ब्रेस्ट कॅन्सर मराठी माहिती : हा आजार नन्स डिसीज म्हणून ओळखला जात असे. कारण रुग्णांमध्ये जास्त संख्या नन्सची असे ! नन्स म्हणजे ख्रिस्त धर्मातल्या सेवाभावी स्त्रिया. ज्या आजन्म अविवाहित आणि ब्रह्मचारी राहून धर्माची सेवा करतात.

खरंच ब्रेस्ट कॅन्सरचा धर्माशी संबंध असू शकतो का ? तसे नाहीय. याचा संबंध स्त्रीला अनुभवाच्या लागणाऱ्या मासिक पाळीच्या संख्येशी आहे. अविवाहित स्त्रीला विवाहित स्त्री पेक्षा जास्त मासिक पाळींचा सामना करावा लागतो. कारण विवाहित स्त्रीला सरासरी दोन मुले असतील तर गरोदरपणात त्यांना मासिक पाळी येत नाही. जितक्या मासिक पाळी जास्त, तितका ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त. एखाद्या स्त्रीला लग्नानंतर मूल झाले नाही तर अशा स्त्रीला सुद्धा या कॅन्सरचा तितकाच धोका असतो.

ब्रेस्ट कॅन्सर मराठी माहिती – Breast Cancer Information in Marathi

ब्रेस्ट कॅन्सर मराठी माहिती, Breast Cancer Information in Marathi
ब्रेस्ट कॅन्सर मराठी माहिती, Breast Cancer Information in Marathi

ब्रेस्ट कॅन्सर भारतात खूपच झपाट्याने वाढतो आहे. वरील कारणांव्यतिरिक्त अपुरा व्यायाम, आरामाची जीवनशैली, सत्वहीन आहार ही कारणेसुध्दा आहेत. परंतु याचे बरे होण्याचे प्रमाणसुद्धा 80-90% आहे. योग्य वेळेत कॅन्सर समजला तर जीवाचा धोका पूर्ण टाळता येतो. आणि उशिरा समजल्यास औषध उपचारांनी साधारण पाच वर्षांपर्यंत रुग्णाला जगवता येते.

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नक्की काय ?

आधी ब्रेस्टची रचना जाणून घ्या. ब्रेस्टचे प्रमुख दोन भाग असतात. निपल आणि बाकीचे ब्रेस्ट. यातल्या मोठ्या भागाला लोब्यूल म्हणतात. या लोब्युलमध्ये मिल्क ग्लॅण्डस असतात. ऑक्सिटोसिन नावाच्या हॉर्मोन मुळे या मिल्क ग्लॅण्ड मध्ये दूध तयार होते. ते लोब्युल पासून निपल पर्यंत पोहोचण्यासाठी जी पाईपलाईन असते त्याला मिल्क डक्ट म्हणतात. लोब्युलच्या आसपास फॅट्स आणि चेस्ट टिश्यूज असतात.

ब्रेस्ट कॅन्सर मुख्य दोन प्रकारचा असतो. पहिला प्रकार कॉमन आहे. त्याला डक्टल कार्सिनोमा म्हणतात. म्हणजेच हा कॅन्सर मिल्क वाहून नेणाऱ्या मिल्क डक्ट ना होतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे लोब्यूलर कार्सिनोमा. हा कॅन्सर मिल्क ग्लॅन्ड जिथे असतात त्या लोब्युलना होतो. आणखी एक प्रकार दिसतो. ज्याला इनव्हॅशन म्हणतात. यात कॅन्सर मिल्क डक्ट किंवा लोब्युलना होऊन आसपासच्या नॉर्मल सेल्स मध्ये पसरत जातो.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

  1. ब्रेस्टमध्ये एखादी गाठ येणे. जी बऱ्याचदा वेदनारहित असल्यामुळे लवकर समजत नाही. कॅन्सरच्या अनकंट्रोल्ड वाढणाऱ्या पेशींमुळे ही गाठ येते. 
  2. ब्रेस्टचा आकार बदलतो. गाठ खूपच आत असेल तर सहज समजत नाही. परंतु बदललेला आकार समजतो.
  3. अंडर आर्स मध्ये वेदना. कॅन्सर जर आसपासच्या पेशींमध्ये पसरत असेल तर हे लक्षण दिसते. 
  4. निपलमधून पातळ स्त्राव होणे. डक्टल कॅन्सरमध्ये हे लक्षण दिसते. कधीकधी हा स्त्राव इतका वाढतो की कपडे भिजून जातात. 
  5. यासोबतच डोकेदुखी, चक्कर, ताप ही सामान्य लक्षणे सुद्धा दिसतात.

आता एक महत्वाची गोष्ट ! बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी सुरु होण्याआधी ब्रेस्टमध्ये गाठी येतात. त्या दुखतातही. परंतु मासिक पाळी थांबल्यावर त्या निघून जातात. या गाठी कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका.

त्याहून महत्वाचे ! आपल्या स्त्रिया स्वतःचे ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला का लाजतात ? स्वतःच्या शरीराला हात लावायची कसली भीती ? किती स्त्रिया स्वतःच्या ब्रेस्टचा आकार बदललेला ओळखू शकतात ? सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन अत्यंत सोपे आहे. चाळिशीनंतर प्रत्येक स्त्रीने ते करायलाच हवे !

सेल्फ ब्रेस्ट एक्झॉमिनेशन

आज ही अत्यंत सोपी पद्धत शिकूया. ही परीक्षा मासिक पाळी येऊन गेल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी करावी. कारण या काळात पिरियड्स मुळे येणाऱ्या गाठी नसतात. ब्रेस्ट नॉर्मल असतात.

स्टेप 1) कपडे काढून आरशासमोर खांदे ताठ ठेवून उभ्या राहा. नुसतेच आरशात ब्रेस्टकडे पाहून निरीक्षण करा. ब्रेस्ट नॉर्मल दिसतात का ? आकार नेहमीसारखाच दिसतोय का ? कुठे सूज दिसतेय का ? किंवा खड्डा दिसतोय का ? निपल्सचा शेप नॉर्मल दिसतोय का ? कारणाशिवाय कुठे लाल चट्टे किंवा डाग दिसतात का ?

स्टेप 2) आता दोन्ही हात कमरेवर ठेवून पुन्हा फक्त निरीक्षण करा. प्रश्न वरचेच. आता दोन्ही हात वर करून निरीक्षण करा. एक हात वरच ठेवा. जर डावा हात वर असेल तर उजव्या हाताने डाव्या ब्रेस्ट वर हलक्या हाताचा दाब द्या. निपल पासून अंडर आर्सपर्यंत संपूर्ण ब्रेस्ट कव्हर होईल अशा पद्धतीने बोटांनी दाब देत पुढे सरकत राहा. हळूहळू दाब वाढवत नेत, इतका वाढवा की छातीच्या बरगड्या बोटांना जाणवतील. दाब देताना कुठे गाठ, टणक भाग हाताला जाणवतोय का हे पहा.

स्टेप 3) डावा हात खाली घ्या. आता उजवा हात वर करून डाव्या हाताने उजव्या ब्रेस्टची तपासणी करा. हात दुखत असेल तर बिछान्यावर छताकडे तोंड करून झोपूनही ही तपासणी करता येते.

स्टेप 4) तपासणी करताना निपलमधून रंगहीन, किंवा पांढरा, थोडा चिकट स्त्राव होतोय का हे पहा. ही तपासणी महिन्यातून एकदा करा. खात्रीने सांगते, नियमित तपासणी करणाऱ्या स्त्रीला जरी कॅन्सर झालाच तरी 100% वाचवता येईल…

ब्रेस्ट कॅन्सर उपचार

ट्युमर स्वरूपात आढळणाऱ्या कोणत्याही कॅन्सरच्या चाचणीसाठी बायॉप्सी पद्धत वापरली जाते. यात संशयित भागाचा अत्यंत लहानसा तुकडा कापून त्यात कॅन्सरच्या पेशी आहेत अथवा नाहीत हे तपासले जाते. एकदा कॅन्सर कन्फर्म झाल्यावर त्याची स्टेज, फैलाव, रुग्णाची हेल्थ, वय, आर्थिक क्षमता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रीटमेंट ठरवली जाते.

ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात सर्जरी खूप महत्वाचा रोल प्ले करते. ही सर्जरी दोन प्रकारची असते. कॅन्सर जर नवीन असताना समजला तर तेवढी छोटीसी गाठ आणि त्याभोवतीची अगदी थोडासा भाग काढून टाकून उरलेले ब्रेस्ट वाचवता येते. खूप वेगाने पसरणारा, किंवा उशिरा समजलेला ब्रेस्ट कॅन्सर बरा करण्यासाठी पूर्ण ब्रेस्ट काढून टाकावे लागते. 

रुग्णाचे वय कमी असेल आणि त्याला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी झेपणार असेल तर सर्जरीच्या आधी या थेरपी वापरून ट्युमरचा आकार लहान केला जातो, आणि त्यानंतर सर्जरी केली जाते. या थेरपीने सुद्धा ब्रेस्ट वाचवता येते. सर्जरी केल्यानंतरही केमो, रेडिएशन आणि तपासणी कायम ठेवावी लागते. कारण कॅन्सरचे सर्व सेल्स सर्जरीने काढून टाकता येत नाहीत. कुठेनाकुठे पेशी राहण्याची शक्यता असते. आणि कितीही फॉलो अप्स केले तरीही कॅन्सर पुन्हा उद्भवणारच नाही याची कोणतीही खात्री नसते.

ब्रेस्टमधल्या काही नसा अंडर आर्स मधल्या लिम्फ नोड्स पर्यंत जातात. कॅन्सर तिथपर्यंत पोहोचू शकतो. हे शोधणे थोडेसे अवघड, म्हणूनच इंटरेस्टिंग वाटेल… सर्व लिम्फ नोड्सची बायोप्सी करण्यापेक्षा ठराविक एखादीच लिम्फ नोड कॅन्सर बाधित आहे का, हे पाहण्यासाठी निपल किंवा आसपासच्या भागात एक विशिष्ट डाय इंजेक्ट केली जाते. ही डाय नसांमार्फत अंडर आर्स मधल्या लिम्फ नोडपर्यंत येते. त्यावरून कॅन्सरबाधित लिम्फ नोड ओळखून तितकीच बायॉप्सी करून सर्जरी करता येते. कधीकधी रंग बदलणारी डाय वापरली जाते.

ब्रेस्ट रिमूव्हल नंतर. कॅन्सर आहे हे पचवण्यापासून, आर्थिक तरतुदी करण्यापर्यंत, आणि केमो थेरपी झेपवण्यापासून सर्जरीनंतर सावरण्यापर्यंत पेशंटला अनेक शारीरिक आणि मानसिक आंदोलनांना सामोरे जावे लागते. स्त्री कोणत्याही वयाची असो, तिला सर्जरीनंतर आपल्याला आता एक ब्रेस्ट नाही हे स्वीकारणे कठीणच जाते. आपण कॅन्सरमधून वाचलो आहोत, परंतु आपल्या सौंदर्यात कमतरता आली आहे हे आपल्याला पाहता क्षणी प्रत्येकाला समजू नये अशी पेशंटची इच्छा असते.

सर्जरीनंतर सिलिकॉन इम्प्लान्टस बसवण्याचा मार्ग पूर्ण रिकव्हरी नंतर मोकळा असतो. प्लास्टिक सर्जरी करून नकली ब्रेस्ट बसवता येतात. परंतु ही सर्जरी खर्चिक आहे. पुन्हा कापाकापी नको असेल तर हेच इम्प्लान्टस ब्रा च्या आत पॅडिंग सारखे वापरता येतात. तसेच इतर मटेरियल चे सॉफ्ट पॅडिंग्स सुद्धा मिळतात.

विशिष्ट प्रकारच्या ब्रा सुद्धा मिळतात. ज्याचा एक कप नॉर्मल आणि दुसरा पॅडेड असतो. इतकेच नाही, तर केमो थेरपी घेणाऱ्यांसाठी सुद्धा वेल्क्रो असणाऱ्या स्पेशल ब्रा मिळतात.

सिलिकॉन इम्प्लान्टस साधारण चार पाच हजार रुपयांत मिळतात. परंतु एकदा घेतले की पुन्हा घ्यावे लागत नाहीत. बाकी मटेरियल चे पॅडिंग्स दोन अडीच हजारात मिळतात. स्पेशल ब्रा सुद्धा दोन ते तीन हजारात मिळतात.

वर उल्लेख केलेल्या सर्व वस्तू अमेझॉन, फ्लिपकार्ट, आणि इतर शॉपिंग पोर्टल वर उपलब्ध आहेत.

अजून वाचा:


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply