बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी – Buddha Purnima Information in Marathi

इ.स.पूर्व ५६३ मध्ये नेपाळमध्ये कपिलवस्तूच्या जवळ लुंबिनी येथे राजा शुद्धोदन आणि राणी मायावती यांना मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव सिद्धार्थ उर्फ गौतम ठेवले. तो विजयादशमीचा शुभ दिवस होता. आपला मुलगा चक्रवर्ती राजा व्हावा, अशी शुद्धोदन राजाची इच्छा होती. त्याने राजज्योतिषाला बोलावून सिद्धार्थाची कुंडली मांडली; पण ज्योतिषाने भविष्य वर्तवले की, हा राजकुमार मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश देणारा धर्मप्रवर्तक होईल.

हे भविष्य खोटे ठरावे म्हणून राजा शुद्धोदनाने एक सुंदर महाल बांधला. सुंदर बागा, भोवताली सुंदर आणि तरुण दास-दासी अशा सर्व सुखांनी भरलेल्या राजमहालात सिद्धार्थाला ठेवले. त्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले; पण भविष्य खोटे व्हायचे नव्हते.

बुद्ध पौर्णिमा

राजपुत्र सिद्धार्थ फार दयाळू होता. इतरांप्रमाणे हौसेपोटी शिकार करून प्राण्यांचा जीव घेणे त्याला आवडत नसे. एकदा त्याचा भाऊ देवव्रत याने एका पक्ष्याला बाण मारला. जखमी झालेल्या त्या पक्ष्याचा जीव सिद्धार्थाने वाचवला. देवव्रत जेव्हा आपला पक्षी परत मागू लागला, तेव्हा सिद्धार्थाने उत्तर दिले, “मी पक्षी देणार नाही. मारणार्‍यापेक्षा जीव वाचवणार्‍याचा हक्क जास्त मोठा असतो.”

एकदा सिद्धार्थाने असे पाहिले की, एक साप मुंग्या खात होता. तेवढ्यात एक घार येऊन त्या सापाला घेऊन उडाली; पण साप खाणार तेवढ्यात तिला एका शिकार्‍याचा बाण लागला. हे दृश्य पाहून सिद्धार्थ फार अस्वस्थ झाला. जीवनाबद्दल विचार करू लागला.

सिद्धार्थ मोठा झाला, तेव्हा राजाने त्याचे यशोधरा नावाच्या सुंदर मुलीशी लग्न करून दिले. त्याला राहुल नावाचा एक सुंदर मुलगाही झाला.

एक दिवस फिरत असताना सिद्धार्थला रस्त्यात बसलेला एक माणूस दिसला. तो भयंकर रोगाने गांजलेला होता. त्यानंतर एका वृद्ध माणसाचे दर्शन झाले आणि शेवटी एक अंत्ययात्रा त्याला पाहायला मिळाली. ही सर्व विदारक दृष्य पाहून तो व्यथित मनाने घरी आला. रोग, म्हातारपण आणि मृत्यू हे कोणालाही टाळता येत नाही याची त्याला जाणीव झाली आणि मग जीवनाचे ज्ञान करून घेण्यासाठी तो सर्वसंग परित्याग करून एके दिवशी गुपचूप वनात निघून गेला.

प्रथम त्याने एक गुरु करून त्यांच्याकडून मनोनिग्रह शिकून घेतला पण त्याचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने सात वर्षे खडतर तपश्चर्या केली पण शरीराला इतके कष्ट देऊनसुद्धा खरे ज्ञान मिळाले नाही, तेव्हा त्याने तो मार्ग सोडला.

नंतर तो एक दिवस समाधी लावून बसला असता, त्याला ज्ञान प्राप्त झाले. लोक आता त्याला गौतम बुद्ध म्हणू लागले. बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा.

गौतम बुद्धाने ठरवले की, आपल्याला मिळालेले ज्ञान लोकांना सांगायचे. दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग त्याने जगाला शिकवला. हाच बौद्धधर्म. त्याने आपला पहिला उपदेश पाच भिक्षूंना केला व ते त्याचे पहिले शिष्य बनले.

बुद्धाने आपल्या शिष्यांना ‘मध्यम मार्ग’ शिकवला. संसारात पुरते बुडून जाणे हे एक टोक आणि दूर जंगलात जाऊन तपश्चर्या करणे हे दुसरे टोक. हे दोन्ही मार्ग टाळून चार सत्ये समजून घेणे व अष्टांग मार्गाने चालणे हा ‘मध्यम मार्ग.’

बुद्धाला समजले की, माणसाच्या जीवनातले दुःख हे वासनेपासून, तृष्णेपासून निर्माण होते. ही वासना जर जिंकली, तर दुःखांचे मूळच नाहीसे होईल. तेव्हा माणसाने समजून घेण्याची चार सत्ये अशी आहेत.

  • संसार दुःखमय आहे.
  • या दुःखाचे मूळ आहे तृष्णा.
  • तृष्णा जिंकली, तर दुःख नाहीसे होईल.
  • तृष्णा जिंकण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग.

जीवनाचे योग्य ज्ञान, सत्कृत्ये करण्याचा निश्चय, मृदू बोलणे, चांगले आचरण, चरितार्थाचे योग्य असे प्रामाणिक साधन, प्रयत्न, योग्य विचार व मनाची शांती ढळू न देणे हा तो अष्टांग मार्ग आहे. गौतम बुद्धाने ४५ वर्षे धर्मप्रसार केला व ८० व्या वर्षी त्याचे निधन झाले. बुद्धाला ज्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले तो वैशाख पौर्णिमेचा दिवस ‘बुद्धपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो.

आज भारताखेरीज जगातल्या अनेक देशांत बौद्धधर्माचे उपासक आहेत. सारनाथ येथे ज्या ठिकाणी गौतम बुद्धाने लोकांना पहिला उपदेश केला, ते स्थान बौद्धधर्मीय पवित्र मानतात. बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची शिकवण त्या काळी सर्वांना समजेल अशा पाली भाषेत दिली. बुद्धाच्या शिकवणीनुसार सर्व माणसे समान आहेत व सर्वांनी परस्परांवर प्रेम केले पाहिजे. हिंदूधर्मीय भगवान बुद्धाला दशावतारातला नववा अवतार मानतात.

पुढे वाचा:

Leave a Reply