल-वायू प्रदूषण, भूस्खलन, जमिनीची धूप, विनाशक पूर, पावसाची कमी, हिरवळीच्या ठिकाणी वाळवंटे वाढत आहेत. देशाच्या विकास योजना पण या वनसंपत्तीच्या शत्रू आहेत. रस्ते, रेल्वे, धरणे, औद्योगिक विस्तार आणि पुनर्वसनाच्या योजना पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम जंगले कापली जातात.
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंगलांचा नाश चालूच राहिला तेव्हा सरकारने देशाला पुनश्च हिरवेगार बनविण्यासाठी वृक्षारोपण मोहीम सुरू केली. आता सरकार दरवर्षी वनमहोत्सवाचे आयोजन करते. त्यामुळे जनता आपल्या कर्तव्याप्रती जागृत होते आणि वृक्षारोपणाचे प्रयत्न करते. जर एक वृक्ष कापला तर त्याच्या जागी दुसरा लावलाच पाहिजे. जर आधीपासून इकडे लक्ष दिले असते तर ही समस्या इतकी बिकट झाली नसती.
वनसंपत्तीचे महत्त्व नाकारता येत नाही. निसर्गाची ही अमूल्य देणगी सर्वस्वी आमची आहे. आपणास तिचा नाश करावयाचा नसून विकास करावयाचा आहे.
पुढे वाचा:
- भारतीय लोकशाही मराठी निबंध
- भारताची अंटार्टिक मोहीम मराठी निबंध
- भगवान महावीर निबंध मराठी
- बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
- बाजारातील फेरफटका निबंध मराठी
- बाजारातील एक तास निबंध मराठी
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- शाळेची बस निबंध मराठी
- फळांची उपयुक्तता मराठी निबंध
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती