Set 1: जर मला पंख असते तर मराठी निबंध – Jar Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

माझी ताई खूप दिवसांत आमच्याकडे आली नव्हती. मला तिची खूप खूप आठवण येत होती. तेव्हा मनात आले की, आपल्याला पंख असते, तर आपण उडत उडत ताईकडे गेलो असतो.

खरेच! मला उडता आले असते, तर किती मजा आली असती! पक्ष्यांप्रमाणे स्तपैकी आकाशात उडत राहिलो असतो. उडता उडता दमलो असतो, तर एखादया पाडावर क्षणभर विसावलो असतो. झाडांशी, झाडांवरील पक्ष्यांशी खूप गप्पा मारल्या असत्या.

मला पंख मिळाले तर मी खूप खूप प्रवास करीन. मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडते. प्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहावयास सुरुवात करीन. मी महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहून घेईन.

महाराष्ट्रातील सर्व नदयांत पोहून घेईन. वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत घेईन. पण मी भटकत भटकत खूप दूर गेलो तर? तर आईबाबा खूप वाट पाहतील, आजीआजोबा काळजी करतील. पण नकोच, मी खूप लांब जाणारच नाही! मात्र मला पंख हवेतच!

Set 2: मला पंख असते तर निबंध मराठी – Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

मला पंख असते तर किती बरे मजा झाली असती? मला रोज शाळेला चालत जावे लागते. त्या ऐवजी मी पंखांनी मस्त उडूनच शाळेला गेलो असतो. मला पंख असते तर मी कधीही कुठेही उडत उडत जाऊ शकलो असतो. उंच उंच नारळाच्या शेंड्यावर बसून खाली उभ्या असलेल्या आईला घाबरवले असते. तिथले नारळ खाली काढले असते, आंब्यावर बसून आंबे काढले असते.

गरूड, ससाणे, घारी अशा मोठमोठ्या पक्ष्यांशी मी दोस्ती केली असतीच पण त्याचबरोबर चिऊताई, खारूताई, काऊदादा अशांशीही मैत्री केली असती.

मला पंख असते तर मी उडतउडत कुठल्याही उंच इमारतीच्या गच्चीवर गेलो असतो. विजेच्या तारांना लटकलो असतो. खूप उंचावरून खाली बघताना किती मस्त वाटले असते मला. उंचावरून वाहाणारा भणभणता वारा मला अनुभवता आला असता.

मला उडताना बघून टीव्हीवाल्यांनी एकच गर्दी केली असती. माझ्या मुलाखती घेतल्या असत्या. आमच्या शाळेतही मी खूप प्रसिद्ध झालो असतो. माझ्यावर सिनेमा निघाला असता. त्यात मीच काम केले असते.

पण एक प्रश्न आहे माझ्या मनात.. तो म्हणजे फार चालले की पायजसे दुखतात तसे खूप उडल्यावर पंखही दुखतील काय?

Set 3: मला पंख असते तर निबंध मराठी – Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

त्यादिवशी शाळेत सरांनी आमच्या सर्व वर्गाला शिक्षा केली होती. शाळेच्या पटांगणाला २५ फेऱ्या मारण्याची शिक्षा. त्यामुळे घरी परतत असतांना अतिशय कठीण अवस्था झाली होती. पाय खूपच दुखत होते. रिक्शा करुन घरी जाण्याइतके पैसेही जवळ नव्हते. अचानक मला एक कावळा उडतांना दिसला आणि माझ्या मनात आले, मलाही पंख असते तर?

अहाहा! काय आनंदाचा क्षण असेल तो. कुठलेही वाहन न वारता मी शाळेतुन घरी आणि घरुन शाळेत जाऊ शकेन. अगदी फुकटात. सगळी कामे पटापट होतील. कुठेही जायला पंख पसरले की झाले. पंख मिळाले तर मी सर्वप्रथम सगळे जग फिरुन येइन. प्रथम आपल्या देशातील सर्व प्रेक्षणीय ठिकाणे पाहुन येईन. कुठे रेल्वेचे तिकीट काढायला नको की गाडी खराब झाली म्हणून अडकून पडायला नको. त्यानंतर मी विदेश सफरीवर जाईन. आयफेल टॉवर, आफ्रिकेतील जंगले, जगातील सातही आश्चर्ये पाहून येईन, पक्षांप्रमाणेच झाडावरच राहीन आणि झाडांवरील ताजी फळे खाईन. वाटेत दिसणाऱ्या शेतांमधील रानमेवा खाईन. तळयातील स्वच्छ पाण्याने तहान भागवीन. डबा नको की पाण्याची बाटली नको.

याशिवाय मी आणखी एक महत्त्वाचे काम करीन. मी सर्व जगात भारताचा शांतीदूत म्हणून फिरेन. सर्व जगात शांततेचा प्रसार करीन. त्यामुळे देशांदेशातील युद्ध थांबतील. सर्व देश एकत्र येतील व जगाचे कल्याण होईल. दहशतवाद दूर होईल. पृथ्वीवर नंदनवन फुलेल. सगळीकडे आनंदी-आनंद पसरेल. तेव्हा कमीतकमी एक दिवस तरी मला पंख मिळावेत अशी मी देवाजवळ प्रार्थना करते.

Set 4: मला पंख असते तर निबंध मराठी – Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

परवाच सकाळी शाळेत जात होतो. आज माझ्याकडच्या दप्तरात जरा जास्तच ओझे होते. एरवी तसे नसते. माझी पाठ भरून आली. शिवाय रस्त्यावर गर्दीही फार असल्याने जास्त भराभर चालताही येत नव्हते. चहू बाजूंनी वाहने नुसती अंगावर येत होती. मोटारींच्या भोंग्यांच्या कर्णकटू आवाजाने तर डोक ठणठणू लागले होते. तेव्हा माझ्या मनात आले की मला पंख असते तर? कित्ती मज्जा आली असती. पटकन शाळेत पोचलो असतो. रस्त्यावरच्या वाहनांचा, धुराचा कसलाच त्रास सहन करावा लागला नसता.

खरेच, देवाने आपल्याला निदान पंख तरी द्यायला हवेच होते. त्याने आपल्याला शिंगे, नखे, दात काहीच दिले नाही. आपल्याला पंख मिळाले असते तर किती छान झाले असते. मला पंख मिळाले तर मी उंच आकाशात उडतच राहीन. अभ्यास करून किंवा घरात बसून कंटाळा आला की चाललो लगेच आकाशात उडायला. स्वच्छ हवेत दोन चकरा मारून आलो की पुन्हा अभ्यास करायलासुद्धा किती मजा येईल राव.

मला पंख मिळाले तर मी नारळाच्या शेंड्यावर जाऊन तिथली ताजी शहाळी घेऊन खाली येईन. मग मला कुठल्याच गाडीचीही गरज पडणार नाही. पेट्रोलचा खर्च तर अगदी शून्यावरच येईल. पंख असल्यामुळे मी फुकटात मला हवे तिकडे जाऊन येईन. जगातील सात आश्चर्ये, नॉर्वेमधील सहा महिन्यांचा सूर्यप्रकाश, अंटार्क्टिकाची सहल.. स्वतःच्या सा-या हौशीमौजी पुरवीन. मला त्यासाठी आगगाडीचे तिकिट काढायला नको, विमानाचे तिकिट काढायला नको. आकाशात उडताना मला ढगांमध्ये शिरता येईल. पावसाळ्यात खंडाळ्याला ढग कसे जमिनीवर उतरलेले आहेत असे वाटते. इथे मी स्वतः ढगांमध्ये जाऊन खेळेन.

आकाशात उडताना इंद्रधनुष्य उगवलेले असेल तर त्याचे रंग मला अधिक जवळून पहायला मिळतील. चंद्रचांदण्यांसोबत खूप धमाल उडवून देईन. सगळी बंधने झुगारून मुक्तपणे विहार करीन. माझ्यावर कुणी रागावले किंवा भांडण करायला आले तर पटकन उडूनच जाईन. मग आईला आणि शिक्षकांना मला शिक्षा करता येणारच नाही.

पण मी आकाशात उडालो तर ते बाकीच्या पक्ष्यांना आवडेल का? की गरूड, ससाणे आणि घारी माझ्या अंगावर धावून येतील? शिवाय ज्या देशात मी जाईन तिकडचा व्हिसा मात्र काढावाच लागेल. तसेच तिथे खाली उतरल्यावर मला भूक लागेल तेव्हा तिकडचे चलन मला सोबत घ्यावेच लागेल त्याचे काय? तेवढे पैसे माझ्याकडे कुठून बरे येणार? मी तर शाळेत शिकणारा मुलगा. शिवाय चालून चालून जसे पाय दुखतात तसे उडून उडून पंख दुखतील ना? त्याचे काय?

म्हणूनच वाटते की पंख फुटण्याची कल्पना केवळ एक कल्पना म्हणूनच ठीक आहे.

मला पंख असते तर निबंध मराठी – Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply