संत एकनाथ महाराजांची माहिती – Sant Eknath Information In Marathi
संत एकनाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात १५३३ साली पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. बालपणीच आई-वडील वारल्यामुळे एकनाथ पोरके झाले. आजोबांच्या छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले. आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले. एकनाथांना लहानपणापासून
अध्यात्माची व हरिकीर्तनाची आवड होती.
वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे त्यांनी अध्ययन केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालवली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
गिरिजाबाई नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदा व गंगा नावाच्या दोन मुली होत्या. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली. संसारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले.
आळंदीस जाऊन संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू केले. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या साहित्यातून त्यांनी रंजन व प्रबोधन केले. ते ‘एका जनार्दनी” म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. एकनाथांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यामध्ये टीकाग्रंथ, आख्यान, काव्य, आध्यात्मिक प्रकरणे, याबरोबरच अभंग, गौळणी, भारुडे इत्यादींचा समावेश आहे. ‘चतुःश्लोकी भागवत’ तसेच ‘एकनाथी भागवत’, ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘भावार्थ रामायण’ ही त्यांची ग्रंथसंपदा.
संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील उदारमतवादाचे व नेमस्त संप्रदायाचे जनक मानले जातात. त्यांचा जीवनक्रम म्हणजे समन्वयवादाचा एक उत्कृष्ट आदर्श होय. विठ्ठलाची भक्ती, संतांचा सहवास यातून जीवनाचा आनंद अनुभवावा हेच एकनाथांनी आवर्जून सांगितले.
एकनाथ महाराज अतिशय बुद्धिमान होते. भागवतावर लिहिलेला त्यांचा टीकाग्रंथ म्हणजे, ‘एकनाथी भागवत’ म्हणून सर्वपरिचित आहे.
“काय करिशी काशी गंगा। भितरी चांगा नाही तो।।
एकनाथांनी बोली भाषेत सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत साहित्यनिर्मिती केली. आचारांची शुद्धता राखून त्यांनी कर्मठते विरूद्ध बंड केले. प्रेमळपणा, सौजन्य व शांती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. ते भूतदया मानत असत. त्या काळी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड दूर करण्यासाठी सोप्या भाषेत भारुडं, गौळणी लिहून उपदेश लोकांच्या मनावर बिंबवला. त्या काळात समाजातील स्रियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार या विषयी ‘रोडगा’ या भारुडातून त्यांनी स्त्रियांच्या मनाची स्थिती व्यक्त केली आहे.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहीन तुला ।।
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ।।
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ।।
जाऊ माझी फडफड बोलती । बोबडी कर ग तिला ।।
नंदेचे पोर किरकीर करिते । खरूज होऊ दे त्याला ।।
शेवटी ती म्हणते, “मला छळणारे सर्वच खपू दे नि मी एकटीच मागे राहू दे.” अशा प्रकारे तिच्या मूक भावनेतून तिच्या विचारांना व्यक्त करण्याचे काम संत एकनाथांनी केले. त्याच प्रमाणे ‘दादला’ हे भारुड विनोदी अंगाने लिहून हसत हसवत आशय लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले. स्रीला नकाराचे स्वातंत्र्यच नव्हते. लहान वयातच घरातील मंडळी तिचे लग्न लावून देत असत. फक्त संसार करायचा यापलीकडे तिने विचारच करायचा नाही असा तो काळ होता. त्या काळातील स्त्रियांना जणू ह्या भारुडाने बोलकं केले.
मोडकेसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ।
मला दादला नको गं बाई ।।
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी ।
शिवाया दोराच नाहीं ।। मला दादला नको गं बाई ।।
महारीण, परटीण, माळी, कुंटीण, भटीण, बैरागीण अशा समाजातील वेगवेगळ्या जातींतील स्रियांची प्रातिनिधिक स्वरूपात स्रीची योजना करून त्यांनी तमाम स्रियांचे दुःख शब्दांत मांडले.
‘विंचू चावला’ हे भारुड खूप गाजलं. आजही एकनाथांची भारुडे म्हटली जातात. एकनाथांची भारुडे अतिशय अर्थपूर्ण आहेत. भारुड याचा अर्थ बहुरूढ म्हणजेच लोकप्रिय असे गीत होय. भारुडांमधून त्यांनी लोकांच्या गुणा-अवगुणांवर टिका केलेली आहे. तसेच बोधही दिलेला आहे.
एक नाही, दोन नाही, तर तब्बल १२५ विषयांवरील भारुडे असून त्यांची संख्या ३००वर आहे. तसेच एकनाथांच्या गौळणीही प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक गाजलेली गवळण.
वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।। धृ ।।
राधा पाहून भुलले हरी।। बैल दुभवी नंदाघरी ।।
गौळणीमधून आपल्या उपास्य दैवतावरील एकनिष्ठ प्रेमभाव, मधुराभक्ती प्रकट करणाऱ्या गौळणी आहेत. हा गीतप्रकार प्रतिष्ठित समाजात जास्त रुजला आणि बहरला. कीर्तन, भजनात नेहमी गवळणी म्हटल्या जातात.
एकनाथांनी त्यांच्या कवितेत काही प्रसंगांचे सुरेख वर्णन केलेले आहे. त्यापैकी एका प्रसंगाचे वर्णन.
गोदावरी उत्तम तीरी । चौ योजनांचा चंद्रगिरी ।।
श्री जनार्दन तेथेवेरी । स्वभावे गेला ।।
तो अति दीर्घ चंद्रगिरी । तळी चंद्रावती नगरी ।।
तेथ ‘चंद्र’ नामा द्विजवरी । वस्ती त्या घरी स्वभावे घडली ।
तेणे चतुश्लोकी भागवत वाखाणिले यथार्थ युक्त ।
तेणे श्रीजनार्दन अत्यंत झाला उत्सवयुक्त अद्भुत स्वानंदे ।।
गुरू जनार्दन स्वामी समवेत एकनाथ तीर्थयात्रेस निघाले. ते दोघे गोदावरीच्या तीरावरील चंद्रावती या गावी आले व चंद्रभट या ब्राह्मणाकडे उतरले हा ब्राह्मण दिवसा काम करून रात्री प्रवचन करत असे. त्या दिवशी चंद्रभटचे चतुःश्लोकी भागवतावरील व्याख्यान गुरू-शिष्यांनी ऐकले. पुढे या गुरू-शिष्यासमवेत चंद्रभटही तीर्थयात्रेस निघाले. पुढे त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथांना ‘चतुःश्लोकी भागवत’ यावर टीका लिहिण्यास आज्ञा केली. तिथेच चतुःश्लोकी भागवत हा ग्रंथ एकनाथांनी लिहून समाप्त केला.
परमेश्वर हा फक्त जाणून समजून उमजून घ्यायचा विषय नाही तर तो नितांत श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे. अंगाला राख फासून आणि भगवी वस्र परिधान करून कोणीही साधक होत नाही तर त्यासाठी मनोभावे साधना करावी लागते. ईश्वरापर्यंत जाण्यासाठी नामात आर्तता, ओढ लागते. अशा वेळेला दिव्य नामाचा जप अंतर्मनात चालू होतो, हे लोकांना माहीतच नाही. याविषयी संत एकनाथ महाराज म्हणतात.
जग राम राम म्हणे । तया कां न येती विमाने ।
नवल स्मरणाची ठेव । नामी नाही अनुभव।।
साधकाच्या जीवनातील सद्गुरूंचे महत्त्व खालील रचनेत एकनाथांनी सांगितले आहे; ते पाहा
सद्गुरूवांचोनी नाम न ये हाता ।
साधने साधिता कोटी जाणा ।
संतांशी शरण गेलिया वांचोनि ।
एका जनार्दनी न कळे नाम ।।
सदगुरू असल्याशिवाय गुरुमंत्र मिळत नाही. गुरुमंत्र म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण केल्याने परमेश्वरप्राप्ती होते. जो खरा सद्गुरू असतो. अशा सद्गुरूला शरण गेल्याशिवाय परमेश्वरनामाचा मंत्र मिळत नाही. त्या साधकाला पूर्ण दिशा न मिळाल्यामुळे तो परमेश्वरप्राप्तीचा रस्ता भटकू शकतो. गुरुमंत्र मिळाला तर ईश्वरप्राप्ती लवकर होते असं संत एकनाथ महाराज म्हणतात. सद्गुरूचा नाम मंत्र म्हणजे परिस आहे.
आपुले कल्याण इच्छिणे जयासी ।
तेणे या नामासि विसंबू नये ।।
संत एकनाथांनी मनाचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केलेला दिसतो. वरील रचनेतून त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. आपल्या सकारात्मक विचारांमध्ये खूप शक्ती असते. आपण जसे विचार करतो, तसेच त्याचे फळ आपल्याला मिळते. जे कर्म आपण करतो ते करत असताना आपले मन जर जेव्हा परमेश्वर नामाशी एकरूप होते, त्यावेळेला आपल्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही. परमेश्वराचे नामस्मरण हे सकारात्मक ऊर्जेचं काम करतात. ही ऊर्जा जर आपण साठवायचा प्रयत्न केला तर, “आनंदाच्या डोही आनंद तरंग ” अशी आपली अवस्था होते.
‘सर्वाभूती भागवद्भाव’ हे भक्तीचे मर्म पटवून देताना हठयोग, ज्ञानयोग, कर्मयोग किंवा आश्रमधर्म हे सारे उपाय अपाय ठरतात असे सांगून आचाराच्या नव्या व्याख्या एकनाथांनी निर्माण केल्या. यातूनच एकनाथांचे बुद्धिसामर्थ्य दिसते. नवीन नवीन शब्दांचा वापर करून वाचकांना प्रभावित करण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. रूढ शब्दांतून नवा अर्थ काढण्याची शोधक वृत्ती त्यांच्या ठिकाणी दिसून येते.
जे जे ब्रह्मांडी इंद्रियवृत्ती। ते चि स्थिती पिंडी ।
या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जी चैतन्यशक्ती आहे, ते आपल्या शरीराच्या ठिकाणी व्यापलेले आहे असे एकनाथ महाराजांनी म्हटले. अनेक उदाहरणे देऊन पटवून सांगण्याची त्यांची हातोटी होती. उदा. भ्रमराकडून बोध घेताना काही लक्षणे सांगितली आहेत. ते म्हणतात, “भ्रमर फुलाला न दुखवता त्यातील मध चुंबून घेतो. अशी त्याची चौकस बुद्धी असते; पण त्याला कमलिनीचा अतिलोभ होतो. त्याला वेळेचं भान राहत नाही. सायंकाळी फुलाने पाकळ्या मिटून घेतल्याने त्या बंधनात त्याला अडकून पडावे लागते. त्याप्रमाणे सुजाण योगी यांना संसाराचा मोह झाला तर संसाराच्या बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यांची स्थिती भुंग्याप्रमाणे होते. तैसेची योगिया निटकु। शास्त्रदृष्टी अतिविवेकु। असली पाहिजे. लोभविरहित कर्म केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. कोणत्याही गोष्टीचा मोह केल्यास संसारातच माणूस आडकून पडतो.भोवतालच्या जीवनातील वास्तवाचे प्रतिबिंब नाथांच्या साहित्यात जागोजागी प्रत्ययाला येते.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे म्हणतात. एकनाथ महाराजांच्या जीवनातील प्रसंग, अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. त्यापैकीच काही प्रसंग; ज्या काळात उच्च वर्गातील लोक शूद्रांची सावलीही अशुभ मानत, त्या काळात एकनाथांनी अस्पृश्याच्या वाट चुकलेल्या मुलाला कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचविले, पूर्वजांचे श्राद्ध घालायचे होते त्यांच्या पत्नीने जेवण बनविले. एकनाथांच्या घरी श्राद्धाला ब्राह्मण येईनात तेव्हा शिजवलेले अन्न त्यांनी अस्पृश्यांना खाऊ घातले. देवासाठी कावडीमधून आणलेले गंगाजल तहानेने व्याकूळ होऊन पडलेल्या गाढवाला पाजले. यासारख्या एकनाथांच्या जीवनातील घटनांवरून अद्वैत वेदांताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होता हे दिसून येते. खरे अध्यात्म त्यांनी जाणले होते. त्या मार्गानेच ते आयुष्यभर वागले. राग, लोभ, मोह, माया याचा लवलेशही त्यांच्या वागण्या, बोलण्यात नव्हता.
संस्कृत भाषेतील ज्ञानामृत सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने संत एकनाथांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला; परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारूडं, गवळणी आदींच्या सहाय्याने लोकांना परमार्थमार्गास लावले.
संताची नित्य आठवण करणे म्हणजे आनंद अनुभवणे हे अगदी खरं आहे. अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यांनी अनेक रचनांमध्ये हाताळले आहेत. ‘रुक्मिणीस्वयंवर’मध्ये श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. ‘एकनाथी भागवत’ ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे.
भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवसिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. ‘बालकांड’, ‘अयोध्या कांड”, ‘अरण्य कांड”, ‘किष्किंधा कांड”, ‘सुंदर कांड ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्धकांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी प्राण सोडला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्या आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन मुस्लीम सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.
या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी संत एकनाथ महाराजांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेले ‘तुळशीमाहात्म्य’ व ‘सीता मंदोदरीची एकात्मता’ या पुराणकथा रोचक आहेत. त्यामध्ये नाथांनी स्वभावचित्रणं रेखाटली आहेत. कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि ज्ञानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत.
एकनाथांनी गेय पदरचना केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यात सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुवपदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात.
‘वारियाने कुंडल हाले”, ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा.” असे कितीतरी नाथांची गीतं आजही लोक आवडीने ऐकतात.
प्राचीन मराठीतील भारुडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोतिषी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत.
एकनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत.
ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विसकळीत झाली होती. संत एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली; म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले. ज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील; पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे ‘नाथांचे भागवत’ होय. भावार्थ रामायणामुळे मुक्तेश्वरांसारख्या कवीला रामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. ‘रुक्मिणीस्वयंवराने’ तर आख्यान काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला.
बहुजन समाजाला रूपके समजतात व आवडतात, म्हणून एकनाथांनी रूपकप्रचुर शैलीचा वापर केला. मराठीचा पुरस्कार करतानाही, सर्वसंग्राहक भाषादृष्टीने त्यांनी संस्कृत भाषेचे प्रौढत्व तिला प्राप्त करून दिले आणि आपल्या भारुडरचनेत बोलीभाषेचाही स्वीकार केला. वीररसाचा आविष्कार, अभंगरचनेतील भेदक समाजचित्रण, कीर्तनोपयोगी नाट्यपूर्ण कथाकाव्य त्यांनी रचली. लोकसेवेचं साधन म्हणूनच एकनाथांनी कवित्वाची साधना केली.
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर,नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाची सुरुवात केली. एकनाथांनी त्या भागवत भक्तिपंथाची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. भागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान नाथांनी प्राप्त करून दिले.
एकनाथांचे साहित्य हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाज- प्रबोधन व समाजसंघटन केले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. आजही हजारो भाविक षष्ठीला संत एकनाथांच्या दर्शनास पैठणला दरवर्षी जातात.
या थोर संत एकनाथ महाराजांचा पावनभूमीत मी जन्माला आले याचा मला अभिमान वाटतो.
पुढे वाचा: