नवरात्र / दसरा माहिती मराठी – Navratri / Dussehra Information in Marathi

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासूनचे नऊ दिवस म्हणजे नवरात्र आणि आश्विन शुद्ध दशमीला दसरा किंवा विजयादशमी म्हणतात. मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे हे दिवस आहेत. या काळाबद्दलच्या अनेक कथा आहेत.

महिषासुर नावाचा दुष्ट राक्षस सर्व लोकांचा छळ करत होता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या दिव्य तेजातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीचे रूप घेऊन तिने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले व दसर्‍याच्या दिवशी त्याचा वध केला. नवरात्र म्हणजेच देवीच्या उपासनेचे हे नऊ दिवस.

दसरा Aptyache pan

घरोघरी घट बसतात. त्यांची पूजा केली जाते. खरे तर ही घटपूजा म्हणजे एक क्षेत्रपूजा असते. लहानसे चौकोनी शेत करतात. त्यात धान्य पेरतात. त्यात मातीचा एक घट ठेवतात. त्याला भोके पाडून आत दिवा ठेवतात. घटावर फुलांच्या, धान्याच्या माळा सोडतात. हे एक प्रतीक आहे.

गुजरातेत घट बसवून स्त्रिया नऊ दिवस गरबानृत्य करून देवीची आराधना करतात. बंगालमध्ये दुर्गापूजेचा मोठा उत्सव होतो व दसर्‍याच्या दिवशी मिरवणुकीने देवीचे विसर्जन होते. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गापूजेचा हा उत्सव बंगालमध्ये प्रसिद्ध आहे.

नवरात्री व दसरा हे दिवस ओणम नावाच्या सणाच्या रूपाने केरळात साजरे केले जातात. तिथे कल्पना अशी आहे की, वामनावतारात पाताळात दडपलेला बली हा राजा इतका दयाळू होता की प्रजा सुखात आहे की नाही हे पाहण्यासाठी या दिवसात पृथ्वीवर येतो. त्याला सर्वत्र सुखसमृद्धी दिसावी असा प्रयत्न या सणात असतो. रामाने रावणाचा वध दसर्‍याच्या दिवशी केला. उत्तरेत नऊ दिवस रामलीलेच्या रूपाने रामकथा सादर करतात. दसर्‍याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात.

दसर्‍याच्या दिवशी लहान मुले पाटीपूजनाच्या रूपाने शारदादेवीचे पूजन करून विद्याभ्यासाला आरंभ करतात. शारदा किंवा सरस्वती ही विद्येची आणि कलेची देवता आहे. तेव्हा या दिवशी पुस्तके, पोथ्या यांच्याबरोबर वाद्यांचीही पूजा करतात.

या दिवशी शस्त्रांचीही पूजा करतात. पूर्वीच्या काळी पावसाळा संपल्यानंतर दसर्‍याच्या दिवशी राजे स्वारीला म्हणजे लढाईला निघत असत. या शस्त्रपूजनाच्या मागे एक कथा आहे.

पांडव अज्ञातवासात असताना वेश पालटून विराट राजाच्या घरी राहिले होते. या वेळी आपली शस्त्रे त्यांनी एका शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवासाचा कालावधी संपत आलेला असताना कौरवांनी विराटाच्या गाई पळवून नेल्या. त्यावेळी अर्जुनाने झाडावरली शस्त्रे काढून घेतली आणि गाईंचे रक्षण करण्यासाठी कौरवांशी युद्ध केले. तो दिवस दसर्‍याचा होता.

आपट्याच्या पानांना सोने का मानायचे, त्याचीही एक कथा आहे.

कौत्स नावाच्या एका विद्यार्थ्याने वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेतले. त्या काळी ऋषी जंगलात आश्रम बांधून राहत. शिष्य त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करत व शिक्षण घेत. शिक्षण संपल्यावर आपल्या घरी परत जाताना विद्यार्थ्याने गुरूला गुरुदक्षिणा द्यायची असे.

कौत्साचे शिक्षण संपल्यावर त्याने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. गुरूंनी गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. पण कौत्साने फारच आग्रह केला; तेव्हा वरतंतू ऋषींनी प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी अशा हिशेबाने, कौत्साला शिकवलेल्या चौदा विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.

कौत्स हे दान मागण्यासाठी रघुराजाकडे गेला; पण राजाने नुकताच विश्वजित नावाचा यज्ञ केला होता. विश्वजित यज्ञानंतर सर्वस्वाचे दान करायचे असते, त्यामुळे राजाचा खजिना रिकामा झाला होता.

तेव्हा राजाने कौत्साकडून तीन दिवसांची मुदत मागून घेतली. राजाने ठरवले, की इंद्रावर स्वारी करायची आणि त्याला जिंकून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा घ्यायच्या. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. तेव्हा राजा स्वारी करणार आहे, हे समजताच इंद्राने कुबेराला सांगून त्याच्या राजधानीजवळ एका शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने कौत्साला त्या सुवर्णमुद्रा घेऊन जायला सांगितले.

कौत्स सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला; पण वरतंतूंनी त्यांतल्या फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. राहिलेल्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स रघुराजाकडे गेला; पण राजानेही त्या परत घ्यायला नकार दिला. तेव्हा कौत्साने त्या सुवर्णमुद्रा पुन्हा शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या लुटण्यास सांगितले. तो दिवस दसर्‍याचा होता. म्हणून आपण दसर्‍याला शमीची आणि शमी नसेल, तर अश्मंतक म्हणजे आपट्याची पाने एकमेकांना देतो.

असा हा दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

पुढे वाचा:

Leave a Reply