मैदानी शर्यती व स्पर्धा मैदानी शर्यती व स्पर्धा आयोजित करणे‚ हे मोठे जबाबदारीचे काम आहे. अनेक स्पर्धक विविध अंतरांच्या धावण्याच्या शर्यती व स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शर्यती व स्पर्धा यांची काळजीपूर्वक आखणी करावी लागते.

मैदानी शर्यती व स्पर्धा माहिती मराठी
मैदानी शर्यती व स्पर्धा माहिती मराठी

मैदानी शर्यती व स्पर्धा माहिती मराठी

ट्रॅकची व इतर मैदानांची पद्धतशीर आखणी‚ साहित्याची जमवाजमव‚ अधिकाऱ्यांची नेमणूक व कार्याची विभागणी इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात. योग्य नियोजन व त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली‚ तर हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडणे सोईचे होते. ट्रॅकवर शर्यती व ट्रॅकच्या आतील जागेत फेकीच्या व उड्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या‚ तर त्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. म्हणून शर्यती व स्पर्धा शक्यतो एकाच मैदानावर आयोजित कराव्यात.

कार्यक्षम व तज्ज्ञ अधिकाऱ्यांवर शर्यती व स्पर्धा यांचे यश अवलंबून असते. शर्यती व स्पर्धांसाठी पुढीलप्रमाणे अधिकारी नेमावेत :

  • व्यवस्थापक (Manager)
  • कार्यवाह (Secretary)
  • तांत्रिक व्यवस्थापक (Technical Manager)
  • न्याय मंडळ (Jury of Appeal)
  • शर्यतीचे सरपंच (Referee for Track Events)
  • अंतिम रेषा पंच (Judges at Finish)
  • शर्यतीचे पंच (Track Judges)
  • चालण्याच्या शर्यतीचे सरपंच व पंच (Referee for Track Events)
  • अंतिम रेषा पंच (Judges at Finish)
  • शर्यतीचे पंच (Track Judges)
  • चालण्याच्या शर्यतीचे सरपंच व पंच (Referee (Referee & Judges for Walking)
  • प्रारंभक (Starter)
  • प्रारंभकाचा सहायक (Starter’s Assistant)
  • फेरीगणक (Lap Scorers)
  • वेळाधिकारी (Time Keepers)
  • क्षेत्र सरपंच (Referees for Field Events)
  • क्षेत्र पंच (Field Judges)
  • अधिकृत क्षेत्रमापक (Official Surveyor)
  • स्वयंसेवक प्रमुख (Marshal)
  • गुणलेखक (Recorder)
  • घोषक (Announcer)
  • डॉक्टर (Doctor) आदी.

विभाग

मैदानी शर्यती व स्पर्धेचे (Athletics) तीन विभाग पडतात :
१) मैदानी शर्यती – यामध्ये विविध अंतरांच्या धावण्याच्या शर्यतींचा समावेश होतो.
२) क्षेत्र स्पर्धा – यामध्ये फेकी व उड्या यांचा समावेश होतो.
३) मिश्र स्पर्धा – यामध्ये पंचक स्पर्धा‚ सप्तक स्पर्धा व दशक स्पर्धा यांचा समावेश होतो.

मैदानी शर्यती

सर्वसामान्य नियम –

१) १०० मी.‚  २०० मी.‚  ४०० मी.‚  ८०० मी.‚  १५०० मी.‚ ५००० मी.‚ १०‚००० मी. धावणे‚ ४ × १०० मी. आणि ४ × ४०० मी. रिले व हर्डल्स या शर्यती ट्रॅकवर (Track) घ्याव्यात.

२) ४०० मी. ट्रॅकची आखणी करताना धावण्याची त्रिज्या ३६.५ मी. ते ३८ मीटर्सच्या दरम्यान निश्चित करावी. ट्रॅकची आखणी करण्यासाठी 2π × R 2L · ४०० मी. या सूत्राचा वापर करावा. (R म्हणजे धावण्याची त्रिज्या व L म्हणजे ट्रॅकच्या सरळ पट्ट्याची लांबी) ट्रॅक आखण्यासाठी धावण्याची त्रिज्या ३७.४५ मी. धरली‚ तर सरळ पट्ट्याची लांबी ८२.३० मी. येईल.

वक्राच्या सर्वांत आतील रेषेवर विटा किंवा सिमेंटची बॉर्डर असते किंवा निशाणे रोवलेली असतात; म्हणून ३७.१५ मी. आखण्याची त्रिज्या असेल. (आतील रेषेवर विटांची/सिमेंटची बॉर्डर नसेल किंवा निशाणेही रोवलेली नसतील तर आखण्याची त्रिज्या ३७.२५ मी. असेल) उपलब्ध उपयुक्त मैदानाचा आकार विचारात घेऊन टॅ्रकची आखणी करावी. ट्रॅकच्या सरळ पट्ट्याची लांबी ८४.३९० मी. असावी‚ अशी संघटनेची शिफारस आहे.

३) ट्रॅकवर आठ पट्टे (Lanes) आखावेत. प्रत्येक पट्ट्याची किमान रुंदी १.२२ मी. (चार फूट) असावी. पट्ट्यांच्या रेषांची जाडी ५ सें.मी. असावी. धावणाऱ्या खेळाडूच्या उजव्या बाजूची रेषा ही त्या धावणाऱ्याच्या पट्टीमध्ये मिळवलेली असते.       

४) ट्रॅकच्या आतील रेषेवर प्रत्येक ५ मीटर अंतरावर २५ सें.मी. × २० सें.मी. मापाची निशाणे लावतात. निशाणाच्या काठीची उंची २० सें.मी. असावी. निशाणे ६० अंशांचा कोन करून पट्ट्याच्या बाहेरच्या बाजूस कललेली असतात.

५) १०० मी. धावणे‚ १०० मी. हर्डल शर्यत (महिला) आणि ११० मी. हर्डल शर्यत (पुरुष) या शर्यती सरळ पट्ट्यातच घ्याव्यात.

६) ट्रॅकची आतील बाजू धावणाऱ्या स्पर्धकाच्या डाव्या बाजूस येईल‚ अशा पद्धतीने स्पर्धकांच्या धावण्याची दिशा असावी.

७) शर्यतीचा शेवट सरळ रेषेतच व्हावा.

८) कमी अंतराच्या धावण्याच्या शर्यती‚ ४ × १०० मी. रिले व हर्डल्स शर्यती यांमध्ये स्पर्धकांनी आपापल्या पट्ट्यातून धावावे.

९) ट्रॅकवरील पट्ट्याच्या डावीकडील रेषेवरून किंवा रेषेच्या आतून धावणारा स्पर्धक बाद होण्यास पात्र ठरतो.

१०) स्पर्धकांनी आपला क्रमांक स्पष्ट दिसेल असा छातीवर व पाठीवर लावावा.

११) स्पर्धकांनी कॅनव्हास शूज / स्पाइक्स वापरणे आवश्यक आहे.

१२) कमी अंतराच्या शर्यतीमध्ये प्रथम प्राथमिक फेऱ्या (Heats) घ्याव्यात. प्रत्येक फेरीतून किमान पहिल्या दोन क्रमांकांची पुढील / अंतिम फेरीसाठी निवड करावी. (स्पर्धकांच्या प्रावीण्याची (Performance) पूर्वकल्पना असेल तर चांगल्या स्पर्धकांची विविध फेऱ्यांत विभागणी करावी. अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट स्पर्धक येतील याची काळजी घ्यावी.)

१३) प्राथमिक फेरीत लागलेल्या वेळेवरून पुढील / अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड करता येईल. मात्र‚ त्याबाबत त्यांना तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

१४) स्पर्धकांनी ठरलेल्या फेरीतच धावले पाहिजे.

१५) पहिली फेरी (Round) व दुसरी फेरी किंवा अंतिम फेरी यांमध्ये शक्यतो पुढीलप्रमाणे वेळ द्यावा :

  • १०० मी. व २०० मी. धावणे ….. ४५ मिनिटे.
  • ४०० मी. व ८०० मी. धावणे ….. ९० मिनिटे.
  • १००० मीटरर्सपेक्षा जास्त धावणे ….. १८० मिनिटे.

१६) ट्रॅकवर आठ पट्टे असल्याने अंतिम फेरीत आठ स्पर्धक असतील.

१७) पत्ते वाटून स्पर्धकांचे पट्टे निश्चित करावेत.

१८) स्पर्धकाने धावताना दुसऱ्या खेळाडूस अडथळा आणला‚ तर अडथळा आणणारा स्पर्धक बाद करावा. ती फेरी पुन्हा घ्यावी किंवा ज्या स्पर्धकाला अडथळा आणला गेला असेल‚ त्या स्पर्धकाला अन्य फेरीत धावण्याची संधी द्यावी.

१९) धावणाऱ्या स्पर्धकास बाहेरून कोणीही‚ कसल्याही प्रकारचे साह्य करू नये.

२०) सरपंचाच्या परवानगीशिवाय मैदानावरील कोणाही व्यक्तीस शर्यत सुरू असताना मध्येच वेळ सांगता येणार नाही.

२१) शर्यतीमधून स्वेच्छेने बाहेर पडलेल्या स्पर्धकास पुन्हा त्या शर्यतीत भाग घेता येणार नाही. (रस्त्यावरील दीर्घ अंतराच्या शर्यतीत पंचाच्या परवानगीने व पंचाच्या नियंत्रणाखाली रस्ता सोडता येईल. मात्र‚ रस्ता सोडल्याने धावण्याचे अंतर कमी होणार नाही याची खात्री करून घ्यावी.)

२२) डोपिंगला (Doping) पूर्ण मज्जाव राहील. खेळाडूची शारीरिक किंवा मानसिक क्षमता कृत्रिमरीत्या वाढवून त्याच्या प्रावीण्यात सुधारणा घडवून आणतील अशी पेये अथवा पदार्थ सेवन करणाऱ्या स्पर्धकास शर्यतीत व स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

२३) मॅरेथॉन शर्यत व ५० कि.मी. चालण्याची शर्यत चांगल्या रस्त्यावर घ्यावी. त्या शर्यतीचा आरंभ व शेवट ट्रॅकवर व्हावा.

२४) मॅरेथॉन शर्यत व ५० कि.मी. चालण्याची शर्यत यांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाने स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असल्याबाबतचा दिलेला वैद्यकीय दाखला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सादर केला पाहिजे.

२५) मैदानी शर्यती व क्षेत्र स्पर्धा शक्यतो एकाच मैदानावर घ्याव्यात. एखादा स्पर्धक शर्यती व क्षेत्र स्पर्धेत भाग घेत असेल आणि दोन्हीकडे त्याचे नाव पुकारले असेल तर सरपंचाच्या परवानगीने त्याने प्रथम शर्यतीत भाग घ्यावा आणि क्षेत्र स्पर्धेची ती फेरी पूर्ण होण्यापूर्वी त्यामध्ये भाग घ्यावा. क्षेत्र विभागाच्या संबंधित सरपंचाने त्या स्पर्धकाला त्या फेरीत त्याचा क्रम बदलून संधी द्यावी (मात्र क्षेत्र स्पर्धेत एका फेरीत त्याला एकच पाळी (Trial) मिळेल.)

२६) अधिकृत निर्णय जाहीर झाल्यापासून ३० मिनिटांच्या आत प्रोटेस्ट (Protest) नोंदवता येईल.

शर्यतीचा प्रारंभ

१) प्रारंभकाचा सहायक आरंभ रेषेच्या पाठीमागील तीन मीटर अंतरावरील रेषेवर (Assembly Line) विशिष्ट फेरीतील स्पर्धकांना एकत्र करून‚ पत्ते वाटून त्यांचे पट्टे (Lanes) ठरवून देईल.

२) प्रारंभक हा शर्यत सुरू होणार असल्याबद्दल अंतिम रेषा पंच आणि वेळाधिकारी यांना इशारा देईल.

३) ‘ऑन युवर मार्क्स’ असे प्रारंभकाने म्हणताच त्या फेरीतील स्पर्धक आपापल्या पट्ट्यात आरंभ रेषेच्या (Starting Line) पाठीमागे आपापल्या पद्धतीने स्टार्ट घेण्याच्या तयारीस लागतील. १०० मीटर‚ २०० मीटर‚ ४०० मीटर हर्डल्स व रिले या शर्यतींसाठी स्पर्धकांनी ‘क्राउच स्टार्ट’च (Crouch Start) घेतला पाहिजे.

४) ‘सेट’ हा प्रारंभकाचा शब्द ऐकताच स्पर्धक धावण्याच्या तयारीत राहतील. त्या वेळी स्पर्धकाचा आरंभ रेषेला किंवा आरंभ रेषेपुढील मैदानास स्पर्श असणार नाही.

  • अ)‘सेट’ म्हटल्यावर स्पर्धकांना काही सांगावयाचे असल्यास त्यांना उभे करून मागील तीन मीटर अंतरावरील रेषेवर नेऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात. सूचना देऊन झाल्यावर पुन्हा ‘ऑन युवर मार्क्स’… ‘सेट’ या ऑर्डर्स मिळतील.
  • ब) सर्व स्पर्धकांनी योग्य वेळेत (Reasonable Time) ‘सेट’ व्हावे‚ अशी अपेक्षा असते. ‘सेट’ होण्यास अकारण विलंब करणाऱ्या स्पर्धकास ताकीद दिली जाते.

५) सर्व स्पर्धक‘सेट’ होताच पिस्तुलाचा आवाज करावा. पिस्तुलाचा आवाज होताच शर्यत सुरू होईल.

६) पिस्तुलाचा आवाज होण्यापूर्वी स्पर्धकाच्या हाताचा किंवा शरीराच्या कोणत्याही भागाचा आरंभ रेषेला किंवा त्यापुढील मैदानास स्पर्श झाला‚ तर तो फाउल (Foul) समजावा. असा चुकीचा आरंभ झाला तर पुन्हा पिस्तुलाचा आवाज करून अथवा शिट्टी वाजवून सर्व स्पर्धकांना परत बोलवावे.

चुकीचा आरंभ (False start) करणाऱ्या संबंधित खेळाडूला / खेळाडूंना लाल कार्ड (Red Card) दाखविले जाईल व त्याला / त्यांना त्या फेरीतून बाद केले जाईल. इतर खेळाडूंना समज (Warning) दिली जाईल. (मिश्र स्पर्धांमध्ये पहिला चुकीचा आरंभ करणाऱ्या खेळाडूला / खेळाडूंना पिवळे कार्ड दाखविले जाऊन समज दिली जाईल.

दुसरा चुकीचा आरंभ करणारा / करणारे खेळाडू त्या फेरीतून बाद केले जातील.) चुकीचा आरंभ करणाऱ्या खेळाडूला बाद करण्याबाबतचा हा नियम १ जानेवारी २०१० पासून अमलात आला आहे.

७) ४०० मीटर्सपेक्षा अधिक अंतराच्या शर्यतीचा आरंभ करताना‘ऑन युवर मार्क्स’ अशी ऑर्डर दिल्यानंतर पिस्तुलाचा आवाज करण्यापूर्वी ‘सेट’ म्हणण्याची आवश्यकता नाही.

८) प्रारंभकाने सर्व स्पर्धकांपासून शक्यतो समान अंतरावर उभे राहावे.

९) ४०० मी. अंतरापर्यंतच्या शर्यतीसाठी स्पर्धकांना मान्यताप्राप्त स्टार्टिंग ब्लॉक्सचा (Starting Blocks) वापर करता येईल. रिले शर्यतीमधील संघाच्या फक्त पहिल्या खेळाडूस ब्लॉक्सचा वापर करता येईल. ब्लॉक्स वापरणाऱ्या खेळाडूचा ‘सेट’ स्थितीत दोन्ही हातांचा व पायांचा जमिनीशी संपर्क पाहिजे.

शर्यतीचा शेवट

१) अंतिम रेषेच्या दोन्ही बाजूंना ट्रॅकच्या आत व बाहेर ३० सें.मी. अंतरावर पांढऱ्या रंगाचे दोन खांब (Finish Posts) असावेत. खांबांची मापे पुढीलप्रमाणे असावीत :        
उंची – १.४० मी.; रुंदी – ८ सें.मी.; जाडी – २ सें.मी.

२) अंतिम रेषेवर‚ अंतिम रेषेच्या आतील बाजूस (Edge) १.२२ मी. उंचीवर मऊ लोकरी धागा धरावा. (आरंभ रेषेच्या बाहेरील बाजूपासून अंतिम रेषेच्या आतील बाजूपर्यंत शर्यतीचे अंतर मोजले जाते.) आरंभ रेषा व अंतिम रेषा यांची रुंदी ५ सें.मी. असते. (ट्रॅकवरील सर्वच रेषा ५ सें.मी. जाडीच्या असतात.)

३) अंतिम रेषेपासून ५ मीटर अंतरावर ट्रॅकच्या आतील बाजूस सरपंच व पंच आणि दुसऱ्या बाजूस ५ मीटर अंतरावर वेळाधिकारी राहतील. (अंतिम रेषेवरील शर्यतीचा शेवट स्पष्ट दिसावा म्हणून त्यांना स्टँड्स पुरविले‚ तर अधिक सोईचे होईल.)

४) ज्या स्पर्धकाच्या छातीचा (Torso) प्रथम लोकरी धाग्याला स्पर्श होईल त्याला प्रथम क्रमांक द्यावा. हात‚ पाय‚ डोके यांनी अंतिम रेषा कधी ओलांडली याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. (वेगवान वाऱ्यामुळे धागा सरळ रेषेत राहत नसेल तर तो वापरू नये. छातीचा भाग अंतिम रेषेच्या आतील बाजूवर येण्यावरून क्रमांक ठरवावेत.)

५) अंतिम रेषा पंचांपैकी एकाने प्रथम क्रमांक‚ दुसऱ्याने पहिला व दुसरा‚ तिसऱ्याने दुसरा व तिसरा… याप्रमाणे शर्यतीच्या निकालाची नोंद करावी. पंचांच्या गुणपत्रकांवरून सरपंचाने अंतिम निकाल तयार करावा.

पेच (Tie)

१) प्राथमिक फेरीत पेच निर्माण झाल्यास संबंधित स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड करावी.

२) अंतिम फेरीत पहिल्या क्रमांकाबाबत पेच निर्माण झाला‚ तर सरपंचाने तो आपल्या अधिकारात सोडवावा. पेच सोडवण्यासाठी शक्यतो फोटो फिनिश कॅमेरा किंवा व्हिडिओ फिल्मचा वापर करावा.

वेळेची नोंद

१) फेरीतील विजेत्या खेळाडूला शर्यत पूर्ण करण्यासाठी लागलेल्या वेळेची नोंद करण्यासाठी किमान तीन वेळाधिकारी असतील. एक मुख्य वेळाधिकारी असेल. (याशिवाय दोन पर्यायी वेळाधिकारी असावेत. वेळाधिकाऱ्यांपैकी एखाद्याचे घड्याळ बंद पडले‚ तर पूर्वी ठरविल्याप्रमाणे विशिष्ट पर्यायी वेळाधिकाऱ्याच्या घड्याळाचा उपयोग करता येतो.)

२) वेळाधिकारी अंतिम रेषेवर ट्रॅकच्या बाहेरच्या बाजूस ५ मी. अंतरावर उभे असतील. (त्यांच्यासाठी स्टँड्सची सोय करणे अधिक चांगले.)

३) शक्यतो फेरीतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या स्पर्धकांच्या वेळेची नोंद करावी. तसेच दीर्घ अंतराच्या शर्यतीत प्रत्येक स्पर्धकाच्या प्रत्येक फेरीच्या वेळेची नोंद करावी. (स्पर्धकांना शर्यत पुरी करावयास लागणाऱ्या वेळेवरून त्यांची पुढील किंवा अंतिम फेरीसाठी निवड करावयाची असेल‚ तर प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद करावी. तसेच पंचक‚ सप्तक आणि दशक स्पर्धेतील शर्यतीत प्रत्येक स्पर्धकाची वेळ नोंदविण्यासाठी तीन वेळाधिकारी असावे लागतात.)

४) वेळाधिकाऱ्यांनी शर्यत संपल्यावर छापील फॉर्मवर वेळेची अचूक नोंद करावी. त्यांनी आपली घड्याळे एकमेकांना दाखवू नयेत आणि वेळेबाबत आपसांत चर्चा करू नये.

५) मुख्य वेळाधिकारी सहकाऱ्यांच्या घड्याळात दर्शविलेली वेळ पाहू शकतात.

६) सहकाऱ्यांनी फॉर्मवर नोंदविलेल्या नोंदी पाहून मुख्य वेळाधिकारी अधिकृत वेळ निश्चित करतील.

७) अ)  तिन्ही घड्याळांनी एकच वेळ दाखविली असेल‚ तर ती अधिकृत वेळ मानावी.
ब) तीनपैकी दोन घड्याळांत एकच वेळ दाखविली गेली असेल‚ तर ती अधिकृत वेळ म्हणून नोंदवावी.
क) दोनच घड्याळे वेळ दाखवीत असतील‚ तर अधिक वेळ दाखविणाऱ्या घड्याळातील वेळेची अधिकृत वेळ म्हणून नोंद करावी.
ड) तीन घड्याळे वेगवेगळी वेळ दाखवीत असतील‚ तर त्यांपैकी मधली वेळ अधिकृत वेळ म्हणून नोंदवावी.

८) सेकंदाच्या किमान १/१० (एक-दशांश) भागापर्यंत वेळेची नोंद करावी. (शक्यतो सेकंदाच्या एक-शतांश भागाची नोंद करणे अधिक चांगले.)

स्टॅगर्स (Staggers)

१) २०० मी.‚ ४०० मी. धावणे व ४०० मी. हर्डल्स आणि ४ × १०० मी. रिले व ४ × ४०० मी. रिले या शर्यतीसाठी स्टॅगर्स दिले जातात. (८०० मी. शर्यतीसाठीही स्टॅगर्स देता येतात.) फेरीतील सर्व स्पर्धकांना सारखेच अंतर धावण्यास लागावे म्हणून स्टॅगर्स दिले जातात.

२) २०० मी.‚ ४०० मी. धावणे आणि ४०० मी. हर्डल्ससाठी पुढीलप्रमाणे स्टॅगर्स द्यावेत. (ट्रॅकच्या सरळ पट्ट्याची लांबी व धावण्याची त्रिज्या थोडी कमी-जास्त असली तरी पुढील स्टॅगर्समध्ये बदल होत नाहीत.)

पट्टा२०० मी.साठी स्टॅगर्स४०० मी.साठी स्टॅगर्स
०.०० मी. ०.०० मी.
३.५२ ’’ ७.०४ ’’
७.३५ ’’१४.७० ’’
११.१८ ’’ २२.३७ ’’
१५.०२ ’’३०.०४ ’’
१८.८५ ’’३७.७१ ’’
२२.६९ ’’४५.३८ ’’
२६.५२ ’’३.०५ ’’

३) ८०० मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये स्टॅगर्स दिले जातात. या शर्यतीत फेरीतील स्पर्धक ट्रॅकचा पहिला वक्र संपेपर्यंत आपापल्या पट्ट्यातून धावतात‚ वक्र संपताच बाहेरील पट्ट्यातील स्पर्धक आतील पहिल्या पट्ट्यात येऊ शकतात.

एक वक्र आपापल्या पट्ट्यातून धावावयाचे असल्याने २०० मी. शर्यतीसाठी दिले जाणारे स्टॅगर्सचे अंतर आणि बाहेरील पट्ट्यातून आतील पहिल्या पट्ट्यात येण्यासाठी तोडावे लागणारे जादा अंतर यांचा विचार करून ८०० मी. शर्यतीसाठी स्टॅगर्स दिले जातात. प्रत्येक पट्ट्यातील स्पर्धकाला पुढीलप्रमाणे स्टॅगर्स दिले जातात :

पट्टास्टॅगर्स अंतर
०.०० मी.
३.५३ ’’
७.३८ ’’
११.२६ ’’
१५.१६ ’’
१९.०८ ’’
२३.०२ ’’
२६.९६ ’’


४) ४ × १०० मी. आणि ४ × ४०० मी. रिले शर्यतीसाठी स्टॅगर्स द्यावे लागतात. (याची माहिती पुढे रिले शर्यतींच्या संदर्भात दिलेली आहे.)

मध्यम व दीर्घ अंतराच्या शर्यती

१) ८०० मी. व १५०० मी. शर्यतींचा समावेश मध्यम अंतराच्या शर्यतीत होतो. ५००० मी. व १०‚००० मी. शर्यतीचा समावेश दीर्घ अंतराच्या शर्यतीत होतो. या शर्यती ट्रॅकवरच घ्यावयाच्या असतात. या शर्यतींसाठी स्टॅगर्स देण्याची आवश्यकता नसते. (८०० मी. शर्यतीसाठी स्टॅगर्स देण्याची एक पद्धती आहे.)

२) शर्यत सुरू होताना स्पर्धक आपापल्या पट्ट्यात उभे असतात. शर्यत सुरू होताच त्यांना आतील पट्ट्यांत येण्यास मुभा असते. आतील पट्ट्यांत येण्यासाठी जे जादा अंतर तोडावे लागते‚ त्यासाठी स्पर्धकांना वक्राकार (Arc) आरंभ रेषेवर उभे करून शर्यतीचा आरंभ केला जातो.

३) पुढील स्पर्धकाला मागे टाकून दुसऱ्या स्पर्धकाला पुढे जायचे असेल (Overtake) तर त्याला अडथळा न आणता त्याच्या उजवीकडून पुढे गेले पाहिजे. खेळाडूच्या पुढे किमान दोन मीटर जाऊन मग आतील पट्ट्यात यावे (पुढे धावणारा खेळाडू जर आतील पट्टा सोडून बाहेरील पट्ट्यातून धावत असेल‚ तर त्याच्या डावीकडून पुढे जायला हरकत नाही.)

४) १५०० मी.‚ ५००० मी. आणि १०‚००० मी. धावण्याच्या शर्यतींसाठी फेरीगणक अंतिम रेषेजवळ उभे राहतील. एक खास फेरीगणक स्पर्धकांना त्यांच्या किती फेऱ्या शिल्लक राहिल्या‚ ते सांगेल. स्पर्धकास प्रत्येक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागला‚ हे अधिकृत वेळाधिकारी सांगेल आणि संबंधित फेरीगणक वेळेची नोंद करतील. (एका फेरीगणकाकडे चारपेक्षा अधिक स्पर्धक सोपवू नयेत.)

Leave a Reply