Guru Purnima Speech in Marathi : विद्यार्थ्यांना शैक्षणिक भाषणे लिहिण्यात आणि देण्यास मदत करण्यासाठी, आम्ही या लेखात एक सुंदर गुरुपौर्णिमा भाषण मराठी प्रदान केले आहे.
आम्ही इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये Speech on Guru Purnima in Marathi लिहिले आहे.
गुरुपौर्णिमा भाषण मराठी – Guru Purnima Speech in Marathi
सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला गुरुपौर्णिमा वर काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला गुरुपौर्णिमा निमित्त भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.
गुरुब्रम्हा गुरु विष्णू : गुरुदेवो महेश्वरायः ।
गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मैयश्री गुरवे नमः ।।
गुरु म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रुप: या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो: असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे. ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेदिवशी साजरी होते.
व्यास महर्षिंनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळातील मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्याच्याइतके थोर व्यासंगी, ज्ञानसंपन्न गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. राजावाचून सेना, शेतकऱ्यावाचून मळा आणि मंगळ सुत्रावाचून गळा, नावाड्याशिवाय नौका या जशा गोष्टी विसंगत वाटतात त्याप्रमाणे सदगुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच श्री समर्थांनी ‘सदगुरुविणा जन्म निष्फळ’ असे म्हटले आहे.
विद्या हे एक महान दैवत आहे. विद्यादान करण्याचे महान व पवित्र असे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री सरस्वतीची अमृतवाणी, सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीचा शिल्पकार, गुरु म्हणजे दयेचा सागर, केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटणारा, निस्वार्थी ज्ञान दान करणारा, गुरुविना कोणाच्याही जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दिपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचवू शकत नाही. कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी कंठ फुटण्यास जसा वसंत ऋतुच यावा लागतो, त्याप्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला सद्गुरु पासून चालना मिळावी लागते. लोखंड जसे परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनते. त्याप्रमाणे गुरुच्या ज्ञानदानाने शिष्य कृतार्थ होतो.
गुरु म्हणजे ज्ञानाचे पीठ या दिवशी गुरुपूजन करणे म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन करणे होय. गुरुसारखा पाठीराखा असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो. गुरुची सुरुवात आईवडीलांपासून होते. आई ही प्रत्येकाची सर्वात मोठी गुरु आहे. आपल्या बाल मनावर अनेक चांगले संस्कार रुजवते, कितीतरी चांगल्या बाबींचे ज्ञान, चांगले विचार व सदाचार आपल्या मनावर बिंबवते, आपण अज्ञानाचे सज्ञान तिच्याच तालमीत होते. प्रेम वात्सल्य ह्या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच उचलतो.
महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार व समाजाचे खरे गुरु होते. जगातील महान साहित्यिक तत्ववेत्ता म्हणून व्यासांची किर्ती आहे. व्यासमुनी शिष्यांना मौनातून ज्ञान द्यायचे. व्यासांनंतर जो शिष्य संप्रदाय तयार झाला. त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा अधिकार देण्यात आला की, त्यांनी मौना ऐवजी मुखवाणीतून शिष्याला ज्ञान द्यावे. तेव्हापासून “गुरुपौर्णिमा” साजरी करण्याची प्रथा सुरु झाली. त्या दिवशी गुरुप्रती आपले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा देतात. अर्थात हे सर्व शिष्याच्या अध्यात्मिक उन्नत्तीसाठीच असते.
गुरुपौर्णिमेदिवशी गुरुतत्व हजार पटीने कार्यरत असते. म्हणजे इतर दिवशी गुरुंसाठी काही केल्याने जो फायदा होतो, त्यापेक्षा गुरुपौर्णिमेला हजार पटीने फायदा होतो, हे या दिवसाचे माहात्म्य आहे. वैदिक काळापासून गुरुबद्दलचा आदर आपणास दिसून येतो. राज्यकर्ते जे, महाराजे देखील गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय राजकारण करित नसतात. भारतीय गुरु परंपरेत गुरु – शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक – याज्ञवल्क्य, शुक्राचार्य जनक, कृष्ण – सुदामा संदिपनी, विश्वामित्र – राम लक्ष्मण, परशुराम – कर्ण, द्रोणाचार्य – अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे.
गुरुबद्दलचा आदर कर्ण यांच्या उदाहरणात देता येईल. गुरुजींची झोप मोडू नये म्हणून स्वत:ची मांडी भुंग्याने पोखरुन काढली तरी जराही हालचाल न करता सर्व वेदना सहन केल्या. त्या केवळ गुरुबद्दलच्या आदरापोटीच, समाजात गुरुचे स्थान अतिशय उच्च आहे. म्हणूनच भारतात गुरुची महती रहावी म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करतात.
निसर्ग हा ही एक गुरुच आहे. त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे निसर्ग निसर्गातील नद्या, पर्वत, झरे, धबधबे, दऱ्या – खोऱ्या, वली, फळे, पाऊस, सरोवर, वृक्ष हे आपणास, निश्चलता, गांभीर्य, परोपकार सहिष्णूता शिकवतात. निसर्ग हा जणू महान जादुगारच, त्याच्याजवळ ज्ञानाचा अपार खजिना आहे. निसर्गातून आपल्यावर कितीतरी चांगले संस्कार घडतात, पण त्यासाठी सर्वांनी निसर्गोपासना करायला हवी. वृक्ष, वेली, फुले, फळे या पासून शितलता, जमिनीपासून दृढ निर्धार असे कितीतरी सुस्कार आपण निसर्गातून घेऊ शकतो.
आज संस्कृतीचे अवमूल्यन मोठ्या वेगाने होत आहे. गुरु अर्थात शिक्षकाने वर्गात अपमान केला किंवा अभ्यासाबद्दल विचारले तर वेळप्रसंगी त्या गुरुला किंवा शिक्षकाला मारहाणसुद्धा केली जाते. अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुरु आणि त्यांचे महात्म्य यांचे ज्ञान मिळणे आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक घरात शाळेत शैक्षणिक संस्थेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे. यासाठी हा लेखन प्रपंच, गुरुविषयीचे सार खालील दोन ओळीत आपल्याला सापडेल.
गुरुसमान कुणी नाही सोयरा । गुरुविण नाही थारा ।।
गुरु निधान गुरु मोक्ष । गुरु हाच आपुला आसरा ।।
पुढे वाचा: