नागपंचमी माहिती मराठी – Nag Panchami Information in Marathi

नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला ‘नागपंचमी’ असे म्हणतात. या दिवशी जिवंत नागांची, नागाच्या मातीच्या मूर्तींची अगर चंदनाने नागाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. नागांना हळदी-कुंकू लावून, लाह्या व दूध वाहतात. असे केले असता वर्षभर नागांपासून त्रास होत नाही असे मानले जाते.

पूर्वी स्त्रियांना, विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना नागपंचमीला माहेरून बोलावणे येत असे. नागपूजा झाल्यावर माहेरवाशिणी आपल्या मैत्रिणींसह झोपाळे बांधून त्यावर झोके घेत, फेर धरून गाणी म्हणत आणि सगळा दिवस आनंदात घालवीत.

नागपंचमी माहिती मराठी - Nag Panchami Information in Marathi

नागपूजेची ही प्रथा देशात अनेक ठिकाणी पाळली जाते. बंगाल व छोटा नागपूर या प्रदेशात मनसादेवी या सर्पदेवतेची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी नागांचे अवतार मानल्या गेलेल्या पुरुषांचीही पूजा केली जाते. राजस्थानात तेजाजी व पंजाबमधील गूगा हे त्यापैकी होत.

नागपंचमीबद्दल पुष्कळ कथा आहेत. श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नागाचा पराभव केला व तो यमुनेच्या डोहातून सुखरूप बाहेर आला, त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती.

दुसरी कथा अशी आहे की, नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरायचे नाही अशी पद्धत असतानाही एका शेतकर्‍याने शेत नांगरले. त्यामुळे एका नागिणीची पिल्ले नांगराचा धक्का लागून मेली. नागीण रागावली व शेतकर्‍याच्या कुटुंबातल्या सर्व माणसांना चावली. शेतकर्‍याची एक मुलगी दुसर्‍या गावी- आपल्या सासरी- होती. नागीण मग तिला चावायला तिथे गेली. तेव्हा तिला असे दिसले, की त्या मुलीने पाटावर नागाचे चित्र काढले आहे व ती नागाची पूजा करते आहे. नागीण खूष झाली. त्या मुलीला न चावता नागीण परत शेतकर्‍याच्या घरी आली व आपले विष परत ओढून घेऊन तिने शेतकर्‍याच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत केले.

आणखी एक गोष्ट अशी आहे की, एक सासुरवाशीण दरवर्षी नागाची पूजा करत असे. तिला आई-वडील अगर भाऊ असे माहेरचे कोणी नसल्यामुळे तिला कधीच माहेरी जायला मिळत नसे. म्हणून तिला वाईट वाटे. तेव्हा नागाने माणसाचे रूप घेतले आणि तिचा मामा बनून तो तिला माहेरी घेऊन गेला. आपल्या संस्कृतीत सर्व उपयोगी गोष्टींची पूजा होते. आपला देश शेतीप्रधान आहे. उंदीर धान्य खाऊन शेतकर्‍याचे नुकसान करतात. तेव्हा उंदरांना खाणारे नाग व साप हे उपयोगी प्राणी आहेत. त्यांना मारू नये या विचाराने नागपूजा सुरू झाली असावी. परंतु नंतर मात्र अशा चांगल्या विचारांचा विपर्यास होऊ लागला.

सध्या प्रत्यक्षात असे होते की, दरवर्षी नागपंचमीला गारुडी शेकडो नाग पकडून आणतात. त्यांची तोंडे शिवतात, त्यांचे विषाचे दात पाडतात आणि त्यांना टोपलीत बंद करून दारोदार फिरतात. घरोघरी बायका या नागांना हळदी-कुंकू लावतात आणि दूध पाजतात. नागांनी दूध प्यावे म्हणून गारुडी त्यांना उपाशी ठेवतात. वास्तविक नागाचे अन्न उंदीर व बेडूक हे आहे. तो दूध पीत नाही. दूध प्यायल्याने नागाला न्युमोनिया व डायरिया होतो. पूजेच्या नावाखाली दर नागपंचमीला नागांचा असा छळ होतो व हजारो नाग मरतात.

यामुळे पर्यावरणाची चिंता करणारे लोक दरवर्षी जनतेला आवाहन करतात की, त्यांनी नागाला दूध पाजू नये व कोणी नाग पकडून आणल्याचे समजले तर त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवावी.

या सणाच्या संदर्भात आणखीही एक विचार असा आहे की, हा सण नाग या सरपटणार्‍या प्राण्यासंबंधी नसून ‘नाग’ नावाच्या माणसांच्या जमातीसंबंधी असावा.

कालियाचा पराभव केल्यावर कृष्णाने कालियाला क्षमा करावी, म्हणून कालियाच्या बायकांनी कृष्णाची प्रार्थना केली… नागकन्या उलूपीने अर्जुनाशी लग्न केले… किंवा कहाणीमध्ये, नाग एका मुलीचा मामा बनला… हे आपण वाचतो. हे सर्व नाग म्हणजे नाग जमातीतील माणसे असावीत. अजूनही, विशेषतः ईशान्य भारतात नाग जमातीचे लोक बहुसंख्येने आहेत.

या सणामागचा धार्मिक उद्देश काहीही असो, सध्याच्या काळात या दिवसाचा उपयोग मुलांना नाग व साप यांची जास्त माहिती करून देण्यासाठी केला पाहिजे. नागांना पकडून आणणे, अगर दूध पाजणे अशा गोष्टींनी नागांना त्रास होतो तेव्हा त्यापासून दूर राहिले पाहिजे.

नागपंचमी माहिती मराठी – Nag Panchami Information in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply