डॉ. होमी भाभा निबंध मराठी – Dr Homi Bhabha Essay in Marathi

डॉ. होमी जहांगीर भाभा हे खूप थोर अणुशास्त्रज्ञ आपल्या भारतात होऊन गेले. त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर, १९०९ रोजी मुंबई येथे एका सुखवस्तू पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील म्हैसुर संस्थानात शिक्षणाधिकारी होते परंतु होमींचे शिक्षण मुंबईतच झाले.

१९२७ साली वयाच्या अठराव्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले. तेथे केंब्रिज विद्यापीठात त्यांनी इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते. विद्यार्थीजीवनातच त्यांना भरपूर पारितोषिके मिळाली. केंब्रिजला असताना त्यांनी विद्युतनिर्मिती, चुंबकत्व, क्वांटम थिअरी, कॉस्मिक किरण इत्यादी विषयांवर संशोधन केले. सन १९३५ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळाली. तिथे असतानाच होमी भाभांनी अणूविज्ञानातील ‘फिशन’ ह्या प्रक्रियेचा अभ्यास केला होता. भारतात परतल्यावर त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथे प्राध्यापक म्हणून काम स्वीकारले तेव्हा तिथे सर सी. व्ही रामन हे महान शास्त्रज्ञ प्रमुखपदावर होते.

१९४५ साली त्यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या मदतीने टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल सायन्स ही संस्था मुंबई येथे उभारली. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अणुविज्ञानातील त्यांचा अधिकार लक्षात घेऊन नेहरूंनी त्यांच्यावर भारताला अणुविज्ञानात स्वयंपूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली. मग भारतीय अणु आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. भारताचे पहिले अणु संशोधन केंद्र मुंबईत तुर्भे येथे आणि तारापूर येथे उभारण्याचे संपूर्ण श्रेय डॉ. होमी भाभा ह्यांचेच आहे. म्हणूनच त्या केंद्राला आता भाभांचेच नाव देण्यात आले आहे.

अणूपासून आपल्याला विद्युतनिर्मिती करता येईल हे त्यांनीच पहिल्यांदा ओळखले आणि त्या दृष्टीने पावलेही उचलली. त्यांनी आपल्या कार्याला जणू वाहूनच घेतले होते. अतिशय योजनाबद्धतेने काम करणे, कामात काटेकोरपणा असणे हे त्यांचे मोठे गुण होते. ह्या व्यतिरिक्त त्यांना कला आणि संगीत ह्यातही रस होता. संगीताचे ते दर्दीच होते. महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सन्मानही पुष्कळच मिळाले. १९४२ सालीच त्यांना ऍडम्स पुरस्कार मिळाला होता. १९५१ मध्ये ते भारतीय वैज्ञानिक परिषदेचे अध्यक्ष बनले. १९५५ साली आण्विक शक्तीचे शांततामय उपयोग ह्या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जिनेव्हा येथे परिषद भरली होती. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थानही त्यांनाच मिळाले होते. १९५४ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

अशा ह्या थोर शास्त्रज्ञाचा विमान अपघातात मृत्यू झाला ही फार शोचनीय घटना आहे. युरोपच्या दौ-यावर असताना त्यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी माऊंट ब्लांक येथे विमान कोसळून निधन झाले.

डॉ. होमी भाभा निबंध मराठी – Dr Homi Bhabha Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply