प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पाठदुखी-कंबरदुखीच्या त्रासाला तोंड द्यावे लागलेले असते. असे म्हणतात की, सर्दीनंतरचा दुसरा आजार म्हणजे पाठ आणि कंबरदुखी होय. पाठ आणि कंबरदुखी हा टाळण्याजोगा त्रास आहे. त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती आपण मिळवली तर आपण या समस्येतून लवकर मुक्त होऊ शकतो.
सर्वसाधारणत: अर्धेअधिक लोक उतारवयात केव्हा ना केव्हा पाठ व कंबरदुखीने त्रस्त होतात. पाठदुखीचे अधिक प्रमाण पुरुषांमध्ये, तर कंबरदुखीचे स्त्रियांमध्ये आढळून येते. कोणत्याही वयात आढळून येणारी पाठदुखी चाळिशीनंतर तर अधिक त्रासदायक ठरते.
शाळा-कॉलेज-क्लासेसमधील तासंतास बैठक, बँक-कार्यालय कंपन्या अशा ठिकाणचे संगणकासमोरचे बैठे काम, शारीरिक हालचालींचा व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल तरुण व्यक्तींनादेखील पाठ-कंबरदुखीचा त्रास उद्भवतो.
दरवर्षी पाठ-कंबरदुखीमुळे गोळ्या, तपासण्या, डॉक्टरची फी, एक्स-रे, स्कॅन व शस्त्रक्रिया इत्यादींवर कितीतरी रुपये खर्च होतात. तसेच या त्रासामुळे नोकरी-व्यवसायाचे नुकसान व दैनंदिन कामावरही विपरीत परिणाम होतो. मुळात आपण हे समजून घेतले पाहिजे की, पाठ व कंबरदुखी हा आजार नसून त्यावरील उपाय हा बहुतेक वेळा
नियमित व्यायाम व जीवनशैलीत योग्य तो बदल करणे हाच आहे.
पाठीच्या कण्याच्या मध्यभागात जेव्हा हे दुखणं असतं तेव्हा त्याला पाठदुखी म्हणतात. तसेच कण्याच्या खालच्या भागात हे दुखणं जाणवतं तेव्हा त्याला कंबरदुखी म्हणतात. ग्रामीण भागात अशा दुखण्यास कंबर धरली किंवा उसण भरली असाही शब्दप्रयोग प्रचलित आहे.
पाठ-कंबरदुखीच्या त्रासावर आजन्म नियंत्रण ठेवण्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, योगासने करणे तसेच झोपणे, उठणे, बसणे या हालचाली करताना चुकीच्या सवयीत योग्य बदल केल्यास खूपच फायदा होतो. याबरोबरच आहारात योग्य तो बदल केल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते आणि हाडांची ताकद वाढते.
पाठ-कंबरदुखी म्हणजे नेमके काय?
Table of Contents
कंबरदुखी आणि पाठदुखी हे विकार आजकाल सगळीकडे व्यापकपणे आढळून येतात. या पुस्तकात आपण कंबरदुखी या आजाराबद्दल माहिती आणि त्यावरील उपचार पद्धती बघणार आहोत.
एखादी बिल्डिंग बांधताना पाया भरतानाच आपण ठरवतो की किती मजले बांधायचे आहेत आणि त्यानुसार किती सिमेंट व काँक्रीट टाकायचे.
पण तीन मजले बांधायचे ठरल्यावर त्यावर अजून तीन मजले बांधले तर पिलर्सवर जास्त भार निर्माण होऊन बिल्डिंग कोसळते. त्याचप्रमाणे आपल्या हाडांवर चरबीचे मजले बांधले तर हाडांवरचा लोड वाढून, हाडांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांच्यामध्ये कंबर दुखण्याचे प्रमाण जास्त आहे.
आहारावर नियंत्रण ठेवले, तर स्थूलता येणार नाही. वजन वाढणार नाही व त्यांच्यामुळे हाडांवर जो बोजा येणार आहे तो कमी होईल. जेव्हा शारीरिक वाढ संपते, म्हणजे साधारणत: 18 ते 19 वर्षांत शरीराची पूर्ण वाढ झालेली असते. तेव्हा आपल्या हाडांची जी स्थिती असते ती विशिष्ट वजन पेलण्याकरिता केलेली असते. जर वजन त्याच्यावरती गेले तर सर्व भार मणके व सांध्यावर येतो. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर कंबरदुखीचे प्रमाण जास्त आढळते. मात्र, आजकाल एक-दोन बाळंतपणानंतरही काही स्त्रिया कंबरदुखीने हैराण झालेल्या आढळून येतात.
पाठदुखी व कंबरदुखीची कारणे
साधारणत: पाठ व कंबरदुखीची कारणे खालीलप्रमाणे आढळून येतात-
- चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास, अपघाताने किंवा जड ओझे उचलले असल्यास या कारणांमुळे कण्यावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे दोन मणक्यांमध्ये असणारा पातळ कूर्चेचा पापुद्रा फाटतो अथवा विरतो त्यामुळे पाठ-कंबर दुखू लागते.
- बसण्याची आणि चालण्याची चुकीची पद्धत यामुळेही पाठ-कंबरदुखी उद्भवू शकते.
- सतत खुर्चीवर बसून टेबलावर वाकून काम करणाऱ्या कारकून वर्गातील, शिवणकाम करणाऱ्या किंवा घडाळ्यासारख्या लहान यंत्रांची जुळणी करणाऱ्या व्यक्तींना पाठ-कंबरदुखीचा त्रास होतो.
- बैठे काम करणाऱ्या तसेच सतत एका ठिकाणी एकाच स्थितीत बराच वेळ बसावे लागणाऱ्या व्यक्तींना कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्यांच्या कण्यातील स्नायू व अस्थिबंधने अधिक जास्त मर्यादेपर्यंत ताणली जातात. या व्यक्तींच्या दैनंदिन जीवनात समतोल आहार व व्यायामाचा अभाव असला, तर त्यांना पाठ-कंबरदुखीचे दुखणे निश्चित सतावते.
- जसजसे वय वाढत जाते तसतसे दोन मणक्यांतील कूर्चा स्नायू व अस्थिबंधने यांची कार्यक्षमता कमी होत जाते. कूर्चेचा धक्का सहन करण्याची व स्नायूंची विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणण्याची ताकद कमी होते व एकंदरीत कण्यांची झीज होऊन कंबरदुखी सुरू होते.
- बहुतेक स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी गरोदरपणात अथवा बाळंतपणानंतर कंबरेचे दुखणे आढळून येते.
- गरोदरपणाच्या सातव्या, आठव्या व नवव्या महिन्यात कंबरेच्या स्नायूंवर व स्नायूबंधनांवर जास्त ताण पडल्याने बाळंतपणानंतर कंबरदुखीचे प्रमाण अधिक आढळून येते.
- गरोदरपणी पोटाच्या भारामुळे मणक्यांच्या स्नायूवर जास्त ताण येतो. बाळंतपणामध्ये कंबरेची हाडे व माकडहाड यात बराच सैलपणा येऊन पूर्वीची शरीराची स्थिती प्राप्त होण्यासाठी काही काळ जावा लागतो. यामुळे गरोदरपणात व बाळंतपणात कूर्चा स्नायू व अस्थिबंधने यावर अतिरिक्त ताण पडून कंबरदुखी सुरू होते.
- मलावरोध, पोटात गुबारा धरणे, पोट जड वाटून ढेकर न येणे, वायू न सरणे तसेच बद्धकोष्ठता यामुळे पाठीच्या व कंबरेच्या स्नायूंवर ताण पडून कंबरदुखी निर्माण होते.
- संधिवातानेसुद्धा कंबरदुखी उद्भवू शकते.
- मानसिक दुर्बलता हेही कधी-कधी दुखण्याचे कारण असू शकते.
- स्त्रियांमधील अंग बाहेर येणे (गर्भाशय योनीतून बाहेर येणे), अंगावर पांढरे जाणे, गर्भाशयाची पिशवी योग्य जागी नसणे, पिशवीच्या तोंडावर सूज असणे, पोटात ट्यूमर असणे इत्यादी रोगांचे एक लक्षण म्हणूनही कंबरदुखी होऊ शकते.
- पाठीच्या कण्यातील दोषांमुळेही पाठ-कंबरदुखी होऊ शकते.
- नियमितपणे दुचाकी वाहन चालवताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठीला व कमरेला धक्का बसून इजा होते. या गोष्टीकडे बराच काळ लक्ष न दिल्याने त्याचे रूपांतर व्याधीत होते.
- एकापाठोपाठ एक अशी अनेक कामे करण्यासाठी विश्रांती न घेता सतत धडपड करीत राहिल्यामुळे पाठीचे आजार संभवतात आपल्या कामात बदल करून विश्रांती घेणे फार महत्त्वाचे असते.
- काही व्यक्तींना रस्त्यावर खांदे वाकून चालण्याची, पावले वेडेवाकडे टाकून चालण्याची सवयच असते. या सवयीमुळे मणक्यावर ताण येतो. परिणामी पाठ व कंबरदुखी उद्भवते.
- एकाच पायावर जास्त भार देऊन उभे राहण्याच्या सवयीमुळेसुद्धा कंबर दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही पायांवर सारखाच भार देऊन उभे राहण्याची सवय असायला हवी.
- योग्य व्यायामाच्या आभावामुळेही पाठ-कंबर तसेच इतर स्नायूंनाही व्याधी जडण्याची शक्यता असते. यामुळे स्नायूंची कार्यक्षमता घटते व स्नायूंचा त्रास सहन करावा लागतो.
- बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही पाठ व कंबरदुखीला निमंत्रण मिळते. बैठे काम असणाऱ्या व्यक्तींना वाकून बसण्याची किंवा वाकून लिखाणकाम करण्याची सवय लागलेली असते. यामुळे पाठ व कंबरदुखीचे आजार उद्भवतात.
पाठदुखी-कंबरदुखीचे निदान
पाठ-कंबरदुखीच्या कारणाचे निदान करण्याकरिता खालील तपसण्या मार्गदर्शक ठरतात:-
1) X’Ray – X’Ray मध्ये मणक्यांचा आकार मणक्याची ठेवण व मणक्यांमधील अंतराचा अंदाज घेता येतो. निदानासाठी लागणाऱ्या तपासण्यामध्ये X’Ray चा सर्वांत जास्त उपयोग केला जातो.
2) MRI (Magnetic Reasonance Imaging) – MRI ही एक अत्याधुनिक स्कॅन पद्धती आहे. याद्वारे मणक्यामध्ये जवळजवळ सर्व आजारांचे अचूक निदान होते. X’Ray मधील फक्त मणक्यांची हाडे दिसत. स्नायूद्वारे मणके, मज्जारज्जू, मज्जातंतू, मणक्यामधील गाठी (Disc) व स्नायूंची सखोल माहिती मिळते. यामुळे योग्य निदान होते व डॉक्टरांना योग्य उपचार करण्यास फायदा होतो.
3) CT Scan – या मशीनद्वारे मणक्याच्या व्यांधीचे निदान करता येते. यापद्धतीचा सर्वांत जास्त फायदा मणक्यांच्या फ्रॅक्चरमध्ये होतो.
पाठदुखी-कंबरदुखीवरील उपचार
1) स्नायू आखडून जाणे
हा त्रास सहसा वजन उचलल्यामुळे, अवघड स्थितीत बसल्यामुळे होतो. स्नायू आखडून जातात व हालचाली करण्यास त्रास होतो. यामध्ये गरम पाण्याने शेकणे, मसल रिलॅक्सन्ट गोळ्या व आराम करणे हा उपाय आहे.
2) स्लीप डिस्क
मणक्यांना झटका बसल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने वाकल्यामुळे अथवा वजन उचलल्याने दोन मणक्यांमधील गादी फाटते व मज्जातंतूवर दाब येतो. यालाच स्लीप डिस्क असे म्हणतात. लोकांमध्ये सामान्यत: यालाच ‘मणक्यात गॅप’ असे म्हणतात. याच्यावर उपचार म्हणजे पूर्ण आराम, वेदनाशामक गोळ्या, एक्स-रे, ट्रॅक्शन व शेक इ.
3) स्पाँडिलॉसिस
वाढत्या वयाबरोबर होणारी मणक्यांची झीज यालाच ‘स्पाँडिलॉसिस’ म्हणतात. (स्पोंडिलायटिस नव्हे). हा कुठला रोग नाही. चाळीशीनंतर कमी-जास्त प्रमाणात याचा त्रास प्रत्येकालाच होतो. त्यावरील उपचार म्हणजे व्यायाम, योग्य आहार, जीवनशैलीत बदल व कॅल्शिअमच्या गोळ्या इ. काही वजन उचलल्यामुळे अथवा एखाद्या झटक्यामुळे अचानक कंबरेत उसण भरली तर ताबडतोब आराम मिळण्यासाठी –
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे झोपणे. ताबडतोब पूर्णपणे बेडरेस्ट घ्या. एका गादीवर/चटईवर जी फार नरम अथवा फोमची नसेल त्यावर झोपा.
- गुडघे आणि खुबा थोडेसे वाकवून झोपावे. गुडघ्याखाली उशीचा आधार ठेवा. द्द्र पाय एकदम ताठ नको. पाय किंचित वाकवून झोपल्यास स्नायू शिथिल होतात.
- सर्वांत आरामदायी स्थिती म्हणजे अंगावर झोपणे. जेव्हा आपल्याला थंडी वाजते, तेव्हा जसे पाय व हात वाकवून पोटात घेऊन झोपतो तसे झोपावे.
- हालचाल कमी करावी.
- गरम पाण्याने/पिशवीने शेकावे.
पाठदुखी-कंबरदुखीची लक्षणे
- पाठ-कंबरदुखीत कधी-कधी वेदनेबरोबर चक्कर येणे, उलट्या होणे, हातपाय गळणे इत्यादी लक्षणेही दिसून येतात.
- कधी-कधी कंबरेतून कळा येऊन दोन्ही पायांतून अथवा एकाच पायातून वेदना सुरू होतात.
- कंबरेच्या हालचाली क्लेशकारक वाटतात.
- पायातही मुंग्या आल्याप्रमाणे वाटते.
- सुरुवातीला दुखणे सौम्य असले तरी पुढे ते तीक्र व क्लेशकारक बनते.
- काही व्यक्तींमध्ये कंबरेत मधोमध दुखते किंवा कधी-कधी ती एका बाजूलाच दुखते.
- कधी कण्याच्या दोन्ही बाजूंना दुखते याचे कारण असे की ज्या बाजूची कूर्चा सरकली असेल किंवा जागच्या जागी फाटून विरली असेल त्या बाजूला वेदना होतात.
पाठदुखी-कंबरदुखीतील पथ्ये
- फोमच्या किंवा मऊ गादीवर झोपण्याने पाठीच्या कण्याला वेडावाकडा पीळ बसून पाठीच्या कण्यात जास्त वेदना होतात. म्हणून मऊ गादीवर न झोपता सपाट व कठीण जागेवर म्हणजे लाकडी फळीवर, पलंगावर किंवा जमिनीवर पातळ अंथरूण घालून झोपावे.
- दुखणे जरा थांबले व व्यक्ती हिंडू फिरू लागली की तिला कंबरेला रुंदसा कंबरपट्टा बांधणे जरूरी आहे. नाहीतर पाठीच्या कण्यावर ताण पडून जास्त दुखू लागते.
पाठदुखी-कंबरदुखीतील आहार नियोजन
सर्वसाधारणे अशक्तपणा हा विकार सर्वांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येतो. यामुळे पाठ-कंबरदुखी सुरू होते. त्यासाठी अंगात शक्ती व उत्साह येण्यासाठी समतोल आहार घेणे आवश्यक आहे. पाठ-कंबरदुखीवर खाण्या-पिण्यात फारसे काही पथ्य पाळण्याचे कारण नाही.
- आपला रोजचा साधा नैसर्गिक आहार घ्यावा. अति मसालेदार पदार्थ, मांसाहार तसेच तळलेले पदार्थ वर्ज्य करावेत.
- रात्री चार-पाच बदाम भिजत घालून सकाळी ते चावून खावेत.
- त्यावर एक कप थंड दुधात साधारण एक चमचा मध घालून ते प्यावे.
- मोड आलेले चमचाभर गहू वाफवून अथवा कच्चे खावेत.
- आहारात ताजा हिरवा भाजीपाला, फळे, दूध यांचा समावेश अवश्य करावा.
- ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा सर्व मिश्र पिठांची भाकरी भाजीबरोबर जेवणात घ्यावी.
- रसाहारात यासाठी भाज्यांचे सूप, फळांचे रस, दूध हे घ्यावे.
- आहार असा घ्यावा, ज्यात शरीराची झीज भरून काढणारे क्षार व जीवनसत्त्वे यांचा समावेश असेल.
- मोड आलेली कडधान्ये घ्यावीत.
- पाठ-कंबरेला हलक्या हाताने मालीश करावी. जोराने रगडून मालीश करू नये, त्यासाठी खोबरेल तेल वापरावे.
- बाळंतपणानंतर जी कंबरदुखी सुरू होते त्यासाठी आवश्यक तेवढी विश्रांती व पौष्टिक आहार घ्यावा.
पाठदुखी-कंबरदुखी होऊ नये म्हणून दैनंदिन जीवनशैलीत करावयाचे बदल
कॉम्प्युटरवर किंवा ऑफिसमध्ये बैठे काम करताना
- खुर्चीत ताठ बसा, वाकून बसू नका.
- मॉनिटर, की बोर्ड योग्य उंचीवर ठेवा. मान वर करून मॉनिटरकडे पाहण्याची वेळ येऊ नये. तो तुमच्या डोळ्यांच्या पातळीपेक्षा 15 ने खाली असावा.
- मनगटाला आणि हाताला आधार देणारे पॅड वापरावेत. बसलेल्या अवस्थेत कीबोर्ड, माऊस तुमच्या हाताच्या कोपराच्या उंचीवर असायला हवे.
- कॉम्प्युटरसमोर बसून खूप वेळ काम करायचे असेल तर थोड्या-थोड्या वेळाने मान उजवीकडे-डावीकडे वळविण्याचा व्यायाम करा.
- कॉम्प्युटरसमोर बसताना खुर्चीत बसूनही पाठीला पोक काढून (वाकून) बसू नये. पाठीला आधार म्हणून उशी घेऊ शकता.
- टेबललाखाली पाय ठेवायला व्यवस्थित जागा असावी. नाही तर पाठ आणि मान दुखण्याची शक्यता असते.
- वाचण्याचा मजकूर डोळ्यांच्या पातळीवर ठेवा. शक्यतो कागदपत्र दिसण्यासाठी स्टॅण्ड वापरा.
- खुर्चीची उंची टेबलाच्या उंचीला साजेशी असावी. खुर्चीमध्ये कंबरेच्या खळग्याला आधार असावा.
- अधूनमधून थोडी विश्रांती घ्या. सतत बैठे काम केल्याने पाठ व कंबर दुखण्याची शक्यता असते.
वजन उचलताना घ्यायची काळजी
- वजन उचलताना ते शरीराजवळ आणि कमरेपाशी धरा.
- प्रवासात जड पिशव्या, सुटकेस उचलण्यापेक्षा ट्रॉलीद्वारे ढकलत नेणे चांगले. वजनदार सुटकेस असेल तर तिला ढकलून नेण्यासाठी चाके असायला हवीत.
- वजन उचलताना पाठ ताठ ठेवून पायाच्या स्नायूंवर जोर देऊन वजन उचलण्याचा प्रयत्न करावा.
- प्रवासात असताना अवजड बॅग सतत एकाच खांद्यावर घेऊन चालू नका. त्यामुळे पाठ, कंबर आणि मान दुखण्याची शक्यता असते.
- वजन उचलताना पोट आखडून/ आत घ्या आणि वजन घेऊन चालताना एकदम वळू नका नाही तर पाठीला झटका बसण्याची शक्यता असते.
गादी-सोफा निवडताना घ्यायची काळजी
- जास्त सैल, विसविशीत गादीमुळे झोपेतून उठल्यावर पाठ आखडून जाते आणि पाठीवर ताण पडतो.
- चांगल्या गादीची जाडी 5-7 सेंमी इतकी असावीत. आपल्या शरीराप्रमाणे आकार बदलण्याइतपत मऊसुद्धा असावी. अशा गादीमुळे पाठीला आराम मिळतो.
- तुमची पाठ पूर्णपणे सोफ्याच्या पाठीला ठेकवता येईल. अशा प्रकारे सोफ्याची रचना असावी.
- सोफ्याची उंची खूप जास्त किंवा कमी नसावी. गुडघ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारे उंची असावी.
- सोफ्याचा बसण्याचा तळ जास्त खोलगट असेल तर पाठीला पोक काढून बसावे लागते. त्यामुळे पाठीला त्रास होतो.
झोपण्याची पद्धत व पाठ-कंबरदुखी
- बऱ्याच व्यक्तींना पालथे म्हणजे पोटावर झोपण्याची सवय असते. ही पद्धत योग्य नाही. पोटावर झोपायचेच असेल तर अर्धवट कुशीवर व पोटावर असे झोपावे.
- पाठीवर झोपताना गुडघ्याखाली उशी घेतल्याने कंबरेच्या स्नायूंना आराम मिळतो.
- फार मऊ गादीवर झोपणे टाळा. यामुळे पाठीचे स्नायू, सांधे, अस्थिपंजाचे स्नायू यावर अनावश्यक ताण पडून पाठ व कंबर दुखते.
- ज्यांच्या पाठीचा खालचा भाग दुखत असेल त्यांनी एका कुशीवर झोपावे.
पाठ-कंबरदुखी व घ्यावयाची काळजी
पाठ-कंबरदुखी हा आजार जवळपास सर्वांनाच होतो. हा एक अशा प्रकारचा शारीरिक त्रास आहे, ज्याने आपली सर्वक्रमशक्ती नष्ट होते व शरीर थकल्यासारखे वाटते. हा त्रास होऊ नये म्हणून याची अगोदरच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टी करताना आपण जर योग्य पद्धतीने त्या केल्या तर या होणाऱ्या त्रासापासून आपण मुक्त होऊ. चालण्याचा व्यायाम, खुर्चीवर बसताना, प्रवास करताना, चप्पल निवडताना, बेल्टचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊया.
चालण्याचा व्यायाम करताना घ्यावयाची काळजी
- चालणे हा एक उत्तम आणि सर्वांगसुंदर व्यायामप्रकार आहे. चालणे हा सर्वांत चांगला व्यायाम मानला जातो.
- दररोज सकाळी भरभर चालण्याने शरीर तंदुरुस्त राहते, स्नायू बळकट होतात. त्यामुळे पाठ व कंबरदुखी दूर होते.
- भरभर चालताना दोन्ही हात हालवीत चालावे. मान व पाठ ताठ ठेवावी.
- भरभर चालताना चालण्यात योग्य ते अंतर ठरवून घ्यावे. पोटात त्रास होईल असे जास्त अंतर नसावे.
- दररोज 30 ते 40 मिनिटे भरभर चालावे. चालण्याची वेळ व अंतर एकदम वाढवू नये. ते दररोज हळूहळू वाढवावे.
- निरोगी पाठ व कंबरेसाठी दहा-पंधरा मिनिटे चालण्याची सुरुवात करून, चालण्याची गती हळूहळू वाढवून दररोज 40 ते 45 मिनिटे चालण्याची सवय लावून घ्यावी.
खुर्चीवर बसताना घ्यावयाची काळजी
- खुर्चीवर बसताना नेहमी सरळ ताठ बसा.
- बऱ्याच जणांना पुढे सरकून तिरपे बसण्याची सवय असते. त्यामुळे पाठ आवश्यकतेपेक्षा जास्त वाकून कालांतराने दुखते.
- खुर्चीवर बसताना पाय जमिनीवर ठेवावेत व गुडघे 90 च्या कोनात ठेवावे.
- खुर्चीच्या पाठीला पूर्णपणे टेकून बसा व पोट आत घ्या.
- कंबरेच्या खळग्याला उशीचा आधार द्यावा.
बैठे काम व पाठदुखी-कंबरदुखी
आजकाल ऑफिसेस, बँका, सॉफटवेअर कंपन्या, दुकानदार अशा नोकरी व व्यावसायिकांना सतत तासन्तास एकाच ठिकाणी बसावे लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये कंबरदुखीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते.
बैठे काम करणारे दिवसाची सुरुवात करताना पहिल्यांदा खुर्चीवर येऊन जेव्हा बसतात, तेव्हा ताठ बसतात व हळूहळू थोड्या वेळाने ते कंबरेतून वाकतात. पाठीचे कुबड काढतात व खांद्याचा भाग पुढे वाकवतात. थोड्या वेळाने लक्षात येते की, कंबर आखडलेली आहे, तेव्हा आळस देऊन पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. त्यामुळे बैठे काम करणाऱ्यांना कंबरदुखी व स्नायूंचे दुखणे जडते. परिणामी पुढे स्नायू कमजोर होऊन मणके झिजतात व मणके झिजल्यामुळे पुढे स्पाँडिलोसिसचा धोका निर्माण होतो.
पाठीचा उत्तम मित्र म्हणजे सरळ, कठीण पृष्ठभागाची खुर्ची. जर तुम्हाला हवी तशी योग्य खुर्ची मिळाली नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही खुर्चीवर योग्य प्रकारे बसावयास शिका. बसण्याच्या स्थितील पुढे झुकण्याचा दोष सुधारण्यासाठी डोके मागे करा. नंतर हनुवटी ओढून घेण्यासाठी थोडे पुढे झुकवा. यामुळे पाठ सरळ होईल. आता पोटाचे स्नायू आवळून छाती वर उचला. स्थिती वारंवार तपासून पाहा.
- बसण्याची योग्य पद्धत :
- काम करताना कसे बसावे?
बसण्याची खुर्ची कशी असावी?
आजकाल शारीरिक काम कमी व बौद्धिक काम जास्त करण्याकडे सर्वांचा कल आहे. नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असल्यामुळे सतत आठ तास तरी एका ठिकाणी बसावे लागते. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील शाळा, महाविद्यालयात तासन्तास एकाच ठिकाणी एकाच स्थितीत बसावे लागते. परिणामी, कमी वयातच पाठ-कंबरदुखी यासारख्या व्याधी निर्माण होऊन पुढे त्याचे रूपांतर रोगात होते. यासाठी खुर्चीत बसण्याचे काही साधे नियम पाळले, तर पाठ-कंबरदुखी बऱ्याच प्रमाणात रोखली जाऊ शकते.
- आपल्या उंचीनुसार खुर्ची निवडा. खुर्ची जास्त उंच नसावी. खुर्चीवर बसल्यानंतर पाय जमिनीवर टेकले पाहिजेत. शक्य नसल्यास पायाखाली छोटा स्टूल ठेवावा.
- सहसा खुर्ची निवडताना आपण चूक काय करतो की, जी खुर्ची चांगली, भव्य दिसते ती निवडतो व मला खुर्चीत पाहिल्यानंतर समोरचा कसा प्रभावित होईल व मी कोणत्या खुर्चीत खूप छान दिसेल हे पाहतो; पण दिसण्यापेक्षा ज्या खुर्चीमध्ये बसल्यावर आपल्याला आरामदायी वाटते, अशीच खुर्ची घ्यावी.
- खुर्ची फार उंच नसावी. पाठ व्यवस्थित टेकली पाहिजे. खुर्चीत बसायचे असते, झोपायचे नाही. त्यामुळे पाठीला व्यवस्थित आधार असावा.
- बसल्यानंतर कंबरेला मागून आधार असावा. शक्य नसल्यास कंबरेच्या मागे उशी ठेवावी. कंबरेच्या ठिकाणी कधीही फलॅट नको. कारण कुबड काढायचा प्रयत्न केला; तर खुर्ची आपल्याला पुढे ढकलेल.
- ताठ बसल्यानंतर मांड्यांचा गुडघ्यांपर्यंतचा भाग बसण्याचा सीटवर आला पाहिजे. म्हणजे मांड्यांना पूर्ण आधार पाहिजे.
प्रवास व पाठदुखी-कंबरदुखी
सध्याची रस्त्यांची स्थिती खालावत जाऊन दुचाकींचे प्रमाण वाढत चालले आहे. आजकाल घरामध्ये जितक्या व्यक्ती तितक्या दुचाकी गाड्या असतात.
दुचाकी चालविल्यामुळे मान, पाठ व कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण फार वाढत चालले आहे. रस्ते खराब असल्यामुळे रस्त्यात भरपूर खड्डे असतात व खड्ड्यांमुळे शरीराला फार झटके बसतात. दुचाकीवर जाताना बसणारे झटके 50 टक्के गाडीचे शॉक अॅब्झॉर्व्हर झेलतो, तर 50 टक्के झटके आपल्या शरीराचा शॉक अॅब्झॉर्व्हर म्हणजे पाठीचे मणके झेलतो. कारण जे झटके बसतात त्याचा सरळ परिणाम मणक्यांवरच होतो.
जे लोक खूप लांबचा प्रवास करतात. बस, कार अथवा कोणत्याही वाहनाने प्रवास करणाऱ्यांना जे झटके बसतात ते मणक्यांनाच बसणार आहेत. त्यामुळे प्रवास करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
प्रवास करताना घ्यावयाची काळजी :
- कारमध्ये प्रवास करताना सीटबेल्ट वापरणे गरजेचे आहे.
- गाडीमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करताना सीटबेल्टची सोय नसल्यास पाठीसाठी कठीण टेकण विकत मिळते ते वापरा.
- कंबरेखाली एक छोटीशी उशी आधारासाठी ठेवावी.
- बसताना पाय पूर्णपणे जमिनीवर व्यवस्थित टेकत नसतील तर पायाखाली आधाराला छोटा स्टूल अथवा बॅग ठेवावी.
उंच हिल्सच्या चपला व कंबरदुखी :
काही जणी घरामध्ये सुरक्षितता बाळगायची म्हणून स्लिपर्स घालतात; पण हिल्सच्या स्लिपर्स वापरून दुष्परिणामच भोगतात. उंच टाचेच्या चपला वापरल्यामुळे टाचा, गुडघे व कंबर या तिन्ही ठिकाणी दुष्परिणाम वाढतात.
हिल्सच्या चपलांमुळे कंबरदुखी वाढण्याचे कारण :
उंच टाचांच्या चपला वापरल्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू (Centre of gravity) हा मणक्यांपासून पुढे सरकला जातो व शरीराचा तोल व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे शरीरातील मणक्यांवर ताण पडतो.
टाचा व गुडघे दुखण्याचे कारण :
देवाने आपला पाय बनविताना त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार दिलेला आहे व तो आकार देण्याचे एक विशिष्ट कारणदेखील आहे. आपण जेव्हा चालतो तेव्हा पायाचा पुढचा भाग व टाचा दोन्हींचा स्पर्श जमिनीला होणे जरुरी असते; पण हिल्सच्या खालचा भाग जमिनीवर राहून टाचांचा भाग जमिनीपासून दूर जातो व त्यामुळे चालताना पुढच्या भागावर जास्त वजन येऊन टाचांवर कमी वजन येते व गुडघे दुखतात.
पाठदुखी व चप्पल
कंबरदुखी, गुडघेदुखी होऊ नये म्हणून चप्पल वापरताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
- चपलेच्या हिल्स कमीत कमी असाव्यात; अथवा हिल्सच नसाव्यात.
- चप्पलही अगदी पायाच्या मापानुसारच असावी.
- आपला पाय चपलेत व्यवस्थित मावलेला असून चालताना चप्पल बोटांनी धरायची आवश्यकता नसावी.
- चपलेला कुशन असावे.
- चालताना आपल्याला मोकळे वाटेल अशीच चप्पल निवडावी.
पाठ-कंबरदुखीत बेल्टचा वापर
- बेल्टचा वापर कमीत कमी वेळासाठी करावा.
- बेल्टचे काम आहे आपल्या कंबरेला आधार देणे; पण सहसा तो आपल्या मणक्याला कमी व मनालाच जास्त आधार देतो.
- विशेषत: स्त्रियांना बेल्टची फार सवय असते. त्यांना असे वाटते की, एकदा बेल्ट लावला की, आपण कितीही काम करू शकतो, चालू शकतो. बेल्ट वापरणाऱ्यांना असे वाटते की, बेल्टशिवाय आपल्याला उठता येणार नाही; चालता येणार नाही; पण हा आजार 50 टक्के मानसिक व 50 टक्के शारीरिक असतो.
बेल्टचे कार्य :
- मणक्यांना आधार देणे.
- पोटाला आत दाबणे, कारण आपण पोटाला जेव्हा आत दाबतो, तेव्हा कंबरेचे स्नायू शिथिल (Relax) होतात.
- कंबरेच्या स्नायूंवर ताण पडत नाही.
- बेल्ट हा कायमस्वरूपी वापरायचा नसून तो तात्पुरता असतो. जेव्हा कंबरेच्या वेदना अति जास्त असतील तेव्हाच वापरावा.
- आपल्या शरीरात जे नैसर्गिक बेल्टचे काम करणारे स्नायू आहेत ते आपण मजबूत केले, ताकद वाढवली, तर कृत्रिम बेल्टची गरज भासणार नाही.
दप्तरांचे ओझे व पाठदुखी
आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये वाढत्या स्पर्धेबरोबर मुलांच्या दप्तराचे ओझेही अधिक प्रमाणात वाढत आहे. मुलांमध्ये आढळून येणाऱ्या मान व पाठदुखीच्या वाढत्या प्रमाणाची अनेक कारणे आहेत.
- या कोवळ्या वयात मुलांच्या हाडांची व विशेषत: मणक्यांची संपूर्ण वाढ झालेली नसते.
- मणक्यांना जोडणारे स्नायू हे पूर्णत: विकसित नसतात.
- आहारामध्ये पोषक अन्नपदार्थांची कमतरता व जंकफूडचे सेवन अधिक प्रमाणात असते.
- मैदानी खेळांचे प्रमाण कमी होऊन कोचिंग क्लासचे प्रमाण वाढते आहे. यामुळे शारीरिक व्यायामाचा अभाव जाणवतो.
- कॉम्प्युटर व मोबाइलच्या अति वापरामुळे मानेवर व पाठीवर अनैसर्गिक ताण पडतो.
दप्तराचे ओझे कमी करणे उपाय
- मुलांनी भरपूर मैदानी खेळ खेळावेत. सांधे, मान, पाठ, कंबर यांना व्यायाम होईल अशा खेळांचा समावेश दैनंदिन जीवनात असावा.
- रोज सकाळी लवकर उठून योगासने व व्यायाम करणे.
- आहारामध्ये जंकफूडचा समावेश टाळून सकस व परिपूर्ण आहार घ्यावा.
- पालेभाज्या व फळांचा समावेश लहान मुलांच्या आहारामध्ये असावा.
- शालेय दप्तरांचे ओझे हे मुलांच्या शारीरिक क्षमतेच्या योग्यतेचे असावे.
- शालेय वयामध्ये मुलांच्या हाडांची विशेषत: मणक्यांची वाढ पूर्णत: झालेली नसते. त्यामुळे त्यांना झेपतील तेवढेच शारीरिक श्रम करू द्यावेत.
- लहान मुलांची पाठ-कंबरदुखी टाळण्यासाठी दप्तरांचे ओझे कमी होण्याबरोबरच त्यांच्या शारीरिक व मानसिक सबलीकरणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
- मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या आई-वडिलांच्या, शिक्षकांच्या व स्वत:च्या अपेक्षांचे ओझे आहे. त्यामुळे पुढील पिढी परिपूर्णरीत्या सक्षम करण्यासाठी केवळ दप्तरांचे ओझे कमी करून चालणार नाही तर, विकासाच्या दृष्टीने, पालक व शिक्षकांनी जागृत राहावयास हवे. तरच आजची मुले ही उज्ज्वल भारताचे सक्षम नागरीक होतील.
- पालक व शिक्षकांनी एकत्र बसून मुलांच्या शाळेच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणावी. जेणेकरून मुलांना कमी वह्या पुस्तके शाळेत न्यावी लागतील.
- काही पुस्तके आणि वह्या शाळेतच ठेवता येतील का ते शिक्षकांशी बोलून ठरवता येईल.
पाठदुखी-कंबरदुखीवरील उपचार
पाठदुखी-कंबरदुखीवरील निसर्गोपचार
1) सनबाथ : सकाळच्या अथवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात दहा मिनिटे बसून संपूर्ण पाठीला शेक द्यावा. असे सातत्याने केल्यास बराच फायदा होतो.
2) अंघोळ करताना कंबरेवर एक तांब्या गरम पाणी व त्यानंतर एक तांब्या थंड पाणी असे आलटून पालटून सात-आठ वेळा टाकावे. शेवटचा तांब्या थंड पाण्याचा (आपल्याला सोसेल इतपत नळाचे थंड पाणी घ्यावे) टाकून अंग कोरडे करावे. या प्रयोगाने खूप आराम मिळतो.
कंबरदुखी आणि पाठदुखी हे विकार आजकाल सगळीकडे व्यापकपणे आढळून येतात. या पुस्तकात आपण कंबरदुखी या आजाराबद्दल माहिती आणि त्यावरील उपचार पद्धती बघणार आहोत.
एखादी बिल्डिंग बांधताना पाया भरतानाच आपण ठरवतो की, किती मजले बांधायचे आहेत व त्यानुसार किती सिमेंट व काँक्रीट टाकायचे. पण तीन मजले बांधायचे ठरल्यावर त्यावर अजून तीन मजले बांधले तर पिलर्सवर जास्त भार निर्माण होऊन बिल्डिंग कोसळते. त्याचप्रमाणे आपल्या हाडांवर चरबीचे मजले बांधले तर हाडांवरचा लोड वाढून, हाडांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांच्यामध्ये कंबर दुखण्याचे प्रमाण जास्त आहे.
आहारावर नियंत्रण ठेवले, तर स्थूलता येणार नाही. वजन वाढणार नाही व त्यामुळे हाडांवर जो बोजा येणार आहे तो कमी होईल. जेव्हा शारीरिक वाढ संपते, म्हणजे साधारणत: 18 ते 19 वर्षांत शरीराची पूर्ण वाढ झालेली असते. तेव्हा आपल्या हाडांची जी स्थिती असते ती विशिष्ट वजन पेलण्याकरिता केलेली असते. जर वजन त्याच्यावरती गेले तर सर्व भार मणके व सांध्यावर येतो. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर कंबरदुखीचे प्रमाण जास्त आढळते. मात्र, आजकाल एक-दोन बाळंतपणानंतरही काही स्त्रिया कंबरदुखीने हैराण झालेल्या आढळून येतात.
पाठदुखी-कंबरदुखीवर घरगुती उपचार
- अचानक पाठ- कंबर दुखणे उद्भवल्यास काही काळ पडून आरामशीर पडून राहा. विश्रांतीमुळे स्नायूंवरील ताण कमी होतो; पण गादीवर न झोपता सपाट जागेवर ब्लँकेट पसरून त्यावर झोपा.
- पाठ किंवा कंबर दुखत असल्यास अशा अवस्थेत वजन उचलू नका किंवा ताण देऊन काही ओढू नका.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलके व्यायाम करा. व्यायाम प्रकार ताण न देणारे असावेत.
- ‘पॅरासिटिमॉल’, ‘डायक्लोफिनॅक’, ‘आयबुप्रोबेन’ अशा प्रकारच्या वेदनाशामक गोळ्यांपैकी कोणतीही गोळी घेतल्यास. पाठ-कंबरदुखीला आराम मिळतो; परंतु अल्सर, दमा, इतर पोटाचे विकार असे काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या घ्याव्यात.
- पाठीला व कमरेला गरम पाण्याच्या पिशवीने शेका. त्यामुळे आराम मिळेल; पण त्वचा भाजण्याइतके गरम पाणी नसावे याची काळजी घ्या.
- दुखणाऱ्या भागावर बेलाडोनाची चिकटपट्टी लावल्यास स्नायू मोकळे होतात; पण ही पट्टी तीन-चार दिवस तशीच ठेवावी लागते.
- फार जोर न देता हलका मसाज केल्यास पाठ किंवा कंबरदुखीला चांगला आराम मिळतो.
पाठदुखी-कंबरदुखीवर व्यायामाद्वारे उपचार
व्यायामाच्या आभावामुळे शरीराच्या स्नायूंची कार्यक्षमता घटते व असे बरेच काळ राहिल्यानंतर त्याचे आजारात रुपांतर होते. पाठ व कंबरदुखीचे आजार उद्भवल्यास व्यायामाचा आभाव बहुतांशी कारणीभूत ठरतो. पाठ व कंबरदुखीपासून बचाव करण्यासाठी पुढील व्यायामप्रकार अवश्य करायला हवेत.
- दररोज सकाळी भरभर चालण्याचा व्यायाम केल्यास पाठ, कंबर, मानेचे स्नायू लवचिक होतात व पाठ-कंबरदुखी जाणवत नाही.
- मान, पाठ, मणका, कंबर या सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते.
कंबरदुखी व मसाज
कंबरदुखीत मसाज करावा की नाही किंवा कसा करावा? कोणत्या तेलाने करावा? यासाठी त्याचे एक शास्त्र आहे, त्याला ऑस्टिओपॅथी किंवा कायरोपॅक्टिस असे म्हणतात. हा तीन-चार वर्षांचा कोर्स असतो. या कोर्समध्ये मसाज कसा करावा? किती जोर द्यावा, कुठल्या प्रकारे करावा हे शिकविले जाते.
या कोर्सला अमेरिकेत मान्यता दिली असून भारतात तो प्रचलित नाही. भारतामध्ये डॉक्टर्स कंबरदुखी थांबण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मसाज सांगत नाहीत.
मसाज करायचा असेल तर –
- डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.
- कुठल्याही प्रकारचे नुकसान न होण्याची खात्री बाळगून करा.
- तज्ज्ञांकडून शास्त्रीय पद्धतीनेच मसाज करा. बऱ्याच वेळा काही केसेसमध्ये मसाजमुळे अजून नुकसान होऊन मणक्यांना अथवा हाडांना नुकसान होऊ शकते.
पाठ-कंबरदुखीत हे करू नका
अचानक होणाऱ्या पाठ-कंबरदुखीत जोपर्यंत कंबरदुखीचे निदान होत नाही तोपर्यंत –
- कुठल्याही क्रीमने अथवा तेलाने जोरजोरात मसाज करू नये. यामुळे मणके किंवा डिस्क हलण्याची शक्यता असते व छोटे-मोठे फ्रॅक्चर असल्यास चोळल्यामुळे अजून त्रास होऊ शकतो.
- कुणाकडून पाठ टाचांनी अथवा पायांनी जोरजोराने तुडवून घेऊ नये.
- एकदा हे नक्की झाले की, हे दुखणे फक्त स्नायूंचे आहे. तेव्हा मात्र हलकेच मसाज करण्यास हरकत नाही.
पाठ-कंबरदुखी व फिजिओथेरपी
फिजिओथेरपी हा प्रकार अस्थिव्यंग, पाठ-कंबरदुखी, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर इत्यादी परिस्थितीमध्ये महत्त्वाचे शास्त्र व उपचारपद्धती आहे.
अस्थिरोगतज्ज्ञांनी कितीही चांगली शस्त्रक्रिया केल्यावरसुद्धा फिजिओथेरपीअभावी रुग्णाला सर्वोत्तम परिणाम मिळत नाही. पाठ-कंबरदुखीमध्ये सुद्धा फिजिओथेरपीसह यांचे महत्त्वाचे योगदान असते.
फिजिओथेरपीचे प्रकार :-
1) Short wave Diathermy (SWD) – या मशीनद्वारे पाठीच्या व कंबरेच्या स्नायूंना विशिष्ट ऊर्जेने शेक देण्यात येतो. अखडलेले स्नायू शिथिल होण्यात याची मदत होते.
2) Inforterential therapy (IFT) – या मशीनद्वारे सूक्ष्म करंट पाठीच्या व कंबरेच्या स्नायूंना देण्यात येते. यामुळे स्नायू शिथिल होतात व मणक्यांच्या हालचाली सुधारतात.
3) Traction – या पद्धतीत मानेला किंवा कंबरेला पेशंटच्या पनतानुसार ताण दिला जातो. या पद्धतीमुळे दाबलेल्या मज्जातंतू मोकळे होण्यास मदत होते. या रुग्णांच्या मान व कंबरदुखीमुळे हातात अथवा पायात मुंग्या किंवा वेदना होत असतील अशा व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो.
4) Exercise (व्यामोपचार) – फिजियोथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रकारचे व्यायाम शिकवले जातात व करून घेण्यात येतात. फिजिओथेरपीचा हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही अस्थिव्यंगामध्ये फिजिओथेरपीचे फार महत्त्वाचे योगदान असते. लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शिकवलेले व्यायाम तुम्ही सातत्याने करणे गरजेचे आहे. बरेच रुग्ण बरे झाल्यावर व्यायाम बंद करतात. यामुळे त्यांना पाठ-कंबरदुखीचा त्रास पुन्हा उद्भावू शकतो.
पाठ-कंबरदुखीवरील शस्त्रक्रिया
पाठ-कंबरदुखीसाठी शस्त्रक्रियेची वेळ फार क्वचित येते. उदा.
- मज्जतंतूवर दाब आल्यामुळे हाताची किंवा पायाची ताकत गेलेली आहे.
- कंबरेत मज्जतंतूवर दाब आल्यामुळे लघवी बंद झालेली आहे.
- मणक्यांचे फ्रॅक्चर ज्यामुळे हातांना किंवा पायांना पॅरॅलिसिस आला आहे.
- विना ऑपरेशनच्या साऱ्या उपचारपद्धती वापरून सुद्धा असाध्य मान किंवा कंबरदुखी असल्यास.
मणक्याचे कुठलेही ऑपरेशन म्हटले की, पेशंट व नातेवाईक घाबरून जातात. समाजामध्ये असा समज रूढ आहे की, मणक्यांचे ऑपरेशन बऱ्याच वेळेस ‘‘फेल’’ होतात. यामुळे बऱ्याच वेळेस पेशंट व नातेवाईक ऑपरेशन करण्यास तयार होत नाहीत. ‘‘डॉक्टर, काहीही करा; पण माझे ऑपरेशन करू नका.’’ असे अनेक पेशंट म्हणतात; पण वस्तुस्थिती अशी आहे की, योग्य पेशंट निवडल्यास अनुभवी अस्थिव्यंग तज्ज्ञ अथवा न्यूरोसर्जन योग्य ती काळजी घेऊन पेशंटची ऑपरेशनद्वारा पाठ-कंबरदुखीपासून मुक्तता करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भूलशास्त्रामधील प्रगती व ऑपरेशननंतर घेण्यात येणारी काळजी यामुळे मणक्यांचे ऑपरेशन सोपे व सुरक्षित झालेले आहे.
पाठ-कंबरदुखीवरील ऑपरेशनच्या पद्धती
- Laminectomy
- Discectomy
- Endoscopic Discatomy
- Spinal Fusion.
पाठदुखी साठी व्यायाम
पाठ आणि कंबरेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकालाच व्यायाम करणे आवश्यक आहे. पाठ व कंबरदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी तसेच आपल्याला ही समस्या कधी उद्भवूच नये असे वाटणाऱ्या सर्वांसाठीच व्यायाम उपयुक्त ठरतो. पाठ व कंबरेच्या आरोग्यासाठी करावयाच्या व्यायामाबाबत काही महत्त्वपूर्ण टिप्स :
- पाठीचा किंवा कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांनी पाठ-कंबरेच्या स्नायूंवर जास्त ताण येईल अशा प्रकारचा व्यायाम करणे टाळावे. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करावा.
- योगासने करताना हालचाली अत्यंत सावकाश करा. झटका देणे किंवा शरीर अवयवांना ताण देणे टाळा.
- आसनांमध्ये पद्मासन घालून उपनाभ्यास करणे उत्तम; कारण त्यामुळे पाठीचा कणा सुस्थितीत राहून आराम मिळतो.
- करण्यासाठी सकाळची वेळ ठरवून घ्यावी. आपले नियमित केल्याने पाठ-कंबरदुखीपासून कायमची सुटका होईल. गरोदर स्त्रीने मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आसने किंवा व्यायाम करावा.
- दररोज सकाळी उठल्यावर किंवा सायंकाळी झपझप चालण्याचा व्यायाम करावा. दररोज 40-45 मिनिटे चालणे सर्वांत चांगले. नियमित चालण्याने पाठ व कंबरदुखीचे आजार होत नाहीत.
- पाठीला व कमरेला मालिश करताना हलकेसे तेलाने मालिश करावे. मालिश करताना जोरात रगडू नये. हलक्या हाताने चोळावे.
- मानसिक ताण, काळजी किंवा चिंता, वैचारिक गोंधळ घालताना आसने करू नका.
- आसन करतेवेळी एखादा अवयव ताणला गेला किंवा दुखावला असेल आणि त्यापासून त्रास होत असेल तर आसन करणे बंद करा. आराम वाटल्यानंतरच 2-3 दिवसांनंतर ते आसन करा.
- सुरुवातीस कोणतेही आसन थोडा वेळ म्हणजे 314 सेकंद करा. आसनाचा कालावधी हळूहळू वाढवा.
- योगासनानंतर किमान अर्ध्या तासापर्यंत कोणतेही खाद्यपदार्थ सेवन करू नये किंवा कोणतेही पेय घेऊ नये.
- संध्याकाळी योगासने करावयाची असल्यास त्यापूर्वी किमान चार तास अगोदर तुमचे भोजन झालेले असावे.
- ज्या व्यक्तीचे एखादे हाड मोडले असेल त्यांनी त्या अवयवाशी संबंधित आसन किंवा व्यायाम करू नयेत. तसेच त्यांनी फार अवघड आसने किंवा व्यायामप्रकार करणे टाळावे.
- व्यायाम करताना तुमचे शरीर व मन यांच्यात सुसंगती हवी. व्यायामाच्या वेळी तुमचे मन अन्यत्र भटकत असेल किंवा अस्वस्थ असेल तर व्यायाम थांबवावा.
उत्तम शरीरस्थितीसाठी घ्यायची काळजी
- एकाच शरीरस्थितीत फार काळ राहू नये. जर तुम्हाला आठ तास खुर्चीत बसून काम करावयाचे असेल तर थोडा वेळ बाहेर फेरफटका मारावा.
- झोपतानाही काही वेळानंतर कूस बदलावी. एकाच शरीरस्थितीत दीर्घकाळ असल्यास स्नायूंमध्ये ताठरपणा येतो. तसेच रक्तभिसरण खंडित होण्याची शक्यता असते.
- पाठदुखी असणाऱ्या व्यक्तींनी पोटावर झोपू नये. अन्यथा पोटाखाली उशी घेऊन झोपावे.
- तुमच्या पाठीचा खालचा भाग खुर्चीच्या पाठीला टेकला पाहिजे. ही काळजी न घेतल्यास तुम्हाला पाठदुखीची त्रास होऊ शकतो.
- खुर्चीत बसून कायम वाकून काम करावे लागत असेल तर ते टाळा. टेबलावर लाकडी फळीचा वापर करा. त्यामुळे जास्त वाकण्याची आवश्यकता पडणार-भासणार नाही.
- जमिनीवर बसताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. या स्थितीत जास्त वेळ बसणे शक्य नसेल तर भिंतीला उशी ठेवून टेकून बसावे. म्हणजे पाठीच्या खालच्या भागावरील ताण कमी होईल.
- गर्भावस्थेतील स्त्रियांनी गुडघे पोटाजवळ व दोन्ही हात डोक्याखाली घेऊन एका कुशीवर झोपणे चांगले असते. शक्यतो डाव्या कुशीवर जमिनीवर सरळ झोपावे. मानेला त्रास होत असेल तर हाताखाली उशी घ्यावी.
- आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा अवजड सामान, वस्तू, वजन उचलू नका. अशा वेळी इतरांची मदत घ्या.
- उंच टाचांचे बूट, सँडल घालू नका. त्यामुळे पाठीच्या स्नायूंना वेदना होतात.
- पाठीच्या खालील भागात कुबड किंवा वरच्या भागात बाक काढून उभे राहण्याची सवय असेल तर ती बदला. सरळ आणि ताठ उभे राहण्याची सवय करा.
इ तुम्हाला दीर्घकाळ उभे राहून काम करावे लागत असेल तर अशा वेळी एक तास दुसऱ्या पायापेक्षा उंचावर ठेवा. यासाठी तुम्ही तुमच्या टेबलाचा ‘फुटरेस’ किंवा स्वतंत्र छोट्या स्टूलचाही वापर करू शकता.
पाठदुखी-कंबरदुखीवर इतर उपयुक्त टिप्स
- रोजच्या आहारात जास्त मसालेदार, तेलकट व मांसाहारी पदार्थांचा समावेश नसावा. साधा आहार घ्यावा.
- शरीराची झीज भरून काढणारे क्षार व जीवनसत्त्वे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा. दैनंदिन आहार समतोल असावा.
- पाठ व कंबर अचानक दुखू लागल्यास विश्रांती घ्या. पाठीवर ताण पडेल असे काहीच करू नका. डोक्याखाली किंवा दोन्ही गुडघ्यांखाली उशी घेऊन सरळ झोपा.
- कधी-कधी पाठीचे किंवा कंबरेचे स्नायू ताणले गेल्यामुळे पाठ किंवा कंबर दुखते. अशावेळी घाबरू नका. पाठीला-कंबरेला मालिश करणे, बर्फाच्या किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे असे सोपे घरगुती उपाय करा.
- पाठीचे सातत्याने दुखणे तीन ते चार दिवसांमध्ये घरगुती उपाय करू तसेच विश्रांती घेऊनदेखील बरे झाले नाही तर अशावेळी डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते. कारण ही मणक्याच्या आजाराची किंवा मज्जातंतूला दुखापत झाल्याची लक्षणे असू शकतात. त्यावर त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक असते.
- पाठ मुरगळली असेल किंवा पाठीला लचक भरली असेल तरी तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखविणे गरजेचे आहे.
- पडल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे पाठ दुखत असेल तर फिजिओथेरपिस्टला दाखवावे. कारण तो योग्य निदान करून त्यावर इलाज करू शकतो.
- सततच्या पाठ किंवा कंबरदुखीच्या अचूक निदानासाठी एक्स-रे, सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. याद्वारे तपासण्या करणे गरजेचे असते. त्याशिवाय औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया करता येत नाही.
- स्वत:च्या मनानेच वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. वेदनाशामक गोळ्या सातत्याने आणि जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांचा इतर अंतरिद्य्रिांवर दुष्परिणाम होतो.
- पाठदुखी बरी झाल्यानंतर पाठीचे आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आयसोमेट्रिक व्यायाम करावेत. त्यामुळे पाठ लवचिक बनते.
- मणक्याचे सांधे आखडले असतील तर गतीने मालिश करावी. लयबद्ध मालिशमुळे स्नायूंना आराम मिळतो.
- कंबर दुखत असेल तर कंबरपट्टा वापरा. हा पट्टा वापरल्यामुळे पाठीच्या हालचाली कमी होतात व कंबरदुखी कमी होते.
- पाठ व कंबर निरोगी ठेवणारी योगासने करावीत. योगासनांमुळे स्नायू बळकट व कार्यक्षम होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते. प्राणायाम व योगासने नियमितपणे केल्यास शरीराची लवचिकता वाढते.
- योगासनामुळे पाठीचा कणा स्थिर राहतो; परंतु पाठीवर जास्त ताण पडत असेल तर ते थांबवून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योगासने करावीत.
- आयुर्वेदामध्ये पाठ व कंबरदुखी वातदोषामुळे होते असे सांगितले आहे. जिरे, हळद, आले, धने, मिरची या वनस्पती पाठ आणि कंबरेच्या वेदना कमी करण्यास आणि वातदोष घालविण्यास मदत करतात. या वनस्पतींचा रोजच्या आहारात समावेश असावा.
- नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांमुळे पाठ व कंबरेच्या वेदना वाढण्यास अधिक-चालना मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्तीही कमी होते.
- सकारात्मक राहाल तर रोजची कामे पाठदुखी असूनही करू शकाल. नकारात्मक विचारांमुळे नैराश्य येते. औषधोपचार सुरू असताना आपण पूर्णपणे बरे होणार आहोत असाच विचार करा.
- तुमच्या पाठीवर आणि कंबरेवर चरबी जास्त असेल तर त्याचा पाठीवर ताण येऊ शकतो. म्हणून वजन कमी करा व सडपातळ होण्याचा प्रयत्न करा.
- मनावरचा ताण कमी करा. ताणतणावामुळे स्वभाव चिडचिडा बनतो. अस्वस्थ वाटते. पाठीचे स्नायू आखडले जातात आणि पाठ दुखू लागते.
- ऑफिसमध्ये किंवा कॉम्प्युटरवर सतत आठ तास बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना मध्ये दोन वेळा थांबून पाच-पाच मिनिटे सोपे व्यायाम करावेत.
- कॉम्प्युटरवर दीर्घकाळ काम करताना खुर्चीत योग्य पद्धतीने बसावे. टेबलची उंचीही योग्य असावी. सतत बाक काढून बसल्यास पाठ-कंबर दुखीचा त्रास होतो.
- टेबलाच्या खाली पाय ठेवण्यास पुरेशी जागा असावी. नाही तर पाठ आणि मान दुखते.
- दररोज 40-45 मिनिटे भरभर चालण्याची सवय करा. हा पाठ व कंबरदुखी दूर करण्यासाठी अतिशय सोपा व चांगला व्यायाम आहे. यासाठी शक्यतो सकाळची वेळ ठरवा.
- चालताना, उभे राहताना पाठीचा बाक काढून उभे राहू नका. पाठ ताठ ठेवा. एकाच जागेवर दीर्घकाळ उभे राहायचे असेल तर मधून-मधून एका पायाला विश्रांती द्या.
- खुर्चीत बसताना गुडघे 90 अंशाच्या कोनात ठेवावे. पाय जमिनीवर ठेवा. खुर्चीच्या पाठीला पूर्णपणे टेकून बसा. सरळरेषेत ताठ बसा. पाठीचा बाक काढून बसू नका.
- वजन उचलताना पायाला स्नायूंवर जोर देऊन उचला. चटकन वळू नका. पाठ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा.
- झोपताना डोक्याखाली फार जड किंवा फार उंचीची उशी घेवू नका. मानेच्या आकाराप्रमाणे दबेल आशी मऊ उशी घ्या.
- उंच टाचांचे बूट घालू नका. त्यामुळे कंबरेला त्रास होतो आणि पाठीवरही ताण पडतो.
- कार चालवताना ताठ बसा. पुढे जास्त वाकून बसू नका. मान सरळ ठेवा. डोक्याला, मानेला आधार म्हणून हेडरेस्ट असावे; कारण अचानक ब्रेक दाबल्यावर मानेला झटका बसायला नको.
- रेल्वेमध्ये प्रवास करताना दर तासाला थोडे चालावे. त्यामुळे मांडीचे, कमरेचे, पाठीचे स्नायू मोकळे होतात व एकाच स्थितीत दीर्घकाळ बसावे लागत नाही.
- कॉम्प्युटरवर काम करताना मोबाईल कानाला चिटकवून मान वाकडी करून बोलण्याची सवय फार घातक आहे. त्यामुळे मानेवर परिणामी पाठीवर ताण पडतो.
- स्त्रियांमध्ये पाठ आणि पोट दुखणे, योनीतून स्त्राव, संभोगाच्या वेळी पाठ व पोट जास्त दुखणे असा त्रास होत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवा. गर्भाशय नलिकेचा जंतुसंसर्ग झाल्यामुळे असे होऊ शकते.
- काही वेळा विषाणूजन्य ताण आल्यावरही पाठीत दुखते, अशा अवस्थेत भरपूर पाणी प्यावे व विश्रांती घ्यावी.
- सतत कंबर व माकडहाडाचे सांधे रात्री दुखत असतील तर सुरुवातीला घरगुती उपचार करा. उदा. शेकणे, मलम लावणे इ. हा त्रास सतत होत राहिल्यास फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या; कारण हा अँकिलोझिंग स्पाँडिलायटिस असू शकतो.
- ज्या व्यक्तींना स्वादुपिंडाचा त्रास होतो. त्यांची पाठ आणि पोट सोबतच दुखत असते. उलट्याही होतात. अशा वेळी पोटविकार तज्ज्ञांना दाखवावे. स्वादुपिंडाच्या आजारामुळे पाठीला असह्य वेदना होतात.
- वयस्कर लोकांमध्ये सतत पाठ आणि कंबरदुखी असेल तर त्यांना पट्टा लावण्यास सांगावे. वयोमानानुसार हाडे ठिसूल झालेली असू शकतात. अशा व्यक्तींना वेदनाशामक गोळ्यासोबतच ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त आणि कॅल्शिअमयुक्त आहार द्यावा.
- पाठीचे व कंबराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कॅल्शिअममुक्त आहार घ्या. नारहाचे दूध, डिंकाचे लाडू, नाचणी, आळीवाची खीर असे पदार्थ खावेत. कठीण कवचाच्या फळांमध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते.
- सकाळची न्याहरी करणे खूप गरजेचे आहे. न्याहरीत 1 ग्लास दूध प्यावे. रात्रीच्या जेवणात खिचडी, भाकरी, पालेभाजी, पालेभाज्यांचे सूप असे पदार्थ असावेत.
पुढे वाचा:
- वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा
- वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता
- फॅट्स्-चरबी वाढण्याची कारणे आणि उपाय
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- आपल्याला भूक का लागते?
- लठ्ठपणा कशामुळे होतो?
- वजन कमी करण्याचे उपाय
- गर्भधारणा झाली कसे ओळखावे?
- मासिक पाळी माहिती मराठी
- किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या व उपाय
- सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे?
- लैंगिक आजाराची सुरुवातीची लक्षणे
- कोरोनापासून सुरक्षिततेचे उपाय
- कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी
- उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
- ब्लड कॅन्सरवर उपचार
- अवयव दान माहिती