Sant Namdev Information in Marathi : ज्ञानेश्वर आणि नामदेव हे समकालीन मानले जातात. नामदेवांच्या जन्मापूर्वीपासून भारतावर सतत मुस्लिमांचे राज्य होते, त्यामुळे त्यांचे धार्मिक विचार समाजात मिसळले. त्यामुळे सांस्कृतीक वातावरण गढूळले होते. समाजाला एक प्रकारची ग्लानी आली होती सर्वसामान्य लोकं कर्मकांडाच्या नादी लागल्यामुळे खरा धर्म सामाजिक प्रवाहापासून दूर चालला होता. त्या काळात नामदेवांनी अलौकिक कार्य केले.
उत्तर भारतात तब्बल चोपन्न वर्ष समाज जागृतीसाठी आध्यात्मिक कार्य केले. अवघ्या महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेवाबरोबरच आध्यात्मिक भक्तिगंगेत पुढे एकनाथ, तुकाराम, रामदास हे सामील झाले आणि या पंच संतकवींनी अज्ञानी मनात ज्ञानाचे दीप प्रज्वलित करण्याचे मौलिक काम केले. ज्ञानेश्वरांची ज्ञानभक्ती आणि नामदेवांची नामभक्ती प्रचलीत आहे. वास्तविक पाहता ज्ञान आणि नाम हे एकत्र झाले म्हणजे तिथे दुजाभाव राहत नाही आणि म्हणूनच ते म्हणतात,”नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातले नामयाने.” अशा या महान संताचा थोडक्यात जीवनपरिचय.
संत नामदेव यांची माहिती – Sant Namdev Information in Marathi
नाव | नामदेव दामाशेटी रेळेकर |
जन्म | २६ ऑक्टोबर १२७० |
मृत्यू | ३ जुलै १३५० शनिवार (शके १२७२) |
गाव | नरसी नामदेव जि. हिंगोली मराठवाडा |
आई | गोणाई रेळेकर |
वडील | दामाशेटी रेळेकर |
पत्नी | राजाई नामदेव रेळेकर |
मुले | महादेव, गोविंद, नारायण, विठ्ठल आणि मुलगी लींबाई |
भागवत पंथाचे आद्य प्रचारक संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० मध्ये झाला. पित्याचे नाव दामाशेट व आईचे गोणाई. नरसीबामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव असे सांगितले जाते. नामदेवांचा जन्म नरसी-बामणीचा, नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता.
“शिपियाचे कुळी जन्म मज झाला असे नामदेवांनी एका अभंगात म्हटले आहे. नामदेवांच्या घरात त्यांच्या आजोबापासून विठ्ठलभक्तीचे वातावरण होते त्यामुळे त्यांना बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली.
नामदेवांचा विवाह राजाई यांच्याबरोबर झाला. राजाई अतिशय कर्तव्यतत्पर असल्यामुळे त्यांचा संसार फुलू लागला, त्यांना चार मुलगे व एक मुलगी अशी पाच अपत्यं झाली; परंतु विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होत गेले, त्यांचे मन संसारात रमले नाही.
नामदेवांची संत ज्ञानदेव व त्यांच्या भावंडाशी भेट झाली. त्या सर्व भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला; परंतु नामदेवांनी त्यांना परत नमस्कार न करता तसेच बसून राहिले. ते पाहून मुक्ताबाई नामदेवांना म्हणाली, “तुम्ही विठ्ठलभक्त स्वत:ला समजता, तरीही तुमचा अहंकार काही गेला नाही.” त्यानंतर संत ज्ञानदेवाच्या सांगण्यावरून नामदेवांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला. त्यांचे शिष्यत्व स्वीकारले.
गुरुपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला. त्यानंतर नामदेवांनी महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी गुजरात-सौराष्ट्र-राजस्थान-पंजाब असा प्रवास करीत कीर्तनाद्वारे भागवत संप्रदायाचे प्रबोधन केले. राजस्थानातील जयपूर, भरतपूर, बिकानेर, अलवर अशा मोठ्या शहरातून नामदेवांची मंदिरं आहेत. तसेच त्यांच्या नावाच्या शाळाही आहेत.
राजस्थानमध्ये अठरा जिल्ह्यातील बावन्न गावांमधून नामदेवांची मंदिरं आजही पाहायला मिळतात. सातशे वर्षांपूर्वी नामदेवांनी भारतभर धर्मकार्य केले, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे.
संत नामदेवांनी ‘आदि’, ‘तीर्थावळी’ व ‘समाधी’ अशी त्रिखंडात्मक चरित्रकार रचना संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर केली आणि ‘आद्य पद्य चरित्रकार’ म्हणून संत नामदेवांचा गौरव केला गेला. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते आद्य प्रचारक होते.
संत ज्ञानदेवांना समकालीन असलेले संत नामदेव यांनी तर भगवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर द्वारका, मारवाड, बिकानेर, मथुरा, हरिद्वार पंजाबपर्यंत फडकवली, पंढरपुरातील विठ्ठलाच्या परिसरात सीमित झालेल्या भक्तिकेंद्राला त्यामुळे व्यापक क्षेत्र मिळालं. खरंतर नामदेवांच्या नामामध्येच नाम हाची देव आहे. नामदेवांचे गुरू संत विसोबा खेचर यांच्या सान्निध्यात नामदेवांना दिव्य दृष्टी लाभली असं म्हणतात. विसोबांनी केलेली रचना –
नाम आणि रूप दोन्ही नाही जया
तोचि देव पाही रे मिथ्या
ईश्वराला अनन्यभावानं शरण जाणं ही नामदेवांच्या कवित्वामागील प्रमुख प्रेरणा होती. नामदेवांनी विठ्ठलाविषयी ज्या उत्कटेने रचना लिहिल्या. त्याच उत्कटतेने अनेक संतांचं वर्णन काव्यात केलं आहे.
“विठ्ठल आवडी प्रेमभावे, आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी। असं नामदेव अभिमानाने सांगतात. ‘अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा’ असे म्हणत पंढरीचा महिमाही पटवून देतात.
“देह जावो अथवा राहो, माझे तीर्थ पंढरी।”
अशा कितीतरी अभंगांतून नामदेवांचा विठ्ठलाविषयीचा श्रद्धाभाव व्यक्त झाला आहे. सर्वसुख आहे मज पांडुरंगी” अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळे तीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. तरीही नामदेव ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रेला गेले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झाले. तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर ज्ञानदेवांनी समाधी घेतली. तो प्रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्यावेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते. त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरीत ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला.
“नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी” ही त्यांची भूमिका होती.
सर्व प्राणिमात्राच्या ठिकाणी भगवद्भाव मानणं हा जो भक्तियोग ज्ञानदेवांनी सांगितला, तोच भागवतधर्म. त्यांच्या शब्दांमध्ये समदृष्टी आहे, व्यापकपणा आहे, आणि आल्हादही आहे. त्यामुळे नामदेवांच्या रचना मनाला स्पर्श करतात. बालवयापासूनच विठ्ठलभक्ती ही नामदेवांच्या रोमरोमात भिनली होती. म्हणूनच विटेवरचं सगुण साकार विठ्ठलतत्त्व वेगळं राहिलंच नाही. दैवी चैतन्याचा सहवास कायमच त्यांच्या हृदयात वस्तीला होता. त्यामुळे जळी स्थळी, काष्ठी, पाषाणी त्याच परम्याचे दर्शन होत होते. नामदेवांच्या मनाचा कोपरान् कोपरा विठ्ठलप्रेमाणे भरून गेला होता. आवघं जीवनंच विठ्ठलाला अर्पण केलं होतं. म्हणूनच पांडुरंग फक्त विटेवर न राहता तो भक्तांशी बोलूचालू लागले. भक्तांची कामं करू लागले. धन्य ही भक्ती आणि धन्य तो देव.
“जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।” हा भक्तियोग त्यांनी निश्चित केला. इथे मला त्यांच्या जीवनातील एक गोष्ट समर्पक वाटते, ती म्हणजे, नामदेवांनी केलेली भाकरी जेव्हा कुत्रा घेऊन पळतो, तेव्हा ते दृश्य पाहून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात आणि म्हणतात, “हे माझ्या देवा, अशी कोरडी भाकरी नका खाऊ. तिला जरा तूप तरी लावू क्या.” ही भक्तीची परिसीमा संत नामदेवांच्या ठिकाणी पाहायला मिळते.
संसाराची क्षणभंगुरता नामदेव सांगतात, ‘ज्याप्रमाणे पाण्यावर बुडबुडे दिसतात, परंतु हातात मात्र काहीच लागत नाही, तसाच हा संसार आहे. क्षणिक सुख देणारा आहे, त्यामुळे अशा फसव्या सुखापासून लांब राहावे. त्यांचा पुढील
अभंग पाहाजळी बुडबुडे देखला देखला ॥ क्षण न जगता दिसेनाती ।
तैसा हा संसार पहाता पहाता । अंतकाळी हाता काय नाही ।
नामा म्हणे तेथे काही नसे बरे । क्षणाचे हे सर्व खरे आहे ।।
मग अशा या संसारात माणसाचं कर्तव्य कोणतं? या प्रश्नाचं उत्तर नामदेवांनी खालील अभंगरचनेत दिलं आहे…
संसारी असावे, असोनी नसावे । कीर्तन करावे वेळोवेळा ।
नामा म्हणे विठो भक्ताचिए द्वारी । घेऊनिया करी सुदर्शन ।।
संसाराचा उपभोग जरूर घ्यावा, परंतु नित्य जागृत राहावे. माणसाने अनासक्त असावं. वेळोवेळी ईश्वरभक्ती करावी. अशा या भक्ताच्या रक्षणासाठी साक्षात् विठ्ठल सुदर्शनचक्र घेऊन सदैव पाठीशी उभे असतात.
जेव्हा विठ्ठलाच्या रूपाला, प्रतिभेला, अस्तित्वाला नामदेव भारावून जातात. अशा भारावलेल्या अवस्थेत लिहितात.
नाम आणि रूप दोन्ही नाही जया
तोचि देव पाही रे मिथ्या
संत ज्ञानेश्वरांनी एका ओवीत जे मूळ तत्त्व सांगितलं, ते संत नामदेवांनी केवळ स्वीकारलं असंच नाही तर ते अंगीकारलं, त्यामुळे त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला.
नामदेवांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. संसारात राहून संसाराचा उपभोग जरूर घ्यावा; परंतु नित्य जागृत राहावं, अनासक्त असावं. वेळोवेळी ईश्वराची भक्ती करावी. अशा या भक्ताच्या रक्षणासाठी साक्षात् विठ्ठल सुदर्शनचक्र घेऊन दारात उभा असतो, नामदेवांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे नामस्मरण होय.
विठ्ठलाचं माहात्म्य नामदेवांनी जितक्या प्रकारे गायले आहे. तितके कोणत्याही संताने गायले नसेल. त्यांच्या शब्दांमध्ये समदृष्टी आहे, व्यापकपणा आहे, आणि आल्हादही आहे.
“पहाटेच्या वेळी चारा आणायला गेलेल्या साक्षणीची वाट तिचे उपाशी पिलू पाहात राहते, तशीच धरचरणांची आस मला रात्रंदिवस लागली असल्याचे AN नामदेवांनी एका अभंगात म्हटले आहे. विठ्ठलाशी त्यांनी जोडलेले नाते मुलाचे आणि आईचे आहे हे यावरून ध्यानात येते. ते पुढे म्हणतात,
तू माझी माउली मी तुझे वासरू । नको पान्हा चोरू पांडुरंगे।
पांडुरंगाविषयी त्यांच्या मनात असलेला भक्तिभाव उच्चकोटीचा आहे हे समजते. त्यांच्या मनातील उलघाल, विठ्ठलाला भेटण्याची ओढ या नात्यातून सहज व्यक्त होते. हरिनामाची महती सांगणारे त्यांचे सुमारे दोनशे अभंग आहेत.
नाम तेचि रूप । रूप तेचि नाम ।
नामरूपा भिन्न । नाही साधन ।
संत नामदेव म्हणतात, “परमेश्वराच्या नामस्मरणाने प्रपंचातील अडी अडचणी, संकट, दुःख नाहिशी होतात. दुःख दूर करण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे.”
इथे कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. नामदेवांच्या विठ्ठलभक्तीचा महिमा सांगणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी सर्वपरिचित असलेल्या गोष्टी.
संत नामदेव खूप लहान असतानाची ही गोष्ट. एकदा नामदेवांना त्यांचे वडील म्हणाले, “आज देवाला नैवेद्य तू दाखव.” त्या दिवशी नामदेवांनी देवाला नेवैद्य दाखविला अन् देवापुढे वाट बघत बसले की, केव्हा देव येतील आणि नैवेद्य खातील. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद ग्रहण केला.
दुसरी आणखी एक कथा… भागवत धर्माची पताका उत्तरेत नेणारे नामदेव हे पहिले संत होते. नामदेवांनी पंजाबमध्ये भक्तिमार्गाचा शुभारंभ केला आणि रामानंद, कबीर व नानक नानक अशा संतांना प्रेरणा मिळाली. शीखबांधवांच्या ‘श्री गुरुग्रंथसाहेब’ या धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे आहेत त्यास “बाबा नामदेवजी की मुखबानी” म्हणून ओळखले जाते. त्यात ते म्हणतात…
कहाँ करूं जाती, कहाँ करूं पाती।
रामको नाम जयो, दिन और राती
लोकजागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी विविध प्रदेशांतील भाषा त्यांनी आत्मसात केल्या. नामदेवांची सव्वाशे हिंदी पदेही उपलब्ध आहेत. विष्णुस्वामी, बोहरदास, जाल्लो, लब्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले.
संत नामदेवांच्या कार्याचे वर्णन करताना आचार्य हजारीप्रसाद त्रिवेदी लिहितात “नामदेवजी की सीधीसाधी, सहज-सत्य वाणी देश और काल की सीमाओं को भेदकर, सारे देश में नई चेतना जगा सकी थी.” संत नामदेवांचे केलेले हे वर्णन सर्वस्वी सार्थ आहे.
नामदेवांनी विठ्ठलभक्तीबरोबरच व्यावहारिक व प्रापंचिक जीवनावरही अभंगांद्वारे भाष्य केले आहे. चंचल मनाविषयी ते म्हणतात,
मन केले तैसे होय, धाडिले तेथे जाय।
नामदेवांचे अभंग, कविता अतिशय तरल, अर्थपूर्ण व भावस्पर्शी आहेत. त्यांच्या काव्याचे वर्णन संत तुकारामांनी अचूक शब्दात केले आहे, ते असे.
‘कविता गोमटी नामयाची’
गुजरातमधील विख्यात संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. ‘देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शेकारले.’ असे संत मीराबाईंनी आपल्या एका कवनात म्हटले आहे.
साधी, पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या काव्यरचनेचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या उत्कट ईश्वरभक्तीचा अत्यंत विलोभनीय असा आविष्कार काव्यात जाणवतो. त्यांच्या रसाळ वाणीची व अर्थपूर्ण अभंगाची महती सांगणाऱ्या किती तरी कथा प्रचलित आहेत.
पंजाब प्रांतात संत नामदेवांनी भरपूर प्रवास केला. पंजाबातील गुरुदासपूर जिल्ह्यात फिरत फिरत एका शांत स्थळी नामदेव पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मनुष्यवस्ती नव्हती. नामदेवांना विठ्ठलाशी एकरूप होण्यास तेथील शांतता भावली. त्यांनी तेथे पंधरा वर्षे वास्तव्य केलं. या पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांचा पारमार्थिक आविष्कार आसपासच्या लोकांच्या ध्यानी आला. अनेक लोकं तिथे आणि नामदेवाच्या सान्निध्यात रमली.
नामदेवाच्या झोपडीच्या आसपास ती मंडळीही झोपड्या बांधून राहू लागली. तेथे गाव वसले. नामदेव घुमत घुमत (फिरत) या ठिकाणी पोहोचले, त्यामुळे या गावाला ‘घुमान’ असे नाव पडले. आज या गावाला ‘नामदेव की घोमानी’ असं म्हणतात. ‘पंजाबमधील पंढरपूर’ असा या गावाचा महिमा आहे. अशा या थोर संताचा महिमा अगाध आहे.
संत नामदेवांनी हरिनामाचा प्रसार करण्यासाठी विविध भाषा, जाती, प्रांत ही बंधने पार करून उत्तरेतही कार्य केले. महाराष्ट्रातील कीर्तनपरंपरा उत्तर भारतात घेऊन गेले. समविचारी साधकाला एकत्र आणले. माणसातलं माणूसपण जागवत एक आदर्श समाज घडविण्याचे मोलाचे कार्य केले. सातशे वर्षांपूर्वी त्यांनी संपूर्ण भारतभर अध्यात्माची चळवळ सुरू केली. या चळवळीतूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य केली.
“आपला उद्धार आपणच करू शकतो. हा मोलाचा संदेश नामदेवांनी दिला. ईश्वराच्या मूळ रूपाशी एकरूप झालेल्या नामदेवांच्या हृदयातून सहज शब्द बाहेर पडा, ते म्हणजे “मीच माझा देव पीच पाया भक्त, इथे दुजाबादच उरला नाही, नामदेवार्च कवीमन पावण्याम भक्ताचे असे नामदेवाचा मनोधर्य हा सगुण भक्तीवर आधारित आहे, नामदेवाची अभंगगाथा मागज, विश्वबंधुत्वाशी नाते सांगणारी आहे.
अशा या नामदेवानी अज्ञानाला दूर सारत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावण्याचे महान कार्य केले, खऱ्या अर्थान नि:स्वार्थी भावनेने त्यांनी ज्ञानदेवानी लावलेल्या भागवत पंथाच्या रोपट्याचा महावृक्ष केला, दु:खापासून मुक्ती मिळवून सुख, शांती समाधान मिळविण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग पीडित जनतेला दिला, लोकांना कर्मकांडापासून परावृत्त करून खरा धर्म सर्वसामान्याच्या मनात रुजवाला, अखंड आयुष्यभर प्रमाण करत विश्वशांतीचे स्वप्न साकार केले. ज्ञानदेवांनी केलेली विश्वकल्याणाची प्रार्थना नामदेवांनी अंगीकारत सार्थ केली.
ऐंशी वर्षांचं वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले, आषाढ शुद्ध एकादशी,शके १२७२ रोजी विठ्ठलापुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी,शके १२७२ ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिल्या पायरीखाली त्यांनी समाधी घेतली.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
संत पाय हिरे देती वल ।।
विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या संतांच्या चरणाचा स्पर्श घडावा अशी त्यांची इच्छा, नामदेवाच्या मनाचा मोठेपणा वरील रचनेतून प्रत्येयाला येतो. अशा या महान संत नामदेवांना जाणून घेताना मी आवाक झालो. त्यांचे विचार मनाच्या आरपार उतरले. सुखाचा हलकासा स्पर्श झाला. सहजच हात जोडले गेले आणि खालील दोन ओळीतून शब्दांची भावपूर्ण आदरांजली अर्पण केली…
कीर्तनाच्या रंगी । रमावे क्षणभरी।
सोहळा जीवाचा । पहाया संसारी ।।
मित्रांनो ही Sant Namdev Information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. जर तुमच्याकडे जर संत नामदेव महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही ते या Information About Sant Namdev in Marathi या लेखामध्ये जोडू, तसेच आपण या लेखाचा वापर Sant Namdev Essay in Marathi असा देखील करू शकता.
पुढे वाचा: