ध्यान म्हणजे काय? – ध्यान कसे करावे
ध्यानाला बसण्यासाठी शक्यतो अगदी स्वतंत्र व एकांत स्थान असावे. घरातील देवघर किंवा स्वतंत्र खोलीचा ध्यानाच्या अभ्यासासाठी वापर करावा. ज्यांची अशी स्वतंत्र सोय नसेल, त्यांनी गावातील एखादे देवालय, मठ अगर इतर पवित्रस्थानी एकांतसमयी ध्यानाचा अभ्यास करावा.
शहरासारख्या ठिकाणी अशी सोय होत नसेल, तर घरी असेल त्या परिस्थितीत अभ्यास करावा. कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरू नये. कारण काही न करण्यापेक्षा काही करणे उत्तम. मात्र ज्या ठिकाणी आपण अभ्यास करणार ते स्थान स्वच्छ व पवित्र असावे. कारण स्थानदोष पुष्कळ ठिकाणी असतात. त्या जागी चित्त एकाग्र होत नाही.
पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञांनी असे शोध लावले आहेत की, ज्या ठिकाणी द़ृष्ट अगर सुष्ट कृत्ये होतात त्या ठिकाणी सर्व पदार्थांवर त्यांचा ठसा (Impression) उमटत असतो.
एका खोलीत खून व रक्तपात झाला होता. शास्त्रज्ञांनी तेथील भिंतीचा तुकडा काढून त्यावर विद्युतप्रयोग करून पाहिला असता तो तुकडा थरथर कापू लागला व त्यावर भीतीचे विकार उमटू लागल्याचे प्रयोगांती आढळून आले. म्हणून ज्या ठिकाणी आपण ध्यान करणार त्या जागेवर झोप घेणे, अद्वातद्वा गप्पा मारणे, बाष्फळ-अश्लील विनोद करणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे इत्यादी प्रकार कटाक्षाने वर्ज्य करावेत.
एवढेच नव्हे तर आपल्या विचारांशी विरोध असणाऱ्या तामसी व द़ृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींना त्या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव करावा. असे स्थान निवडल्यावर दररोज नियमाने ठरावीक वेळेत तेथे धूप किंवा अगरबत्ती जाळावी.
स्नान करून शुद्ध झाल्यावर शांतमनाने त्या ठिकाणी प्रवेश करून ध्यानास बसावे. योग्य असे स्थान न मिळाल्यास वेदव्यासाच्या सूचनेप्रमाणे यत्रैकाग्रता तत्राविशेषात् म्हणजे जागा कशीही असली तरी जेथे मन एकाग्र होईल तेथे ध्यानाचा अभ्यास करावा.
ध्यानाला बसावयास आसन घ्यावे. खाली दर्भासन वर मृगाजिन आणि त्यावर लोकरीच्या किंवा धुतलेल्या शुभ्र वस्त्राच्या कापडाची घडी घालून त्यावर बसावे. दर्भासन व मृगाजिन न मिळाल्यास नुसत्या चौपदरी घोंगडीवर बसावे. मात्र पाटावर, पलंगावर किंवा नुसत्या जमिनीवर बसून कधीही ध्यान करू नये.
आपल्या आसनावर दुसऱ्या कोणालाही बसू देऊ नये. त्यामुळे दुसऱ्याचे दोष येण्याची शक्यता असते. या विशिष्ट आसनाची उपयुक्तता अशी आहे की, ज्या वेळी मनुष्य विचार करतो, चित्त एकाग्र करतो किंवा ध्यान करतो तेव्हा त्याच्या शरीरात अल्पसा स्थायी विद्युतशक्तीचा प्रवाह वाहू लागतो. तो तसा शरीरातच राहावा. जमिनीत जाऊ नये म्हणून वरील आसनांचा निर्बंधक (Insulators) असा उपयोग होतो.
ध्यानाला बसताना योग्य आसन घालून बसावे. मान ताठ, छाती पुढे करून सरळ बसावे. यासाठी पद्मासन किंवा सिद्धासन ही दोन आसने अत्यंत उपयुक्त आहे. या दोन्ही आसनांमध्ये शरीराची जी स्थिती असते त्यामध्ये कुण्डलिनी शक्ती जागृत होणे, तिचा प्रवाह व्यवस्थित होणे, प्राणवायूचा संचार सुरळीत होणे, प्राणायाम करताना इंद्रियांची मोकळी स्थिती राहणे इत्यादी गोष्टींचा विशेष लाभ होतो.
ध्यानाची वेळ
ध्यानाभ्यासासाठी पहाटेचा ब्रह्ममुहूर्तही उत्तम वेळ आहे. सूर्योदयापूर्वीच्या प्रहराला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. पहाटे ज्यांना ध्यानाभ्यास शक्य नसेल त्यांनी आपल्या सोईनुसार मिळेल त्यावेळी अभ्यास करावा. मात्र शास्त्रकारांनी निवडलेल्या ब्राह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे.
दिवसाच्या कोणत्याही वेळी आसपासची सर्व माणसे जागृतावस्थेत असतात व त्यांच्या चित्तातील विचारांचे स्पंद रेडिओ लहरीप्रमाणे सगळीकडे प्रसूत होत असून हे स्पंद ध्यानाभ्यास करणाऱ्या साधकाच्या चित्तात विक्षेप आणतात; पण पहाटे ब्रह्ममुहूर्तात सर्व माणसे झोपलेली असल्यामुळे त्यांचे विचारस्पंदही बंद असतात. मात्र गिरीकदरातील एकांतवासात राहून योगाभ्यास करणारे किंवा जनसंर्पकात राहून योगाभ्यास करणारे साधक यावेळी जागे असून ते आपला योगाभ्यास याच वेळी करीत असतात. त्यामुळे त्यांच्या चित्तातील सत्त्वगुणी विचारांचे स्पंद सर्व दिशांना प्रसूत होत असतात. हे सात्त्विक स्पंद याच वेळात योगाभ्यास करणार्यांना त्यांच्या योगाभ्यासाला फारच पोषक होतात. त्यामुळे पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तात ध्यानाभ्यास केल्याने चित्ताची एकाग्रता लवकर साधते व ध्यानाभ्यासात शीघ्रतेने प्रगती होते.
ध्यानाचा अभ्यास
आसन घालून डोळे मिटून तासन्तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. ध्यानाभ्यास करणे किती अवघड आहे हे प्रत्यक्ष ध्यानाला बसल्यानंतरच कळते. ध्यानाभ्यास करणे म्हणजे मनाची एकाग्रता साधणे. मन हे वाऱ्यासारखे चंचल आणि माकडासारखे उपद्व्यापी आहे. अशा चंचल मनाला वळवणे किती अवघड असते याचे प्रत्यंतर रोजच्या व्यवहारातसुद्धा होत असते. चांगल्या तर्हेने विचार करता न येणे, कोणतेही काम मन:पूर्वक करता न येणे इत्यादी गोष्टी मनाच्या चंचलपणामुळेच होतात.
अस्थिर मनामुळे विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकत नाही, शिक्षक नीट शिकवू शकत नाही, कामगार मन:पूर्वक काम करू शकत नाही, वक्ता उत्कृष्ट व्याख्यान देऊ शकत नाही. थोडेसे अंतर्मुख होऊन पाहिल्यास असे आढळते की, कोणतेही कार्य करीत असताना मनात नाना प्रकारचे संकल्प उठत असतात. मनामध्ये निरनिराळे संकल्प उठणे हा मनाचा स्वभावच आहे. सर्वांच्या मनात सारखेच संकल्प उठत नसतात. ज्याच्या मनात जशी आवड-निवड असते, तसे संकल्प त्याच्या मनात उठत असतात.
एकीकडे अभ्यास अथवा काम चालू असताना संकल्पाच्या अनुरोधाने कितीतरी गोष्टींची उजळणी अंतर्मनात चालू असते. ज्याचा प्रत्यक्ष कामाशी अथवा अभ्यासाशी काहीही संबंध नाही अशा गोष्टींचे विचार मनामध्ये येत असतात. मनात नाना प्रकारचे संकल्प उठत असले तरी मनाचा एक गुण चांगला आहे की, एखाद्या विषयाची गोडी त्याला लागली की ते त्या गोडीच्या आशेने सोकावते व तिथेच रमते. मनाच्या या गुणविशेषाचा लाभ घेऊन कोणत्याही एका विषयावर ध्यान करावे. एकदा का मनाला ध्यानाची गोडी लागली, की ध्यानाभ्यासात प्रगती होऊन चित्ताची एकाग्रता अनुभवास येते.
ध्यान हे अष्टांगयोगातील महत्त्वाचे साधन आहे. आपल्या वैदिक धर्मात ध्यान सांगितले आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध, ख्रिश्चन इत्यादी अवैदिक धर्मातसुद्धा ध्यानाचे साधन म्हणून मोठे वर्णन केलेले आहे. डोळे मिटून केवळ इष्ट देवतेचे ध्यान करणे या पाठीमागे शास्त्रशुद्ध बैठक आहे, याचा पाश्चात्त्य संशोधकांनी आधुनिक वैज्ञानिक कसोटीने केलेल्या संशोधनाने प्रत्यय येतो.
अजून वाचा: