विष्णूशास्त्री चिपळूणकर : ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार होते. मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी विष्णुशास्त्री चिपळूणकरांना, मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात.
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी माहिती – Vishnu Shastri Chiplunkar Information in Marathi
Table of Contents
जन्म : 20 मे 1850
मृत्यू : 17 मार्च 1882
विष्णुशास्त्री चिपळूणकर शिक्षण
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
शालापत्रक
वडीलांच्या शालापत्रक ह्या मासिकातून 1868 मध्ये विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले. त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन 1875 मध्ये शालापत्रक बंद पडले.
न्यू इंग्लिश स्कूल’ ची स्थापना
1880 मध्ये नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही ख्यातनाम शाळा स्थापन केली.
विष्णुशास्त्री चिपळूणकर निबंधमाला
निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 84 अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी एकट्याने केले. याचा पहिला अंक 25 जानेवारी 1874 रोजी प्रसिद्ध झाला. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
निबंधमाला विषयी इतर महत्वाची माहिती :
- 1874 साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन सुरु केले.
- 1874 सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली.
- निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले.
काव्येतिहाससंग्रह
महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह हे मासिक 1878 सुरू केले. आपल्या देशातील लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे, हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते.
लिखाण मागील प्रेरणा :
स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती.
लिखाणाचा हेतू :
सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतवणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता.
राजकीय जाहालावादाचा पुरस्कार :
आपल्या देशात सुशिक्षितांमध्ये रुजलेल्या व्यसनप्रवण अशा पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणास आळा घालणे व आपल्या मूल्यव्यवस्थेचे रक्षण करणे आणि देशाच्या अधोगतीला कारण ठरलेली ब्रिटिशांची जुलमी राजवट झुगारून देणे. ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी विष्णुशास्त्र्यांनी सामाजिक परंपरावाद व राजकीय जहालवाद पुरस्कृत केला.
विचारसरणी वरील प्रभाव :
त्यांनी आत्मसात केलेल्या जहाल व प्रबुद्ध विचारशैलीवर व विद्वत्ताप्रचुर भाषाशैलीवर हटवादी राष्ट्राभिमानी व इंग्रजी भाषेचे विकासप्रवर्तक सॅम्युअल जॉन्सन, पाश्चात्त्य लेखकद्वय जुनिअस व अॅडिसन आणि इतिहासकार मेकॉले ह्यांचा प्रभाव होता.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे प्रकाशित साहित्य
- अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी (एकूण 6 भाग, सहलेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरि कृष्ण दामले)
- आमच्या देशाची स्थिती
- संस्कृत कविपंचक (1891)
- बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
- कालिदासावरील निबंध
- मराठी व्याकरणातील निबंध
- विनोद आणि महदाख्यायिका (1901)
- विद्वत्त्व आणि कवित्व व वक्तृत्व
- विष्णुपदी (3 खंड)
- सॅम्युएल जॉन्सन यांच्या द हिस्टरी ऑफ रासेलस (इंग्लिश: The History of Rasselas) या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचाबद्दल इतर महत्वाची माहिती
- 1878 मध्ये पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला.
- 1875 मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले.
- कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्री यांनी नंतर शालापत्रकातून पूर्ण केले.
- त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत.
- ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत.
- राजकीय वा सामाजिक चळवळीत विष्णुशास्त्री प्रत्यक्ष पडले नाहीत आपला परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासण्याच्या भरात प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी, ख्रिस्ती धर्मोपदेशक यांना सरसकट परधार्जिणे ठरवून त्यांनी टीका केली.
पुढे वाचा:
- शिवराम महादेव परांजपे मराठी माहिती
- गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती
- जगन्नाथ शंकरशेठ माहिती मराठी
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती
- लोकमान्य टिळक माहिती मराठी
- संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी
- संत तुकाराम माहिती मराठी
- महात्मा गांधी मराठी माहिती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी
- शिवाजी महाराज मराठी माहिती
- सावित्रीबाई फुले माहिती मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले यांचा बद्दल माहिती