सारांश लेखन मराठी ९वी आणि १०वी – Saransh Lekhan in Marathi

Table of Contents

सारांश लेखन म्हणजे काय प्रस्तावना

गदय उताऱ्याच्या आकलनाचा एक प्रश्न विदयार्थ्यांना परीक्षेत दिलेला असतो. त्यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा दिला जातो. ‘विदयार्थ्याला शिक्षकांच्या मदतीशिवाय, स्वतंत्रपणे, स्वयं अध्ययनाने उतारा समजून घेता आला पाहिजे,’ हे ‘उताऱ्याचे आकलन’ या अभ्यासघटकामागील मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच, हे आकलन अनेक रितींनी आत्मसात करता येते. त्यांपैकी इयत्ता नववी-दहावी मध्ये आपल्याला पुढील रीत अभ्यासायची आहे :

दिलेल्या उताऱ्याचा सारांश एक- तृतीयांश शब्दांत लिहिणे.

सारांशलेखनासंबंधी मार्गदर्शन

सारांशलेखनाच्या प्रश्नासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरील एखादा उतारा दिला जातो. सारांशलेखन करताना दिलेल्या उताऱ्याच्या सुमारे एक तृतीयांश इतका सारांश विदयार्थ्याने लिहावा, अशी अपेक्षा असते. हा सारांश आपल्या स्वतःच्या शब्दांत सुसंगतपणे लिहायचा असतो, हे महत्त्वाचे आहे.

सारांशलेखनासाठी महत्त्वाच्या सूचना :

(१) उतारा काळजीपूर्वक वाचावा. वाचता वाचता महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत. उताऱ्यातील शब्द मोजून त्यांची संख्या बाजूला नोंदवून ठेवावी. या उताऱ्यात कोणता विचार मांडला आहे, हे मनातल्या मनात आठवून पाहावे.

(२) पुन्हा एकदा उतारा काळजीपूर्वक वाचावा. एखादा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा राहून गेला नाही ना, हे तपासून पाहावे.

(३) दिलेल्या उताऱ्यातील विचार कोणाला सांगायचा झाला, तर कसा सांगावा याची कल्पना करावी. तोच विचार स्वत:च्या शब्दांत थोडक्यात लिहून काढावा. हा तुमच्या सारांशाचा कच्चा मसुदा झाला. यात मूळ उताऱ्यातील सर्व मुद्दे आले आहेत ना, हे काळजीपूर्वक पाहावे. उताऱ्यात नसलेला मुद्दा सारांशामध्ये घेऊ नये.

(४) मूळ उताऱ्यातील उदाहरणे, आलंकारिक शब्द सारांशामध्ये जसेच्या तसे आणण्याची आवश्यकता नसते. मूळ उताऱ्यामध्ये अवतरणातील मजकूर जसाच्या तसा सारांशात घेऊ नये. अवतरणातील मजकूर तृतीयपुरुषी निवेदनात व थोडक्यात लिहावा.

(५) तुम्ही तयार केलेल्या सारांशातील शब्द मोजावेत. सारांशाची शब्दसंख्या मूळ उताऱ्याच्या एक-तृतीयांश असणे आवश्यक आहे. ही संख्या नेमकी एक तृतीयांश एवढीच असली पाहिजे असे नाही, चार-पाच शब्द कमी किंवा जास्त चालू शकतात. हे लक्षात घेऊन आपल्या कच्च्या मसुदयातील किती शब्द कमी करायचे किंवा वाढवायचे, ते पाहा. त्यानुसार सारांश पुन्हा लिहून काढावा. हा आपला पक्का मसुदा होईल.

(६) सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते. प्रश्नामध्ये शीर्षक दया’ असे सांगितले नसले, तरी शीर्षक दयावे. शीर्षक वाचताक्षणी उताऱ्यातील विचार लक्षात यायला हवा, अशी अपेक्षा असते.

(७) या पद्धतीने वर्षभरात किमान दहा उताऱ्यांचा सारांश करण्याचा सराव करावा. वर्षभरात असा सराव केलात, तर परीक्षेमध्ये सारांशलेखन कमीत कमी अवधीत व सहजगत्या करता येईल.

सारांशलेखनाचे फायदे

सारांशलेखन हे फक्त परीक्षेतच उपयोगी असते असे नाही तर प्रत्यक्ष जीवनातही अनेक ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो. त्यांपैकी काही फायदे असे :

(१) पाठ्यपुस्तकातील एखादया पाठात किंवा इतिहास-विज्ञान यांसारख्या विषयांच्या पुस्तकांतील प्रकरणात काय सांगितले आहे, हे थोडक्यात सांगता येते.

(२) वर्गात शिक्षकांनी काय शिकवले. ते थोडक्यात सांगता येते.

(३) एखादया ऐकलेल्या भाषणाचे सार सांगता येते.

(४) पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचे थोडक्यात अचूक वर्णन करता येते.

(५) मोठेपणी कार्यालयात काम करताना अनेक कामांचे थोडक्यात अहवाल किंवा टिप्पणी लिहिता येते.

(६) आपल्या कोणत्याही अनुभवाचे संक्षिप्त वर्णन करता येते.

अशा प्रकारे, सारांशलेखन हे कौशल्य आयुष्यभर वेळोवेळी उपयोगी पडते.

सारांश लेखन मराठी उतारा – सारांशलेखनाचे काही नमुने

प्रश्न. पुढील उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश लिहा :

नमुना १: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे. नाइलाज झाल्याशिवाय हिंसा करूच नये, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय ? प्राण घेणे, जिवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. दुसऱ्याचे मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेचीच रूपे आहेत. भारतात महात्मा गांधींनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्षे तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला आहे. ब्रिटिश माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता, त्यांच्या राजवटीविरुद्ध लढा दयायला गांधीजींनी शिकवले.

उत्तर : अहिंसेचे बळ

कोणालाही ठार मारणे ही हिंसा आहे. त्याचप्रमाणे कुणालाही दुखावणे, अपमानित करणे ही पण हिंसाच आहे. महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा दिला. नेल्सन मंडेला यांनीही अहिंसात्मक मागनि दक्षिण आफ्रिकेतील अन्यायपीडितांना न्याय मिळवून दिला.


नमुना २: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

लाहोर कटाच्या खटल्याने साऱ्या भारताचे चित्त खेचून घेतले होते. अनेक क्रांतिकारकांना त्या वेळच्या नोकरशाहीने तुरुंगात डांबून त्यांचे अनन्वित हाल मांडले होते. नोकरशाहीने ज्यांच्यावर दात धरला होता अशा अनेकांना लाहोर कटाच्या जाळ्यात गोवले होते आणि त्यातच बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक श्री. जतींद्रनाथ दास हे एक होते. जतींद्रनाथांना, वस्तुतः लाहोरच्या कटाशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध सिद्ध न करता सरकारने पकडले होते. १९२० सालच्या असहकाराच्या चळवळीत सामील झाल्यापासूनच नोकरशाहीचा त्यांच्यावर दात होता. पाच वर्षांत त्यांना चार वेळा तुरुंगात अडकवण्यात आले. चौथ्यांदा ज्या वेळी ते मैमनसिंगच्या तुरुंगात गेले, तेव्हा त्यांचा इतका छळ झाला की, वैतागून त्यांनी जेल सुपरिंटेंडंटशी मारामारी केली. परंतु या गुन्ह्यामुळे त्यांना अंधारकोठडीची शिक्षा भोगावी लागली. तेथे जतींद्रनाथांनी उपवास आरंभला. २३ दिवस त्यांनी उपाशीपोटी काढले, तेव्हा त्यांच्या तक्रारीची थोडीशी कुठे दाद लागली. यशवंतराव चव्हाण

उत्तर : ब्रिटिशांची दमनशाही

लाहोर कटाच्या निमित्ताने अनेक क्रांतिकारकांना नोकरशाहीने अटक केली. जतींद्रनाथांना अकारण अटक झाली; त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला होता. त्याचा राग त्यांनी इथे काढला. तुरुंगात त्यांचा अतिशय छळ करण्यात आला, म्हणून त्यांनी तुरुंगाधिकाऱ्यांशी मारामारी केली. याची शिक्षा म्हणून जतींद्रनाथांना अंधारकोठडीत टाकण्यात आले. त्यांनी तेथे उपोषण सुरू केले, तेव्हाच त्यांच्या तक्रारीची दाद लागली.


नमुना ३: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

उद्दामपणा अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे. ज्याला थोडेसे सायन्स कळले तो म्हणतो, “आम्ही निसर्गावर मात केली, विजयी झालो!” पण खरा शास्त्रज्ञ असे करीत नाही. एक शोध त्याला लागला की तो म्हणतो, “देवा, तुझी लीला अगाध आहे! किती कौशल्याने तू जगात वस्तू निर्माण करतोस. जितके जितके मी शोधतो तितके तितके माझे अज्ञानच प्रकट होते. परमेश्वरा, तू दिलेला हा मेंदू किती रे चांगला” असे म्हणून तो परमेश्वरापुढे नम्र होतो. सायन्सने आज आमचा अहंकार कमी केला. हे विश्व केवढे आहे. त्यात आपण रज: कणापेक्षा फारसे मोठे नाही. हे विज्ञानाने आम्हांस शिकवले. विज्ञानानेच सत्यदर्शन करून आमच्या अहंकाराचा धुव्वा उडवला. खरे जे शास्त्रज्ञ, त्यांची वृत्ती अशी होते.

जगाचा मामला तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, “महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.’ धकाधकीचा आहे. त्यात वाचायचे असेल तर नम्रता धारण करायला हवी. परमेश्वरापाशी आपण जातो, त्या दगडाच्याही पुढे आपले मस्तक नमवितो. का? आपण दाखवतो, परमेश्वरा, माझ्या बुद्धीची, कार्याची सपाटी जमिनीबरोबर आहे. दगडापेक्षा मी काही मोठा नाही. काही नाही माझ्याजवळ आणि तू तर सर्वसंपन्न! लहान मुलाप्रमाणे आपण तोंडावर चापट्या मारून घेतो. आपली नम्रता व्यक्त करण्यासाठीच आपण हे सारे करतो. नम्रता संपली की माणुसकीही संपलीच. यदुनाथ थत्ते

उत्तर : ज्ञान आणि नम्रता

लेखक यदुनाथ थत्ते सांगतात की, अर्धवट ज्ञान प्राप्त झालेला माणूस त्या ज्ञानाने उद्दाम होतो; तर उलट खरा ज्ञानी, शास्त्रज्ञ नव्या ज्ञानाच्या साक्षात्काराने अधिकाधिक विनम्र होतो. कारण त्याला परमेश्वराच्या निर्मितीचा मोठेपणा उमगतो. तुकाराम महाराजांनीसुद्धा ज्ञानाबरोबर नम्रतेचा उपदेश केला आहे. कारण नम्रतेनेच आपला टिकाव लागतो आणि जेथे नम्रता असते तेथेच माणुसकी असते.


नमुना ४: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

सध्याचा सरकारी वनमहोत्सव सुरू होण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी १९०८ साली रवींद्रनाथांनी वृक्षारोपणाची ही मोहीम सुरू केली आणि त्यांच्या शब्दांतच सांगायचे तर ही ‘मरु विजया’ची म्हणजे वाळवंटावरच्या विजयाची मोहीमच होती. ही मोहीम त्यांनी किती यशस्वी करून दाखवली, याची साक्ष पटवीत आज शांतिनिकेतनात शेकडो झाडे उभी आहेत. रवींद्रनाथांच्या या वृक्षप्रेमात त्यांचे चिरंजीव रथींद्रनाथ यांची नुसती साथच नव्हती, तर वने- उपवने उभी करण्याच्या शास्त्रातले ते एक फार नामांकित तज्ज्ञ होते. वृक्षवेलींच्या सगळ्या खोडी, आवडीनिवडी, लहरी रथीबाबूंना बरोबर ठाऊक होत्या. “साऱ्या भारतीय वृक्षांचं मी इथं कायमचं संमेलन भरवून ठेवीन” अशी प्रतिज्ञा केल्यासारखे त्यांनी शांतिनिकेतनाचे तपोवन उभे केले आहे, इतकेच नव्हे, तर फुलझाडांना लागणाऱ्या कुंड्यादेखील स्वतः त्यांचे ‘डिझाइन’ करून. आकार देऊन, स्वतः भट्टीत घालून इतक्या विविध आणि सुंदर आकारांत घडवल्या आहेत, की एखादया बंगल्याच्या मालकाला आपल्या बंगल्याचा अभिमान वाटावा तसा त्या रोपांना आपल्यासाठी घडवलेल्या त्या कुंड्यांचा वाटत असेल. ‘उत्तरायण’ बंगल्याच्या परिसरात त्यांनी निर्माण केलेल्या बागेतून – अशोकवनातून – निरनिराळ्या वृक्षांच्या वीथिकांतून हिंडताना माणूस नकळत अंतर्मुख होतो. – पु. ल. देशपांडे

उत्तर : रथींद्रनाथांचे वृक्षप्रेम

सरकारी वनमहोत्सव सुरू होण्यापूर्वीच रवींद्रनाथांनी वृक्षारोपणाची मोहीम सुरू केली होती. ते त्याला ‘मरुविजय’ मानत. रवींद्रनाथांचे चिरंजीव रथींद्रनाथ हे वने- उपवने उभी करण्यातील तज्ज्ञ होते. त्यांनी शांतिनिकेतनाच्या तपोवनात भारतीय वृक्षांचे कायमचे संमेलनच उभे केले होते. वृक्षांच्या सर्व खोडी, आवडीनिवडी त्यांना माहीत होत्या. त्यांनी त्या झाडांसाठी स्वतःच अप्रतिम कुंड्या तयार केल्या होत्या. लेखक म्हणतात, त्या तपोवनातून हिंडताना माणूस अंतर्मुख होतो.


नमुना ५: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

हे समजून गुरुजींची ‘श्यामची आई’ म्हणजे कुमारांची जणू गीताच आहे. पण ज्याला ‘साने गुरुजी’ म्हणजे काय, घ्यायचे आहे, त्याने ‘श्यामची आई’ पुन:पुन्हा वाचली पाहिजे, पारायणे केली पाहिजेत. प्रत्येक माताच प्रेममयी असते व आपल्या मुलांसाठी ती कोणताही त्याग करायला मागेपुढे पाहणार नाही, हे खरे; पण गुरुजींची आई एक विलक्षण स्त्रीरत्न असले पाहिजे. आभाळ फाटावे तसा त्या माउलीचा संसार फाटत चालला होता, पण ती जिवाचे रान करून तो सावरू पाहत होती. घरात खायची ददात, धड वस्त्रांची टंचाई, पोराबाळांच्या शिक्षणाला दमडा नाही, पण श्यामची आई डगमगली नाही. आपल्या मुलांच्या मनाला उदात्त सुंदर वळण लावण्यासाठी ती आमरण झिजली. साने गुरुजींच्या जवळ जे जे काही सुंदर होते देण्यासारखे होते, ते तिने त्यांना दिलेले होते. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला तिने शिकवले. स्वतःच्या मुलांचे कोणीही कोडकौतुक करील. परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही तितक्याच प्रेमाने करावे, हे तिने शिकवले. तिच्या प्रेमाने, तिच्या रागाने, तिच्या अश्रूंनी गुरुजींचा मन:पिंड बाळसेदार झाला. – वसंत बापट (जिंकुनि मरणाला)

उत्तर : साने गुरुजींच्या आईची देणगी

लेखक वसंत बापट कुमारांना साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचायला सांगतात. कारण ते पुस्तक जणू मुलांची गीताच आहे. प्रत्येक आई मुलावर प्रेम करते, मुलासाठी त्याग करायला तयार असते. गुरुजींच्या आईवर चोहोबाजूंनी संकटे आली, तरी ती डगमगली नाही. तिने आपल्या मुलांना संस्कारसंपन्न केले. सर्वांवर प्रेम करण्यास शिकवले. तिच्या आचरणामुळेच गुरुजींच्या मनाचे सामर्थ्य वाढले.


नमुना ६: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

चेहरा कसाही असो, रंगरूप कसंही असो, माणूस अंतर्यामातून हसला की, तो सुंदर दिसतो. अशा सुंदर चेहऱ्यांच्या भेटी परवा ‘उमेद’ परिवारात झाल्या. अक्षरश: खांदयावर पेलत नव्हती अशी मुलं, त्यांच्या पालकांनी, त्यांच्या शिक्षकांनी स्टेजवर आणून चढवली अन् शक्तिहीन बोटे जुळवण्याचा आटोकाट प्रयत्न करून त्यांनी गणेशाला प्रार्थना केली. शारीरिक आणि मानसिक विकलांग मनांना उमेदीचा आधार देणारे सगळे कार्यकर्ते पन्नाशी गाठलेले होते. एकमेकांची सुखदुःखे जाणून घेत गेली चौदा वर्षे महाराष्ट्रातल्या शाळांना, पालकांना गुंफून घेत ही संस्था काम करते आहे.

ज्या आत्म्यांना अव्यंग आधार देताना परमेश्वराचेही हात शिणतात, तेथे तोही काही पालकांचा हात हाती घेतो न् म्हणतो ‘या जन्मी, माझं हे काम तुम्ही कराल का?’ हे काम करणं वाटतं तेवढं सोपं नाही. प्रत्यक्षात रणांगणात उतरावं लागतं, जिद्दीने हे मूल सांभाळताना स्वत:च्या आयुष्याची पुरचुंडी दूरही ठेवावी लागते, हौसमौज नावाची चीज उरत नाही. एकच ध्यास ! एकच श्वास ! जिद्दीने आपल्या बौद्धिक विकलांग मुलाला स्वतःचा चेहरा देणं! त्याला झेपणारा आनंद त्याला घेऊ देणं. असे आनंदी चेहरे त्या परिवारात भेटले. – प्रवीण दवणे (रे जीवना! – दोन )

उत्तर : परमेश्वराचे अपूर्ण काम

विकलांग मुले, त्यांचे पालक व त्यांच्या शाळा यांना उत्साह देण्यासाठी ‘उमेद’ परिवाराने कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे लेखकाला एकमेकांची सुखदुःखे जाणून घेणारी मंडळी भेटली. विकलांग मुलांचे हे पालक परमेश्वराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आपल्या विकलांग मुलांना आनंदी करण्यासाठी ते आपल्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करतात व जिद्दीने प्रयत्न करतात.


नमुना ७: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

विचाराने एखादी गोष्ट समजावून दिली की ती माणसाला पटते. समजावून देण्याऐवजी भय दाखवून, मार देण्याची भीती दाखवून पटवण्याचा प्रयत्न केला, तर भीती निर्माण होते; भीती न दाखवावी; तर माणूस स्वच्छंदी बनतो. सिंहाचे बळ त्याच्या दातांत आहे. हत्तीचे सामर्थ्य सोंडेत आहे. गाई- बैलांची शक्ती त्यांच्या शिंगांत आहे, तसे मानवाचे सर्वस्व कोणते–तर माणसाची शक्ती, ती त्याच्या बुद्धीत आहे. शारीरिक शक्तीला मर्यादा असते, पण बुद्धीला मर्यादा नसते. म्हणून माणूस प्राण्यांचा राजा बनला. या पृथ्वीवर राज्य करू लागला. पण याच बुद्धीमुळे माणूस अहंकारी बनला. बुद्धीचा वाईट उपयोग करू लागला. निर्बुद्धपणाने वागून तो आपले सामर्थ्य न ओळखील तर आपली शक्ती तो गमावून बसेल. माणसाच्या या बुद्धिसामर्थ्याला नीट मार्गावर ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो तो सत्याग्रह किंवा सत्यदर्शन!

उत्तर : सत्याग्रह

माणसाला वळण लावण्यासाठी मार देण्याची, भय दाखवण्याची गरज नसते. कारण तो बुद्धिमान आहे. त्याला एखादी पटवून दिली की समजते, पण माणूस कधी ना कधी बुद्धीचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतो. ही चूक दुरुस्त करण्याचा गोष्ट सत्याग्रह हा मार्ग आहे.


नमुना ८: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

माणसाचे जीवन म्हणजे विविध प्रकारच्या अनुभवांची साखळी असते. ज्या क्षणी त्याचा जन्म होतो, त्या क्षणीच या साखळीची गुंफण होऊ लागते. हे अनुभव जसे शारीरिक तसेच बौद्धिक आणि भावनिक असतात. असे विविध स्वरूपांचे अनुभव अनेकविध संदर्भातून एकमेकांवर प्रतिक्रिया करीत करीत संमिश्र होतात आणि त्यांच्या प्रभावाने माणसाचे व्यक्तिमत्त्व घडत असते. काही अनुभव जीवनात साहजिकपणे येतात; पण काही अनुभव आपल्या इच्छेने, आपल्या जिज्ञासेच्या ओढीमुळे घेण्याची प्रवृत्ती माणसात असते. हे सर्व अनुभव माणसाचे एक प्रकारचे सहजशिक्षण करीत असतात, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. मात्र हे शिक्षण बरेचसे अव्यवस्थित असते. अनुभवांचा उपयोग जाणीवपूर्वक करून आपले व्यक्तिमत्त्व अधिक समतोल, अधिक संपन्न कसे करावे हे माहीत नसेल तर कितीतरी महत्त्वाचे अनुभव वाया जातात. म्हणून, अनुभवांची योग्य पडताळणी करून, योग्य रचना करून, समतोल व्यक्तिमत्त्व घडवण्याची व्यवस्था करणे हे सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य असते. त्या अवस्थेला आपण ‘शिक्षणव्यवस्था’ म्हणतो.

उत्तर : अनुभव

आपल्याला दोन प्रकारे अनुभव मिळतात. नैसर्गिक परिस्थितीतून काही अनुभव मिळतात; तर काही वेळा आपण स्वतः कृती करतो. त्या कृतीतून अनुभव मिळतात. या दोन्हींमुळे आपले व्यक्तिमत्त्व घडते. कोणते अनुभव घ्यावेत व ते कसे घ्यावेत, याचे नियोजन केले, तर आपण सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवू शकतो. आपण शिक्षण घेतो, तेव्हा असे समतोल व्यक्तिमत्त्व घडवत असतो.


नमुना ९: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून वेळाचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळाचा वेग किती आहे? वेळाच्या सोबत आपल्याला चालता येईल का? कोणीही सांगू शकत नाही. पण जो वेळाचे भान बाळगतो, तो वेळासोबत सहज चालू शकतो. मात्र वेळाचे महत्त्व ओळखले पाहिजे. वेळाचे नियोजन केले पाहिजे. मग दैनंदिन कामे व्यवस्थित पार पडतात. शिवाय, इतर अनेक गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो. अशी माणसे अनेक छंद जोपासतात. घरी परतल्यावर दीड-दोन तास वाचन करू शकतात. काहीजण संगीताचा आस्वाद घेतात. काहीजण संध्याकाळचा फेरफटका मारतात; तर काहीजण कुटुंबीयांसोबत गप्पागोष्टी करतात.

वेळ नाही, ही सबब आळशी माणसे देतात. ही माणसे कामाचे नियोजन करीत नाहीत. त्यामुळे त्यांची कामे वेळेवर पार पडत नाहीत. त्यांना कामात अपयश येते. शिवाय, त्यांना मोकळा वेळही मिळत नाही.

उत्तर : वेळाचे महत्त्व

वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. वेळ जपून वापरला पाहिजे. त्यासाठी वेळाचे व कामाचे नियोजन केले पाहिजे. हे नियोजन काटेकोरपणे पार पाडले पाहिजे. मग कामे वेळेवर पार पडतात. आपल्याला इतर कामांसाठी व छंदांसाठी वेळ मिळतो. म्हणजे यश मिळते आणि आनंदही मिळतो.


नमुना १०: सारांश लेखन मराठी उतारा आणि उत्तर

शिक्षण मनाचा विकास करते. शिक्षण बुद्धीचा विकास करते. शिक्षणामुळे मन व्यापक बनते. शिक्षणाविना माणूस अज्ञानी राहतो. त्याला व्यवहार समजत नाही. जगाचे ज्ञान होत नाही. जगात कसे वागावे, हे कळत नाही. म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण सर्वांनी घेतले पाहिजे. स्त्रियांनीसुद्धा शिक्षण घेतले पाहिजे. समाजात स्त्रियांची संख्या निम्मी असते. स्त्रियांना शिक्षण दिले नाही, तर अर्धा समाज अज्ञानी राहील. स्त्रीशिक्षणाचे खूप चांगले परिणाम घडून येत आहेत. वाईट चाली नाहीशा होत आहेत. अंधश्रद्धा नाहीशा होत आहेत. विविध क्षेत्रांत स्त्रिया महत्त्वाच्या भूमिका पार पाडीत आहेत. मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत. काहीजणी आपापल्या देशाचे नेतृत्व करीत आहेत. हे सर्व शिक्षणामुळे घडत आहे.

उत्तर : शिक्षणाचे फायदे

शिक्षणामुळे माणसाच्या मनाचा व बुद्धीचा विकास होतो. म्हणून सर्वांना शिक्षण दिले पाहिजे. स्त्रियांना तर आवर्जून शिक्षण दिले पाहिजे. स्त्रियासुद्धा मोठमोठी कामे करू शकतात. विशेष म्हणजे स्त्रिया शिकल्या, तर समाजात सुधारणा होते.


स्वाध्याय

प्रश्न. पुढील उताऱ्यांचा प्रत्येकी एक तृतीयांश शब्दांत सारांश लिहा : –

नमुना १: सारांश लेखन मराठी उतारा स्वाध्याय

आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘वक्तशीरपणा’ होय. औदयोगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत, तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा. हाच वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय.

नमुना २: सारांश लेखन मराठी उतारा स्वाध्याय

पहिल्याच दिवशी भारताच्या परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची मुलाखत ऐकायला मिळाली. अमेरिका, जपान, मॉरिशस, सीरिया अशा अनेक देशांतील दूतावासात यशस्वी अधिकारी म्हणून नावलौकिक मिळालेल्या मुळेंच्या बालपणातील गमती ऐकताना मजा आली. कोल्हापूर जिल्ह्यातील लाट या छोट्याशा गावात ते वाढले. तिथे भरपूर खोड्या करीत स्वच्छंदपणे त्यांचे शालेय शिक्षण चालले होते. शिलाईचा व्यवसाय असलेल्या त्या घरात मुलांना परीक्षेनंतर फक्त ‘पास की नापास ?’ इतकाच प्रश्न विचारला जाई. पण त्यांची हुशारी बघून त्यांच्या सरांनी चौथीनंतर कोल्हापूरला नव्याने उघडलेल्या निवासी शाळेसाठी त्यांची निवड केली. तो त्यांच्या आयुष्यातील पहिला टर्निंग पॉइंट ठरला. त्याच शाळेच्या पहिल्या वर्धापनदिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शरद काळे या तरुण आयएएस अधिकाऱ्याला मिळालेला मानसन्मान पाहून मुळे प्रभावित झाले.

सारांश लेखन मराठी ९वी आणि १०वी – Saransh Lekhan in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply