आपल्याला भूक का लागते: लठ्ठपणाचा फार मोठा संबंध आपल्या आहाराशी असतो हे आपण वारंवार ऐकतो, वाचतो; पण आहारात आवश्यक असे सुयोग्य बदल करण्याची मात्र आपली तयारी नसते. याचे एक कारण म्हणजे आपल्या जिभेने आपल्याला तिचे पुरते गुलाम बनविलेले असते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हे सगळे बदल करायचे म्हणजे आपल्या जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करावे लागतात. ते करण्याची तर आपली मुळीच तयारी नसते.

म्हणूनच तर ‘आजच्या दिवस थोडेसे चालेल, उद्यापासून नको खायला’ असे आपण स्वत:ला समजावतो व त्या दिवसापुरती स्वत:ची सुटका करून घेतो. नाहीतर कधी अगदी पोटात खड्डा पडेल व चक्कर येईल इतके डाएटिंग करून दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पूर्वपदावर येतो. परंतु हे करताना आपण आपल्या शरीरावर किती अत्याचार करतो याचा आपण विचारसुद्धा करत नाही.

आपल्याला भूक का लागते, भूक म्हणजे काय
आपल्याला भूक का लागते?

मळमळ, अपचन, डोकेदुखी, गॅसेस, विविध मार्गांनी शरीर आपल्याला सांगते की ‘बाबारे! आता बस कर माझ्यावरचे अत्याचार’ पण आपण ऐकतो कुठे! इकडची पावभाजी, तिकडची दाबेली, इथली पाणीपुरी तर तिथला डोसा आपल्या या आतल्या आवाजाच्या संवेदना नष्ट करायला आपल्याला मदतच करतात. अशा वेळी वजनाचा काटा आणि चरबीचा साठा या दोन्ही गोष्टी मात्र वाढतच राहतात आणि उत्साह, काटकपणा, समाधानाची भावना मात्र लोप पावत जाते.

असे तुमच्याही बाबतीत होत असेल तर आपल्या आहाराविषयक तत्त्वज्ञानात बदल करण्याची तुम्हाला नितांत गरज आहे. नियंत्रित आहार असणाऱ्या व्यक्तीला कर्करोग, मोतीबिंदू, त्वचा, हृदय आणि मूत्राशयाचे आजारदेखील, वाटेल तितके अन्न खाण्याऱ्या व्यक्तींच्या मानाने कमी प्रमाणात दिसून येतात आणि दिसलेच तर ते आयुष्याच्या अगदी शेवटी शेवटी अवतरतात.

मित आहार आचरण आणि लंघन करण्याचे फायदे लोकांना माहीत नव्हते अशातली बाब नाही. चौदाव्या शताब्दीत लुईनी कॉरनारो नावाच्या एका लेखक असलेल्या इटालियन सरदाराने आपल्या आयुष्याची सुरुवात ऐशआरामात व मोठ्या खादाडपणाने केली. सदतिसाव्या वर्षी तो भयंकर आजारी झाला; पण यानंतर त्याने आयुष्याच्या शेवटपर्यंत नियंत्रित आहार घेण्याचे ठरविले आणि आरंभीच्या काळात बकासुराचे जीवन जगलेले असतानाही तो 103 वर्षांपर्यंत जगला.

नियंत्रित आहार हे हिंदू संस्कृतीचे एक अंग बनून राहिले आहे. कित्येक लोक शनिवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार, एकादशी वगैरेचे उपवास करताना आणि अनेक प्रकाराने आपल्या खाण्यापिण्यावर स्वयंप्रेरित प्रतिबंध लादून घेताना दिसून येतात. उपवासामुळे शरीरशुद्धी होते असे आयुर्वेद सांगते. या सर्वांचा अंशत: तरी आयुष्यवाढीकडे उपयोग होत असावा. इतर धर्मांतही अशी नियंत्रणे प्रचारात असल्याचे दिसून येते.

गरीब, मागासलेल्या देशांत अनेक लोक अर्धपोटी राहतात. मग अशा परिस्थितीत या देशात जनतेचे सरासरी आयुर्मान समृद्ध व प्रगत देशातल्या लोकांच्या मानाने अधिक का नसते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचे उत्तर असे की, मागासलेल्या देशातल्या लोकांचा आहार कमी असला तरी तो संतुलित, पौष्टिक आणि नियमितपणे उपलब्ध नसतो. अस्वच्छता आणि संसर्गजन्य रोगामुळेही मागासलेल्या देशांतल्या लोकांचे सरासरी आयुर्मान कमी होते.


आपल्याला भूक का लागते? – Aplyala Bhook Ka Lagte

पोटात अन्न नसले की भूक लागते. साधारणपणे जेवल्यानंतर तीन-ते चार तासांत पोट रिकामे होते. रिकाम्या पोटाच्या भिंती आकुंचन पावतात आणि हवा गेलेल्या रबरी फुग्याप्रमाणे एक दुसऱ्याशी भिडलेल्या असतात. अशा स्थितीत पोटाच्या हालचालींना सुरुवात होते. हालचाल लाटांच्या स्वरूपाची असते. प्रथम या लाटा हलक्या व मंदगती असतात; पण जसा वेळ निघत जातो तशा त्या तीव्र होतात आणि वरचेवर येऊ लागतात. काही वेळेस ‘गुर्र, गुर्र’ असा आवाजही होतो. याच ‘भुकेच्या संवेदना’ होतात. त्यांना संबोधूनच आपण ‘पोटात कावळे कोकलताहेत’ अगर ‘उंदीर पळताहेत’ असे म्हणून भूक लागली असल्याचे निदर्शनास आणून देतो.

जठराच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नामी युक्ती योजिली आहे. एका लांब नळीला लहानसा रबरी फुगा जोडून तो गिळायला दिला जातो. पोटात गेलेला हा फुगा फुगविला म्हणजे तो जठराच्या भिंतीला जाऊन भिडतो. नंतर जठराच्या हालचालीने फुग्यावर कमीअधिक दाब पडतो.

जठराच्या हालचालीच्या आलेखावरून भुकेच्या संवेदनेविषयी बरीच मनोरंजक माहिती हाती आली आहे. ती म्हणजे भुकेची संवेदना केवळ जठराकडून मिळणाऱ्या संदेशावरच अवलंबून नसते. कारण हा अवयव काढून टाकलेल्या व्यक्तींनाही भूक लागते, असे निरीक्षणास आले आहे; पण मेंदूतल्या हायपोथालमस भागात असणाऱ्या भक्षण (Feeding) आणि तृप्तता (Satiety) या दोन मज्जाकेंद्रांच्या उत्तेजित होण्याशी मात्र भुकेच्या संवेदनेचा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेला आहे. भक्षण या केंद्राला उत्तेजित करण्याने अतोनात खाण्याची इच्छा उत्पन्न होते. साधारण परिस्थितीत तृप्तता केंद्र भक्षण केंद्राला काबूत ठेवते आणि वैयक्तिक आहाराचे नियंत्रण करते.

रक्तातल्या ग्लुकोज साखरेशीही भुकेचा संबंध आहे आणि हा तृप्तता केंद्राच्या ग्लुकोज वापरण्याच्या क्षमतेशी निगडित आहे. समजा, काही कारणाने रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले, तर हे केंद्र उत्तेजित होते. भक्षण केंद्रालाही चालना मिळते. परिणामस्वरूप जठरात जोराच्या लाटा उठतात आणि भुकेची तीव्र संवेदना उद्भवते. याउलट स्थिती रक्तात ग्लुकोज भरपूर प्रमाणात असताना होते. तृप्तता केंद्राला पुरेसे ग्लुकोज मिळाल्याने भक्षण केंद्राच्या कार्यात खंड पडतो. जठरात भूकलहरी उत्पन्न होत नाहीत व भुकेच्या संवेदनेचा अभाव होतो.


भूक म्हणजे काय?

जर रोज नियमाने एका ठराविक वेळेस जेवत गेल्यास एक परावर्तक क्रिया तयार होते. मग एखाद्या दिवशी अन्न खाल्ले नाही तरी पोटात त्या ठराविक वेळी हालचाल सुरू होते आणि भूक जाणवते. भुकेची संवेदना शरीराला आहाराची आवश्यकता असल्याची पूर्वसूचना होय. या सूचनेचे पालन केले नाही आणि वेळेवर अन्न घेतले नाही तर क्षीणता येते.

एक-दोन दिवसांनंतर भुकेच्या संवेदनाही जाणवत नाहीत; पण दीर्घ काळ अपुऱ्या अन्नावर अर्धपोटी राहिल्यास भुकेची संवेदना वाढत जाते आणि शेवटी माणसाची सारी खटपट पोटासाठी अन्न मिळविणे याच एका लक्ष्यावर केंद्रित होते. इन्सुलिन हा शरीरातल्या स्वादुपिंडात तयार होणारा एक ग्रंथिरस आहे. हा शरीरपेशींना रक्तातली ग्लुकोज साखर पुरवितो आणि या इंधनाचे नियंत्रण करतो. रक्तात इन्सुलिनचे प्रमाण अधिक झाले म्हणजे सडकून भूक लागते. म्हणून अनेकदा इन्सुलिनला ‘भुकेचा ग्रंथिरस’ म्हटले जाते.

इन्सुलिनचे प्रमाण केव्हा अधिक होते, यावर पुष्कळ संशोधन झाले आहे. साखरेचा अंश पुष्कळ असणारे पदार्थ आणि मद्यसेवन करण्याने रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि मग हे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुलिनचे स्रवन होते. यामुळे रक्तातल्या ग्लुकोजचा स्तर थोड्याच वेळात घटतो; पण इन्सुलिनचे प्रमाण मात्र नंतर दोन-तीन तास वाढलेलेच राहते. यामुळे खूप भूक लागते आणि गोड खाण्याची जबर इच्छा होते.

ग्लुकोज साखरेचा चयापचय आणि इन्सुलिनचा स्राव नियमित करण्यास क्रोमियम या खनिज धातूचा अल्पसा भाग आहारात असणे आवश्यक असल्याचेही कळले आहे. एरवी हे खनिजद्रव्य कडधान्यातून पुरेशा प्रमाणात मिळते; पण दळण्याच्या आणि खाद्यपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेत हे नष्ट होते व याची उणीव उद्भवते. ईस्ट या द्रव्यात क्रोमियम विपुल असते, म्हणून याच्या सेवनानेही इन्सुलिनचा स्तर स्थिर राहतो.


भूक का लागत नाही? भूक न लागणे

शरीराच्या कोणत्याही भागात किटाणू, जिवाणू वगैरेसारख्या सूक्ष्म जंतूचे संक्रमण झाल्यानेही भुकेची संवेदना नष्ट होते. अशा स्थितीत सूक्ष्म जीवजंतूंनी रक्तात सोडलेले विष शरीरात भिनते. ते मेंदूत जाते आणि भूक केंद्राला निष्क्रिय करून भुकेच्या संवेदनेवर परिणाम दाखविते. अशा व्यक्तींना तापही येतो.

भुकेच्या संवेदनेने जठर भरलेले असल्यास अथवा जठराच्या भिंतीवर कसल्याही प्रकारचा दाब पडल्यास आपोआप नाहीशा होतात. एखादा पट्टा पोटावर घट्ट ओढून बांधण्यानेही असाच परिणाम होतो. पोटात एखादी गाठ अगर गळू झाल्यानेही भूक नष्ट होते. जठरावर सूज आली असता आणि जठराच्या कर्करोगाच्या स्थितीत मुळीच भूक लागत नाही.

भुकेची संवेदना शरीराला अन्नाची गरज असल्याचे सूचित करते. म्हणून रक्तक्षय, यकृताचे दोष आणि शरीर दुर्बल करणाऱ्या इतर आजारांच्या स्थितीत शरीराचे चयापचय घटल्याने फार थोड्या अन्नाची गरज असते आणि भुकेची संवेदनाही मंद राहते. तसेच चहा-कॉफी आणि तंबाखूनेही भूक लागत नाही.

भूक न लागण्याची तक्रार असणारा ‘अनरेक्सिया नर्व्होजा’ नावाचा एक मानसिक आजारही आहे. हा बहुतेककरून तरुण मुलीत दिसतो आणि वजन कमी करण्याच्या व सडपातळ राहण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित असतो. अनेकदा मित्र-मैत्रिणींनी लठ्ठपणावर टोमणे मारण्याने आणि चिडवण्याने याची सुरुवात होते.

भूक न लागण्याची तक्रार सामान्य आहे. एखाद्या वेळेस जेव्हा भूक लागत नाही, काही खावेसे वाटत नाही तेव्हा त्यामागे काहीतरी क्षुल्लक, स्थानिक कारण असते; पण ही तक्रार पुष्कळ दिवस टिकून राहिल्यास ती एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण ठरते. भुकेची संवेदना गुंतागुंतीची आहे. हिचे अनेक भाग आहेत. जठर मोकळे असले म्हणजे ही उत्पन्न होते.

अन्नरहित जठराच्या भिंती आकुंचन पावतात आणि भुकेची जाणीव करून देतात. मेंदूतील भूकेशी संबंधित केंद्राच्या कार्यकुशलतेमुळे भुकेच्या संवेदनेत बदल होतो आणि प्राणी अन्न घेण्यास अथवा न घेण्यास प्रवृत्त होतो. भक्षण केंद्राच्या निष्क्रिय अथवा नष्ट होण्याने भुकेची संवेदना ही पूर्णपणे नाहीशी होते. भूक मुळीच लागत नाही. तर तृप्तता केंद्र निष्क्रिय अथवा नष्ट झाल्यास व्यक्तीचे खाणे थांबत नाही.

भूक संवेदनेचा रक्तातल्या ग्लुकोज-साखरेच्या प्रमाणाशीही संबंध आहे. तृप्ती केंद्राला किती प्रमाणात ग्लुकोज मिळते त्यावरून त्याची कार्यक्षमता ठरते. समजा काही कारणाने रक्तात ग्लुकोज-साखरेचे प्रमाण घटले, तर तृप्ती केंद्र उत्तेजित होते आणि भक्षण केंद्राला चालना मिळते. परिमाणस्वरूप जठरात हालचाल वाढून जोरदार लाटा उठतात आणि भुकेची संवेदना तीव्रतेने जागृत होते.

रक्तात ग्लुकोज-साखर भरपूर प्रमाणात असल्यास उलट स्थिती होते. तृप्ती केंद्राला पुरेसे ग्लुकोज मिळाल्याने ते निष्क्रिय बनते आणि भक्षण केंद्रालाही निष्क्रिय बनविते. त्यामुळे जठरात भूकलहरी उत्पन्न होत नाहीत. संवेदनांचा अभाव होतो आणि भूक लागत नाही. खेळ आणि शारीरिक व्यायामाने चयापचय वाढते. ग्लुकोज-साखरेचे ज्वलन होते आणि रक्तात याचे प्रमाण घटते. परिणामस्वरूप सडकून भूक लागते. याउलट स्थिती बैठ्याजागी काम करणाऱ्या मंडळींची आणि मधुमेहासारख्या आजाराने पछाडलेल्या रोग्यांची असते. त्यांच्या रक्तात भरपूर प्रमाणात साखर राहते. त्यामुळे तृप्ती व भूक केंद्राचे कार्य मंदावते आणि भूक लागत नाही.


भूक कमी करण्याचे उपाय – भुकेची संवेदना कशी टाळावी?

डाएटिंग करताना भुकेच्या अप्रिय संवेदनांचा अनुभव टाळायचा असल्यास डाएटिंग करणाऱ्यांनी तणावाची स्थिती येऊ न देण्याचा निक्षून प्रयत्न करावा. अशा स्थितीत शरीरातली सहानुभावी मज्जासंस्था आणि वृक्कस्थ ग्रंथी उत्तेजित होतात. इतर ग्रंथी आणि इंद्रियांनाही उत्तेजन मिळते. यकृत आणि स्वादुपिंडाच्या सक्रियतेमुळे रक्तात ग्लुकोज-साखरेचे प्रमाण वाढते. परिणामस्वरूप इन्सुलिनचे प्रमाणही अधिक होते आणि भूक जाणवते.

भुकेची तीव्र संवेदना टाळण्यासाठी काही उपाय

अशा स्थितीत थोड्या-थोड्या वेळाने फळे, सॅडल, ताक, बिनसाखरेचे दुध, खजूर, ओटस इ. घेतल्याने भुकेची तीव्र संवेदना टाळता येऊ शकते. भूक मारण्यासाठी चहा-कॉफी मात्र अजिबात घेऊ नये. दोन खाण्यांमध्ये 2 तासांचे अंतर ठेवावे. नुसतेच द्रवपदार्थ घ्यायचे असतील तर हाच कालावधी कमी करता येईल.

डाएटिंग करताना नियमित व्यायाम घेण्याने दुहेरी फायदा होतो. एकतर शरीरात चयापचय वाढून कॅलरींचे अधिक ज्वलन होते आणि दुसरे म्हणजे रक्तातल्या इन्सुलिनचा स्तर निर्बंधित राहून भूक लागत नाही.

मधुमेहाच्या स्थितीत रक्तात ग्लुकोज-साखरेचा स्तर उंचावतो; पण त्याबरोबर इन्सुलिन ग्रंथिरसाचे स्रवन योग्य प्रमाणात होत नाही आणि भुकेची संवेदनाही उत्पन्न होत नाही. अशा स्थितीत डाएटिंग सुरू करणे धोक्याचे होऊ शकते. म्हणून कोणत्याही प्रकारचे डाएट सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे असते आणि भुकेचे संकट उत्पन्न होऊ न देता ते तडीस लावणे सोपे जाते.

डाएटिंग करताना ते आपल्या स्वास्थ्यासाठी आहे हा विचार पुन्हा पुन्हा केल्यास आणि आपण सडपातळ झाल्यावर कसे दिसू याचे आकर्षक चित्र मनासमोर उभे केल्यास भुकेची संवेदना आपोआप कमी होईल.

आपण जास्त का जेवतो?

कमी खाल्ल्याने माणूस एकंदरीत अधिक दिवस निरोगी जीवन जगतो, किंवा कमी खाण्याने नव्हे तर अति खाण्याने आजारांना आणि मरणाला आमंत्रण देतो हे कळूनही मोठ्या संख्येने लोक आपला आहार नियंत्रित करण्यास तयार होत नाहीत, असा अनुभव येतो.

कारण पथ्याच्या आहारात एकंदर खाद्यान्नाची मात्राच कमी भरत असल्याने पोट पूर्णपणे भरल्याचे समाधान होत नाही. अन्नाचा कंटाळा येतो. तृप्ती होत नाही आणि आयुष्यातल्या एका मोठ्या आनंदाला आपण मुकतो आहोत अशी भावना उत्पन्न होते. आहार नियंत्रित करून दीर्घायुष्य कमावले तरी पुढच्या विलंबित काळातही संक्षिप्त आहारच चालू ठेवावा लागतो आणि अधिक बंदिस्त जीवन जगावे लागते हा विचार त्रासदायक वाटतो.

पण हा समज चुकीचा आहे. कारण मिताहाराची सवय लागली की, मग आपण नेहमीपेक्षा कमी खात आहोत ही प्रारंभीची भावना दूर होते. तसेच नियंत्रित आहाराच्या परिणामी वजन घटल्याने व शरीराची कार्यक्षमता व स्फूर्ती वाढल्याने जो आनंद वाटेल त्यामुळे आपण मर्यादित आहार घेत आहोत अशी उगीचच वाटणारी चुटपुटही जाणवणार नाही.

जीवनसत्त्वे आणि ट्रिप्टोफेनची त्रुटी, फाजील मेदवृद्धी झालेल्या लोकांची खाण्याकडे भारी प्रवृत्ती असते. ऑक्स्फोर्ड येथल्या लिटरमोर इस्पितळाच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. ई.एम. कॅरोल यांच्या संशोधनाप्रमाणे या प्रवृत्तीचे कारण या लोकांच्या आहारात आणि पर्यायाने त्यांच्या शरीरात अनेक दिवसांच्या कुपोषणाने आलेली जीवनसत्त्वांची आणि ट्रिप्टोफेन या एका आवश्यक अमाइनो आम्लाची त्रुटी होय. ही द्रव्ये मिळविण्यासाठी त्यांचे शरीर धडपडत असते आणि म्हणून हे लोक अजाणपणे खात सुटतात.

ट्रिप्टोफेन, मज्जातंतूतून संदेश वाहण्यास मदत करणाऱ्या सिराटोनिन या द्रव्यात मोठ्या प्रमाणात असते. शरीरात ट्रिप्टोफेन कमी झाले म्हणजे सिराटोनिनही घटते आणि भूककेंद्राला योग्य संदेश मिळत नाही. यामुळे जेवढी भूक लागली असेल त्यापेक्षा अधिक भुकेचा भास होऊ लागतो आणि मग तो अधिक खाद्य गिळू लागतो. अनेकदा तहानेच्या संवेदनेचे चुकीचे विवरण होते आणि भूक लागल्याचा भास होतो. अशा प्रसंगी खऱ्या अर्थाने शरीराला पाण्याची गरज असते; पण आपण त्याला चुकीने भुकेची संवेदना समजून भराभर खात सुटतो.


आहार किती घ्यावा?

दिवसातून दोन वेळेस जेवणे उत्तम आहे. आपला जठराग्नी प्रज्वलित झाला की, त्यात आहुती दिली पाहिजे. ती योग्य आहाराची असावी. आपण अन्न खातो. या खाल्लेल्या अन्नावर संस्कार होतात. अनेक पाचक रस मिळून अन्न पचते. त्यातील पोषक द्रव्ये रक्तात शोषली जातात. ही ऊर्जा असते. ज्यांना जास्त श्रमाचे काम करायचे, त्यांनी आवर्जून न्याहारी करावी.

सकाळचे जेवण बाराच्या अगोदर घ्यावे. 4 वाजता एखादे फळ खावे. दुसरे जेवण संध्याकाळी घ्यावे. दुपारचा वेळ पित्ताचा कालावधी आहे. संध्याकाळी पित्ताचा कालावधी कमी असतो. रात्री उशिरा पचन नीट होत नाही. कारण रात्री एन्झाईम्स तयार होत नाहीत. म्हणून सायंकाळी 7 च्या आत जेवावे. रात्री 10 वाजता भूक लागते. ती भूक खोटी असते. या वेळी ग्लासभर पाणी प्यावे.

सकाळी 10 ते 10.30 ला जेवल्यास दुपारी भूक लागते. यावेळी फळ खावे. फळ हे उत्तम नैसर्गिक अन्न आहे. ते पचायला उत्तम आहे. जड अन्न सकाळी न्याहारीत घ्यावे. सायंकाळी हलका आहार घ्यावा.

किती खायचे?

शरीरासाठी अन्नाची गरज आहे; पण किती खायचे? आवडते म्हणून भरमसाट खाणे बरोबर नाही. याचा अर्थ असा आहे की, पोटभर खायचे नाही. दोन घास भूक राहील एवढेच जेवले पाहिजे.

आपण जेवलो की ते अन्न जठरात जाते. आणि जठराची आकुंचन-प्रसरण क्रिया सुरू होते. पोटभर जेवल्याने ही क्रिया नीट होत नाही. त्याकरिता जठरात थोडी जागा शिल्लक असावी लागते.

यासाठी साधा नियम असा आहे, अर्धे पोट अन्नाने भरावे. पावभाग द्रव आहार घ्यावा. यात ताक-पाणी येईल. उर्वरित चौथा हिस्सा हवेसाठी मोकळा सोडावा. यामुळे पचन नीट होण्यास मदत होते.

ढेकर येईपर्यंत जेऊ नये. ढेकर आला याचा अर्थ होतो की, उरलेला भागही आपण अन्नानेच भरला आहे.

दिवसाची सुरुवात करा पाणी पिण्यापासून/ लिंबूपाण्यापासून

आपल्या शरीरात जितके जास्त पाणी जाईल, तितके ते आपल्या शरीरासाठी हितकारक ठरते. चहा, कॉफी, किंवा फ्रूट ज्यूस, सूप याच्याऐवजी पाणी हे आपल्या शरीराला शुद्ध करून आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवते. त्यासाठी दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी रोज गरम पाणी/लिंबूपाणी पिणे चांगले असते.

अजून वाचा:

Leave a Reply