लग्न ठरल्यानंतर करावयाची कामे – Lagna Tharlya Nantar Kay Karave

आपल्याकडे विवाह हा आपण जन्माचा संबंध मानतो. विवाहसंबंध हा अत्यंत पवित्र मानलेला आहे. आणि म्हणूनच देवा – ब्राह्मणाच्या साक्षीने विवाहबंधन स्वीकारावे लागते.

लग्न ठरल्यानंतर आपल्यापुढे अनेक कामे उभी राहतात. आणि ती योग्य त्या वेळात पुरी करावी लागतात. लग्न ठरल्यानंतर दोन्ही घरच्या वडील मंडळींनी एकत्र येऊन काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात.

  1. साखरपुडा केव्हा व कुठे करायचा ?
  2. साखरपुड्यासाठी किती मंडळींना बोलवावे. आणि तो कशा पद्धतीने साजरा करावा ? फोटोग्राफरची व्यवस्था.
  3. लग्न कुठल्या पद्धतीने करावे ?
  4. लग्नासाठी कुठला हॉल घ्यावा ? डेकोरेशन कसे व किती करावे ? भटजींची काय व्यवस्था करायची ?
  5. लग्नाच्या दिवशी जेवायला किती माणसे येतील ? (अंदाजे) लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री पिठलेभातासाठी अंदाजे किती माणसे येतील ?
  6. रिसेप्शनला साधारण किती माणसे येतील ?
  7. रिसेप्शनला आलेल्या मंडळींना खाण्यासाठी काय द्यावे ? की फक्त आइस्क्रीम चालेल ?
  8. मानपान, देणे-घेणे यावर सविस्तर रीतसर चर्चा.
  9. पत्रिका कशा छापाव्या ( इंग्लिशमध्ये की मराठीत ) व किती छापाव्या ? दोन्ही कुटुंबाने एकच पत्रिका छापावी का?
  10. लग्नपत्रिका छापताना जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी वेगळी छोटी चिठ्ठी छापून जोडावी का?
  11. रिसेप्शन न करता, सुट्टीच्या दिवशी लग्नाचा मुहूर्त धरून सर्वांना जेवायला बोलवावे का ?
  12. लग्नाच्या दिवशी सकाळपासून हॉलवर येणाऱ्या मंडळींना नास्ता, चहा किंवा कॉफी याची व्यवस्था.
  13. लग्न लागल्यावर हळद-कुंकू – अत्तर – गुलाब फुले व पेढा.
  14. जेवण्याची व्यवस्था पाने मांडून करावी की बुफे पद्धत चालेल?
  15. मुलाकडची मंडळी बाहेरगावाहून येणार असली तर त्यांच्या उतरण्याची, राहण्याची व जेवणाची व्यवस्था काय करावी ?
  16. हॉलवर जाताना कुलुपे घेऊन जावी. खोली सोडून इकडे तिकडे जाताना आपल्या कुलुपांचा उपयोग होतो.
  17. लग्नाच्या हॉलवर एखादा पेट्रोमॅक्स तयार असावा. काही कारणाने लाइट गेल्यास जरुरी पडते. तसे दोन-तीन टॉर्च, मोठ्या मेणबत्त्या व काड्यापेटी याचीही सोय करावी. हल्ली बॅटरीवर चालणारा दिवाही मिळतो.
  18. फर्स्ट एड सामान थोडेफार तयार ठेवावे.
  19. व्याहीभोजन केव्हा आणि कसे करायचे ?

तुमच्या मुलीचे लग्न ठरले. तुम्ही खूप आनंदात आहात. तुमच्यावरची जबाबदारी संपली आहे, पण लग्नकार्य व्यवस्थित पार पडेपर्यंत तुमच्यावर खूपच जबाबदारी आहे.

लग्न ठरल्यावर प्रथम आपल्या घरातील अडचणींच्या तारखा लक्षात घेऊन तारीख ठरवावी. कुठल्या दिवशी हॉल रिकामा आहे व सर्वांना कुठली तारीख व कुठचा मुहूर्त सोयिस्कर आहे ते पाहून तारीख पक्की करावी व तुमच्या आवडीप्रमाणे पत्रिका छापून घ्याव्या.

लग्न जुन्या धार्मिक पद्धतीने करणार आहात की वैदिक पद्धतीने ते नक्की करावे व भटजींना भेटून काय काय सामान लागेल त्याची यादी करावी. भटजी काय काय सामान आणणार त्याचीही नोंद करावी, म्हणजे गोंधळ होणार नाही.

लग्न ठरल्यानंतर आपल्या घरातील जी वडीलमंडळी आहेत, त्यांना रीतसर भेटून, लग्न ठरल्याचे सांगून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. बाहेरगावी असलेल्या मंडळींना फोनवरून किंवा पत्रे लिहून लग्न ठरल्याचे कळवावे

मुंबईसारख्या मोठ्या शहरात हल्ली आमंत्रणासाठी घरोघर जाणे शक्य होत नाही. तेव्हा घरातील मोठ्या व मानाच्या मंडळींना रीतसर पत्रे लिहून आमंत्रणे करावी. नंतर पत्रिका छापून आल्या की पत्रिका पाठवाव्या. पत्रिकेमुळे मुहुर्ताची वेळ व हॉल यांची माहिती कळेल. पोस्टाची तिकिटे अगोदर आणून ठेवावी.

लग्नाच्या दिवशी जेवायला काय मेनू ठरवावा ? हल्ली बहुतेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भोजनसमारंभ आयोजित केले जातात. तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्यांच्याकडे काय मेनू आहेत त्यावर चर्चा करून पदार्थ ठरवावे. आधल्या रात्रीचे जेवण काय व कसे करावे याविषयीही नक्की ठरवावे. रिसेप्शनला फक्त आइस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक देण्याची पद्धत आहे. खाण्यासाठी डिशही दिली जाते. काही ठिकाणी हल्ली रिसेप्शनला बुफे डिनर देतात. त्याविषयी सर्व माहिती करून घ्यावी. आपल्याला काय परवडेल हे सर्वात महत्त्वाचे असते. लग्नाचे जेवण बुफे पद्धतीने किंवा पाने मांडून करता येते. तुमच्याकडे कशा पद्धतीची माणसे येणार त्यावर तुम्ही ठरवा.

तुम्ही हॉल बुक करून आलात की लगेचच तुमच्याकडे वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर मंडळींकडून पत्रे यायला लागतील. त्यांची मंडळी तुम्हाला भेटायला येतील. तेव्हा कॉन्ट्रॅक्टर मंडळींची पूर्ण माहिती काढा. पूर्वी त्यांनी कोणाकोणाची कामे केली आहेत त्या मंडळींचे पत्ते मिळवा व त्यांच्याकडे फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून कॉन्ट्रॅक्टरचे काम, जेवणाची चव व इतर बारीकसारीक माहिती मिळवा.

हळदकुंकू – अत्तर- गुलाब फुले-हार- पेढे यांची काय व्यवस्था करायची, ते पक्के करा. शक्यतो हे सर्व जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना देणार त्यांनाच सांगावे, म्हणजे आयत्या वेळची आपली धावपळ वाचेल व मानसिक शांतता लाभेल.

लग्नाच्या दिवशी हॉलवर जाण्यासाठी मोटारींची व्यवस्था करावी लागते. तुमची स्वतःची मोटार असेल व काही स्नेही मंडळींच्या गाड्या असतील तर खूपच सोयीचे होईल किंवा टॅक्सी, रिक्षा करून हॉलवर जाण्यासाठी कोणातरी जबाबदार व्यक्तीची मदत घ्यावी लागेल.

लग्नापूर्वी व्याहीभोजन करण्याची पद्धत आहे. मुलीकडच्या पाच-सात माणसांना मुलाकडे जेवायला बोलावतात. मुलीच्या आईला चांगली साडी व वडिलांना कापड देण्याची पद्धत आहे.

लग्न करावे की नाही नक्की काय करावे

पुढे वाचा:

Leave a Reply