आज आम्ही लहान मुलांसाठी २५ पेक्षा जास्त अकबर बिरबल छान छान गोष्टी घेऊन आलो आहे. अकबर बिरबल च्या मराठी गोष्टी (Akbar Birbal Story in Marathi) ह्या लहान मुलांच्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडेल.
अकबर बिरबल छान छान गोष्टी – अकबर बिरबल मराठी गोष्टी – अकबर बिरबल कथा मराठी – Akbar Birbal Story in Marathi
Table of Contents
अकबर बिरबल छान छान गोष्टी – अकबर-बिरबलाच्या प्रसिद्ध गोष्टी – Akbar Birbal Story in Marathi
- पर्शियाचे सहा राजे
- बिरबलने वाचविले प्राण
- बिरबल व जादूचे गाढव
- पिसाळलेला हत्ती
- शुभ्र उजेड
- बिरबलचा देशत्याग
- सावत्र भाऊ
पर्शियाचे सहा राजे
पर्शियाच्या राजाच्या कानावर बिरबलची कीर्ती आणि चातुर्याच्या गोष्टी गेल्या होत्या. बिरबल खरोखरच हुशार आहे का? हे समजून घेण्याची राजाला जिज्ञासा होती. पर्शियाच्या राजाने आपला एक खास दूत अकबराच्या दरबारात पाठविला. पर्शियाच्या राजाचे भेटीचे खास निमंत्रण बिरबलने स्वीकारले. मजल-दरमजल करीत बिरबल पर्शियाच्या राजदरबारात पोहोचला तेव्हा बिरबलला आश्चर्याच्या धक्का बसला. एक सारखे दिसणारे सहा राजे दरबारात बसले होते. सहा सिंहासनांवर सहा राजे बसले होते.
पर्शियाचाराजा आपलीपरीक्षाघेत आहे हे बिरबललालगेच कळले. बिरबलने क्षणार्धात खऱ्या राजाला ओळखले आणि तो राजाच्या समोर उभा राहिला. राजाला अत्यंत आश्चर्य वाटले. राजाने बिरबलला विचारले, “प्रिय बिरबल, तू एवढ्या अचूकपणे खरा राजा कसा काय ओळखलास?”
बिरबल म्हणाला, “महाराज बाकीचे राजे तुमच्याकडे पुढील आज्ञांसाठी बघत होते. तुम्ही एकटे समोर बघत होतात. तुम्ही खरे राजे असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. अन्य राजे तुमच्याकडे आज्ञेच्या आशेने बघत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. यामुळे तुम्हाला ओळखणे मला अवघड गेले नाही.” बिरबलच्या बुद्धिचातुर्यावर पर्शियाचा राजा खूष झाला.
बिरबलने वाचविले प्राण
अकबरहा एकखूप प्रेमळ राजा होता. पण त्याला रागसुद्धा पटकन येत असे. एक दिवस अकबर त्याच्या दरबारातील एका सेवकावर खूप भडकला. अकबर त्या सेवकावर इतका चिडला होता की त्याने शिपायांना हुकूमच दिला की, उद्या त्या सेवकाचे डोके कापून माझ्याकडे आणा.
तो सेवक अकबराच्या हुकूमाने इतका घाबरला होता की त्याने स्वत:चे प्राण वाचविण्यासाठी बिरबलचे पाय धरले. ‘मला महाराजांच्या शिक्षेतून वाचवा’ अशी तो विनवणी करू लागला. अखेर बिरबलने त्याला एक सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी तो सेवक अकबराच्या महालाजवळ येऊन उभा राहिला. तेवढ्यात त्याला एका शिपायाने पाहिले. तो तलवार घेऊन सेवकाला मारायला गेला. सेवकत्या शिपायाला म्हणाला. ‘मला मरण्या अगोदर एकदा महाराजांना भेटायचे आहे’. शिपायाने त्याला महाराजांना भेटण्याची नाईलाजाने परवानगी दिली. जेव्हा अकबर त्या सेवकाला भेटला. तेव्हा तो शिपायांना म्हणाला की, ‘मी तुम्हाला याचे डोके उडवायला सांगितले होते ना? तुम्ही याला येथे का घेऊन आला आहात?
तो सेवक अकबरासमोर गुडघे टेकून बसला. राजाचे पाय धरले आणि म्हणाला, ‘महाराज तुम्हाला माझे डोके हवे आहे ना, म्हणून मी स्वत:च आपल्यासाठी डोके घेऊन आलो आहे. माझा या शिपायांवर विश्वास नाही. माझ्या मरणानंतर हे शिपाई माझे डोके आपल्याला आणून देतीलच असे मला वाटत नाही.’ हे ऐकून अकबराचा राग शांत झाला. अकबर हसून त्या सेवकाला म्हणाला की, ‘तुझे डोके तुझ्याजवळच ठेव’ अकबराला कळून चुकले की, याला असा सल्ला बिरबलशिवाय कोणीच देऊ शकणार नाही.
बिरबल व जादूचे गाढव
एकदा अकबराच्या दरबारात एक सेवक धावत धावत गेला आणि म्हणाला, ‘महाराज काल माझ्या घरात चोरी झाली आणि चोराने सगळे किंमती सामान चोरले.’ अकबर म्हणाला, ‘असे कसे होऊ शकते? तू तर खूप सुरक्षित ठिकाणी राहतोस. तुझ्या घराशेजारी तर दरबारातील सर्व सेवकांची घरे आहेत. जर खरंच चोरी झाली असेल तर बाहेरुन कोणी येऊन चोरी करु शकणार नाही.’
थोड्या वेळाने अकबराने बिरबलला बोलावून चोरीबद्दल सांगितले. अकबर म्हणाला की, ‘आपल्या दरबारातच कोणी तरी चोर आहे.’
बिरबल म्हणाला, ‘महाराज मी लवकरच चोराला तुमच्या समोर हजर करेन.’ लगेचच बिरबल दरबारात निघून गेला.
दुसऱ्या दिवशी बिरबल त्याच्या सोबत एक गाढव घेऊन दरबारात गेला. बिरबल म्हणाला की, ‘हे जादूचे गाढव आहे. ते आपल्याला सांगू शकते की चोर कोण आहे.’
दरबारातील सर्व सेवकांना बिरबल म्हणाला की, ‘ या गाढवाची शेपटी उचलून मी चोर नाही असे म्हणा’ एकेका सेवकाने पुढे येऊन गाढवाची शेपटी धरली.
शेवटी बिरबलने सर्व सेवकांना हात वरती करायला सांगितले. सर्वांचे तळहात काळे झाले होते. परंतु एका सेवकाचे हात एकदम स्वच्छ होते. बिरबलने त्याच्याकडे बोट दाखवून म्हटले की, ‘महाराज हा चोर आहे. तो जादूच्या गाढवाला घाबरला. त्याने गाढवाच्या शेपटीला हातचलावला नाही.’ अशाप्रकारे भर दरबारात चोर पकडला गेला.
पिसाळलेला हत्ती
एकदा अकबराच्या दरबारात सगळे आपापसांत बोलत होते. की, सर्वात चांगले हत्यार कोणते आहे? सगळेजण वेगवेगळी हत्यारे सुचवित होते. बिरबल म्हणाला, की असे कोणतेच हत्यार नाही की ज्याला सर्वोत्तम हत्यार म्हणता येईल.’ संकटाच्या काळी जे हत्यार प्रथम हातात येईल ते सर्वात चांगले हत्यार असते.
परंतु, अकबर बिरबलशी सहमत झाला नाही. दुसऱ्या दिवशी अकबर आणि बिरबल शहरात फेरफटका मारायला बाहेर पडले. अचानक त्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती लागला. अकबराने त्याच्या तलवारीने हत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
अकबर जिवाच्या भीतीने तेथून पळू लागला. एवढ्यात बिरबलला रस्त्यात एक कुत्राचे पिल्लू दिसले. त्याने पिल्लू उचलून हत्तीवर फेकले. ते पिल्लू जीवाच्या भीतीने हत्तीच्या सोंडेला चिकटून बसले. पिल्लाच्या नखाने हत्तीच्या सोंडेला इजाझाली.त्यामुळे हत्तीने अकबर आणि बिरबलचापाठलाग करणे सोडून दिले. हत्ती त्या पिल्लापासून सुटका कधी होईल याचा प्रयत्न करायला लागला. अखेर अकबराने सुस्कारा सोडला.
तेव्हा बिरबल अकबराला म्हणाला, ‘महाराज या परिस्थितीत हे पिल्लू हेच आपले सर्वात चांगले हत्यार ठरले.’ अकबराला बिरबलाचे म्हणणे पटले. त्याने बिरबलची तोंडभर स्तुती केली. अकबर बिरबलला म्हणाला, ‘तू आज माझा जीव वाचवलास आणि त्याच बरोबर हत्याराबाबत एक चांगली शिकवणही दिलीस.’ अकबराने खूश होऊन बिरबलला एक मोत्याचा हार भेट म्हणून दिला.
शुभ्र उजेड
एके दिवशी अकबराने सर्वाधिक शुभ्र व तेजस्वी रंगाची वस्तू कोणती आहे? असा प्रश्न सर्वांना विचारला. दरबारातले लोक चर्चा करु लागले की अशी कोणती वस्तू आहे बरे? काही लोकांना कापूस सर्वाधिक शुभ्र व तेजस्वी रंगाचा वाटला. काही लोक म्हणाले, दूध सर्वाधिक शुभ्र व तेजस्वी रंगाचे आहे. शेवटी नेहमीप्रमाणे अकबराने तोच प्रश्न बिरबलला विचारला. बिरबलने लगेच ‘सूर्यकिरण’ सर्वाधिक शुभ्र व तेजस्वी रंगाचे असतात असे उत्तर दिले. अकबर बिरबलला म्हणाला, ‘तुझे म्हणणे सिद्ध करून दाखव. बिरबल म्हणाला ‘ठीक आहे महाराज’ आजच सिद्ध करून दाखवतो.’
अकबर दुपारी महालात झोपण्यासाठी गेल्यावर बिरबलने अकबराच्या महालात सर्वत्र काळे पडदे लावले.
झोप झाल्यावर अकबर उठला आणि नेहमीच्या सवयीने दरवाजाकडे जाऊ लागला. इतक्यात त्याचा पाय जमिनीवरील एका वस्तूला लागला. अकबराने काय आहे हे बघण्यासाठी दरवाजा उघडला. सूर्यकिरण आत येताच खोलीत प्रकाश पसरला. अकबराने पाहिले तर फरशीवर दुधाचे भांडे सांडलेले आणि कापूस दिसला. ‘या वस्तू येथे कोणी ठेवल्या आहेत?’ असे अकबराने रागाने विचारले. बिरबल लगेच पुढे आला आणि म्हणाला, ‘महाराज क्षमा असावी या वस्तू मी ठेवल्या आहेत’. महाराज जर का दूध आणि कापूस सर्वाधिक शुभ्र असते तर आपणास ते अंधारातही दिसले असते. परंतु तुम्ही त्यांना सूर्यप्रकाशाच्या उजेडातच पाहू शकलात. आता मला सांगा महाराज ‘सूर्यकिरणेच सर्वाधिक शुभ्र व तेजस्वी रंगाची असतात ना? अकबराला पुन: एकदा बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडले.
बिरबलचा देशत्याग
एके दिवशी दरबार चालू असताना अकबराला त्याच्या प्रिय राणीचा संदेश आला की, राणीला त्यांना भेटायचे आहे. सर्व महत्त्वाची कामे संपली की, योग्यवेळी राणीला भेटायला जावे असे अकबराच्या मनात आले. दरबार चालू राहिला. थोड्यावेळात महाराजांना पुन: राणीचा दुसरा संदेश आला. अकबर जाण्याकरीता उठला. तेवढ्यात त्याने पाहिले की, बिरबल स्मितहास्य करीत आहे. राजाला खूप राग आला. भरात म्हणाला की, ‘बिरबल निघून जा येथून आणि माझ्या राज्यातल्या जमिनीवर पुन्हा पाय अकबर त्याला रागाच्या ठेवू नकोस.’
बिरबल उठला आणि शांतपणे तेथून निघून गेला. ज्या लोकांना बिरबलचा राग यायचा त्या सर्वांना खूप आनंद झाला. अशाप्रकारे एक महिना होऊन गेला. अकबराला बिरबलची आठवण येऊ लागली. एक दिवस अकबर खिडकीतून बाहेर पाहतो तर बिरबल एका रथात उभा राहिलेला दिसला. राजा बिरबलला बोलावतो. अकबराने त्याला विचारले की, ‘तुझी इतकी हिंमत कशी झाली की तू माझा आदेश मोडलास?’
बिरबल राजाला म्हणाला की, ‘तुम्ही मला सांगितले होते की, तुमच्या जमिनीवर पाय ठेवायचा नाही. म्हणून तर मी दुसऱ्या राज्यातून माती मागविली. माती रथात पसरवली आहे. आता आयुष्यभर मी याच मातीवर पाय ठेवून चालणार.’ हे ऐकून अकबर खूप हसला आणि त्याने बिरबलला माफ केले. दुसऱ्या दिवशी पासून बिरबल पुन्हा दरबारात जाऊ लागला.
सावत्र भाऊ
अकबर राजा लहान होता. तेव्हा त्याला सांभाळणारी दाई त्याचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ करीत असे. अकबराजवळ त्याची आई नसायची तेव्हा ती दाई अकबराचे खाणे-पिणे करीत असे. त्यामुळे अकबराला त्याच्या या दाईबद्दल खूप आदर होता. अकबर तिला आपली आईच मानत असे. दाईच्या मुलाला स्वत:चा सावत्र भाऊ मानत असे. अकबराला त्याच्याबद्दल खूप प्रेम, जिव्हाळा होता. जेव्हा सावत्र भाऊ भेटायला येत असे तेव्हा अकबर त्याच्यासाठी शाही व्यवस्था करीत असे.
कधी कधी तर अकबर त्याला भेटण्यासाठी दरबारातून सुट्टीच घेत असे. अकबर कधी कधी त्याच्याबरोबर इतका वेळ घालवत असे की, बाकी सर्व महत्त्वाची कामे राहून जात. राजाच्या अशा वागण्याने प्रजेला आणि दरबारातील सेवकांना खूप त्रास सहन करावा लागे. बिरबलला वाटे की, अकबराने त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करू नये. एकदा अकबराने बिरबलला विचारले. की, ‘तुला कोणी सावत्र भाऊ आहे का?’
बिरबल म्हणाला, ‘हो महाराज आहे ना! उद्या मी त्याला बरोबर घेऊन येतो.’ बिरबल खूप दिवसांपासून या संधीची वाट पाहत होता. अकबराला त्याच्या चुकीची समज देण्याची संधी बिरबलला मिळाली.
दुसऱ्या दिवशी बिरबल एका वासराला दरबारामध्ये घेऊन आला. अकबर बिरबलवर ओरडला, ‘बिरबल! हा प्राणी दरबारामध्ये काय करत आहे?’ बिरबलने शांतपणे उत्तर दिले. ‘महाराज! हाच तर माझा सावत्र भाऊ आहे. लहानपणापासूनच मी याच्या आईचे म्हणजे गाईचे दूध पिऊन मोठा झालो आहे.’ अकबराला बिरबलच्या बोलण्याचा अर्थ समजला. त्यानंतर अकबराने आपल्या सावत्र भावाकडे जरुरीपेक्षा जास्त लक्ष देणे सोडले.बिरबलने राजाला इशाऱ्यानेच समजावले होते की, एका व्यक्तीसाठी राज्याकडे दुर्लक्ष करणे हे चुकीचे आहे.
अकबर बिरबल मराठी गोष्टी – अकबर-बिरबलच्या रंजक गोष्टी – Akbar Birbal Stories in Marathi
- अकबर-बिरबलची भेट
- बागेतील बाण
- अकबराची अंगठी
- दुधाचे भांडे
- बिरबलची निवड
- तीन चतुर उत्तरे
- अकबर आणि साधू
अकबर बिरबलची भेट
एकदा सम्राट अकबर जंगलात शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या नादात अकबर रस्ता चुकला. अकबर संकटात असताना महेश दास या एका हुशार व्यक्तीने त्याला जंगलाच्या बाहेर येण्याचा रस्ता दाखविला. संकट टळल्यामुळे अकबराने खूश होऊन महेशला स्वत:ची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. एवढेच नाही तर राजवाड्यात पाहुणचार घेण्यासाठी निमंत्रित केले.
काही दिवसांनी महेश अकबराला भेटण्यासाठी राजवाड्यावर गेला. राजवाड्याच्या बाहेर असणाऱ्या पहारेकऱ्यांनी त्याला अडविले. महेशला ते राजवाड्यात जाऊ देईनात, महेशने स्वत:कडील सम्राटाची सोन्याची अंगठी दाखविली. अंगठी बघताच पहारेकरी म्हणाला, ‘मी तुला सम्राटाला भेटायला जाऊ देईन, परंतु राजा तुला जे बक्षिस देईल त्यातील निम्मा भाग तू मला दिला पाहिजेस.’ महेशने तात्काळ होकार दिला.
महेश राजवाड्यात जाऊन सम्राटाला भेटला. सम्राटाला आनंद झाला. अकबराने विचारले, ‘बोल तुला काय पाहिजे?’ महेश तात्काळ उत्तरला, ‘कृपा करून मला पन्नास फटके मारण्यात यावेत.’ अकबराला आश्चर्य वाटले. महेशच्या पुन: पुन: केलेल्या विनंती वरुन अकबराने शिपायांना फटके मारण्याची आज्ञा केली, पंचवीस फटके खाल्लयावर महेश म्हणाला, ‘आता थांबा. राजवाड्याबाहेर उभ्या असणाऱ्या पहारेकऱ्याला उरलेले पंचवीस फटके मारा. त्याने मला राजाकडून जे मिळेल त्याच्या निम्मा भाग माझ्याकडे मागितला आहे. त्याची इच्छा पूर्ण करा. पहारेकऱ्याला आत बोलावण्यात आले. समोरचे दृश्य बघून पहारेकरी हैराण झाला. अकबर महेशच्या बुद्धिमत्तेवर खूश झाला. अकबराने त्याला तात्काळ आपला प्रधान नेमले. हाच महेश बिरबल नावाने प्रसिद्ध झाला.
बागेतील बाण
मे महिन्यातील एका संध्याकाळी अकबर आंब्यांच्या बागेत फिरत होता. पिकलेल्या आंब्यांच्या घमघमाटाने अकबर खूश झाला होता. एवढ्यात एक बाण वेगाने आला आणि अकबराच्या जवळून गेला. अकबर थोडक्यात वाचला. अकबराने बाण मारणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा हुकूम दिला.
काही वेळातच सैनिक बाण मारणाऱ्या तरुणाला पकडून घेऊन आले. अकबराने त्या तरुणाला विचारले की, ‘तू मला मारण्याचा प्रयत्न का केलास?’ तरुण म्हणाला, ‘महाराज, मी तर झाडावरचा आंबा पाडण्यासाठी बाण मारत होतो. एक बाण तुमच्या अगदी जवळून गेला. तुम्हाला ठार मारण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा नाही.
अकबर खूपच रागावला होता. त्याने सैनिकांना हुकूम दिला. ‘या तरुणाने मला जसं मारण्याचा प्रयत्न केला तसंच करुन याला ठार मारा’. सैनिकांनी त्या तरुणाला तात्काळ झाडाला बांधले. सैनिक त्या तरुणाला बाणाने मारणार एवढ्यात बिरबलने मध्येच हस्तक्षेप केला. बिरबल म्हणाला, महाराज ‘आपल्या आज्ञेप्रमाणे या तरुणाला ठार मारायचे असेल तर आंब्यावर निशाणा धरावा लागेल. आंब्यावर निशाणा धरून तो बाण या तरुणाला लागेल असे काही तरी करावे लागेल.’
अकबराच्या लक्षात चूक आली. अकबर म्हणाला, ‘खरं आहे बिरबलचं. मला ठार मारायचे असते तर या तरुणाने माझ्यावरच निशाणा धरला असता. या तरुणाला सोडून द्या.’ त्या तरुणाने प्राण वाचविल्याबद्दल बिरबलचे आभार मानले.
अकबराची अंगठी
एकदा अकबर आपल्या दरबारातील सरदारांसह जंगलात शिकारीसाठी गेला. बिरबलसुद्धा नेहमीप्रमाणे राबरोबर गेला. जंगलातल्या भटकंतीनंतर अकबरला तहान लागली.
जंगलातल्या एका विहिरीजवळ अकबर गेला. विहिरीतील पाणी संपले होते. अकबराने विहिरीच्या काठावर हात ठेऊन डोकावून पाहिले. अकबराने निराशेने मान हलवली आणि तो वळला. एवढ्यात अकबराच्या बोटातील त्याची प्रिय अंगठी निसटली आणि विहिरीत पडली. अकबराने सगळ्यांकडे मदतीसाठी पाहिले. विहिरीतून अंगठी कशी काढायची कोणालाच समजेना. सर्वांनी मान खाली घातली.
बिरबल तिथून बाहेर पडला आणि थोड्या वेळात परतला. बिरबल गाईचे शेण घेऊन आला. बिरबलने शेणाचा गोळा अंगठीवर अचूक नेमधरुन मारला. त्यानंतर एका दगडाला दोरी बांधून तो दगड शेणात मारला. एवढे झाल्यावर सगळे परत शिकारीसाठी जंगलात गेले. सूर्यास्ताच्या वेळी बिरबलने अकबराला विहिरीपाशी भेटण्यास सांगितले. संध्याकाळी विहिरीपाशी अकबर-बिरबल भेट झाली. बिरबलने दगडाला बांधलेला दोरखेचला. त्या दगडाबरोबर वाळलेले शेण वरती आले. शेणाच्या वाळलेल्या गोळ्यातून बिरबलने अकबराची प्रिय अंगठी काढली. अत्यंत किंमती अशी सोन्याची अंगठी परत मिळाल्यामुळे अकबर खूश झाला. त्याने बिरबलची स्तुती करुन त्याला बक्षीस दिले.
दुधाचे भांडे
एके सकाळी अकबर आणि बिरबल राजवाड्यातील बागेमध्ये फिरत होते. अकबर बिरबलला म्हणाला माझे दरबारी ‘माझे म्हणणे नेहमी ऐकतात.’ बिरबलने उत्तर दिले. ‘महाराज ते तुम्हाला घाबरतात सुद्धा.’
अकबर म्हणाला, ‘मी तर विश्वास नाही ठेऊ शकत. तुला तुझे म्हणणे सिद्ध करावे लागेल.’ बिरबल म्हणाला, ‘महाराज! आज्ञा करा की दरबारातील सर्वांनी शाही पटांगणात ठेवलेल्या भांड्यात दुधाचे भांडे ओतावे. अकबराने तसे केले आणि आपण काही दिवसांसाठी शिकार करण्यासाठी जात आहोत हे घोषित केले.
अकबर परत आला तेव्हा त्याने पाहिले की भांड्यात तर पाणी भरलेले होते. कोणत्याही दरबाऱ्याने त्यात दूध ओतले नव्हते. प्रत्येकाने पाणी ओतले आणि असा विचार केला की, दुसरे लोक त्यात दूध ओततील. बिरबल म्हणाला ‘महाराज! आता तुम्ही असा हुकूम द्या की दरबाऱ्यांनी भांडे दुधाने भरायचे आहे. आपण स्वत: शिकारीहून आल्यावर त्याची पहाणी करणार आहोत.’
अकबराने तसेच केले आणि पुन्हा शिकारीला गेला. जेव्हा तो परतला तेव्हा त्याने पाहिले की भांडे दुधाने भरलेले होते. बिरबल राजाला म्हणाला की, ‘आता तर तुमचा विश्वास बसलाना की दरबारी केवळ तुमच्या भीतीने तुमचा हुकूम मानतात.’ अकबराने मान हलविली आणि हसू लागला.
बिरबलची निवड
अकबर प्रत्येक गोष्टीत बिरबलचा सल्ला घेत असे. रिकाम्या वेळेत तो नेहमी बिरबलबरोबर गप्पा मारत असे.
एक दिवस त्याने बिरबलला विचारले, ‘जर तुला न्याय किंवा धन यातील कुठल्यातरी एका गोष्टीची निवड करायला सांगितले तर तू कशाची निवड करशील? बिरबल म्हणाला, ‘महाराज ! मी तर कशाचाही विचार न करता धनाची निवड करेन.’ अकबर हे ऐकून हैराण झाला. तो म्हटला, ‘बिरबल! निवांत विचार करुन उत्तर दे. कुठली ही घाई नाही.
बिरबल म्हटला, ‘महाराज माझे उत्तर तेव्हाही हेच असेल.’ हे ऐकून अकबर खूप निराश झाला. तो म्हणाला, “मी तर तुला दुसऱ्यांपेक्षा वेगळा समजत होतो. पण तू सुद्धा दुसऱ्यांप्रमाणे पैशाचा लालची निघालास. तू न्यायाच्या बदल्यात पैशाची निवड करशील?”
बिरबल म्हटला, ‘महाराज! आपण एक न्यायी आणि दयाळू राजा आहात. आपले दरबारी आणि प्रजा पूर्णपणे निश्चिंत आहेत की, त्यांना आपल्या राज्यात पूर्ण न्याय मिळणार. परंतु ते गरिब आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाही. तेव्हा मी पैशाची निवड केली’. बिरबलच्या उत्तराने खूश होऊन अकबराने त्याला सोन्याची एक हजार नाणी बक्षीस दिली. पुन्हा एकदा बिरबल दुसऱ्यांपेक्षा वेगळा निघाला.
तीन चतुर उत्तरे
अकबर नेहमी बिरबलच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्याचे कौतुक करत असे. त्यामुळे दुसरे दरबारी बिरबलची ईर्ष्या करत.ते नेहमी बिरबलला अपमानित करण्याची संधी शोधत. एक दरबारी अकबराला म्हणाला, ‘मी बिरबलला तीन प्रश्न विचारेन. जर त्याने बरोबर उत्तर दिले तर मी समजेन की तो बुद्धिमान आहे.’
अकबराने होकार दिला. ईर्ष्या करणाऱ्या दरबाऱ्याने बिरबलला विचारले, ‘पृथ्वीचे केंद्र कोठे आहे?’ बिरबल म्हटला, ‘माझे घर पृथ्वीचे केंद्र आहे.’ दरबाऱ्याने विचारले ‘आकाशात किती तारे आहेत?
बिरबल एका मेंढीला घेऊन आला आणि म्हणाला, ‘या मेंढीच्या शरीरावर जितके केस आहेत तितकेच आकाशात तारे आहेत मोजून घ्या.’ हे उत्तर ऐकून तो दरबारी हैराण झाला. त्याने तिसरा प्रश्न विचारला या जगात किती महिला व पुरुष आहेत? ‘
हे ऐकून बिरबलने उत्तर दिले की, ‘तुझ्यासारखे सरासरी लोक यातून वगळले की ही संख्या कळू शकेल.’ अकबर तोंड लपवून हसू लागला. त्यांनी ईर्षा करणाऱ्याला त्याच क्षणी दरबाराबाहेर जाण्याचा हुकूम दिला. बिरबलने पुन्हा एकदा सिद्ध केले होते की दरबारात त्याच्यापेक्षा अधिक हुशार कोणी नाही.
अकबर आणि साधू
एके दिवशी अकबर झोपेतून उठला तेव्हा पुरेशी झोप न झाल्यामुळे तो अस्वस्थ होता. उठल्यापासूनच त्याचा मूड खराब झाला होता. त्यामुळे दिवसभर त्याला कोणाचेच वागणे योग्य वाटत नव्हते. कोणी कितीही चांगले काम करीत असला तरी अकबराला त्यात त्रुटी सापडत होत्या. जो कोणी समोर येईल त्याचे काही खरे नव्हते. अकबराच्या तडाख्यात त्या दिवशी जे कोणी सापडले त्यांना हा अनुभव प्रथमच आला होता.
बिरबलला याची काहीच कल्पना नव्हती. बिरबलने अकबराची थोडीशी चेष्टा केली. अकबराला त्याचा इतका राग आला की त्याने बिरबलला शहर सोडून जाण्याचा आदेश दिला. बिरबल खूप नाराज झाला. त्याने आपले सामान बांधले आणि तो बाहेर पडला.
अकबराला दुसऱ्या दिवसापासून बिरबलची आठवण येऊ लागली. परंतु, आता उशीर झाला होता. बिरबल तर केव्हाच शहर सोडून गेला होता. काही दिवसांनी अकबराच्या दरबारात एक साधू व त्याचे दोन शिष्य आले. शिष्य म्हणाले, ‘आमच्या गुरुदेवांकडे सर्व समस्यांवर उपाय आहेत. ते काहीही करू शकतात.’
अकबराने साधूला अत्यंत अवघड प्रश्न विचारले, त्याची उत्तरे त्या साधूने सहज दिली. शेवटी अकबर म्हणाला, ‘तुझ्या अंगी एवढे सामर्थ्य आहे तर बिरबलला येथे हजर करुन दाखव.’ साधूने तात्काळ स्वत:च्या नकली दाढी-मिशा काढल्या. साक्षात बिरबल प्रकटला. अकबर प्रसन्न झाला. अकबराने बिरबलला आनंदाने मिठी मारली. अकबर म्हणाला ‘मला माहित होते की साधूच्या रुपात बिरबल आहे.’ बिरबलशिवाय कोणीच असा चमत्कार करु शकत नाही.
अकबर बिरबल कथा मराठी – अकबर-बिरबलच्या मनोरंजक गोष्टी – Akbar and Birbal Story in marathi
- दरबारी आणि शाल
- अनोखे आव्हान
- एक दिवसाचा राजा
- ब्राह्मणाची बायको
- अशक्त बकरी
- खूप सारं प्रेम
- भांडखोर शेजारी
दरबारी आणि शाल
बिरबल हा अकबराचा प्रिय मित्र आणि दरबारातील सभासद होता. त्यामुळे दरबारातील अन्य लोक बिरबलचा द्वेष करायचे. बिरबलचा त्यांना खूप राग येत असे. बाकीचे दरबारी नेहमी बिरबलचा कसा अपमान होईल याची वाट पहात असत. एक दिवस काहीजण अकबराला म्हणाले, महाराज ! ‘आपल्या दरबारात बिरबल हा एकटाच हुशार नाही, तुम्ही आम्हाला आमचे बोलणे खरे करण्याची एक संधी तर द्या!
अकबर राग आवरून त्यांना म्हणाला, ‘एक शाल घेऊन या’! दरबारी पट्कन गेले आणि एक शाल घेऊन आले. दरबारींना वाटले आपली हुशारी दाखविण्याची ही चांगली संधी आहे. ते शाल घेऊन येतात आणि बघतात तर काय? बादशहा अकबर पलंगावर झोपला होता.
अकबर त्यांना म्हणाला, ‘ही शाल माझ्या अंगावर अशी टाका की, माझे संपूर्ण शरीर या शालीमध्ये झाकले गेले पाहिजे’! पण, अकबर उंच असल्यामुळे त्या शालीमध्ये त्याचे संपूर्ण शरीर झाकले जात नव्हते. आता काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला. एवढ्यात, बिरबल तेथे आला. अकबराने बिरबलला पण तेच करायला सांगितले.
बिरबल म्हणाला, ‘महाराज, आपले दोन्ही गुडघे दुमडा आणि एका कुशीवर झोपा.’ अकबराने तसे केले. बिरबलने अकबराला शालीमध्ये व्यवस्थित झाकले. दरबाऱ्यांकडे अकबराने पाहिले. अकबराला काय म्हणायचे आहे हे दरबाऱ्यांना कळले. दरबाऱ्यांनी त्यांच्या मर्यादेत रहावे. असा धडा ते शिकले.
अनोखे आव्हान
एकदा अकबर बिरबलला म्हणाला, “बिरबल माझ्याकडे तुझ्यासाठी एक आव्हान आहे!” बिरबलने विचारले काय आहे महाराज? अकबर त्याला म्हणाला, उद्या तू दरबारात अशा दोन व्यक्ती घेऊन ये की त्यांचे स्वभाव एकदम विरुद्ध असायला हवेत. पहिली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि उपकार न विसरणारी हवी.’ त्यावर बिरबलने विचारले, महाराज! ‘दुसरी व्यक्ती कशी हवी’?
अकबर हसून म्हटला दुसरी व्यक्ती याच्या एकदम विरुद्ध स्वभावाची असायला हवी. तो खूप कृतघ्न हवा. तो कोणाच्याच उपकारांची जाणीव नसणारा, नेहमी तक्रारी करणारा आणि कधीच समाधानी न राहणारा पाहिजे.
हे आव्हान ऐकून सगळे दरबारी आश्चर्यचकित झाले. सगळ्या दरबारींना वाटत होते की, बिरबल हे आव्हान पेलूच शकणार नाही. दुसऱ्याच दिवशी बिरबल त्याचा जावई आणि पाळीव कुत्रा यांना घेऊन दरबारात आला.
बिरबल कुत्र्याकडे पाहून म्हणाला, ‘हा माझा कुत्रा खूप प्रामाणिक आणि उपकाराची जाण ठेवणारा आहे. त्यावर अकबर बिरबलाच्या जावयाकडे पाहून म्हणाला, ‘हा माणूस कोण आहे?’ बिरबल म्हणाला, ‘हा माझा जावई आहे, हा कोणाच्याच उपकारांची कधीच जाण ठेवत नाही. नेहमी तक्रारी करत असतो.’ अकबर बिरबलच्या हुशारीने खूप खूश झाला. बिरबलला अनेक बक्षिसे त्याने दिली. बिरबलने पुन्हा एकदा अकबराचे अवघड आव्हान पूर्ण केले.
एक दिवसाचा राजा
एकदा एके संध्याकाळी अकबर, बिरबल आणि बाकी दरबारी नावेत बसून फिरायला गेले. नावेच्या शेजारुन एक फांदी पाण्यातून वाहत चाललेली अकबराला दिसली. ती फांदी हातात घेऊन अकबर दरबारींना म्हणाला ‘फक्त या फांदीला घेऊन तुमच्या पैकी जो कोणी नदी पार करेल त्याला मी एक दिवसासाठी राजा बनवेन.’
सर्व दरबारींना वाटले हे तर अशक्य आहे. असं होऊच शकत नाही. पण बिरबल म्हणाला ‘जर तुम्ही आत्ता घोषित करत असाल की मी राजा आहे तर मी हे काम करु शकतो.’ आजचा दिवस सर्व दरबारी आणि सैनिक माझी आज्ञा पाळतील. अकबराने होकार दिला.
बिरबलने हातात फांदी घेतली आणि तो नदीत उडी मारणार तेवढ्यात एक दरबारी ओरडला, ‘महाराज थांबा’. पुन्हा बिरबल उडी मारायला निघतो पण या वेळी दुसरा शिपाई त्याला अडवतो. असे करत करत कुठलाच शिपाई त्याला नदीत उडी मारू देत नाही.
थोड्या वेळाने ते सगळे जण किनाऱ्यावर पोहोचले. अकबर बिरबलला म्हणाला बिरबल तू हरलास. त्यावर बिरबल म्हणाला, ‘दरबारी आणि सैनिकांनी मला उडीच मारु दिली नाही. परंतु, मी फांदी हातात घेऊनच आलो त्यामुळे जिंकलो. अकबराने बिरबलचे म्हणणे मान्य केले. बिरबलच्या हजरजबाबीपणा पुढे कोणीच टिकू शकत नव्हते.
ब्राह्मणाची बायको
अकबराच्या राज्यात एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला खूप पट्कन राग यायचा. एक दिवस त्याला जेवणात केस सापडला. त्यामुळे तो बायकोला ओरडला की, ‘पुन्हा असे व्हायला नको.’ पुन्हा असे झाले म्हणजे ‘जेवणातकेससापडला तरमीतुला शिक्षाकरेन.’नवऱ्याच्या भीतीने आणि आपल्याला शिक्षा व्हायला नको या विचाराने पत्नी खूप सावकाश जेवण बनवू लागली. जेवण बनविताना केस बांधून ठेवू लागली. जेवणात पुन: केस सापडणार नाही याची ती खूप काळजी घेऊ लागली.
एक आठवड्यानंतर त्या ब्राह्मणाला जेवणात पुन्हा केस सापडला. ब्राह्मण खूप चिडला. तो म्हणाला, “बस, आता खूप झालं. आज तर मी तुझे मुंडनच करतो.” तो केशकर्तन करणाऱ्या कारागीराच्या शोधात बाहेर पडला.
ब्राह्मणाची पत्नी घाबरून तिच्या भावाकडे गेली. तिचा भाऊ आणि ती मिळून बिरबलकडे मदतीसाठी गेले. बिरबल त्यांना म्हणाला, ‘थोडी लाकडे गोळा करुन आणा. पुढे बिरबल तिच्या भावाच्या कानात काहीतरी कुजबुजला. दोघे ब्राह्मणाच्या घरी जाऊन घरासमोर एक चिता रचू लागले. तोपर्यंत ब्राह्मण कारागीराला घेऊन आला. बायकोच्या भावाने त्याला जबरदस्तीने पकडले आणि चितेवर बसविले. ब्राह्मण जोरात ओरडला, ‘अरे मी काही प्रेत नाही.’ बिरबल म्हणाला ‘हिंदू पद्धतीनुसार पतीच्या मृत्यूनंतरच पत्नीचे मुंडन करतात.’ नवऱ्याला स्वत:ची चूक कळून आली. तो रडायला लागला. तो म्हणाला, ‘मला माफ करा. येथून पुढे मी माझा राग नियंत्रणात ठेवेन.’
अशक्त बकरी
एकदा अकबर आणि बिरबल चवदार भोजनाचा आस्वाद घेऊन नुकतेच परतले होते. तेव्हा बिरबल अकबराला म्हणाला, ‘महाराज ! माफ करा परंतु मला वाटते की तुम्ही खूप जाड होत आहात.’ त्यावर अकबर म्हणाला, ‘रोज इतकं चवदार अन्न वाढले जाते, की त्यामुळे जेवताना भान रहात नाही. त्याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन.’ बिरबल म्हणाला, ‘नाही महाराज ! तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण नाही. त्यामुळे असे होत आहे. जर एखाद्या माणसाला कुठल्याही प्रकारचा ताण तणाव असेल तर त्याचे वजन कधीही वाढणार नाही.’
अकबर म्हणाला, ‘बिरबल जनावरांना पोटभर खायला मिळत असेल तर ते देखील जाड होतात.’ बिरबलला त्याचे म्हणणे अकबराला पटवून द्यायचे होते. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी एक बकरी घेऊन आला. तिला दिवसातून दोनदा खायला देऊ लागला.
एक महिन्यानंतर अकबर बकरीला पहायला गेला. बकरीचे वजन अजिबात वाढले नव्हते. ते पाहून अकबराने विचारले की, बकरीला ‘रोज चारा दिला जायचा का?’ बिरबल म्हटला, ‘महाराज ! तिला दिवसातून दोनवेळ भरपेट चारा दिला जायचा. परंतु मी तिला सिंहाच्या पिंजऱ्याजवळ बांधून ठेवल्यामुळे ती हा सिंह आपणास कधीतरी खाणारच या तणावाखाली जगत आहे. बस्स याच कारणामुळे तिचे वजन इतके घटले आहे आणि ती अशक्त झाली आहे.’ अकबर बिरबलला म्हटला, ‘बिरबल तू जे सांगत होतास ते खरं आहे.’
खूप सारं प्रेम
अकबर राजाला सर्व धर्मांची माहिती करून घ्यायला आवडत असे. तो नेहमी काही ना काही नवे शिकण्यासाठी तयार असे. एक दिवस त्यांनी बिरबलला विचारले ‘भगवान श्री कृष्ण त्याच्या भक्तांच्या मदतीसाठी स्वत: का आले? त्यांच्याजवळ नोकर नव्हते का?’ बिरबल म्हटला, ‘महाराज! या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला उद्या देईन!’ मग बिरबलने एका कलाकाराला सांगितले की, ‘राजाचा नातू राजकुमार खुर्रम चा मेणाचा पुतळा तयार करा.’ दुसऱ्या दिवशी अकबर आणि बिरबल बागेमध्ये फिरत असतात.
जेव्हा तेतलावाच्या जवळून जायला लागले तेव्हा बिरबलने त्याच्या नोकराला इशारा केला. नोकराने मेणाचा पुतळा पाण्यात फेकला. अकबराला वाटले की त्याचा नातू खुर्रम पाण्यात बुडत आहे. त्याला वाचविण्यासाठी अकबराने पट्कन पाण्यात उडी मारली. जेव्हा अकबराने पुतळ्याला पकडले तेव्हा त्याला कळले की हा तर खुर्रमचा मेणाचा पुतळा आहे.
बिरबल अकबराला म्हणाला, ‘महाराज! आपण आपल्या नोकरांना का नाही सांगितले की, खुर्रमला वाचवा?’ अकबर म्हणाला, ‘मी कायनोकरांची वाट पाहूकी ते माझ्या नातवाला वाचवतील.’ मग बिरबल म्हणाला. ‘असंच भगवान श्री कृष्ण सुद्धा आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करतात की ते त्यांच्या नोकरांच्या जाण्याची वाट बघत नाही. भक्तांच्या हाकेला ते तात्काळ धावून जातात. अकबराला प्रश्नाचे उत्तर मिळून गेले.
भांडखोर शेजारी
जुम्मन आणि इमाम बिरबलचे शेजारी होते. त्यांच्यात नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे भांडणे होत रहायची. जेव्हा भांडणं खूपच वाढत असत तेव्हा बिरबल त्यांची भांडणं सोडवायचा.
एक दिवस, जुम्मन अकबराकडे इमाम ची तक्रार घेऊन गेला की इमामने त्याच्या शेतातील वांगी चोरली. पण इमाम चोरीचा आळ नाकारतो.
तो अकबराला म्हणतो, ‘महाराज! मी तर जुम्मनच्या शेताला विचारून वांगी तोडली.’ अकबर इमामचे उत्तर ऐकून त्याला म्हणाला, ‘मला जरा व्यवस्थित सांग.’
इमाम म्हणाला, ‘मी वांगी तोडण्या अगोदर शेताला विचारले होते की, ऐ शेता मी एक वांगे तोडू का? त्यावर शेत मला म्हणाले एक काय डझन भर वांगी तोड’ म्हणून मी डझनभर वांगी तोडली. हे ऐकल्यावर बिरबल अकबराच्या कानात काहीतरी सांगतो आणि बिरबल मोठ्याने बोलतो की, इमाम! तू बरोबर बोलत आहे. जरा माझ्याबरोबर चल बरं!
इमामला वाटते की त्याची हुशारी कामास आली आणि त्याला चोरीच्या आरोपामधून सोडून दिले आहे. इमामला बिरबल राजवाड्यातील एका विहिरीजवळ घेऊन जातो. बिरबलचे काही सैनिक त्याला एका बादलीत बसवतात आणि हळूहळू विहिरीत सोडून देतात.
आता बिरबल इमामची शक्कल लढवतो आणि विहिरीला विचारतो ‘ए… विहिरी मी याला कितीवेळा पाण्यात बुडवू?’ बिरबल काहीतरी ऐकल्याचे नाटक करतो आणि म्हणतो ‘असं का बरं, बारा वेळा का बरं’ हे एकून इमाम घाबरतो आणि आपली चोरी कबूल करतो. तो म्हणाला ‘कृपाकरुन मला जाऊ द्या.’ मी वांगी चोरल्याबद्दल माफी मागतो.
इमामला आता कळून चुकले होते की बिरबलला मूर्ख बनविले जाऊ शकत नाही. अकबराने खऱ्या चोराला शिक्षा दिली आणि जुम्मनला न्याय मिळवून दिला. जुम्मनला खूप आनंद झाला. अकबर आणि बिरबलने त्याच्या चोर शेजाऱ्याला शिक्षा केली.
अकबर बिरबल च्या गोष्टी मराठीत – अकबर-बिरबलच्या मनमोहक गोष्टी – Akbar Birbal Marathi Goshti
- बिरबलची परीक्षा
- व्यापारी आणि त्याचा नोकर
- बिरबल झाला कारागीर
- राजाचे आमंत्रण
- भोंदू साधू
- बैल आणि संगीत
- प्रामाणिक माळी
बिरबलची परीक्षा
एक दिवस अकबराला बिरबलच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घ्यायची होती. बिरबल दरबारात पाय ठेवताच अकबर त्याला म्हणाला की, “मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. बिरबल त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि म्हणाला, ‘महाराज! मी तयार आहे, आपण प्रश्न विचारा.
अकबराने विचारले, “सूर्य आणि चंद्र आकाशात राहतात त्यांना आकाशातून सगळे दिसत असते. त्यांना दिसत नाही अशी गोष्ट कोणती?” बिरबल उत्तरला, “ते अंधार पाहू शकत नाहीत.”
अकबराने दुसरा प्रश्न विचारला, “खरे आणि खोटे यात किती अंतर आहे?” बिरबल उत्तरला, “हे आपल्या कान आणि डोळे यांमधील अंतर आहे. कारण आपण जे पाहतो ते खरे असते आणि आपण जे ऐकतो ते कधीकधी खोटे असते.’ या उत्तरावर अकबर खूश झाला. तेवढ्यात अकबराने जमिनीवर एक रेषा काढली आणि म्हणाला, “बिरबल या रेषेला स्पर्श न करता तिला लहान करून दाखव.”
दरबारातील सर्व लोक एकमेकांकडे पहायला लागले. त्यांना वाटले आता बिरबल हरणार, कारण ती रेषा स्पर्श न करता कोणीच लहान करू शकत नाही. पण त्यांचा अंदाज चुकला, बिरबलने त्याच रेषेशेजारी आणखी एक तिच्यापेक्षा मोठी रेषा काढली. बिरबल म्हणाला, “घ्या महाराज, मी करून दाखविले.” अकबर बिरबलच्या सर्व उत्तरांनी प्रभावित झाला. अकबराने त्याला खूप बक्षिसे दिली.
व्यापारी आणि त्याचा नोकर
एक दिवस दोन माणसे अकबराच्या दरबारात अचानक आली. त्यातला एक माणूस म्हणाला, “बिरबल कृपा करून माझी मदत करा.’ माझे नाव अमिर आहे. मी एक व्यापारी आहे. काही दिवसांपूर्वी मी माझी सगळी संपत्ती या माझ्या नोकरावर सोपवून विदेशात व्यापार करायला गेलो होतो. मी जेव्हा विदेशातून परत आलो तेव्हा या नोकराने माझा सगळा व्यापार, संपत्ती ताब्यात घेतली आहे. तो व्यापार करीत आहे. त्याने मला ओळखण्याससुद्धा नकार दिला.
त्यावर दुसरा माणूस म्हणाला, “नाही महाराज मी अमिर आहे. पण हा माणूस म्हणत आहे की, मी याचा नोकर आहे.” बिरबल त्याला म्हणाला, “मी तुझ्या मनातील गोष्ट ओळखू शकतो.” बिरबलाने थोडा वेळ त्या माणसाकडे पाहिले आणि त्याने आपल्या शिपायांना हुकूम दिला की, ‘चोराची मान कापून टाका.’ शिपायाला तर काहीच माहित नव्हते. जेव्हा शिपाई त्या माणसाजवळ गेला तेव्हा चोर पळत पळत जाऊन अकबराकडे आपलाजीव वाचवण्यासाठी गयावया करू लागला. सर्वांना खूप आश्चर्य वाटले की, चोराने स्वतःहून कसा काय गुन्हा कबूल केला. तेव्हा बिरबल म्हणाला, जेव्हा मी म्हटलो की मी लोकांचे मन ओळखू शकतो तेव्हा चोर घाबरला त्याने चोरी स्वतःहून कबूल केली. हे ऐकून अकबर हसू लागला.
बिरबल झाला कारागीर!
एक दिवस अकबर राजाला त्याच्या राज्यात किती अंध लोक आहेत याची माहिती हवी असते. अकबराने त्याबाबत बिरबलला विचारले. बिरबल म्हणाला, “महाराज आपण मला एक आठवड्याचा वेळ द्या म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन.” अकबराने बिरबलला वेळ दिला.
दुसऱ्या दिवशी बिरबलने दरबारात जाणे सोडून दिले. तो बाजारात बसून चपला दुरुस्त करू लागला.
लोकांना बिरबलला ते काम करताना पाहून आश्चर्य वाटू लागले. प्रत्येक जण रस्त्यात थांबून बिरबलाला विचारू लागला, ‘बिरबल तू इथे काय करत आहेस?’ थोड्या. वेळाने राजा अकबर पण तेथे आला. बिरबलला त्याने तोच प्रश्न विचारला. पण बिरबलने काहीच उत्तर दिले नाही. सर्वांना एकच प्रश्न पडला की, ‘असे काय झाले आहे की, बिरबलला हे काम करावे लागत आहे.’
एका आठवड्यानंतर बिरबल दरबारात आला. त्याच्याकडे एक मोठी यादी होती. अकबर त्या यादीमध्ये स्वतः :चे नाव वाचून नाराज झाला. बिरबल राजाला म्हणाला की, “महाराज मला चप्पल दुरुस्त करताना पाहून सुद्धा तुम्ही मी काय करत आहे? हे मला विचारले आणि याच कारणामुळे अंध लोकांच्या यादीमध्ये तुमचे नाव सर्वात पहिले लिहिले. आता तुम्हीच सांगा, समोर सर्व पाहून सुद्धा कोणी विचारत असेल तर त्याला अंध नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?’ अकबराला हे ऐकून खूप हसू आले.
राजाचे आमंत्रण
खूप लोकांना असे वाटते की मानसन्मान मिळविण्यासाठी आपण श्रीमंत असायला हवे. अकबर पण असाच विचार करायचा. तो बिरबलला म्हणाला की, “एखाद्या गरीब माणसाला मान-सन्मान मिळणे शक्य आहे का?’ बिरबल म्हणाला, “हो महाराज ते शक्य आहे.”
अकबर म्हटला ‘जर असे असेल तर माझ्याकडे तशी व्यक्ती शोधून आण. तुला तुझे म्हणणे पटवून द्यावे लागेल.’ बिरबल दरबारातून बाहेर पडला. रस्त्यावरून चालत असताना त्याला एक भिकारी दिसला. तो भिकारी खूप म्हातारा होता. तो काठी घेऊन चालत होता. त्याला सकाळपासून एक पैसापण भीक मिळालेली नव्हती. तो खूप दिवसांपासून उपाशी होता. आता तो खूप अशक्त पण दिसत होता. बिरबल त्या भिकाऱ्याचा हात पकडून, आधार देत त्याला महालात घेऊन गेला.
तेव्हा अकबराने त्या माणसाला पाहताच विचारले, “हा माणूसतरखूपगरीबआहे.यालामानसन्मान मिळवण्याचा अधिकार कसा असू शकतो?” बिरबल म्हणाला, ‘या माणसाकडे एक पैसापण नाही, तरीपण या माणसाला येथे महान सम्राट अकबराने बोलावले आहे.’ हे ऐकून अकबराने मान डोलावली. अकबराला बिरबलाचे म्हणणे पटले. समाजात मान-सन्मान मिळविण्यासाठी श्रीमंत असणे जरूरी नसते, याची खात्री अकबराला पटली.
भोंदू साधू
आहे. एक गृहस्थ त्यांच्या पुतणीला घेऊन एका साधूच्या दर्शनाला गेला. तो साधू अंध होता. मुलगी साधूला पाहताच जोर-जोराने ओरडू लागली की, या माणसाने माझ्या आई-वडिलांना मारले आहे. याला शिक्षा झाली पाहिजे. त्यावर साधू शांतपणे म्हणतो, ‘माझ्या सारखा अंध साधू कोणाला कसा मारू शकतो? या मुलीला येथून घेऊन जा. ती काहीही बडबड करत आहे. ते गृहस्थ त्यांच्या पुतणीला घेऊन घरी गेले. पण त्यांना वाटत होते की, ती खरं बोलत आहे. पण काय करावे हे त्यांना काहीच समजत नव्हते. मग त्यांनी बिरबलची मदत घ्यायची एके काळची गोष्ट ठरविले. ते बिरबलकडे गेले आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. बिरबलने त्या साधूला दरबारात बोलाविले.
जेव्हा साधू दरबारात गेला तेव्हा बिरबल अचानक त्याची तलवार काढून साधूच्या दिशेने धावला. लगेचच साधूने बचाव करण्यासाठी स्वतःची तलवार बाहेर काढली. हे सगळं नाट्य पाहून दरबारातील सगळे आश्चर्यचकीत झाले.
तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, हा माणूस अंध नाही. मला शंका होतीच की हा भोंदू साधू असणार.” अकबराने बिरबलच्या हुशारीची प्रशंसा केली आणि त्या दुष्ट साधूला शिक्षा केली. समाजाला फसविणाऱ्या आणि खून करणाऱ्या साधूचे बिंग असे फुटले.
बैल आणि संगीत
एकदा अकबराने बिरबलला सांगितले की, पुढच्या आठवड्यात एक खूप मोठी गाण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. बिरबल सगळ्या चांगल्या गायकांना आमंत्रण दे आणि तू सुद्धा या स्पर्धेत सहभागी व्हायचे.
ठरलेल्या दिवशी सगळे गायक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले. तेव्हा अकबराने एक घोषणा केली की, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे उत्तम गायक आहात. गाण्याची तुम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु विजेत्याची घोषणा आमचे पाहुणेच करणार आहेत. पाहुणे नक्की कोण आहेत, हे पाहण्यासाठी सगळ्यांनी मागे वळून पाहिले तर सगळ्यांना एक बैल दिसला. त्याला शिपाई दरबारात घेऊन येत होते. अकबर म्हणाला, “जो कोणी आपल्या गाण्याने या बैलाला खूष करेल तोच आजचा विजेता होणार.”
हे ऐकून दरबारातले सगळे विचारात पडले. पण आता काही पर्याय पण नव्हता. सगळ्या गायकांनी चांगली गाणी गायली. पण बैलावर काहीच परिणाम झाला नाही. सर्वात शेवटी बिरबलची वेळ आली. त्याने गाईचे हंबरणे आणि मच्छरांची गुणगुण हा आवाज काढला. .
बैलाने बिरबलचे वादन ऐकले. ओळखीचा आवाज ऐकण्यात बैलरमून गेला. तो त्याची मान सारखी हलवायला लागला. अकबर म्हटला, बिरबलच विजेता आहे. कारण त्याने आपल्या श्रोत्यांच्या आवडीचे संगीत वाजविले.
प्रामाणिक माळी
एकदा, एके सकाळी अकबर त्याच्या बागेत फिरत होता. तो कुठल्यातरी विचारात होता. चालता चालता अचानक त्याच्या पायाला एक दगड लागला. अकबराच्या पायाला जखम झाली. अकबराला खूप राग आला. त्याने बागेत काम करणाऱ्या माळ्याला महालात बोलावून घेतले. माळी अकबराला चिडलेला पाहून खूप घाबरला. त्याला समजले की, राजाला बागेतल्या दगडामुळे लागले आहे. राजा माळ्याला म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या पायाला लागले आहे. तुला उद्या ठार मारण्याची शिक्षा देण्यात येणार आहे.
माळ्याने खूप गयावया केली. पण अकबर खूप रागात होता. त्याने माळ्याचे काहीच ऐकले नाही. माळ्याच्या डोळ्यात पाणी आले. तो बिरबलकडे मदतीसाठी गेला. बिरबलने त्याच्या कानात युक्ती सांगितली. युक्ती ऐकताच माळी शांतपणे तेथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी, अकबरानेमाळ्यालात्याचीशेवटची इच्छा विचारली. माळ्याने घसा साफ केला आणि अकबराच्या पायावर धुंकला. त्याने बिरबलच्या सांगण्यावरूनच तसे केले होते. पण ते पाहून दरबारातील सर्वजण हैराण झाले.
मग बिरबल म्हटला, महाराज हा तुमचा खूप प्रामाणिक माळी आहे. त्याला चिंता होती की, केवळ पायाला लागले म्हणून अकबराने प्राणदंड दिला, असे लोकांना वाटू नये म्हणून तो सम्राटाच्या पायांवर धुंकला. त्याने जाणूनबुजून ही चूक केली की, त्यासाठी हत्येची शिक्षा दिली पाहिजे.
अकबराला त्याची चूक उमगली आणि त्याने माळ्याला माफ केले. बिरबलाने माळ्याचे प्राण वाचवले आणि अकबरला काहीही न बोलता त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. याच कारणामुळे अकबर बिरबलाचा आदर करीत असे. माळ्याने पण बिरबलचे खूप आभार मानले.
सर्वोत्कृष्ट हत्यार
लढाया, युद्ध ही बादशहासाठी नेहमीची बाब असल्यामुळे बहुतेकवेळा बादशहा शस्त्र आणि हत्यारांचाच विचार करीत असायचा. कोणत्याही युद्धात अगदी सहज विजय मिळावा म्हणून आपल्या संग्रहात अतिशय चांगली आणि सर्वोत्कृष्ट हत्यारे असावीत यासाठी बादशहा प्रयत्न करायचा. आपल्या जवळ असलेली हत्यारे आणि शस्त्रे चांगल्या दर्जाची आहेत की नाही याची माहिती घ्यावी म्हणून एके दिवशी दरबारात बसल्यावर बादशहाने प्रश्न विचारला, ‘सर्वात चांगले हत्यार कोणते?’
कोणताही प्रश्न बादशहा सहजा सहजी विचारीत नसल्यामुळे दरबारातील मंडळी गोंधळात पडली. बादशहाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे याचा विचार करायलाही त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे कुणी तोफ, कुणी बंदूक, कुणी भाले तर कुणी बर्ची, बिचवा अशा हत्यारांची नावे सांगितली. बादशहाला यातील एकही उत्तर पंसत पडले नाही. बादशहाने बिरबलाला विचारल्यावर बिरबलाने अतिशय समर्पक उत्तर दिले, ‘महाराज, लढाईच्या वेळी हाताला लागेल ते हत्यार सर्वोत्कृष्ट’ बिरबलाचे उत्तर तसे समाधानकारक होते तरीही बादशहाचे समाधान झाले नाही. त्यामुळे बादशहाने विचारले, ‘तू हे सिद्ध करून दाखवशील?’ ‘उद्याच दाखवतो.’ दुसऱ्या दिवशी सकाळीच बिरबलाने आपल्या उत्तराची सत्यता पटविण्यासाठी योजना आखली. ऐन बाजाराच्या वेळी त्याने मस्त झालेला हत्ती बाजारपेठेत सोडला. मस्त झालेला हत्ती येत आहे असे पाहून बाजारपेठेत धांदल उडाली आणि लोक सैरावैरा धावायला लागले. रस्त्यावर सुरू असलेली गडबड पाहण्यासाठी बिरबल बादशहाला घेऊन महालाच्या गच्चीवर गेला.
थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून एक पैलवान येत होता. समोरून मस्त झालेला हत्ती येतोय याची पैलवानाला खबर नव्हती. हत्ती एकदम पैलवानाच्या समोर आला. काय करावे ते त्याला कळेना. त्याने इकडे तिकडे पाहिले. सहज हातात येईल असे काही दिसत नव्हते. इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुत्र्यावर गेली. काहीही विचार न करता पैलवानाने ते कुत्रे उचलले आणि मस्त झालेल्या हत्तीच्या अंगावर फेकले. विचित्र प्रकारचा आवाज करीत अचानक अंगावर आलेल्या कुत्र्यामुळे हत्ती गोंधळून गेला आणि त्याने आपला मार्ग बदलला. हे दृश्य पाहिल्यावर बादशहाला बिरबलाचे म्हणणे पटले.
बिरबलाचे कौशल्य : कुत्रा किंवा कोणताही प्राणी हा काही हत्यार असू शकत नाही किंवा लढाईसाठी रणांगणावर जाणारा सैनिक हत्यार म्हणून कुत्र्याला सोबत नेत नाही. पण संकट आल्यावर त्यापासून सुटका करण्यासाठी माणूस हातात पडेल त्या साधनाचा वापर करतो, हे सामान्यज्ञान बिरबलाला माहीत होते. त्याचाच त्याने वापर केला.
विद्वान कोण?
बादशहाच्या दरबारात देशोदेशींचे विद्वान हजेरी लावत असत. आपली विद्वत्ता बादशहाला दाखविणे आणि त्या बदल्यात बादशहाकडून खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळविणे हेच त्यांचे काम असायचे. एकदा बादशहाचा दरबार भरला असता एक विद्वान तिथे आला. बादशहाला मुजरा करून त्याने आपली ओळख करून दिली. बादशहाने त्याचा योग्य प्रकारे सन्मान केल्यावर त्याला दरबारात येण्याचे कारण विचारले.
‘महाराज, मी आपल्या दरबारातील विद्वानांची कीर्ती ऐकून आलो आहे. मी आपल्याला दरबारातील विद्वानांना दोन प्रश्न विचारणार आहे. या दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले तर मी माझ्या हातातील सोन्याचे कडे भेट देईल आणि कुणीही उत्तर नाही देऊ शकले तर माझी आपल्या दरबारात नेमणूक करावी.’
त्या विद्वानाची अशा प्रकारची भाषा ऐकताच बादशहा गालातल्या गालात हसायला लागला. त्या विद्वानाला संधी द्यावी म्हणून बादशहा म्हणाला, ‘आम्हाला मान्य आहे. विचारा तुमचे प्रश्न’ या परवानगीने त्या विद्वानाचा चेहरा खुलला. हातातील सोन्याचे कडे सर्व दरबाराला दाखवीत तो म्हणाला, ‘माझा पहिला प्रश्न असा आहे- मी प्रत्येक ठिकाणी आहे तरी माझं राहण्याचं नेमकं ठिकाण नाही. जिथ कुणालाही प्रवेश मिळत नाही, अशा सर्व ठिकाणी मी फिरतो. आकाश, सागर, धरती सर्वत्र माझा संचार आहे, मला कोणी पाहू शकत नाही, मला पकडू शकत नाही तरी माझ्यावाचून सर्व जगाचे अडते असा मी कोण आहे?’ प्रश्न तसा अवघड होता.
सर्व दरबारी एकमेकांकडे पाहायला लागले. दरबारात पसरलेली शांतता पाहून तो विद्वान हातातील कडे दाखवू लागला. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारा कोणीच नाही असे पाहून तो आनंदाने उड्या मारीत असतानाच बिरबल उठला आणि म्हणाला, ‘महाराज, या प्रश्नाचे उत्तर वारा आहे.’ बादशहाने त्या विद्वानाकडे पाहिले. त्याने हे उत्तर बरोबर असल्याचे सांगितले.
आता दुसरा प्रश्न विचारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तो दरबाराला म्हणाला, ‘पहिल्या प्रश्नाहून माझा दुसरा प्रश्न खूप अवघड आहे. तो प्रश्न असा आहे : मी प्रत्येकात असतो. माझ्याशिवाय कुणी जिंवंत राहू शकत नाही. माझी सत्ता अमर्याद आहे. तरीही मी एका ठिकाणी अडकून पडलो आहे. मला माझ्या मित्राने मदत केल्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही, असा मी कोण आहे?’
हा प्रश्न ऐकताच दरबारात पुन्हा शांतता पसरली. त्या विद्वानाने दरबारावरून विजयी नजर फिरवली. आपल्या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकणार नाही, याबद्दल त्याची आता खात्री पटायला लागली होती. आता तर तो पहिल्यापेक्षा हात जास्त उंच करून आपल्या हातातील कडे दाखवीत होता. त्याची आणि दरबारात बसलेल्या बिरबलाची नजरा नजर होताच बिरबल उठून म्हणाला, ‘महाराज, या प्रश्नाचे उत्तर आहे मन’
हे उत्तर बरोबरच होते. त्यामुळे तो विद्वान खूप आनंदी झाला आणि बादशहाला पुन्हा एकदा मुजरा करून म्हणाला, ‘महाराज, मला माझ्या दोन्ही प्रश्नाची अचूक उत्तरे मिळाली आहेत. खरोखरच तुमच्या दरबारात विद्वान आहेत.’ नंतर लगेच त्याने आपल्या हातातील कडे काढून बिरबलाला दिले आणि दरबाराचा निरोप घेतला.
बिरबलाचे कौशल्य : विद्वानाने अवघड म्हणून विचारलेल्या या दोन्ही प्रश्नांतच त्याची उत्तरे दडलेली होती. बिरबलासारख्या हुशार माणसाने आपल्या सामान्यज्ञानाच्या आधारे त्या प्रश्नांना विचार न करता उत्तरे दिली. कारण वारा आणि मन याच्या चंचलतेबाबत आपल्याकडे बहुतेकांना माहिती असते.
अर्धा वाटा
ज्या युक्तीने बिरबलाला बादशहाच्या दरबारात प्रवेश मिळून दिला तीही युक्ती. या युक्तीमुळे बादशहाला बिरबलाचे चातुर्य कळाले आणि त्याची आपल्या दरबारातील विद्वान म्हणून बादशहाने नेमणूक केली. त्याचे असे झाले.
एका गावात राहणारा एका गरीब ब्राह्मणाचा हुशार मुलगा असलेला बिरबल बादशहाला भेटण्यासाठी बादशहाच्या दरबाराकडे निघाला. हा मुलगा बादशहाच्या दरबारापर्यंत तर पोहोचला, पण त्याला दरबारात काही प्रवेश करता येईना. दरबाराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालाने बिरबलाला अडवले, ‘तुला आत जाता येणार नाही.’
अशा वेळी काय करावे ते बिरबलाला कळेना. शेवटी मुळातच हुशार आणि चतुर असलेल्या बिरबलाने द्वारपालांना पटवले आणि आत प्रवेश केला.
बादशहाच्या दरबारात गेल्यावर बिरबलाने बादशहाला आपली ओळख सांगितली. बादशहाने बिरबलाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारून त्याची परीक्षा घेतली. बादशहाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन बिरबलाने बादशहाला जिंकले. बादशहा खुश झाला. ‘तुला काय बक्षीस हवे ते माग,’ बादशहा म्हणाला ‘महाराज, मला बक्षीस म्हणून शंभर फटक्यांची शिक्षा द्यावी,’ बिरबलाने बादशहाकडे मागणी केली.
बिरबलाची अशी जगावेगळी मागणी पाहून सर्व दरबारी आश्चर्यचकीत झाले. बादशहाने बक्षीस मागायला सांगितल्यावर अशा प्रकारची शिक्षा मागणारा बिरबल बहुधा पहिलाच होता. बिरबलाच्या या मागणीने बादशहाही विचारात पडला. अखेरीस बिरबलाची इच्छा म्हणून त्याला हवे ते बक्षीस देण्याची बादशहाने आज्ञा केली. दरबारातील सेवकाने हातात चाबूक घेतला आणि बिरबलाला फटके मारण्यासाठी तो जवळ आला. बिरबलाच्या पाठीवर फटका मारण्यासाठी सेवकाने हवेत चाबूक उगारताच त्याला थांबवीत बिरबल म्हणाला, ‘थांबा, थांबा. मला फटके मारण्याआधी प्रवेशद्वारावरील द्वारपालाला बोलवा.’
बिरबलाने द्वारपालाला बोलावण्याची विनंती करताच बादशहाने सेवकाला पाठवून द्वारपालाला बोलावले. द्वारपाल आता येताच बिरबल म्हणाला, ‘मला मिळणाऱ्या शंभर फटक्यांपैकी अर्धे म्हणजे पन्नास फटके याला द्या.’
बिरबल असा का म्हणतोय ते बादशहाला कळेना. बादशहाला राग आला. बादशहा म्हणाला, ‘हा काय वात्रटपणा चालला आहे?’
‘माफी असावी हुजूर,’ बिरबल बादशहाला सांगू लागला, ‘मी आपल्या दरबारात यायला निघालो तेव्हा या द्वारपालाने मला आडविले. काही केल्या तो मला आत सोडायला तयार नव्हता. अखेर मला बादशहाकडून खूप मोठे बक्षीस मिळणार आहे असे सांगितल्यावर तो मला आत पाठवायला तयार झाला, पण त्याने मला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्ध्या बक्षिसाची मागणी केली. मी तशी तयारी दाखविल्यावरच त्याने मला आत सोडले. आता मला शंभर फटक्यांचे बक्षीस मिळाले आहे तेव्हा कबूल केल्याप्रमाणे त्याला बक्षिसाचा अर्धा वाटा देणे भाग आहे.’
बिरबल असं म्हणाल्यावर सर्व प्रकार बादशहाच्या लक्षात आला. लाच घेणाऱ्या द्वारपालाला पकडून देण्यासाठी बिरबलाने केलेली युक्तीही बादशहाला पसंत पडली. खुश होऊन बादशहाने बिरबलाला खूप मोठे बक्षीस दिले तर त्या द्वारपालाला पूर्ण शंभर फटक्यांची शिक्षा दिली आणि नोकरीवरून काढून टाकले.
बिरबलाचे कौशल्य : बक्षिसातील अर्धा वाटा देण्यासाठी मुद्दाम म्हणून बिरबलाने बक्षीस म्हणून फटाक्यांची शिक्षा मागितली. त्यामुळे पहारेकऱ्याची लाचखोरी तो बादशहाच्या लक्षात आणून देऊ शकला. फटाक्याऐवजी त्याने दुसरी कोणतेही बक्षीस मागितले असते तर आपला द्वारपाल लाच घेतो ही बाब बादशहाने स्वीकारली नसती.
लहान रेषा
यमुना नदीच्या काठी फिरायला जाणे बादशहाला खूप आवडायचे. वेळ मिळाला की तो बिरबलाला सोबत घेऊन नदी काठी जायचा. नदीकाठी फिरताना बादशहाला अनेक विचार सुचायचे. कधी कधी त्याच्या मनात अनेक प्रश्न यायचे. बादशहा मग आपल्या मनातील प्रश्न बिरबलाला विचारायचा आणि बिरबल त्याचे शंका निरसन करायचा.
असेच एकदा यमुनेच्या पात्रातून चालत असताना बिरबलाची गंमत करण्याचा विचार बादशहाच्या मनात आला. बादशहाने आपल्या हातातील काठीने नदी पात्रातील ओल्या वाळूवर एक रेषा काढली. नंतर बिरबलाला म्हणाला, ‘बिरबल, आता या रेषेला अजिबात धक्का न लावता ही रेषा लहान करून दाखव.’
आज आपण खरोखरच बिरबलाला अडचणीत आणणारी समस्या निर्माण केली म्हणून बादशहा खुश झाला. बिरबलाला हे उत्तर काही केल्या येणार नाही म्हणून बादशहा बिरबलाकडे पाहून हसत होता.
बिरबल मात्र शांत होता. त्याने थोडा वेळ विचार केला आणि बादशहाच्या हातातील काठी घेतली. त्याच काठीच्या साहाय्याने बिरबलाने बादशहाने काढलेल्या रेषेच्या शेजारी दुसरी एक रेषा काढली. ही रेषा बादशहाने काढलेल्या रेषेवरून मोठी असल्यामुळे धक्का न लावता बादशहाने काढलेली रेषा लहान झाली. बिरबलाने वापरलेली ही युक्ती पाहून बादशहाला आपला पराभव मान्य करावा लागला. बिरबलाला हरविणे इतके सोपे नाही, याची बादशहाला खात्री पटली.
बिरबलाचे कौशल्य : लहान, मोठे, कमी, जास्त या सर्व एकमेका सापेक्ष गोष्टी आहेत. कोणतीही वस्तू फक्त दुसरीच्या तुलनेत लहान किवा मोठी असते. याच तत्त्वाचा वापर करून बिरबलान बादशहाची रेषा धक्का न लावता लहान केली.
अकलेचा घडा
बादशाच्या दरबारात खूप विद्वान लोक आहेत, याची माहिती अनेक देशांतील राजा महाराजांना झाली होती. या विद्वानांची परीक्षा पाहण्यासाठी हे देशोदेशीचे राजे अनेक युक्त्या करीत असत. दरबारातील विद्वानामुळे बादशहाचा पसरलेला लौकिक कमी व्हावा, हाच त्यांचा त्यामागचा उद्देश असायचा.
बादशहाच्या दरबारातील विद्वानांची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून श्रीलंकेच्या राजाने एका दूतासोबत बादशहाला एक पत्र पाठविले. या पत्रात असे लिहिले होते, ‘महाराज तुमच्या दरबारात अनेक विद्वान आहेत. त्यामुळे तुमच्याकडे अकलेला काही तोटा नसणार हे उघड आहे. आमच्या देशात मात्र अकलेचा दुष्काळ पडला आहे. तरी कृपया आपण आम्हाला एक घडाभर अकल पाठवावी, ही विनंती.’
अशा आशयाचे पत्र वाचल्यावर बादशहा बुचकळ्यात पडला. घडाभर अक्कल कशी पाठवायची, हे काही बादशहाला उमजेना. बादशहाने बिरबलाला बोलावले आणि ते पत्र दाखविले. श्रीलंकेच्या राजाचा डाव बिरबलाच्या लक्षात आला. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून बिरबल म्हणाला, ‘महाराज, घडाभर अक्कल गोळा करायला तीन-चार महिने लागतील. तोपर्यंत या दूताला आपल्या इथे थांबवून घ्या.’
दरबारातून बाहेर आल्यावर बिरबल मळ्यात गेला. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात कोहळ्याचे वेल लावले होते. या वेलीना आता फुले यायला सुरूवात झाली होती. बिरबलाने लगेच आपल्या सेवकाला कुंभाराकडे पाठवले आणि दोन चार चांगले भाजलेले घडे आणायला सांगितले. कोहळ्याच्या वेलीला बारीक फळे यायला लागल्यावर बिरबलाने ही फळे घड्यात टाकली आणि शेतकऱ्याला त्याकडे लक्ष द्यायला सांगितले.
काही दिवसानंतर घड्यात सोडलेले कोहळे खूप मोठे झाले. आता त्यांना घड्याच्या बाहेर काढता येणे अशक्य आहे असे वाटल्यावर बिरबलाने हे कोहळे वेलीपासून वेगळे केले. त्या घड्याची तोंडे कापडाने बांधली. ते घडे घेऊन बिरबल दरबारात आला. श्रीलंकेच्या राजदूताच्या स्वाधीन ते घडे करून बिरबल म्हणला, ‘तुमच्या महाराजांच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे अकलेचे घडे पाठावीत आहोत. त्यांना म्हणावं या घड्यातील अक्कल काढून घ्या आणि घडे आम्हाला परत पाठवा कारण आमच्याकडे अकलेचा नसला तरी घड्यांचा दुष्काळ आहे.’
बिरबलाने पाठविलेली अक्कल श्रीलंकेच्या राजाला काढता आली नाही. बिरबलाने त्यांची केलेली फजिती पाहून बादशहा मात्र बिरबलाच्या अक्कल हुशारीवर खूप खुश झाला.
बिरबलाचे कौशल्य : एका अशक्य गोष्टीवर उत्तर म्हणून दुसरी अशक्य गोष्ट या युक्तीचा बिरबलाने येथे अतिशय कौशल्यपूर्वक वापर केला आहे.
समुद्राचे लग्न
बादशहाचा बिरबलावर जीव होता. बिरबल बादशहाचा सर्वात आवडता होता तरीही बादशहा तो बादशहाच. कधी कधी काही कारण नसताना तो कुणावरही रागावत असे. बादशहाच्या अशा रागापासून बिरबलाची सुटका नव्हती. एकदा बादशहा बिरबलावर रागावला आणि बिरबल दरबार सोडून निघून गेला.
बिरबल गेल्यावर पहिले काही दिवस बादशहाला काही वाटले नाही, पण नंतर मात्र बादशहाला करमेना. बिरबल नसल्यामुळे दरबारातील चातुर्य आणि हुशारी गायब झाली होती. दरबारातील विनोदाचे वातावरण संपले होते. दरबाराला पूर्वीची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी बिरबलाला परत बोलावण्याशिवाय बादशहाकडे पर्याय नव्हता. पण बिरबलाला बोलावणार कसे? कारण बिरबल गायब झाल्यापासून वेशांतर करून राहत होता. त्याचा शोध घेणे खरोखरच अवघड होते. बिरबलाचा शोध घेण्यासाठी काही तरी युक्ती करायला हवी, याबाबत बादशहाला खात्री पटली. युक्तीशिवाय बिरबल परत येणार नाही हे बादशहाला माहीत होते.
थोडा वेळ विचार केल्यानंतर बादशहाने एक योजना मनाशी आखली. आपल्या सर्व मांडलिक राजांना त्याने एक खलिता पाठविला, ‘आम्ही समुद्राचे लग्न काढले आहे. आपल्या देशातील नद्यांना लग्नासाठी पाठवा.’
नद्यांना लग्नासाठी कसे पाठवायचे, या प्रश्नाचे उत्तर फक्त बिरबलच देऊ शकतो. त्यामुळे ज्या राजाकडून उत्तर येईल त्या राजाकडे बिरबल आहे, हे नक्की आपले खलिते गेल्यापासून कुणाकडून काही उत्तर येते का म्हणून बादशहा वाट पाहत होता.
आला दिवस जात होता. समुद्राच्या लग्नाची ठरलेली वेळ जवळ येत होती तरी एकही नदी लग्नासाठी आली नव्हती. आता काय करायचं या विचाराने बादशहा चिंतित झाला. बिरबलाचा शोध घेण्याचा आपला हा प्रयत्न वाया जाणार की काय याची बादशहाला काळजी वाटू लागली.
बादशहा असा निराश झाला असतानाच एके दिवशी दरबारात निरोपाचा खलिता आला. बादशहाने तो खलिता वाचला. त्यात लिहिले होते, ‘आपण ठेवलेल्या सागराच्या लग्नासाठी आमच्या देशातील नद्या निघाल्या आहेत. वेशीवर त्यांच्या स्वागतासाठी आपल्या शहरातील विहिरींना पाठवा. विहिरी आल्या नाही तर नद्या वेशीवरून परत जातील.’
खलिता वाचल्याबरोबर बादशहा खुश झाला. अशी युक्ती फक्त बिरबलच करू शकतो याची खात्री असलेल्या बादशहाने लगेच त्या मांडलिक राजाकडे आपला दूत पाठविला आणि बिरबलाला सन्मानाने आपल्या दरबारात परत आणले.
बिरबलाचे कौशल्य : नद्या आपला मार्ग सोडून जाऊ शकत नाहीत. पण त्यांना बोलावले असता न पाठविणे म्हणजे बादशहाच्या आज्ञेचा अनादर करणे. त्यामुळे बिरबलाने इथे विहिरीला स्वागताला बोलावले आहे. कारण नद्या आपला मार्ग बदलू शकत नाहीत तशाच विहिरीही आपली जागा सोडू शकत नाहीत.
शेरास सव्वाशेर
बादशहाच्या दरबारात कधी कोण येईल आणि काय करील याबाबत काहीच सांगता येत नसे. एकदा असाच एक थापाड्या माणूस बादशहाच्या दरबारात आला. मुळातच तो थापाड्या असल्यामुळे खोट्या गोष्टी रंगवून सांगण्यात आणि त्या खऱ्याच आहेत असे भासविण्याचे त्याच्याकडे चांगले कसब होते. त्यामुळे तो खोटं बोलतोय हे माहीत असूनही लोक त्यांच्या गप्पा ऐकत असत कारण त्या मनोरंजक असायच्या. या गप्पीदासाने आपल्या थापांतून बादशहाची चांगलीच करमणूक केली. त्यामुळे बादशहाने त्याला चांगले बक्षीस दिले.
आता गप्पीदासाला चांगली संधीच मिळाली. काही दिवसांच्या अंतराने तो दरबारात यायला लागला. दरबारात आला की गप्पा मारून बादशहाचे मनोरंजन करायचा आणि खुश झालेल्या बादशहाकडून चांगली बिदागी मिळवायचा. कहर म्हणजे तो आपल्या फालतू थापाड्या गप्पांसाठी बादशहाचा आणि दरबाराचा कितीही वेळ घ्यायचा. ही गोष्ट बिरबलाला आवडली नाही. या गप्पीदासाला चांगला धडा शिकवायचा असा त्याने मनोमन निर्णय केला.
बिरबलाच्या अपेक्षेप्रमाणे दरबारात अतिशय महत्त्वाचे काम सुरू असताना गप्पीदास आला आणि बादशहाला थापा ऐकवायला लागला. बोलता बोलता तो गप्पीदास बादशहाला म्हणाला,
‘महाराज, काल संध्याकाळी जंगलातील पाणवठ्यावर मी एक अनोखा प्रकार पाहिला. एक बकरी वाघाचा कान धरून त्याला फरफटत नेत होती. बिचारा वाघ बकरीला खूपच घाबरला होता…,’
गप्पीदासाची ही थाप ऐकताना बादशहा त्यात चांगलाच रंगला होता. ही संधी साधून बिरबल महाराजांना म्हणाला, ‘जहापनाह, हा प्रकार तर काहीच नाही. मी काल याहून अधिक आश्चर्यकारक प्रकार पाहिला.’
‘कोणता तो?’ बादशहाने विचारले.
‘एक शेतकरी आपली म्हैस घेऊन पाणी पाजण्यासाठी पाणवठ्यावर गेला होता,’ बिरबल सांगू लागला, ‘‘त्या पाण्यात एक मगर होती. मगर भुकेली असल्यामुळे तिने शेतकऱ्याचा पाय धरला. शेतकरीही हुशार होता. मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने आपल्या सोबत आलेल्या म्हशीची शेपूट पक्की धरली आणि म्हशीला हाकारले. त्या शेतकऱ्याला म्हैस पुढे ओढायला लागली तर पाण्यातली मगर मागे ओढायला लागली. या ओढाओढीत शेतकऱ्याच्या शरीराचे दोन भाग झाले. मागचा भाग मगरीसोबत गेला तर पुढचा भाग म्हशीसोबत. योगायोगाने त्यावेळी तिथून एक वैद्यबुवा जात होते. त्यांनी हा प्रसंग पाहिला. लगेच एका बकरीला मारून त्यांनी बकरीचा अर्धा भाग त्या शेतकऱ्याला जोडला…’’
बिरबल अशी गोष्ट सांगण्यात रंगला होता तेव्हा सारा दरबारही लक्षपूर्वक ऐकत होता.
गप्पीदास मात्र केव्हाच दरबारातून गायब झाला होता. बिरबलाच्या थापांपुढे आपला निभाव लागणार नाही, इतके तो नक्कीच कळून चुकला होता.
बिरबलाचे कौशल्य : खोटे बोलणं किंवा खोटे रंगवून सांगणे ही एक कला असली तरी ती निरुपयोगी आहे हे पटवून देण्यासाठी बिरबलाने स्वत:च थाप मारायला सुरुवात केली. त्याने वापरलेल्या या युक्तीमुळे थापेवर गुजराण करणाऱ्या थापाड्याला दरबारातून पळ काढावा लागला.
बैलाचे दूध
बिरबलाची फजिती करून त्याचे दरबारातील महत्त्व कमी करण्यासाठी दरबारातील अनेक सदस्य आपापल्या परीने प्रयत्न करीत असत. आपला कार्यभाग साधावा यासाठी कधी ते बादशहाच्या बेगमांची मदत घेत तर कधी शहाजाद्यांना भरीस घालीत. बिरबलाचा द्वेष करणाऱ्या काही लोकांनी शहाजाद्याला भरीस घातले आणि त्याला एक अवास्तव मागणी करायला सांगितले.
‘‘मला एक औषध तातडीने घ्यायचे असून त्यासाठी बैलाचे दूध लागणार आहे,’’ दरबारात अचानक आलेल्या शहाजाद्याने बादशहाकडे मागणी केली.
‘‘मग बिरबल मला कधी आणून देशील?’’ शहाजाद्याने लगेच बैलाचे दूध आणण्याची कामगिरी बिरबलावर सोपविली.
‘‘खाविंद, तुम्हाला औषध घेण्यासाठी बैलाचे दूध नक्कीच आणून देईल, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल,’’ बिरबलाने बादशहाला सांगितले.
आता बिरबलाला बैलाचे दूध आणणे काही शक्य नाही. त्यामुळे बिरबलाची चांगली फजिती होणार म्हणून दरबारातील बहुतेक सर्व जण खूप खुशीत होते.
इकडे बिरबलाने मात्र योग्य प्रकारे तयारी केली. आपल्या बायकोला मध्यरात्री धुणं धुण्यासाठी नदीवर यायला सांगितले. अशा वेळी कोणी काही प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचे हेही सांगितले.
बिरबलाने सांगितल्याप्रमाणे बिरबलाची बायको आपल्या दासीला घेऊन कापडाचे गाठोडे घेऊन मध्यरात्री नदीवर गेली आणि जोरजोरात खडकावर कपडे आपटून धुवायला लागली.
इकडे बिरबलाने गप्पा मारीत मारीत बादशहा आणि शहाजाद्याला सोबत घेतले आणि नदीच्या दिशेने फिरायला निघाला. अपरात्री कपडे धुण्याचा आवाज ऐकल्यावर बादशहा चमकला. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी तो बिरबलाला घेऊन तिथे गेला.
‘‘हे बाई, तू एवढ्या अपरात्री का कपडे धूत आहेस?’’ बादशहाने विचारले.
‘‘या माझ्या मालकीण आहेत आणि मी त्यांची दासी आहे,’’ बिरबलाच्या बायकोची दासी बादशहाला उत्तर देत होती, ‘‘माझ्या मालकिणीचा नवरा बाळांत झाला असून त्याला मुलगा झाला आहे. नवऱ्याचे आणि त्याच्या बाळाचे करायला मालकिणीला दिवस पुरत नाही. शिवाय उगीच लोकांत चर्चा नको म्हणून माझी मालकीण रात्रीच्या वेळी कपडे घेऊन नदीवर आली आहे.’’
‘‘बाईचा नवरा?’’ शहाजादा मध्येच बोलू लागला, ‘‘पुरुषाला कसे काय मूल होईल?’’
‘‘न व्हायला काय झाले?’’ बिरबलाची दासी उत्तर देत होती, ‘‘या दिल्ली शहरात काय होईल याचा नेम नाही. इथे बैल दूध द्यायला लागले आहेत आणि नवरे बाळांत व्हायला लागलेत.’’
दासीने दिलेले उत्तर ऐकताच बादशहा आणि शहाजादा दोघेही वरमले. आपण बैलाच्या दुधाची मागणी केल्यामुळेच बिरबलाने हा प्रसंग घडवून आणला हे न कळण्याइतके दोघेही खुळे नव्हते. त्यामुळे पुढे कधीही त्यांनी बिरबलाकडे बैलाच्या दुधाची मागणी केली नाही.
बिरबलाचे कौशल्य : बैलाचे दूध मागितल्यावर बिरबलाने पुरुषाला मूल झाल्याची युक्ती केली. एक अशक्य गोष्ट समजून देण्यासाठी त्याने दुसऱ्या त्याच दर्जाच्या अशक्य गोष्टीचा आधार घेतला आहे.
बिरबल गेला स्वर्गात
दरबारात बिरबलाला असलेले स्थान कमी करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची बिरबलाच्या शत्रूंची तयारी होती. बिरबलाला संपवून टाकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही याची खात्री पटल्यावर बिरबलाचे सर्व हितशत्रू एकत्र आले आणि त्यांनी बिरबलाचा काटा काढण्याची एक नामी युक्ती शोधून काढली. बिरबलाचा काटा काढण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून बादशहाच्या शाही न्हाव्यावर सोपविली. ही योजना यशस्वी केली तर खूप मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या धन संपत्तीला भुलून तो ही योजना साकारायला तयार झाला.
या योजनेनुसार बादशहाची दाढी करायला गेलेला शाही न्हावी दाढी करता करता बादशहाला म्हणाला, ‘‘महाराज, आपण इथे खूप आनंदात आहात, पण स्वर्गात गेलेले आपले पिताश्री आणि इतरांची मात्र आपण अद्याप काहीच खबरबात घेतली नाही.’’
‘‘अशी खबरबात घेणे कसं शक्य आहे?’’ बादशहा थोडा चिडला होता.
‘‘न व्हायला काय झाले?’’ शाही न्हावी आपला मुद्दा बादशहाला पटवून देत म्हणाला, ‘‘माझ्या ओळखीचा मांत्रिक आहे. आपल्या मंत्राच्या साहाय्याने कुणालाही सदेह स्वर्गात पाठवू शकतो.’’
‘‘असं शक्य असेल तर आपणही कुणाला तरी पाठवून स्वर्गाची खबरबात जाणून घ्यायला हवी,’’ बादशहा आता थोडा खुशीत आला होता. ‘‘पण यासाठी पाठवणार कुणाला?’’
‘‘सरकार, बिरबल,’’ न्हावी आता आपली योजना पुढे रेटीत होता, ‘‘स्वर्गातून योग्य प्रकारे खबरबात काढून आणणे हे काही वेड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी हुशारच माणूस हवा. बिरबलासारखा हुशार माणूस साऱ्या जगात शोधून सापडणार नाही.’’
‘‘बरोबर आहे. या कामी बिरबलाचीच नेमणूक करायला हवी.’’
बादशहाला आपला मुद्दा पटला म्हणून न्हावी खुश झाला.
दुसऱ्या दिवशी लगेच बादशहाने बिरबलाला आपली योजना सांगितली. आपल्याला संपविण्याचा हा डाव आहे, हे बिरबलाने लगेच ओळखले. यातून युक्तीने काही तरी मार्ग काढला पाहिजे असा विचार करून बिरबल बादशहाला म्हणाला, ‘‘आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी खूप अवघड आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागणार. तसेच मला इथली काही महत्त्वाची कामे उरकण्यासाठी थोडा वेळ लागणार.’’
‘‘काही हरकत नाही.’’
स्वर्गात जाण्याच्या मोहिमेसाठी बादशहाकडून दोन महिन्यांची मुदत आणि बरीच मोठी रक्कम घेऊन बिरबल घरी रवाना झाला.
या काळात बिरबलाने एक गुप्त योजना आखली. स्वर्गात जाण्यासाठी स्मशानात ज्या ठिकाणी बिरबलाची चिता रचण्यात येणार होती त्या ठिकाणापासून आपल्या घराच्या मागील दरवाजापर्यंत बिरबलाने एक भुयारी मार्ग तयार केला. मार्ग तयार झाल्यावर बिरबलाने मुदत संपेपर्यंत विश्रांती घेतली आणि तो बादाशहाच्या समोर हजर झाला.
बिरबलाच्या हितशत्रूंनी ठरविल्याप्रमाणे सारे जुळून आले होते. त्यामुळे त्यांनी जय्यत तयारी केली. बिरबल सदेह स्वर्गात जाणार म्हणून त्यांनी साऱ्या शहरातून बिरबलाची मिरवणूक काढली. अखेरीस त्याला स्मशानात आणले. तिथे बिरबलाने आधीच आपली चिता रचून ठेवली होती. बिरबल चितेवर बसताच अग्नी लावण्यात आला. रचलेल्या सर्व लाकडांची राख होताच बिरबलाचे हितशत्रू खुशीत परत आले. आता बिरबलाच्या जाचातून सुटका झाली म्हणून सारे आनंदात होते.
इकडे चितेला आग लावल्यानंतर बिरबल गुप्त मार्गाने निघून आपल्या घरी आला. अनेक दिवस तो घरातच लपून राहिला. या काळात त्याने आपले दाढीचे आणि डोक्याचे केस खूप वाढू दिले. बऱ्यापैकी केस वाढलेत याची खात्री पटल्यावर बिरबल दरबारात जाऊन बादशहाच्या समोर हजर झाला.
बिरबल परत आलेला पाहताच बादशहा खुश झाला तर बाकीचे सर्व दरबारी गोंधळले. बादशहाच्या पूर्वजांची खबरबात बादशहाला सांगताना बिरबल म्हणाला, ‘‘महाराज, आपल्या पूर्वजांना स्वर्गात कशाची कमतरता नाही. सर्व अगदी आनंदात आहेत. फक्त त्यांना एकच अडचण आहे. स्वर्गात न्हावी नसल्यामुळे ते खूप परेशान झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्याला एक विनंती केली आहे.’’
‘‘कोणती? पूर्वजांच्या समाधानासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे.’’ बादशहा आता खूपच अधीर झाला होता.
‘‘आपल्या शाही न्हाव्याला काही दिवस स्वर्गात पाठवावे, अशी त्यांनी विनंती केली आहे.’’
बिरबलाने सांगितलेली खबरबात ऐकताच बादशहा खुश झाला आणि त्याने शाही न्हाव्याला स्वर्गारोहण करण्याचा आदेश दिला. बादशहाच्या या आदेशाने न्हाव्याच्या पायाखालची वाळू सरकली. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच जाणार याची त्याला खात्री पटली.
बिरबलाचे कौशल्य : आपल्याला स्वर्गात पाठविण्याची योजना तयार करणाऱ्या न्हाव्यावर त्याचाच डाव उलटविण्याची युक्ती इथे बिरबलाने केली आहे.
खिचडी कशी शिजेल?
बादशहा कधी कधी खरोखरच विक्षिप्त वागायचा. एके दिवशी बादशहा काही कारणामुळे संध्याकाळच्या वेळी तळ्याच्या काठी गेला होता. थंडीचे दिवस असल्यामुळे आणि दिल्लीत कडाक्याची थंडी पडलेली असल्यामुळे तळ्यातील पाणी खूपच गार झाले होते. अशा गार पाण्यात कुणीही रात्रभर थांबू शकणार नाही, याची बादशहाला खात्री पटली. त्यामुळे या पाण्यात रात्रभर कुणी राहिले तर त्याला खूप मोठे बक्षीस द्यायला हवे असे बादशहाला वाटले.
लगेच दुसऱ्या दिवशी बादशहाने आपल्या राज्यात तशी दवंडी पिटवली. बादशहाने कितीही मोठे बक्षीस ठेवले तरी केवळ बक्षिसाच्या आशेने कुणी आपला जीव धोक्यात घालणार नाही असे बादशहाला वाटले. मात्र याच दिल्ली शहरात एक अतिशय गरीब ब्राह्मण होता. आर्थिक विवंचनेमुळे तो घायकुतीला आला होता. असाही आपल्या जगण्याला अर्थ नाही तेव्हा तळ्यातील पाण्यात रात्रभर थांबण्याचा त्याने निर्णय घेतला. मेलो तर ठीक आणि जगलो तर आपली काळजी मिटेल असे त्याला वाटले.
बिचारा गरीब ब्राह्मण रात्रभर तळ्याच्या गार पाण्यात कुडकुडत थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो बादशहाच्या दरबारात गेला आणि बक्षिसाची रक्कम मागू लागला.
‘‘तुला कुठून तरी उष्णता मिळत असली पाहिजे त्याशिवाय तू त्या पाण्यात रात्रभर थांबू शकला नसतास,’’ असे म्हणून बादशहाने त्या गरीब ब्राह्मणाला बक्षीस देण्यास नकार दिला. ‘‘तू रात्रभर माझ्या महालातील दिव्यांकडे पाहत होतास, त्याची उष्णता तुला मिळाली म्हणूनच तू थांबलास,’’ असे म्हणून बादशहाने त्या ब्राह्मणाला बक्षीस न देता दरबारातून हाकलून लावले.
अशा अन्याय झालेल्या लोकांचा बिरबलावर विश्वास होता. तो ब्राह्मण बिरबलाकडे गेला आणि त्याने आपली व्यथा सांगितली. बिरबलाने त्याला बक्षीस मिळवून देण्याचे आश्वासन देऊन घरी पाठवले.
या घटनेला दोन तीन दिवस झाल्यानंतरची गोष्ट.
बादशहाला दरबारात काही तरी महत्त्वाचे काम होते. त्यासाठी तो बिरबलाची वाट पाहत होता. दरबारात नेहमी वेळेवर येणारा बिरबल त्यादिवशी महत्त्वाचे काम असूनही आला नव्हता. बिरबलाची बराच वेळ वाट पहिल्यानंतर बादशहाने आपल्या एका सेवकाला बिरबलाला बोलावण्यासाठी पाठविले. थोड्या वेळाने सेवक परत आला, पण बिरबल काही आला नाही. बादशहाने सेवकाकडे चौकशी केली तेव्हा सेवक म्हणाला, ‘जहांपन्हा, बिरबल म्हणाले की माझी खिचडी शिजतेय. खिचडी शिजली की खातो आणि दरबारात येतो.’
बराच वेळ गेला तरी बिरबल काही दरबारात आला नाही. बिरबलाला तातडीने बोलावण्यासाठी बादशहाने आपल्या दुसऱ्या एका सेवकाला पाठविले. दुसराही सेवक थोड्या वेळाने रिकामा परत आला. बिरबल न येण्याचे कारण बादशहाने विचारले तेव्हा तो सेवक म्हणाला, ‘महाराज, बिरबलाची खिचडी अजून शिजली नव्हती. ते म्हणाले की खिचडी शिजली की मी खातो आणि दरबारात येतो.’ आता बादशहा गोंधळला. बिरबल अशी कोणती खिचडी शिजवतोय, असा बादशहाला प्रश्न पडला.
बिरबलाची खिचडी पाहण्यासाठी आपण स्वत: जाण्याचे बादशहाने ठरविले. सोबत दरबारातील काही निवडक सेवक घेतले आणि बादशहा बिरबलाच्या घरी गेला. पाहतो तर काय बिरबलाने तीन उंच बांबू घेऊन त्यांची तिपाई बनवली होती. बांबूची वरची टोके एकत्र बांधून बिरबलाने त्याला एक मडके लटकवले होते. त्या मडक्यात तांदूळ, डाळ आणि पाणी घातले होते. या मडक्याच्या एकदम तळाशी जमिनीवर बिरबलाने जाळ केला होता. अगदी एकेक काटकी हातात घेऊन बिरबल जाळ लावत होता. हे दृश्य पाहताच बादशहा हसायला लागला. बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘‘बिरबल, अशा प्रकारे कधी तुझी खिचडी शिजेल का? तुझा जाळ कुठे, तुझे मडके कुठे? अशाने खिचडी कधीच शिजणार नाही.’
‘का नाही शिजणार?’ बादशहाने चालवलेल्या मस्करीकडे अजिबात लक्ष न देता बिरबल गंभीरपणे म्हणाला,‘महाराज, तळ्यात राहणाऱ्या माणसाला जर तुमच्या महालातील दिव्याची उष्णता मिळू शकते तर या बांबूवरच्या मडक्याला खाली पेटवलेल्या लाकडाची उष्णता का लागणार नाही?’ बादशहाला आपली चूक उमगली. आपली चूक लक्षात आणून देण्यासाठीच बिरबलाने हा खिचडी शिजविण्याचा उपाय योजल्याचे बादशहाला कळले. काहीही न बोलता बादशहाने रात्रभर तळ्यातील पाण्यात उभे राहणाऱ्या त्या ब्राह्मणाला बोलावले आणि त्याला ठरल्याप्रमाणे बक्षीस दिले.
बिरबलाचे कौशल्य : आगीमुळे माणसाला उष्णता मिळते हे खरे पण अग्निमुळे उष्णता किती अंतरावर मिळू शकते हे ठरलेले आहे. हे पटवून देण्यासाठी बिरबलाने ही युक्ती केली.
पुढे वाचा:
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी