शरदाचे चांदणे निबंध मराठी – Sharadache Chandane Nibandh Marathi

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे आपल्याला ऋतू अनुभवायला मिळतात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा एकुण सहा ऋतूंचे हे ऋतुचक्र अविरतपणे फिरतच असते. वर्षा ऋतूसंपला की शरद ऋतूचे आगमन होते. आश्विन आणि कार्तिक असे एकुण दोन महिने शरद ऋतू असतो.

ह्या काळात सूर्याची उष्णता तशी प्रखरच असते. आकाश अगदी निरभ्र असते. पावसाळ्यामध्ये गढूळ झालेले जलाशय सूर्याच्या उष्णतेमुळे शुद्ध होतात. शरदातील चांदण्या रात्री आल्हाददायक असतात.

शरद ऋतूतील रात्रीचे हवामान थंड असते. फुले फुललेली असतात. आकाशात असंख्य तारे आणि तारका चमकत असतात. चंद्राच्या पिठूर चांदण्यामुळे अंधार पळूनच जातो. तेव्हा असे वाटते की सारे जगच दुग्धसागरात पोहत आहे की काय?

सरोवरात कमळे फुललेली असतात. भुंगे फुलांवर गुंजारव करीत असतात. पक्ष्यांचे मंजुळ कूजन चाललेले असते. शरीर आणि मन उत्साही असल्यामुळे काम करावेसे वाटते आणि भरपूर खावेसेही वाटते. फळे आणि भाज्याही ह्या काळात भरपूर उपलब्ध असतात.

शेतक-याचे पीक दारात आलेले असते. सुगीचा हंगाम झाल्यामुळे तोही खुशीत असतो. अशा वेळीच दसराआणि दिवाळी हे सण येतात. ह्या सणांच्या काळात लोक एकमेकांना भेटतात, घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात.

शरद ऋतूतील पौर्णिमेला म्हणजेच आश्विनातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. ह्या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर येऊन’ को जागर्ति?’ म्हणजे कोण जागे आहे? असे विचारते. म्हणून ही चांदणी रात्र जागवायची, एकत्र बसून गप्पागोष्टी करायच्या आणि रात्री मसाला दूध प्यायचे अशी प्रथा आहे.

कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून ह्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव आहे. ह्या रात्री देवळाबाहेरची उंच दीपमाळ प्रज्वलित करतात. तेव्हा अंधारात ते दृश्य फार सुंदर दिसते.

असा आहे हा शरदऋतू.

शरदाचे चांदणे निबंध मराठी – Sharadache Chandane Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply