कार्तिकी / आषाढी एकादशी संपूर्ण माहिती मराठी | Ashadhi Ekadashi information in Marathi
‘एकादशी’ हे विष्णू या देवतेचे व्रत आहे. एकादशीची कथा अशी आहे की, मृदुमान्य नावाच्या राक्षसाने शंकराची आराधना केली. मृदुमान्य हा कुंभाचा मुलगा आणि प्रल्हादाचा नातू होता. त्याने शंकराकडून असा वर मिळवला की, त्याला स्त्रीशिवाय कोणाकडूनही मरण येणार नाही. असा वर मिळाल्यामुळे आता आपल्याला मरणाची भीती नाही असे वाटून तो राक्षस सर्वांना त्रास देऊ लागला. शंकरासह सर्व देव एका गुहेत जाऊन लपले. त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली; तिचे नाव एकादशी. तिने मृदुमान्याला ठार मारले.
हे सारे घडले, तेव्हा खूप पाऊस पडत होता. त्यामुळे देवांना अंघोळ झाली आणि गुहेत लपल्यामुळे उपवास घडलाच होता. त्यामुळे एकादशीच्या व्रताला उपवास करण्याची पद्धत पडली.
एकादश्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्या महत्त्वाच्या मानतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्या दिवशी देव झोपतात; म्हणून तिला ‘शयनी एकादशी’ असेही म्हणतात. आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असे मानतात. देव चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला जागे होतात, ही प्रबोधिनी एकादशी. चातुर्मासात देव झोपलेले असतात, त्यामुळे माणसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी भजन-कीर्तन व व्रते, उपवास करण्याची पद्धत पडली.
वेदांत विष्णूसंबंधीची जी स्तोत्रे आहेत त्यांत विष्णू चार महिने झोपतो, असे म्हटले आहे. यावरून काही विद्वानांना असे वाटते की, आर्य लोक ज्या उत्तरेकडच्या प्रदेशात सुरुवातीला राहत होते, तिथे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र होती. त्यानंतर आर्य दक्षिणेकडे प्रवास करत अशा प्रदेशात आले की, जिथे आठ महिने दिवस व चार महिने रात्र होती. त्या काळात रचलेली ही स्तोत्रे असावीत- हाच तो शयनी एकादशीपासून ते प्रबोधिनी एकादशीपर्यंतचा चातुर्मास.
या चार महिन्यात पावसाळा असतो. तेव्हा आरोग्यदृष्ट्या आहार बेताने घेणे चांगले. म्हणून चातुर्मासात अनेक उपास आले असावेत. या काळात पचायला जड असे अनेक पदार्थ खाण्यास निषिद्ध मानले आहेत.
आपल्याला असे आढळून येते की, आपल्या पूर्वजांनी आरोग्याच्या नियमांचा धर्मात समावेश केला. उद्देश असा की, धर्माशी जोडले गेल्यामुळे हे नियम लोकांनी जास्त व्यवस्थित पाळावेत.
भागवत धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. तिला ‘महाएकादशी’ म्हणतात. भागवत धर्मात ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे नामस्मरण आणि भक्ती. भागवत धर्मात भेदभाव-जातपात मानत नाहीत. त्यामुळे सर्व जातींचे लोक वारीत एकत्र येतात आणि विठ्ठलभक्तीच्या ओढीने पंढरपूरला जातात.
तुकाराम, नामदेव, जनाबाई आदी संतांनी विठ्ठलभक्तीचे महत्त्व लोकांना सांगितले. आपली दैनंदिन कामे करत असताना मुखाने पांडुरंगाचे नाव घ्यावे, असा हा साधा सोपा भक्तिमार्ग लोकांना फार आवडला. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठलभक्तीची परंपरा चालू आहे. ठिकठिकाणांहून संतांच्या पालख्या घेऊन लोक पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जायला निघतात. याला ‘पंढरीची वारी’ असे म्हणतात. या वारीत सामील होतात ते ‘वारकरी’. हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, साथीला मृदंग अशा वेषात वारकरी या यात्रेत सामील होतात.
विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकाराम, जयजय राम कृष्ण हरी असे गात, नाचत आषाढी एकादशीला ही यात्रा पंढरपूरला पोचते. चंद्रभागेचे वाळवंट भजन-कीर्तनांनी दुमदुमते. या दिवशी सारे जण उपवास करतात. विठोबाची महापूजा होते. हजारो लोक या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतात. अवघा महाराष्ट्र विठ्ठलभक्तीमध्ये बुडून जातो. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरला पार पडल्यावर कार्तिक वद्य एकादशीला आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी यात्रा भरते.
प्रत्येक महिन्याच्या शुक्लपक्षात एक आणि कृष्णपक्षात एक, अशा संपूर्ण वर्षात एकूण चोवीस एकादश्या येतात. अधिक मास असल्यास आणखी दोन एकादश्या येतात. भाविक लोक सर्वच एकादश्यांना उपवास करतात. वर्षातल्या चोवीस एकादश्यांना वेगवेगळी नावे व कथा आहेत.
चैत्र शुद्ध एकादशीला ‘कामदा’ एकादशी म्हणतात. या दिवशी उपास केल्याने इच्छा पूर्ण होतात. त्याबद्दलची कथा अशी आहे की, नागराजाच्या दरबारात एक गंधर्व होता. तो राजाच्या करमणुकीसाठी गात असताना त्याने ललत राग नीट गायला नाही म्हणून नागराजा रागावला आणि त्याने त्याला भूतयोनीत पाठवले. त्या गंधर्वाच्या बायकोने एकादशी व्रत केले आणि आपल्या नवर्याला भूतयोनीतून सोडवले.
चैत्र वद्य एकादशीला ‘वरूथिनी’ म्हणतात. या दिवशी उपास करणार्या माणसाचे पाप नाहीसे होते.
वैशाख शुद्ध एकादशीला ‘मोहिनी’ एकादशी म्हणतात. धनपाल नावाच्या व्यापार्याचा धृष्टबुद्धी नावाचा मुलगा होता. तो फार बिघडला. तेव्हा बापाने त्याला घरातून हाकलून दिले, पण त्याचे वागणे सुधारले नाही. नंतर एका ऋषीच्या सांगण्यावरून त्याने एकादशीचे उपास केले आणि तो सुधारला.
वैशाख वद्य एकादशीला ‘अपरा’ एकादशी म्हणतात.
ज्येष्ठ शुद्ध एकादशी म्हणजे ‘निर्जला’ एकादशी. भीमाला खाण्याची फार आवड असल्यामुळे तो उपास करत नसे. पण व्यासांनी सांगितल्यामुळे त्याने ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीसुद्धा न पिता उपास केला आणि त्यामुळे कौरवांशी झालेल्या युद्धात त्याला यश मिळाले.
ज्येष्ठ वद्य एकादशी म्हणजे ‘योगिनी’ एकादशी. कुबेराच्या बागेत काम करणार्या माळ्याने देवाच्या पूजेसाठी वेळेवर फुले आणून दिली नाहीत, म्हणून कुबेराने त्याला शाप दिला. त्यामुळे त्याला कुष्ठरोग झाला. नंतर त्याने योगिनी एकादशीचा उपास केल्यामुळे तो बरा झाला.
आषाढ शुद्ध एकादशीला ‘शयनी’ एकादशी म्हणतात. मांधात राजाच्या देशात दुष्काळ पडला होता. तिथे एकादशीच्या व्रतामुळे पाऊस पडला.
आषाढ वद्य एकादशीला ‘पुत्रदा’ एकादशी म्हणतात. महीजित नावाच्या राजाला या एकादशीचा उपास केल्यामुळे मुलगा झाला, अशी कथा आहे.
श्रावण वद्य एकादशीला ‘अजा’ एकादशी म्हणतात. हरिश्चंद्र राजावर अनेक संकटे आली पण ही एकादशी केल्यानंतर त्याला आपले राज्य परत मिळाले.
भाद्रपद शुद्ध एकादशीला ‘परिवर्तिनी’ एकादशी म्हणतात. विष्णूला झोपी जाऊन आता दोन महिने झालेले असतात. या दिवशी तो कुशीवर वळतो असे मानतात. विष्णूच्या देवळांमध्ये आषाढी एकादशीला झोपवलेल्या विष्णूच्या मूर्तीला या एकादशीला एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळवतात.
भाद्रपद वद्य एकादशी म्हणजे ‘इंद्र’ एकादशी. अशी कथा सांगतात की, इंद्रसेन राजाचे वडील वारले तेव्हा राजाने व प्रजेने एकादशी केली म्हणून राजाचे वडील स्वर्गाला गेले.
आश्विन शुद्ध एकादशी ही ‘पाशांकुशा’ एकादशी. या दिवशी ज्याला मरण येते तो सरळ स्वर्गाला जातो. त्याला यमाच्या पाशाची भीती नसते.
आश्विन वद्य एकादशी ही ‘रमा’ एकादशी. मुचकुंद राजाने आपली बायको चंद्रभागा हिच्या सांगण्यावरून हा उपास केला आणि तो स्वर्गाला गेला.
या नंतरची कार्तिक शुद्ध एकादशी ही ‘प्रबोधिनी’ एकादशी. या दिवशी विष्णू जागा होतो. त्याच्या मूर्तीची या दिवशी मिरवणूक काढतात.
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत आवळीभोजन करतात. म्हणजे देवाची पालखी मिरवत आणून आवळीच्या झाडाखाली ठेवायची व तिथे सर्वांनी जेवण करायचे.
कार्तिक वद्य एकादशी ही ‘उत्पत्ति’ एकादशी. या दिवशी मूर नावाच्या दैत्याचा नाश करण्यासाठी विष्णूने स्वतःपासून एकादशी देवी उत्पन्न केली.
मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला ‘मोक्षदायी’ एकादशी म्हणतात. वैखानस राजाने या उपासामुळे आपल्या वडिलांना नरकापासून वाचवले.
मार्गशीर्ष वद्य एकादशी ही ‘सफला’ एकादशी. या दिवशी लंपक नावाच्या एका राजपुत्राला उपास घडला आणि तो मोक्षाला गेला.
पौष शुद्ध एकादशी ही ‘पुत्रदायी’ एकादशी. या एकादशीमुळे सुकेतू राजाला मुलगा झाला.
पौष वद्य एकादशी ही ‘षट् तिला’ एकादशी. या दिवशी यमाने तपश्चर्या करून तीळ निर्माण केले असे मानतात. म्हणून या दिवशी तीळ सहा प्रकारांनी वापरायचे असतात. तीळ खायचे, तीळ वाटून अंगाला लावायचे, तीळ घातलेल्या पाण्याने अंघोळ करायची तसेच तीळ घातलेले पाणी प्यायचे, देवाला तीळ वाहायचे आणि ब्राह्मणाला तीळ दान द्यायचे. पौष महिन्यात मकरसंक्रांत असते आणि संक्रांतीतही तिळाचे महत्त्व असते.
माघ शुद्ध एकादशी ही ‘जय’ एकादशी आहे. पुष्पवान नावाचा गंधर्व आपल्या बायकोत इतका गुंतला की, तो इंद्राच्या दरबारातले काम नीट करेना. इंद्राने त्याला शाप दिला आणि गंधर्व आणि त्याची बायको दोघे दैत्य झाले. त्यांना या एकादशीच्या दिवशी घडलेल्या उपासाने ते शापातून मुक्त झाले व पुन्हा इंद्रलोकी गेले.
माघ वद्य एकादशी ही ‘विजया’ एकादशी. श्रीरामाने या दिवशी उपास केला म्हणून त्याला लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधता आला, अशी कथा सांगतात.
फाल्गुन शुद्ध एकादशी ही ‘आमलकी’ एकादशी असते. चैत्ररथ राजाने या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली परशुरामाची पूजा करून उपास केला होता.
फाल्गुन वद्य एकादशी ही ‘पापमोचनी’ एकादशी आहे. मंजुघोषा नावाच्या अप्सरेने मेधावी नावाच्या ऋषींच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्या ऋषींनी तिला शाप दिला, तेव्हा त्या शापापासून मुक्त होण्यासाठी तिने एकादशीचा उपास केला.
अशा या चोवीस एकादश्या वेगवेगळ्या कारणाने महत्त्वाच्या मानतात. त्यांतल्या शयनी आणि प्रबोधिनी एकादश्या विशेष महत्त्वाच्या मानतात.
पुढे वाचा: