विवाह पद्धती बद्दल माहिती – Vivah Paddhati Marathi
लग्न जुन्या धार्मिक पद्धतीने करावयाचे असल्यास ते मुलगी पसंत पडल्यानंतर केव्हाही करता येते. जुन्या काळी वाहनांची सोय नव्हती. लांबून मुलगी दाखवायला आणली व ती पसंत पडली तर लगेच दोन दिवसात लग्न आटोपून आईवडील आपल्या गावी परत फिरत असत. विवाहविधी, सप्तपदी, लाजाहोम, कन्यादान हे महत्त्वाचे विधी. हिंदू धर्मात अनेक जाती-जमाती आहेत. त्या सगळ्या जमातीत वरील विवाह-विधी आहेत. त्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही. होमाभोवतालचे सात फेरे झाल्यानंतर लग्न पूर्ण होते असे कायद्यानेही मान्य केले आहे.
विवाहाला संस्कार समजण्यात आले आहे. ह्या संस्कारामुळे विशिष्ट नैतिक बंधने व्यक्तींवर घातलेलीच असतात. अग्नि ब्राह्मणांसमोर वधूवरांना धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या जीवनाच्या चारही अंगांमध्ये एकमेकांना सहकार्य देण्याच्या शपथा घ्यावा लागतात. सप्तपदी हे लाक्षणिक अर्थाने सहजीवनाचे प्रात्यक्षिकच आहे. संसारातील प्रत्येक पाऊल, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, पतीपत्नींनी बरोबरच टाकायला हवे. नक्षत्र – दर्शन हा विधीसुद्धा मोठा सूचक आहे. पतीपत्नींनी एकमेकांवर ध्रुवासारखी अढळ निष्ठा ठेवायची हा त्याचा अर्थ आहे. विधीयुक्त विवाहसंस्कार करून घेऊन शपथांना जागण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हे सुखी संसाराचे उज्ज्वल ध्येय आहे.
दोन हिंदू व्यक्तीत कायदेशीर विवाह होण्यासाठी त्या दोन्ही व्यक्ती हिंदू असल्या पाहिजेत. ख्रिश्चन व मुसलमान सोडून इतर सर्वांना, म्हणजे बौद्ध, जैन, शीख वगैरे सर्वांना हिंदू विवाहाचा कायदा लागू आहे. विवाह विधीत अग्निसमोरील होम व सप्तपदी यांना महत्त्व आहे. काही वेळा वैदिक पद्धतीने लग्न केले जाते. वैदिक पद्धतीत सर्व विवाह – विधी सप्तपदी, लाजाहोम, मंगळसूत्र बांधणे, कन्यादान हे सर्व विधी अगोदर होतात. आणि नंतर तरपाट धरला जातो. वधू आणि वर एकमेकांना माळा घालतात व विवाह-विधी पूर्ण होतो. बाकी सर्व विधी धार्मिक पद्धतीनेच करतात, पण सर्व विधी लवकर आटोपतात.
हिंदू विवाह पद्धतीतील अवडंबर बाजूला सारून वयात आलेल्या, म्हणजे सज्ञान व्यक्तीला आपल्या मर्जीनुसार, सुटसुटीतपणे कायदेशीर विवाह करता येतो. काही ठिकाणी नोंदणी पद्धतीने म्हणजे रजिस्टर पद्धतीने लग्न लावले जाते. रजिस्टर मॅरेज हे स्पेशल मॅरेज ऍक्ट ह्या खाली येते. लग्नापूर्वी किमान एक महिना अगोदर रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन नोटीस द्यावी लागते. वधू आणि वर दोघेही सज्ञान असावे लागतात. वधू आणि वर दोघांनी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे प्रतिज्ञापत्रक भरावे लागते. प्रतिज्ञापत्रक भरताना एकूण तीन साक्षीदार असावे लागतात. साक्षीदाराने प्रतिज्ञापत्रकातील गोष्टी खऱ्या नाहीत असे माहीत असताना देखील साक्षीदार म्हणून सही केली तर त्याला कायद्याने शिक्षा होते.
रजिस्टर लग्न रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन करता येते. तिथे वधूवरांना शपथा घ्यावा लागतात व सह्या कराव्या लागतात. नंतर एकमेकांना हार घालून लग्न झाले असे कायद्याने मानले जाते. आपल्या घरीही रजिस्ट्रारला बोलावून लग्न लावता येते. त्यासाठी रजिस्ट्रारला रीतसर मानाने घरी आणावे लागते. ह्यासाठी सरकारने जी काही फी ठरवली असते ती द्यावी लागते.
प्रत्येक लग्न मग ते धार्मिक पद्धतीने, वैदिक पद्धतीने किंवा नोंदणी पद्धतीने केलेले असू दे, ते लग्न रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर करावे लागते. प्रत्येक लग्नाची रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंद असावी लागते व आपणाकडे मॅरेज सर्टिफिकेट असणे आवश्यक असते. पुढे इस्टेटीच्या वाटणीच्या वेळी वारस म्हणून कायद्याने हिस्सा घेते वेळी, नोकरीच्या वेळी, ह्या लग्नाची नोंद असणे उपयुक्त होऊ शकते. तेव्हा प्रत्येकाने रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन लग्न झाल्याची नोंद करावी व त्याची सर्व कागदपत्रं जपून ठेवावी.