वटपौर्णिमा संपूर्ण माहिती – Vat Purnima Information In Marathi

महाराष्ट्रात स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला सावित्रीच्या नावे जे व्रत करतात त्या व्रताला ‘वटपौर्णिमा’ असे म्हणतात. हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते. पण तीन दिवस उपास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात व एकमेकींना वाण देतात. नंतर सावित्रीची कथा ऐकतात. पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

वटपौर्णिमा

सावित्री ही मद्रदेशाच्या अश्वपती नावाच्या राजाची मुलगी. अश्वपतीला मूल नव्हते म्हणून त्याने सूर्याची प्रार्थना केली व त्याच्या कृपेने राजाला ही सुंदर, गुणवान मुलगी झाली.

सावित्री मोठी झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची काळजी लागली. राजाने सावित्रीबरोबर आपले मंत्री, तिच्या मैत्रिणी व सैनिक दिले व देशात सगळीकडे फिरून तिने आपला नवरा पसंत करावा असे सांगितले. त्याप्रमाणे सावित्री प्रवासाला निघाली.

त्यावेळी शाल्व देशाचा राजा द्युमत्सेनचे राज्य त्याच्या भावाने हिरावून घेतल्यामुळे तो आपल्या कुटुंबासह जंगलात राहत होता. त्याचा मुलगा सत्यवान हा सुंदर व गुणी होता. सावित्रीने त्याला पसंत केले.

घरी परत येऊन तिने आपली निवड वडिलांना सांगितली. तेव्हा तिथे नारदमुनी आलेले होते. नारदमुनींनी राजाला सांगितले की, सत्यवानाला बरोबर एका वर्षाने मरण येणार आहे; तेव्हा सावित्रीने दुसरा कुठला तरी मुलगा पसंत करावा, हे बरे. पण हे भविष्य कळूनसुद्धा सावित्रीने आपला विचार बदलला नाही. मात्र तिने सत्यवानाला वाचवण्यासाठी काय करावे हे नारदमुनींना विचारून घेतले.

सत्यवान-सावित्रीचे लग्न झाले. सावित्री आपला नवरा व सासू-सासर्‍यांसह जंगलात राहू लागली. भविष्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूला तीन दिवस राहिले तेव्हा सावित्रीने तीन दिवसांच्या उपासाचे व्रत सुरू केले. तिसर्‍या दिवशी सत्यवान कंदमुळे, लाकडे वगैरे आणण्यासाठी जंगलात निघाला. तेव्हा तीपण त्याच्याबरोबर गेली.

सत्यवान लाकडे तोडू लागला. पण तेवढ्यात त्याच्या छातीत दुखू लागले व तो खाली पडला. सावित्री त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली असताना प्रत्यक्ष मृत्युदेव यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला. सावित्री ज्या झाडाखाली बसली होती, ते झाड वडाचे होते. सावित्रीने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवरून खाली ठेवले. त्याचे मृत शरीर तेथेच सोडून ती यमराजाच्या पाठोपाठ जाऊ लागली.

यमराजाने तिला आपल्या मागोमाग येण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने उत्तर दिले, “पतीला सोडून मी कुठे जाणार?”

यमराजाने तिला अनेक वरदानांचे आमिष दाखवून परत जाण्यास सांगितले. तिच्या वडिलांना मुलगा होईल, तिच्या सासर्‍यांना त्यांचे राज्य परत मिळेल असे वर त्याने दिले. पण सावित्री त्याच्याबरोबर जातच राहिली. आपल्या चतुर बोलण्याने तिने त्याला संतुष्ट केले आणि यमराजाने तिला ‘पुत्रवती हो’ असा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद खरा होण्यासाठी यमराजाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले. सावित्री सत्यवानाला घेऊन आनंदाने घरी परतली.

या कथेवरून आपल्या लक्षात येते की, आपल्या देशात प्राचीन काळातही मुलींना शिक्षण दिले जात असे व त्या मोठ्या झाल्यावर त्यांचे लग्न होत असे; एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या पसंतीचा नवरा निवडण्याचेही स्वातंत्र्य होते.

पुढे वाचा:

Leave a Reply