लठ्ठपणा कशामुळे होतो: रांगेत उभा असलेला एकजण आपल्या मागे उभ्या असलेल्या माणसाला चिडून म्हणतो, ‘‘केव्हाचं सांगतोय, धक्का देऊ नका, धक्का देऊ नका; पण तुमचं धक्के देणं चालूच आहे!’’ यावर तो माणूस म्हणतो, ‘‘अहो, मी फक्त श्वास घेतोय!’’ लठ्ठ लोकांची टवाळी करणारे असे अनेक विनोद तुम्हीही वाचले असतील. लॉरेल अ‍ॅण्ड हार्डीच्या – जाड्या-रड्याच्या दुकलीने तुम्हालाही पोट धरून हसवले असेल.

विनोदाचा भाग वगळता, लठ्ठपणा म्हणजे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचं उगमस्थान असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लठ्ठपणा कशामुळे होतो-लठ्ठपणा मुळे होणारे आजार
लठ्ठपणा कशामुळे होतो-लठ्ठपणा मुळे होणारे आजार

लठ्ठपणा विषयी थोडक्यात माहिती

Table of Contents

लठ्ठ लोकांना माहीत असते की, त्यांची शरीरयष्टी इतरांच्या थट्टेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्यात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. त्याच्या परिणामी त्यांची स्वत:बद्दलची छबी विकृत होऊन त्यांची आत्म-प्रतिमा खालावते. ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच सामाजिक, वैयक्तिक समायोजनात अनेक अडथळे निर्माण होतात.

लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर असते. जिने चढणे-उतरणे, वेगाने चालणे, चपळतेने काम करणे अशा गोष्टी सहज न जमण्यापासून हृदयविकार, वाढता रक्तदाब व मधुमेह असे नाना प्रकारचे आजार परस्परांच्या हातात हात घालून शरीरात प्रवेश करतात.

अतिलठ्ठ व्यक्तीचा इतरांवर पडणारा प्रथम प्रभाव (First Impression) हा सहसा फारसा अनुकूल नसतो. याउलट प्रमाणबद्ध देहयष्टीकडे आपले डोळे आपोआप आकृष्ट होतात. म्हणजेच एकंदरीत उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक असते. आपण प्रमाणबद्ध असावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. व्यक्तिमत्त्वात प्रमाणबद्ध शरीरयष्टीची भूमिका महत्त्वाची असते; परंतु प्रमाणबद्धतेचे महत्त्व फक्त दिसण्यापुरते मर्यादित नाही.

निरामय आरोग्य राखण्यासाठी शरीराचे वजन वाजवीपेक्षा जास्त नसावे. आपल्या शरीराचा आकार, रचना व ठेवण जनुकीय असते. तरीही आपले वजन योग्य तेच ठेवण्याची जबाबदारी मात्र आपलीच असते. शरीराची प्रमाणबद्धता दिसण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. एखाद्या वेळी रंग-रूप फारसे आकर्षक नसले आणि शरीर प्रमाणबद्ध असले तर अशी व्यक्ती आकर्षक दिसू शकते. आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी प्रमाणबद्धता ही अतिशय आवश्यक बाब आहे. शरीराची प्रमाणबद्धता ज्या सीमेवर संपते तिथून लठ्ठपणाला सुरुवात होत असते.

वय, वजन आणि उंची यांच्या ठराविक मोजमापानुसार शरीराची प्रमाणबद्धता निश्चित करण्यात येत असली तरीही हे प्रमाण नक्की करण्यासाठी वजन, उंची, वयाच्या तक्त्यापेक्षाही आपले डोळे जास्त सजग असतात. एखादे शरीर प्रमाणबद्ध आहे की नाही, हे आपले डोळे लगेच सांगतात. खरं तर प्रमाणबद्ध शरीरच डोळ्यात भरत असते. आकर्षक प्रमाणबद्ध शरीर पाहिल्याबरोबर आपणही असे असायला हवे असे वाटते; पण शरीरात चरबी वा मेदाचे प्रमाण जास्त झाले की प्रमाणबद्धतेचे गणितच बिघडते.

खरं म्हणजे मेद हा आपल्या शरीरातील अत्यंत आवश्यक असा घटक. सृष्टीनिर्मितीनंतर उत्क्रांती घडत असताना माणसाच्या शरीरावरचे केस कमी झाले व त्याच्या त्वचेखाली मेदाच्या पेशी तयार झाल्या. या मेदनिर्मितीचा मुख्य उद्देश होता आणीबाणीच्या काळात म्हणजे कुषोपण, अवर्षण, दुष्काळ इ. च्या वेळी या मेदपेशींमधून ऊर्जा मिळवता यावी व पर्यायाने जिवंत राहता यावे.

अन्न व पाण्याची गरज या मेदपेशी भागवतात. उत्क्रांतीकालीन मानवाला सकाळचे अन्न मिळाल्यावर संध्याकाळी ते मिळेलच याची शाश्वती नव्हती. शिवाय पोट भरण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी त्याला प्रचंड कष्ट करावे लागत; पण आज मात्र अशी परिस्थिती नाही. तरीही आपल्या त्वचेखालील मेदाचा स्तर मात्र कायम आहे.

आज आपल्या जीवनात धावपळ वाढली असली तरी शारीरिक श्रम मात्र फारच कमी आहेत. शिवाय एकेकाळी फळं, कंदमुळं, कच्चे अन्न, भाज्या इ. खाणारा माणूस आता पावभाजी, पिझ्झा, डोसा इ. पदार्थांचा आस्वाद घेत आहे. मग मेदपेशींचा आकार व संचय वाढल्यास नवल ते काय? पण ‘अतिपरिचयात अवज्ञेत अवज्ञा’ म्हणतात तसे प्रमाणापेक्षा जास्त मेदपेशींचा संचय हा घातकच. तो केवळ आपल्या सौंदर्याला बाधा आणतो असे नाही तर अनेक आजारांना शरीरात सुखा-सुखी प्रवेश करू देतो.

लठ्ठपणा म्हणजे काय?

साधारणपणे शरीरातील चरबीचे वजन जास्त असण्याला लठ्ठपणा म्हटले जाते. अधिक चरबीयुक्त आहाराचे सेवन करणे हेच याचे मुख्य कारण आहे. आपण जे काही खात असतो, त्यातील अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात आपल्या शरीरात साठवली जाते. ही अतिरिक्त चरबी शरीराच्या अनेक भागात जमा होऊ लागते. ही अतिरिक्त चरबी नियमितपणे व्यायाम करून कमी करता येऊ शकते.

आपल्यापैकी बहुतेक जण प्रमाणबद्ध नसतात; म्हणजे काय? एक तर प्रमाणापेक्षा कमी असतात किंवा प्रमाणाबाहेर वाढलेले तरी असतात. प्रमाणापेक्षा कमी आकाराचे शरीर असले तर दिसायला ते फारसे वावगे वाटत नाही. परंतु प्रमाणाबाहेर वाढलेले शरीर दिसायला अतिशय बेंगरूळ वाटते. शरीराची अशा प्रकारे झालेली प्रमाणाबाहेरची वाढ म्हणजे लठ्ठपणा होय. पोटाचा वाढत जाणारा घेर, नितंबांचा वाढलेला आकार, खाली लोंबणारी हनुवटी, दंड, मांड्या, पोटऱ्या या ठिकाणाचे थुलथुलीत दिसणारे स्नायू. अशा प्रकारचे दिसणारे शरीर म्हणजे अप्रमाणबद्ध शरीर होय. यालाच लठ्ठपणा म्हणतात.

वजन जसे एका दिवसात किंवा आठवड्यात कमी करता येत नाही. त्याचप्रमाणे ते एकाच दिवसात वाढतही नाही. प्रत्यक्ष शरीराचा आकार हळूहळू वाढत असला तरी काही सूचक लक्षणे लठ्ठपणाची नांदी करणारी असतात. ती लक्षणे पुढीलप्रमाणे –

लठ्ठपणा वाढण्याची शारीरिक लक्षणे

 1. अतितहान व अतिभूक लागणे.
 2. कमी श्रमानेही थकवा येणे व धाप लागणे.
 3. रुक्ष त्वचा.
 4. झोप जास्त येणे .
 5. हिमोग्लोबीन कमी असणे.
 6. अधूनमधून छातीत दुखणे.
 7. सांधेदुखी.
 8. चक्कर येणे.
 9. वंध्यत्व.
 10. अशक्तपणा.

लठ्ठपणा वाढण्याची मानसिक लक्षणे

 1. मोठा आवाज सहन न होणे.
 2. सतत निरुत्साही असणे.
 3. नकारात्मक मानसिकता, न्यूनगंड असणे.
 4. शरीरसंबंधांची इच्छा कमी होणे.
 5. नैराश्य.

ही सगळी लक्षणे एकाच व्यक्तीत वा एकदम दिसत नसली तरी बहुतांश स्थूल व्यक्तींमध्ये यातील अनेक लक्षणे दिसून येतात. तेव्हा ‘सावध ऐका, पुढल्या हाका’ या उक्तीप्रमाणे केवळ शारीरिक आकारमानापेक्षा या लक्षणांचाही विचार करायला हवा.


लठ्ठपणा कशामुळे होतो

लठ्ठपणा एक आजार

लठ्ठपणा ही केवळ सौंदर्याशी संबंधित असलेली समस्या आहे, असे नाही तर ती एक आरोग्यविषयक समस्या आहे. आपण किती चांगले आणि सुंदर दिसू शकतो केवळ याच्याशी लठ्ठपणाचा संबंध नाही, तर आपण किती दिवस चांगल्या रीतीने जगू इच्छितो याच्याशी आहे.

वास्तविक पाहता लठ्ठपणा हा एक आजार आहे. एकट्या अमेरिकेत लठ्ठपणामुळे वर्षाला तीन लाखांहून अधिक लोक मृत्यू पावतात. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता या संख्येने धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूलाही मागे टाकले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 1997 सालीच अशी घोषणा केली होती की, लठ्ठपणा हा दीर्घकालीन आजार असून, तो विकसित आणि विकसनशील देशांत पसरलेला आहे. या आजाराने मुले आणि प्रौढ व्यक्ती अशा सर्वांना ग्रासले आहे. भारतातील लठ्ठ व्यक्तींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन 2025 सालापर्यंत भारत मधुमेहाची व 2020 पर्यंत हृदयरोगाची जागतिक राजधानी बनेल असे तज्ज्ञांनी भाकीत केले आहे. अनेक आजारांचे माहेरघर असा हा आजार आहे.

नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये दी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनने एक अहवाल प्रकाशित केला असून त्यात असे नमूद केले आहे की, लठ्ठपणा हा सर्वाधिक व्यापक आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे. भुकेचे व्यवस्थापन आणि ऊर्जेचा वापर याच्याशी संबंधित असलेल्या गुंतागुंतीच्या घटकांवर आधारित असलेला हा आजार आहे. यामध्ये आनुवंशिकता, शारीरिक बायोकेमेस्ट्री आणि न्यूरोसायन्स शिवाय पर्यावरण, मानसशास्त्र आणि सांस्कृतिक घटकांचाही समावेश आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या न्यूट्रिशिनल समितीच्या उपाध्यक्षांनी असे म्हटले होते की, लठ्ठपणा स्वत:च एक मोठा आजार झाला आहे.

लठ्ठपणाचे सोबती

जास्तीचे वजन आणि लठ्ठपणा यामुळे मृत्युदर वाढतो. जसजसा बीएमआय वाढत जातो तसतसे मृत्यूचे प्रमाण वाढते. लठ्ठ नसलेल्या व्यक्तांच्या तुलनेत लठ्ठ व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाण 5 ते 10 टक्के अधिक आहे. लठ्ठ लोकांचा मृत्युदर 10 ते 25 टक्के अधिक आहे. लठ्ठपणा आणि मृत्यूचे हे प्रमाण जगातील सर्वच जातीच्या आणि वंशांच्या लोकांत सारखेच असल्याचे आढळून आले आहे.

लठ्ठपणामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते आणि फक्त हृदयविकारामुळे अकाली होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वच देशांत सर्वाधिक आहे. एका अभ्यासानुसार लठ्ठ व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण 500 टक्के वाढत असल्याचे आढळून आले आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकाराने मृत्यू पावण्याचे प्रमाण वाढते, तसेच त्यांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. लठ्ठपणामुळे मुले आणि तरुणांतही हृदयविकारांचे प्रमाण वाढले आहे.

याशिवाय लठ्ठपणामुळे रक्तदाबाचा त्रास आणि मधुमेह होण्याची शक्यता 300 टक्क्यांनी अधिक होते.

लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यताही अधिक निर्माण होते. लठ्ठपणामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट होते. महिलांमध्ये लठ्ठपणामुळे सर्व प्रकारच्या कर्करोगांना बळी पडण्याचे प्रमाण 5.9 टक्के वाढते. पुरुषात हेच प्रमाण 9.7 टक्क्यांनी वाढते. ‘द एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ने सांगितले आहे की, स्तन, कोलॉन, एंडोमेट्रियम, किडनी आणि इसोफेगसच्या कर्करोगासाठी लठ्ठपणा 33 टक्के जबाबदार आहे. प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाची शक्यताही लठ्ठपणामुळे 39 टक्के वाढते.

लठ्ठपणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी वेळ आता आली आहे. लठ्ठपणा किंवा पोटाचा घेर वाढलेल्या माणसाला पचनसंस्थेचे विकार जडलेले असतातच. गॅसेस होणे, अपचन होणे, बद्धकोष्ठता आणि मलावरोध यांच्यापैकी काही किंवा सर्वच विकार त्यांना जडलेले असतात. या विकारांच्या जोडीने मधुमेह आणि रक्तदाब हे विकारही अशा लोकांना जडण्याची शक्यता असते.

थोडक्यात काय तर लठ्ठपणा येतो तेव्हा तो एकटा येत नाही तर एका बाजूला तो आपली कार्यक्षमता कमी करतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, पचनसंस्थेचे विकार, मूत्रपिंडाचे विकार आणि अशा विकारांची फौजच आपल्यासोबत घेऊन येतो.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले शरीर एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट रीतीने स्वाभाविकत: वाढत असते. त्यानुसार आपल्या शरीराला आधार देण्याचे काम करणारे पायातील हाडे, सांधे आणि पाठीचा कणा तसेच कंबर काम करीत असते. पोटाचा घेर वाढल्यामुळे तसेच एकूण शरीराचे वजन अधिक वाढल्यामुळे या हाडांवर आणि सांध्यांवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे वजन अधिक वाढलेल्या व्यक्तींना पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखी यासारखा त्रास होत असतो. अगदी उठायला, बसायला आणि चालायलाही त्रास होतो. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी आपण आपले वजन नियंत्रणातच ठेवायला हवे.

हे सर्व दूर ठेवायचे असेल तर लठ्ठपणा कमी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही.

लठ्ठपणा कसा वाढतो?

उष्मांक देणारे घटक अधिक प्रमाणात खाल्ल्यास, शरीरातील काही पेशी हे जास्तीचे उष्मांक आपल्या आत मेदाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. त्या मग फुगतात आणि शरीराला लठ्ठपणा प्रदान करतात. याउलट परिस्थितीत, म्हणजे शरीराचे वजन घटले असता या पेशीतला मेदाचा भाग कमी होतो आणि त्या रोडावतात.

शरीरात मेद साठवून ठेवणाऱ्या या पेशींची संख्या अंदाजे 300 कोटी असते; पण, त्यांची वाटणी शरीरात सारख्या प्रमाणात झालेली नसते. स्त्रियांत या पेशी मांड्या, कटिप्रदेश आणि नितंबांवर अधिक प्रमाणात, तर पुरुषात या पेशी पोटाची त्वचा आणि मांसपेशीत मोठ्या संख्येने गोळा झालेल्या असतात. मेदपेशींची संख्या आणि शरीरातले त्यांचे हे वास्तव्य आयुष्याच्या सुरुवातीलाच ठरलेले असते व ते जनुकीय असते, असे मानले जाते.

सबंध शरीरात पोटच असा एक भाग आहे की, ज्याची पुढची बाजू लवचीक असल्याने आधारहीन असते. मागच्या बाजूचा पाठीचा कठीण कणाच त्याचा भार सहन करतो.

शरीराच्या भाराचा मानवी आयुष्याशी घनिष्ठ संबंध कळल्यापासून साहजिकच वजन का वाढते आणि वाढलेले वजन कमी कसे करावे, या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वळले आहे. या समस्येची अनेक कारणे असली, तरी शरीराच्या गरजेपेक्षा अधिक अन्नाचे सेवन व व्यायामाचा अभाव यांना पहिल्या क्रमांकाचे स्थान आहे. अधिक मात्रेत घेतलेल्या अन्नाचे चरबीत रूपांतर होते. ती शरीरात साठविली जाते आणि वजन वाढते. याउलट अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीज कमी केल्या म्हणजे शरीराला आपलीच चरबी वापरून आवश्यक शक्ती मिळवावी लागते आणि वजन घटते.

साधारण राहणीच्या माणसाला दररोज 3,000 कॅलरीज देणाऱ्या अन्नाची गरज असल्याचे खाद्यान्नावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे; पण स्थूल शरीराचे लोक मूळ गरजेहून बरेच अधिक अन्न घेत असल्याचे निरीक्षकांना दिसून आले आहे.

लठ्ठपणा आपल्यासाठी धोकादायक असेल तर त्याचे कारणही माहीत असायला हवे. ते माहीत झाल्याशिवाय तो कमी कसा करायचा ते कळणार नाही आणि मुळात लठ्ठपणा वाढू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, हेही लक्षात येणार नाही.

लठ्ठपणा वाढण्याची मुख्य कारणे

 1. गरजेपेक्षा अधिक व अयोग्य आहार
 2. शारीरिक श्रमांचा अभाव
 3. आनुवंशिकता
 4. पचनसंस्था व चयापचयाचा दोष
 5. मेदसंग्रहाचा आकार
 6. मानसिक ताण
 7. अंतस्रावी ग्रंथीचे अनियमित कार्य व त्यासंबंधी विकार.
 8. हृदय, मूत्रपिंड, यकृत यासंबंधी विकार. कॅन्सर, मधुमेह इ.
 9. काही औैषधे – उदा. कॉर्टिकोस्टेरॉइडस् – गुंगी आणणारी औषधे – अ‍ॅण्टीडिप्रेसण्ट औषधे इत्यादी.
 10. सगर्भावस्था
 11. काम करण्याची पद्धत
 12. बदललेली जीवनशैली

काही व्यक्ती दिवसभर एका जागी बसून काम करतात. त्यामुळे त्यांच्या शरीराची जराही हालचाल होत नाही. सरकारी आणि खाजगी कार्यालयात काम करणारी बहुतेक माणसे असेच काम करतात. पेढीवर काम करणारे व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यापैकी कुणाच्याच फारशा शारीरिक हालचाली होत नाहीत. मध्येच कधी ते आपल्या जागेवरून उठतात, ते फक्त काही खाण्यासाठी किंवा चहापान घेण्यासाठी.

अशा प्रकारे सतत एकाच जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराची हालचाल होत नाही, म्हणजे जास्तीची ऊर्जा वापरली जात नाही. ही ऊर्जा फॅटस्च्या स्वरूपात जमा होऊन लठ्ठपणा वाढणार नाही तर काय होईल?

आधुनिक काळात जीवनशैली खूप बदलली आहे. अनेक प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जास्तीच्या शारीरिक त्रासांपासून बचाव व्हावा यासाठीच बहुतेक सुखसुविधांची साधने निर्माण झाली आहेत. या साधन-सुविधांमुळे जीवनशैली बदलली आहे. याचा परिणाम थेट फॅटस्चे प्रमाण वाढण्यावर झाला आहे.

लोकांची जीवनशैली अतिशय घाई-गडबडीची आणि तणावग्रस्त झाली आहे. चांगले खाण्यासाठी आणि योग्य प्रमाणात व्यायाम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही असे ते समजतात.

सगळ्यांचेच वाहन वापरण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, आपण जराही पायी चालण्याचे कष्ट घेत नाही.

दळणे, कांडणे, वाटणे, कुटणे अशा शारीरिक कष्टाच्या कामापासून मिक्सर-ग्राईंडर, वॉशिंग मशीन अशी साधने वापरल्यामुळे महिलांची सुटका झाली आहे. धुणे, पुसणे, घासणे अशा कामापांसून गृहिणींची सुटका कामवाल्या बाईने केली आहे. साधन-सुविधांमुळे शारीरिक कष्टाची कामे कमी होण्याचा अपरिहार्य परिणाम शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढण्यात झाला आहे.

थोडक्यात काय तर आधुनिक म्हणून आपण स्वीकारलेली जीवनशैली आपल्या शरीरातील फॅट्स आणि परिणामी आपला लठ्ठपणा वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.

लठ्ठपणा वाढण्याची अजून काही कारणे

 1. अज्ञान

लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर आजारांबाबत अनेक लोकांना पुरेशी आणि योग्य माहिती नसते. मुळात आपण अधिक उष्माकांचा आहार घेत आहोत हेच बऱ्याच जणांना माहिती नसते.

 1. डाएटची फॅशन

वजन कमी करण्याबाबत लोकांना चुकीची माहिती देणे आणि चुकीच्या पद्धतीचा वापर करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झाल्यामुळेही लोक लठ्ठ व्हायला लागले आहेत. चुकीच्या डाएटने शरीरात जास्तीची फॅट्स निर्माण होतात.

 1. संभ्रम

अनेक डाएट प्लॅनमध्ये परस्परविरोधी सल्ला देऊन लोकांना संभ्रमात टाकले जाते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यातील कोणताही एक फॉर्म्युला लोकांसाठी उपयुक्त ठरलेला नाही. त्यामुळे अनेक लोक मग लठ्ठपणा कमी करण्याचे प्रयत्न सोडून देतात.

 1. आहार-उद्योग

आहार-उद्योग आपल्या भल्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर करतो की, त्यामुळे लोकांत लठ्ठपणा कमी होण्याऐवजी पसरत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे लोकांमधील लठ्ठपणा वाढविण्यास आपण जबाबदार आहोत, ही जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाहीत. याचे उदाहरणच बघायचे झाले तर अमुक चहा घ्या व महिन्याला इतके किलो वजन कमी करा. जेवणाऐवजी ही पावडर दुधातून घ्या व वजन कमी करा. आयुर्वेदिक, हर्बल, निसर्गोपचार अशा अनेक नावाखाली ‘कष्ट’ न करता वजन कमी करण्याची लाटच आली आहे. हे अतिशय घातक आहे. या उपायांनी तात्पुरते कमी झालेले वजन नंतर दुपटीने वाढते. परिणामी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात व नैराश्य येते.

 1. तणावमुक्तीसाठी खाल्ल्याने वजन वाढते

तणावग्रस्त जीवन जगणे ही तर आता नित्याचीच बाब झाली आहे. तणाव दूर ठेवण्यासाठी काही लोक खाण्याला प्राधान्य देतात. खाताना त्यांना इतका आनंद मिळतो की त्यामुळे काही काळ तणाव दूर ठेवता येतो; पण अशा खाण्यामुळे आपला लठ्ठपणा आणि वजन वाढते, याकडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे तणावमुक्तीसाठी खाण्याला पर्याय शोधायला हवा.

लठ्ठपणामुळे अवयवांचे वजन वाढते का?

वजन वाढण्याची आपल्या शरीरात होणारी प्रक्रिया सर्वांत आधी समजून घेणे गरजेचे आहे.

आपले शरीर पेशी, उत्ती, हाडे आणि स्नायू यापासून बनलेले आहे. शरीरातील या घटकांची रोजच्या रोज झीज होत असते आणि त्यांची नवनिर्मितीही होत असते. याशिवाय आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. शरीरात असलेल्या या सर्व घटकांचे वजन म्हणजे आपल्या शरीराचे वजन होय. लठ्ठपणामुळे आपल्या शरीराचे वजन वाढते तेव्हा या सर्व गोष्टींच्या शरीरांतर्गत वजनात वाढ होते का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.

लठ्ठपणामुळे किंवा फॅट्समुळे आपल्या शरीराचे वजन वाढते तेव्हा पेशी, उती, हाडे आणि स्नायू मजबूत होत नाहीत आणि त्यांचे वजनही वाढत नाही. लठ्ठपणामुळे वजन वाढते तेव्हा त्यात खऱ्या अर्थाने फक्त शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढत असते.


लठ्ठपणा मुळे होणारे आजार

लठ्ठपणा हा अनेक आजारांचे माहेरघर आहे असे आपण वारंवार ऐकतो, त्यातील मोठमोठ्या आजारांची नावे तर आपल्याला अगदी परिचित असतात उदा. मधुमेह, हृदयविकार; पण हे आजारही आपल्याला एकाच दिवसात होत नसतात. शिवाय केवळ हेच आजार झाल्यावर आपल्याला जाग यावी असेही काही नाही.

लठ्ठपणा या आजारांबरोबर अनेक त्रासदायक विकारांना सोबत घेऊन येत असतो. या विकारांकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे असते. अन्यथा पुढे ते उग्र स्वरूप धारण करतात व त्यांची परिणती शस्त्रक्रिया, शारीरिक अपंगत्व वा परावलंबित्व, आयुर्मर्यादा कमी होणे यात होते. शिवाय औषधं, पथ्य इ. कायमस्वरूपी मागे लागतात ते वेगळेच. याने तो माणूस ‘सामान्य व्यक्ती’ म्हणून जगणे पार विसरूनच जातो. तो केवळ ‘रुग्ण’ म्हणून जगायला लागतो व त्याची मानसिकताही नकारात्मक होत जाते.

कुटुंबावर अनावश्यक आर्थिक भार पडतो तो वेगळाच. एकवेळ आर्थिक भाराकडे कानाडोळा करता येईल; पण ‘जीवन अनमोल आहे’ हे तर प्रत्येकजणच मान्य करेल. लठ्ठपणा या अनमोल जीवनाला अकाली संपवतो हे वास्तव भयानक आहे. लठ्ठपणा आपल्या सोबत कोणकोणते आजार घेऊन येतो, त्याचे परिणाम काय होतात ते पाहू.

कमी आयुर्मान

आधुनिक संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, चयापचय क्रिया मंद असल्याने अतिस्थूल व्यक्तीचे त्यामुळे कुपोषण होते व वार्धक्य येण्याची क्रिया वेळेपेक्षा लवकर घडते.

रोगप्रतिकारक्षमता कमी

पांढऱ्या पेशींमधील फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले की, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. लठ्ठपणामुळे शरीरातील फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते परिणामी स्थूल व्यक्तींच कोणत्याही आजाराला पटकन बळी पडतात.

थकवा

लठ्ठ व्यक्ती थोड्याशा श्रमांनीही थकत असल्याने सुस्त व निरुत्साही असतात. रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचणे आवश्यक असते; परंतु चरबीच्या थराने रक्तप्रवाह सुरळीत व्हायला अडथळे येतात व प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोहोचत नाही. परिणामी स्थूल व्यक्ती पटकन थकतात.

सांधेदुखी, कंबरदुखी व टाचदुखी

अतिरिक्त वजनामुळे सांध्यांची झीज होते. सांध्यामधील कुर्चा या रबरी जाड गाद्यांसारख्या काम करतात; परंतु वजन वाढल्याने विशेषत: शरीराचा भार सहन करणाऱ्या सांध्याची उदा. खुबे, कंबर, गुडघे, कणा इ. झीज लवकर होते. यालाच वैद्यकीय भाषेत ऑस्टीओआर्थरायटीस म्हणतात.

अतिरिक्त वजनाचा भार पोटावरही पडत असतो, त्यामुळे पाठीकडून पोटाकडे येणाऱ्या स्नायूंवर खूप ताण येतो. तसेच आपण बसलेले असताना शरीराच्या वरच्या भागाचे वजन कंबर पेलत असते.

वाढलेल्या वजनाचा भार तेथील स्नायूंना पेलवता येत नाही व कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. आपल्या शरीराच्या संपूर्ण वजनाचा भार टाचेतील कॅलकॅनियम हे हाड पेलत असते. वजन वाढल्यावर तेथील स्नायुबंध काट्याप्रमाणे कडक होतात व पाय जमिनीवर टेकल्यावर दुखतो.

या तीनही विकारांत वेदना, सूज वा हालचालींना मर्यादा अटळ असतात, त्यामुळे व्यायाम करताना अधिकच त्रास होतो व परिणामी सांधेदुखी, वजनवाढ असे दुष्टचक्र तयार होते.

व्हेरीकोज व्हेन्स

स्थूल व्यक्तींमध्ये शीरांमधील झडपांच्या अकार्यक्षमतेमुळे रक्त शीरांमध्ये गोठते. यामध्ये सूज, वेदना व क्वचित प्रसंगी तापही येतो. या विकाराची तीव्रता वाढल्यास रक्ताची एखादी गुठळी रक्तप्रवाहाबरोबर मेंदू, फुप्फुस, हृदय इ. महत्त्वाच्या अवयवांमध्ये अडकू शकते व आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते.

श्वसनसंस्थेवर होणारा परिणाम

लठ्ठपणामुळे फुप्फुसांची प्राणवायू आत घेण्याची क्षमता व कार्बनडायऑक्साइडची निचरा करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे धाप लागते व श्वासही जोरात घ्यावा लागतो. त्यामुळे श्वासांची संख्याही जास्त असते. दोन श्वासांमधील जास्त अंतर किंवा अत्यंत मंद लयीने होणारा श्वासोच्छ्वास ही प्राचीन वैद्यकात दीर्घायुष्याची किल्ली मानली आहे; पण स्थूल व्यक्तींना खूप भरभर श्वास घ्यावा लागत असल्याने त्यांचे सरासरी आयुर्मान कमी असते.

पचनसंस्थेवर होणारा परिणाम

स्थूल व्यक्तींमध्ये चयापचय क्रियेचा (metabolism rate) मंद असल्याने अपचन, पित्ताशयाचे विकार, बद्धकोष्ठता, आम्लपित्त इ. विकार आढळून येतात. शिवाय पोटाचा आकार मोठा असल्याने त्यांना हार्निया होण्याची शक्यताही जास्त असते.

मधुमेह

वैद्यकशास्त्रात असे म्हणतात की, (obesity and diabetes go hand in hand) म्हणजे लठ्ठपणा व मधुमेह हातात हात घालूनच येतात आणि ते खरेच आहे. लठ्ठपणामुळे स्वादुपिंड या ग्रंथीची इन्सुलिन स्रवण्याची कार्यक्षमता कमी होते. परिणामी रक्तातील साखरेचे पचन योग्य प्रमाणात होत नाही व रक्तशर्करा वाढते. सामान्य भाषेत यालाच ‘शुगर वाढली’ असे आपण म्हणतो. मेदपेशींच्या आकारमानामुळे स्वादुपिंडाची संवेदनशीलता कमी होते. म्हणूनच आनुवंशिकता नसेल तरीही लठ्ठ व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. मधुमेह आणि लठ्ठपणा असे दोन्ही एकत्रच असतील तर किडनींचे कार्य बंद पडणे, मेंदू-आघात, हृदयविकार इ. जीवघेण्या विकारांची शक्यता दुपटीने नव्हे तर चौपटीने वाढते.

हृदयविकार

असा कोणता आकडा आहे की, ज्याच्यावर हृदयविकार टाळण्यासाठी सारखे लक्ष ठेवावे लागते आणि हृदयविकाराचा नुसता संशय जरी आला तरी प्रथम याचे मूल्यांकन केले जाते? काय हा हृदयगतीचा किंवा रक्तदाबाचा आकडा आहे का? नाही! दोन्हीही नाही. हा आकडा आहे, तुमच्या रक्तातल्या कोलेस्टेरॉल या रासायनिक द्रव्याचा.

कोलेस्टेरॉल हे एक मेद द्रव्य आहे. थोड्या प्रमाणात हे शरीरात तयार होते आणि याचा अधिकतम भाग खाद्यान्नातल्या मेदयुक्त घटकातून रक्तात येतो. म्हणून तुमचे शरीर किती कोलेस्टेरॉल तयार करते आणि तुम्ही किती खाता, यावर तुमच्या रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण अवलंबून असते.

रक्तात कोलेस्टेरॉल अधिक झाले म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आत भिंतींवर याचा एक थर साचतो. कालांतराने थर वाढत जाऊन रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व शेवटी बंद होतात. हृदयाला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांत असे अडथळे आले म्हणजे हृदयाच्या मांसपेशींना आवश्यक प्राणवायू आणि पोषक द्रव्य मिळत नाही. परिणामस्वरूप, अनेक विकृती उद्भवतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. रक्तात कोलेस्टेरॉलचा स्तर जितका उंच, तितकी हृदयविकार उद्भवण्याची शक्यता अधिक, हा नियमच आहे.

अनेक प्रयोग आणि निरीक्षणांती सबंध रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रति डेसिलिटर अथवा प्रतिशत 200 मिलिग्रॅम अगर याहून कमी असणे सुरक्षित मानले गेले आहे आणि या आकड्यावरच तुम्हाला लक्ष ठेवायचे असते. तुमचा आकडा 200 हून कमी असल्यास भिण्याचे कारण नाही. केवळ हा अधिक तर होत नाही ना, याची काळजी घ्यावी. कारण जवळ जवळ चाळीस टक्के प्रौढांत या रसायनाचे प्रमाण 200 हून अधिक असते आणि याची या लोकांना खबरही नसते. म्हणून वर्षांतून कमीत कमी एकदा तरी रक्तपरीक्षा करून कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजून घ्यावे.

तुमच्या रक्तातला कोलेस्टेरॉल स्तर 240 अथवा याहून अधिक असल्यास तो ‘फार उच्च’ मानला जातो आणि विशेष उपाय योजिले जातात. कोलेस्टेरॉलच्या ‘फार उच्च’ स्तरापासून घातक परिस्थिती उत्पन्न होऊ शकते आणि म्हणून विशेष काळजीची आवश्यकता असते.

काही विशिष्ट परिस्थितीत रक्तात कोलेस्टेरॉलचा स्तर 200 ते 239 मिलिग्रॅम प्रतिशत जरी असला तरी तो ‘फार उच्च’ गणला जातो. या स्थिती अशा

 1. पुरुषलिंगी असणे
 2. कुटुंबात 55 वर्षांपूर्वी हृदयविकार झाल्याचा इतिहास असणे
 3. हृदयविकाराचा आजार असणे
 4. या ना त्या स्वरुपात तंबाखू सेवनाची सवय असणे
 5. रक्तदाब साधारणपेक्षा अधिक असणे
 6. मधुमेहाचा विकार असणे
 7. वजन वाजवीपेक्षा अधिक असणे.

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे हृदयावर चांगले परिणाम असणारे कमी घनत्वाचे लायपो प्रोटीन आणि वाईट परिणामाचे उच्च घनत्वाचे लायपो प्रोटीन असे दोन घटक आहेत. कोलेस्टेरॉलचा शरीरावर होणारा एकंदर परिणाम त्यांच्यातल्या या बरे-वाईट गुणदोष असणाऱ्या दोन घटकांच्या परिणामाचीच गोळाबेरीज असते. म्हणून अनेकदा कोलेस्टेरॉलचा स्तर ‘फार उंच’ असल्यास त्याची तीव्रता जाणण्यासाठी डॉक्टर मंडळी आणखी लॅबॉरेटरी परीक्षा करून या दोन घटकांचे पृथक प्रमाण जाणण्याचे प्रयास करतात.

रक्तात उंचावलेला कोलेस्टेरॉलचा स्तर 35-40 वर्षे वयाच्या प्रौढांना जितका अपायकारक आहे, तितकाच तो 65- 70 वर्षांच्या वृद्धांनाही आहे. म्हणून तारुण्यातही आपल्या रक्तातल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण 200 मि. ग्रॅ. प्रतिशतच्या खालीच राखावे, असे अमेरिकेतल्या मिनिसोटा विश्वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रसेल लुपकेर यांचे मत आहे.

वॉशिंग्टन येथल्या युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे डॉ. जॉन ले रोजा यांना असे वाटते की, रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा स्तर घटविण्याच्या सर्वत्र चाललेल्या प्रयत्नांच्या फलस्वरूप काही वर्षांतच हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत स्पष्ट घट होणे संभवते. पुढे केवळ वृद्धांतच काय तो आजार दिसेल आणि त्यावरही यशस्वी उपचार होऊ लागतील.

तर तुम्हीही या 200 आकड्यावर लक्ष ठेवा. आपले कोलेस्टेरॉल याच्यावर चढू देऊ नका आणि डॉ. जॉन ले रोजा यांचे भाकीत खरे करून दाखवा!

टीप – काही वेळेस रक्तातला पातळ भाग, प्लाझमा वेगळा काढून त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण सबंध रक्तातल्या प्रमाणापेक्षा थोडे अधिक भरते. लेखात दिलेले आकडे सबंध रक्ताचे आहेत.

प्रजनन संस्थेचे विकार

लठ्ठ स्त्रियांमध्ये अंडाशयातील गाठी, गर्भाशयातील गाठी, पाळीचे विकार ते वंध्यत्व, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असे अनेक विकार आढळतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, संबंध ठेवण्याची इच्छा कमी असणे इ. विकार लठ्ठपणामुळे आढळतात.

अंत:स्रावी ग्रंथीचे विकार

अंत:स्रावी ग्रंथींच्या कार्यावर लठ्ठपणाचा घातक परिणाम होत असतो, तर काही वेळा अंत:स्रावी ग्रंथीचे कार्य बिघडल्यानेही वजन वाढते. या ग्रंथीचे कार्य बिघडल्याने थायरॉइड ग्रंथींच्या कार्यात असंतुलन, पॉलिसिस्टिक ओव्हरीअन डिसीज (PCOD) हायपोथॅलॅमिक डिसऑर्डर अशा वेगवेगळ्या व्याधी होतात.

कॅन्सर

लठ्ठपणाने दहा प्रकारच्या कॅन्सरला बळी पडावे लागते. स्थूल स्त्रियांना स्तनाचा, गर्भाशयाचा, पित्तनलिकेचा तर स्थूल पुरुषांना आतड्याचा वा गुद्द्वाराचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. असा हा घातक लठ्ठपणा कमी करण्यातच निरामय आरोग्याचे सार सामावले आहे. त्यासाठी स्वयंशिस्त, चिकाटी व सकारात्मक मानसिकतेची गरज आहे.


लठ्ठपणा कमी कशासाठी करायचा?

एकीकडे आपण आकर्षक दिसावं, प्रमाणबद्ध असावे, असे बहुसंख्य महिला आणि पुरुषांना वाटत असतानाच दुसरीकडे जरा जाड दिसले तर कुठे बिघडते, असा विचार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. बरं प्रौढ म्हणजे वयाची चाळिशी उलटलेलीच माणसेच असा विचार करतात असंही नाही. अगदी दोन-तीन वर्षांपासून पन्नास-साठ वर्षांपर्यंत सर्वच वयोगटात अंगाची जाडी वाढलेली माणसे आढळून येतात.

याबाबत एक गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवी. वयोगट कोणताही असो, प्रमाणाबाहेर झालेली शरीराची वाढ किंवा सुटलेले शरीर लठ्ठपणा हा आरोग्यासाठी घातक असल्याचे लक्षात घ्यावे. लठ्ठपणाचा सर्वांत पहिला धोका म्हणजे कार्यक्षमता कमी होते. लठ्ठ असलेली माणसे वेगात आणि जास्त काम करू शकत नाहीत. मग ते पुरुष असोत की स्त्रिया. ज्यांचे शरीर प्रमाणाबाहेर सुटलेले आहे अशी माणसे कोणतेच काम जास्त वेळ करू शकत नाहीत. कोणतेही काम करताना त्यांना लगेच दम लागतो. थोडा वेळ काम केले की ते घामाघूम होतात आणि त्यांना विश्रांतीची गरज पडते.

सुटलेल्या शरीराचा दुसरा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे अशी माणसे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या आजारात हृदयविकार, मधुमेह आणि रक्तदाब यांचा क्रम बराच वरचा असतो.

शरीराचे वजन वाजवीपेक्षा अधिक असणे दीर्घायुष्याला मारक असल्याचे आता जगजाहीर झाले आहे. विमा कंपन्यांकडे गोळा झालेल्या नोंदीवरून संशोधकांनी अनेक कोष्टके काढून, लठ्ठ माणसांचे सरासरी आयुर्मान कमी असते याचे कित्येक दाखले दिले आहेत. यातलेच अनेकदा प्रकाशित झालेले एक कोष्टक पाहा शरीराचे प्रमाणाबाहेर वाढलेले वजन आणि त्यानुसार वाढत जाणारे, 40 ते 50 वर्षे वयाच्या व्यक्तीत मृत्यूचे प्रमाण:

लठ्ठपणा कमी करण्याचे फायदे

लठ्ठपणा किंवा सुटलेले शरीर कमी करणे किंवा शरीर सुटणार नाही याची काळजी घेत प्रमाणबद्ध शरीर ठेवण्याचे किती फायदे आहेत बघा. एक तर प्रमाणबद्ध शरीर असल्याचा फायदा म्हणजे तुम्ही आकर्षक दिसता आणि आपल्या दिसण्याची दुसऱ्याच्या मनावर छाप पाडता.

शरीर प्रमाणबद्ध असल्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कार्यक्षमता कमी होत नाही. शरीर प्रमाणबद्ध असलेली माणसे कितीही वय झाले तरी कार्यक्षमच राहतात, ही प्रगती करण्यासाठी किती चांगली गोष्ट आहे, नाही का? शिवाय आरोग्य ठणठणीत राहते. आरोग्यम धनसंपदा असे आपल्याकडे म्हटले आहे. निरोगी राहण्यासारखी दुसरी संपत्ती नाही, असा त्याचा अर्थ आहे. शरीर प्रमाणबद्ध असल्यामुळे निरोगी राहण्याची संपत्ती हाताला लागते, हे जास्त चांगले नाही का?

उच्चरक्तदाब, सांधेदुखी, मधुमेह इ. पैकी एखाद्या आजाराला लठ्ठपणामुळे आपण बळी पडतो, तेव्हा काय होते? डॉक्टरांच्या तपासण्या, औषधं, दवाखान्यात भरती होणं इ. साठी अफाट वेळ व पैसा खर्च करावा लागतो. प्रकृती अस्वास्थामुळे, शारीरिक मर्यादांमुळे जीवनातील आनंद उपभोगण्याच्या घटकांवरही बंधने येतात शिवाय आजारातील जोखीम वाढते, आयुर्मान कमी होते, परावलंबित्व येते ते वेगळे.

त्यापेक्षा रोज एक तास व्यायामाला दिल्यास ती एक फायदेशीर गुंतवणूक ठरते व त्यामुळे मिळणारे फायदे दीर्घकालीन असतात. व्यायामामुळे व योग्य आहार नियोजनामुळे वजन कमी करता येते; पण यापलीकडेही त्याचे अनेक अदृश्य फायदे असतात जसे-

 • आजारांची जोखीम कमी होते.
 • स्वस्थ व निरामय आरोग्य प्राप्त होते.
 • उत्साह व आत्मविश्वास उंचावतो.
 • वजन आटोक्यात राहते व चपळपणा वाढतो.
 • आयुमर्यादा उंचावते.

लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय

लठ्ठपणाची समस्या तुम्ही दोन पद्धतीने सोडवू शकता :

 1. व्यायाम करणे :

आपले दैनंदिन जगणे कितीही धावपळीचे असले तरीही त्यातून रोज चालण्यासाठी आणि व्यायामासाठी अर्धा तास तरी काढायला हवा. फक्त चालण्यामुळे आपण शंभर अतिरिक्त कॅलरीज रोज कमी करू शकतो, तर शारीरिक व्यायामाने सुमारे 200 अतिरिक्त कॅलरीज कमी करता येतात.

 1. जेवणातून कॅलरीज कमी करणे :

थोडेसे काळजीपूर्वक आणि दक्ष राहून आपला आहार निवडला तर रोजच्या आहारातून आपल्या शरीरात जाणाऱ्या 400-500 अतिरिक्त कॅलरीज कमी करू शकतो.

वजन कमी करण्यासाठी हा लेख वाचा: वजन कमी करण्याचे उपाय


लठ्ठपणा कसा मोजायचा?

लठ्ठपणा माहीत करून घेण्याची सर्वमान्य पद्धत म्हणजे बॉडी मास इंडेक्स. यालाच थोडक्यात बीएमआय म्हणतात. शरीराचे कि.ग्रॅ.मधील वजन भागिले मीटरमधील उंचीचा वर्ग, याचे उत्तर म्हणजे बीएमआय होय.

इंग्लंडमध्ये वजन पौंडात मोजले जाते, म्हणून तिथे बीएमआय काढण्यासाठी वेगळी पद्धत वापरली जाते. ती म्हणजे पौंडमधील वजनाला 70ने गुणायचे. येणाऱ्या संख्येला नंतर इंचामधील उंचीच्या वर्गाने भागायचे की बीएमआय येतो.

मेट्रिक पद्धतीने बीएमआय काढण्याचे सूत्र = शरीराचे वजन / उंचीचा वर्ग.

इंग्रजी पद्धतीने बीएमआय काढण्याचे सूत्र = पौंडातील वजन  × 70/ इंचातील उंचीचा वर्ग.

उदाहरण 1.75 मीटर उंच असलेल्या 90 किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय आपल्याला असा काढता येईल :

मेट्रिक पद्धतीने

 • 1.75  × 1.75 × 3.06
 • 90/ 3.06 = 29.41
 • त्या व्यक्तीचा बीएमआय 29.41 आहे.

इंग्रजी पद्धतीने

आता याच व्यक्तीचे पौंडातील वजन होते 198 पौंड आणि इंचातील उंची होते 5 फूट 9 इंच, म्हणजे 69 इंच.

 • 198  × 70 × 13860
 • 69  × 69 = 4761
 • 13860/4761 = 2.91

म्हणजे त्या व्यक्तीचा बीएमआय आला 29 तुम्ही लठ्ठ आहात की नाही, हे पाहण्यासाठी बीएमआयचा वापर करून साधारणपणे चार प्रकारात लठ्ठपणाचे विभाजन केले जाते.

आशियायी लोकांसाठी

 • बीएमआय 19 पेक्षा कमी असेल तर कमी वजन
 • 19 ते 22.9 असेल तर वजन नॉर्मल आहे.
 • 23 ते 24.9 असेल तर जास्त वजन आहे.
 • 25 पेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती लठ्ठ आहे.

अमेरिकन लोकांसाठी

 • बीएमआय 19 पेक्षा कमी असेल तर वजन कमी आहे.
 • 19 ते 24.9 असेल तर वजन नॉर्मल आहे.
 • 25 ते 29.9 असल्यास वजन जास्त आहे.
 • 30 च्या वर असल्यास ती व्यक्ती लठ्ठ आहे.
 • एकूणच लठ्ठपणाचेही तीन गटांत विभाजन करण्यात आले आहे.

बीएमआयनुसार त्याची वर्गवारी अशी

 • पहिल्या श्रेणीचा लठ्ठपणा : बीएमआय 30 ते 34.9
 • दुसऱ्या श्रेणीचा लठ्ठपणा : बीएमआय 35 ते 39.9
 • तिसऱ्या श्रेणीचा लठ्ठपणा : बीएमआय 40 किंवा त्याहून अधिक असणे.

पण फक्त बीएमआयच्या आधारे एखादी व्यक्ती लठ्ठ आहे की नाही याचे निदान करणे योग्य ठरत नाही. कारण शरीराच्या एकूण वजनात बॉडी फॅटचे प्रमाण किती आहे, हे माहीत असणे गरजेचे असते. त्याशिवाय बीएमआय लक्षात घेतला तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणारे खेळाडू लठ्ठ ठरू शकतात आणि मांसपेशी कमकुवत असणाऱ्या व्यक्ती नॉर्मल ठरू शकतात.

एकूण शरीराच्या वजनात बॉडी फॅटचे प्रमाण किती आहे, त्याच्या आधारेही लठ्ठपणा ठरविला जाऊ शकतो.

बॉडी फॅटच्या प्रमाणात लठ्ठपणा

 • पुरुष : 12% ते 20% = आदर्श
 • 20.1% ते 25% = जास्त वजन
 • 25 % पेक्षा जास्त = लठ्ठपणा

स्त्रियांसाठी

 • 15 % ते 22% = सामान्य
 • 22.1% ते 30% = जास्त वजन
 • 30% पेक्षा जास्त = लठ्ठपणा

लठ्ठपणाचे प्रकार

आपल्याला स्वत:चा BMI माहिती असावा. त्याशिवाय आपल्या शरीरात चरबी नेमकी कोठे जमा होते आहे, हेसुद्धा समजणे महत्त्वाचे असते. काही व्यक्तींच्या पृष्ठभागावर व मांड्यांवर चरबी जमा होते व ते भाग लठ्ठ दिसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचा आकार ‘नासपती’ (Pear shape obesity) या फळा सारखा दिसतो. काही व्यक्तींमध्ये कंबरेभोवती चरबीचे थर साचतात. त्यामुळे कंबर व पोट मोठे दिसते. अशा व्यक्तींचा आकार, सफरचंदासारखा गरगरीत दिसतो. (Apple shape obesity)

संशोधनाअंती असा निष्कर्ष निघाला आहे की, दीर्घकालीन आरोग्यासाठी सफरचंदा’पेक्षा ‘नासपती’ आकाराचे शरीर असावे. ज्यांच्या कंबरेभोवती व पोटावर चरबीचे थर साचून सफरचंदाचा आकार येतो, अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. याचे अचूक कारण शास्त्रज्ञांना सापडलेले नाही. परंतु सफरचंदासारखे शरीर असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयविकार, स्ट्रोक, विशिष्ट प्रकारचे कॅन्सर यांचा सुद्धा धोका जास्त असतो. याबाबत तज्ज्ञ खात्रीने सांगू शकतात.

म्हणून पुरुषांच्या कंबरेचा घेर 40 इंचापेक्षा जास्त नसावा. स्त्रियांची कंबर 35 इंचापेक्षा जास्त नसावी. कंबरेचा मोठा घेर आणि BMI 25पेक्षा जास्त असल्यास वरील आजारांच्या धोका वाढतो. अडचण अशी असते की, बऱ्याच वेळा शरीराचा आकार आनुवंशिक असतो. त्यामुळे तो आपण बदलू शकत नाहीत; पण सफरचंदाचा आकार असल्यास अधिक मेहनत/प्रयत्न करून BMI 25पेक्षा कमी राखावा. याकरता आपण काय खातो व कोणता व्यायाम नियमित करतो. याकडे खास लक्ष द्यावे आणि समजा आपले शरीर ‘नासपती’च्या आकाराचे आहे याचा अर्थ मी काहीही खाल्ले किंवा व्यायाम नाही केला तरी चालते असा काढू नये. त्यांनी सुद्धा BMI 25 पेक्षा कमी राखणे आवश्यक आहे. कारण जास्त वजनामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

अजून वाचा:

Leave a Reply