गांधीजींचे विचार निबंध मराठी – Gandhijinche Vichar Nibandh Marathi

‘उचललेस तूमीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया… गांधीजींचे नाव घेतले की मला ही कविता आठवते. खरोखरच, गांधीजी हे विसाव्या शतकात होऊन गेलेल्या महामानवांपैकी एक आहेत. त्यांच्या पश्चात् असा कुणी माणूस होऊन गेला का असा विस्मय लोकांना वाटावा एवढे त्यांचे विचार अद्भूत आहेत.

ब्रिटिश सत्तेसारख्या उन्मत्त, उद्दाम सत्तेच्या पुढ्यात सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ह्यांसारखी शस्त्रे घेऊन हा माणूस उभा राहिला, त्याने कोटीकोटी भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरूद्ध एक केले. हे त्यांच्या विचारांचे सामर्थ्य होते. अज्ञानी, बलहीन जनतेला त्यांनी अन्यायाविरूद्ध शांततापूर्ण लढा द्यायला शिकवले. त्या प्रतिकारापुढे सामर्थ्यशाली सत्ताही झुकतात हे त्यांनी दाखवून दिले.

आपल्या वैयक्तिक जीवनातही त्यांनी सत्य, अहिंसा आणि सहिष्णूतेच्या मार्गाचा अवलंब केला. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले,’ असे संत तुकाराम म्हणून गेले आहेत. गांधीजी अशा वंदनीय पुरूषांपैकी एक होते. ते एक महामानव, थोर नेते, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि लेखक होते. थोर स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकारही होते. आपल्या आदर्शासाठीच ते जगले. ज्या विचारांचा प्रचार केला त्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान द्यायला मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या मारेक-याने त्यांना मारले असेल परंतु त्यांचे विचार त्यालाच काय पण कुणालाही आजतागायत मारता आलेले नाहीत.

मारामा-या, हत्याकांडे आणि रक्तपात ह्यांनी बरबटलेल्या ह्या जगाला त्यातून बाहेर पडण्यासाठी गांधीजींच्या मानवतावादाचीच कास धरावी लागेल. आज जरी ते प्रत्यक्ष हयात नसले तरी त्यांनी सांगितलेला मार्ग, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांचे आदर्श आपल्यासोबत आहेत. भारताला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर त्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे खरेच आहे. त्यांनीच राजकारणात ख-या धार्मिकतेचा आणि नैतिकतेचा समावेश केला. त्यांनी जीवनाच्या सर्व पैलूंवर लेखन केले. त्या लेखनातूनच गांधीवाद उदयास आला.

ते सत्य, अहिंसेचे उपासक होते, राजकीय स्वातंत्र्यासोबत स्वावलंबन, आर्थिक स्वातंत्र्य आणि श्रमसंस्कार ह्यांनाही त्यांनी महत्व दिले. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा मूलमंत्र होता. ते जातीभेदाच्या, वर्णभेदाच्या आणि अस्पृश्यतेच्या विरोधात होते. महिला सक्षमीकरणाचा त्यांना ध्यास लागलेला होता.

समाजातील सर्व वर्गांशी त्यांचा संवाद होता, खरा भारत खेड्यांमध्ये वसलेला आहे हे त्यांना माहिती होते. म्हणून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे, कुटीरोद्योगावर भर देणे ह्याचा त्यांनी प्रचार केला. चरखा हे त्याचेच तर प्रतिक होते. आपल्या देशातील लाखो लोकांना पुरेसे वस्त्र मिळत नाही म्हणून ते स्वतः आयुष्यभर केवळ पंचाच नेसून राहिले.

सत्य, अहिंसा, करूणा, मानवी मूल्ये, अस्पृश्योद्धार, स्वावलंबन, संपूर्ण स्वातंत्र्य, आत्मबल, नैतिकता म्हणजेच गांधीचे विचार असे आपण सारांश रूपात म्हणू शकतो.

धीजींचे विचार – Gandhijinche Vichar

पुढे वाचा:

Leave a Reply