भगवान महावीर जयंती माहिती – Mahavir Jayanti information in Marathi

महावीर जयंती जैन धर्माचा प्रणेता महावीर याचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला. हा दिवस ‘महावीर जयंती’ म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी महावीराची मंदिरे सजवतात, त्याची पारंपरिक प्रथेप्रमाणे मोठी मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या अग्रभागी एक घोडा असतो. घोड्यावर एक मुलगा असतो. या मुलाच्या हाती एक लहानसा लाकडी पाळणा आणि त्यावर जरीचे कापड असते. महावीर जयंतीचा समारंभ भारतात सर्वत्र साजरा केला जातो.

महावीर

जैन धर्माचे चोवीस तीर्थंकर आहेत. महावीर हे त्यांतले शेवटचे तीर्थंकर होते. तीर्थ म्हणजे मार्ग. दुसर्‍यांना योग्य मार्ग शोधून देणारा म्हणजेच स्वतः तरून दुसर्‍याला तारणारा तो तीर्थंकर.

इ.स. पूर्व ५९९ मध्ये वर्धमान महावीर यांचा जन्म बिहारमधील वैशाली नगराजवळच्या कुंडग्राम या लहानशा गावात झाला. पाटण्यापासून हे गाव सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. वैशाली गणतंत्राचे राजे सिद्धार्थ हे त्यांचे वडील आणि राणी त्रिशला ही आई.

आई-वडिलांनी त्याचे नाव वर्धमान ठेवले; पण त्याची प्रसिद्धी महावीर या नावानेच झाली. याचे मुख्य कारण त्याच्या ठिकाणी वीरवृत्ती होती, हे होय. तो जन्माला आल्यावर इंद्र त्याच्या दर्शनासाठी आला होता व दर्शन होताच त्याने त्याला वीर म्हटले. चारणमुनींनी त्याला सन्मती या नावाने संबोधले. त्याला महावीर असे नाव ठेवले ते संगमदेवांनी. हा संगमदेव वर्धमानाच्या पुढे सर्परूपाने प्रकट झाला. वर्धमान ज्या वटवृक्षावर चढून बसला होता, त्या वृक्षाला त्याने वेढले. पण वर्धमानाच्या मनात त्याला मारण्याची लवमात्रही इच्छा झाली नाही. त्याने तत्काळ त्या सर्पामधले हिंसकत्व नष्ट केले. त्यामुळेही वर्धमान हा महावीर म्हणून ओळखला जाऊ लागला.

महावीर लहानपणापासून विरागी होते. पण आईच्या इच्छेखातर त्यांनी यशोदा नावाच्या राजकुमारीशी लग्न केले. त्यांना दर्शना नावाची मुलगीही झाली. पण त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग करून ऋजुकुला नदीच्याकाठी १२ वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली व ज्ञान प्राप्त करून घेतले.

पुढली बत्तीस वर्षे त्यांनी लोकांना आपल्या धर्माचा उपदेश करण्यात घालवली.

ते आठ मूळ गुण पाळण्याचा उपदेश करत. ते आठ मूळ गुण असे-

  • मांस खाऊ नका.
  • दारू पिऊ नका.
  • मध खाऊ नका; कारण मध मिळवताना असंख्य मधुमक्षिकांची अंडी नष्ट केली जातात.
  • कोणत्याही प्राण्याला पीडा देऊ नका.
  • असत्य बोलू नका.
  • चोरी करू नका.
  • आपल्या पत्नीशिवाय जगातल्या सर्व स्त्रियांना आई, बहीण किंवा मुलगी माना.
  • कुटुंबपोषणासाठी आवश्यक असेल तेवढ्याच धनधान्याचा संग्रह करा. याहून अधिकाची इच्छा करू नका.

महावीरांपूर्वी जैनधर्मीय चार तत्त्वे मानत असत. ती म्हणजे सत्य, ब्रह्मचर्य, अहिंसा आणि अस्तेय. महावीरांनी त्यात अपरिग्रह हे पाचवे तत्त्व समाविष्ट केले. त्यांच्यापूर्वी स्त्रियांना संन्यास घ्यायला परवानगी नव्हती, तीही त्यांनी दिली.

जैन धर्माच्या आजपर्यंतच्या अस्तित्वाला महावीरांचे हे महान कार्यच कारणीभूत ठरले आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. महावीर वयाच्या बहात्तराव्या वर्षी आश्विन अमावास्या या तिथीस मोक्षाला गेले.

पुढे वाचा:

Leave a Reply