योगाभ्यासामध्ये आसन, क्रिया, प्राणायाम व ध्यान यांचा अभ्यास येतो. रोगनिवारणासाठी आसने व क्रिया यांचा विचार केला जातो. तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही एका आसनाच्या अथवा क्रियेच्या अभ्यासाने संपूर्ण रोग बरा होऊ शकत नाही. पुष्कळ लोक चिकित्सकाला अथवा मार्गदर्शकाला असा प्रश्न विचारतात की, अमुक रोगासाठी कोणते आसन करावे?

एखादे आसन म्हणजे जादूची कांडी किंवा मंत्र नव्हे, की त्याने तत्काळ रोग बरा व्हावा. आसनांच्या संयुक्त प्रभावानेच रोग बरा होण्यास तसेच त्याचा प्रतिकार करण्यास सहाय्य होते. योगचिकित्सेने सर्वच रोग बरे करता येत नसले तरी प्रत्येक रोगाचा प्रतिकार करता येतो हे मात्र निश्चित योगासने व क्रियांची निवड ही सामान्यत: रोगाचे स्वरूप, रोग्याची शरीरप्रकृती त्याचे वय इत्यादी गोष्टी विचारात घेऊन करावी लागते.

योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
योगासन करताना कोणती काळजी घ्यावी

योगासन करताना कोणती काळजी घ्यावी

आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियाकडून जे कार्य केले जाते ते सर्व शरीराच्या संघटित कार्याचाच एक भाग असतो. उदाहरणार्थ लालोत्पादक ग्रंथी, जठर व लहान आतडे यांची कार्ये वेगळी असली तरी सर्वांचा उद्देश अन्नपचन घडवून आणणे हाच असतो. एकाच उद्देशाने कार्य करणाऱ्या इंद्रियांच्या समुदायास संस्था म्हणतात.

शरीरात स्नायूसंस्था, पचनसंस्था, अभिसरणसंस्था, श्वसनसंस्था, उत्सर्जनसंस्था, मज्जासंस्था अंत:स्त्रावी ग्रंथी या महत्त्वाच्या संस्था असून त्यांचे कार्य स्वतंत्र, परस्परास पूरक होईल अशा रीतीने चालत असते. क्रिया व योगासनांचा उद्देश या सर्व संस्थांचे कार्य सुरळीतपणे चालावे आणि प्रत्येक इंद्रियाला व्यायाम घडवून त्यांची कार्यक्षमता वाढावी हा आहे.

योगामध्ये अनेक आसने सांगितलेली असली तरी हल्लीच्या यांत्रिक युगात वेळेच्या मर्यादेमुळे सर्वच आसने उपयोगी नाहीत. कमीतकमी आसनांनी जास्तीत जास्त लाभ होऊन आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा द़ृष्टीने खालील आसने व क्रिया पुरेशी आहेत.

योगासने प्रकार

  1. पद्मासन
  2. भुजंगासन
  3. शलभासन
  4. धनुरासन
  5. अर्धहलासन
  6. हलासन
  7. विपरीत करणी
  8. सर्वांगासन
  9. योगमुद्रा
  10. पवनमुक्तासन
  11. मत्स्यासन
  12. पश्चिमोत्तानासन
  13. शवासन
  14. मयुरासन
  15. अर्धमत्स्येंद्रासन
  16. शीर्षासन
  17. उड्डियानबंध.

योगासन क्रिया प्रकार

  1. नौली
  2. धौती
  3. बस्ती
  4. कपालभाती
  5. नेती
  6. शंखप्रक्षालन.

त्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास वेळ द्यायला हवा. ज्यांची प्रकृती निरोगी आहे अशा व्यक्तींनी वरील संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासावा. मात्र जे अशक्त व रोगी आहेत अशा व्यक्तींनी तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून आपल्या प्रकृतीस झेपेल असा अभ्यासक्रम निवडावा. मार्गदर्शक कुणी हजर नसेल तेव्हा स्वयं उपचार करताना सुरुवातीस सोपी आसने निवडून त्यांचा अभ्यास व सराव वाढत जाईल तसतसे नवीन आसन निवडावे. मात्र क्रियांचा अभ्यास तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाशिवाय कधीही व कुणीही करू नये.

योगासने करताना घ्यावयाची दक्षता

1) आसने व क्रियांचा अभ्यास नेहमी रिकाम्यापोटी करावा. भोजनानंतर साडेचार ते पाच तासांनी आसने करण्यास हरकत नाही. मात्र बस्ती, धौती, नेती व शंखप्रलाक्षन या क्रियांचा अभ्यास सकाळी करावा.

2) आसने मोकळ्या हवेमध्ये व जागेमध्ये करावी. कोंदट व अपुऱ्या जागेमध्ये आसने करू नयेत. आसनासाठी अशी जागा निवडा की जेथे मन प्रसन्न राहून आसने करण्यास उत्साह वाटेल.

3) आसने करताना स्नायूंच्या आकुंचन प्रसारणास अडथळा होऊ नये व अवयवांच्या हालचाली सुलभपणे होण्यासाठी अंगावर शक्य तितके कमी कपडे असावेत.

4) सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हींपैकी कोणत्याही एका वेळेस अथवा शक्य असेल तर दोन्ही वेळेस आसने करावीत. मात्र रोजच्या वेळेत बदल करू नये.

5) आसनाच्या सुरुवातीस व शेवटी शवासन करावे. प्रत्येक आसनानंतर शवासन करण्याची आवश्यकता नाही. दमल्यासारखे वाटेल तेव्हा शरीर शिथिल (Relax) होण्यासाठी शवासन करावे.

6) आसनांची सुरुवात शरीरावर कमी देणाऱ्या आसनांनी करून शेवटी अवघड आसने व क्रिया कराव्यात. आसनांचा ठरावीक असा कोणताही क्रम नाही. आपल्या सोयीनुसार क्रम ठरवावा. प्रथम आसने, मग क्रिया व शेवटी प्राणायाम असा क्रम ठेवावा.

7) आसन करताना श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. जिथे सूचना केली असेल त्या ठिकाणीच फक्त श्वास रोखावा.

8) आसनाच्या पूर्वस्थितीतून अंतिम स्थितीत जाताना व अंतिम स्थितीतून पूर्वस्थितीत येताना शारीरिक हालचाल अत्यंत सावकाश करावी. घाईगडबड करू नये.

9) नवोदितांनी आसनांची अंतिम स्थिती साधण्यासाठी शरीराच्या कोणत्याही अवयवावरील ताण हळूहळू वाढवून आसन करावे. एकदम झटका देऊन किंवा जोर करून अंतिम स्थितीत जाण्याचा प्रयत्न करू नये. अशावेळी स्नायू, मज्जातंतू किंवा रक्तवाहिनी यांसारख्या भागास इजा होण्याचा संभव असतो.

10) पूर्ण अभ्यासक्रमाचा सराव झाल्यानंतर एखाद्या दिवशी घाई असेल त्यावेळी सोप्या आसनांना रजा देऊन शीर्षासन, शलभासन, भुजंगासन, धनुरासन, योगमुद्रा, हलासन, सर्वांगासन इ.आसने व नौली, कपालभाती या क्रिया कराव्या.

11) नेती, धौती, बस्ती व शंखप्रक्षालन या क्रिया दररोज न करता आवश्यकतेनुसार आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा कराव्या.

12) आसने करताना कुणाशीही बोलू नका. शांत व एकाग्रचित्ताने श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करून आसने करावीत.

13) शीर्षासन, मयुरासन यांसारखी अवघड आसने व नौली, कपालभाती, धौती इ. क्रियांचा अभ्यास नवोदितांनी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाशिवाय स्वत:च्या जबाबदारीवर करू नये.

14) मलावरोध असणाऱ्या व्यक्तींनी आसन करण्यापूर्वी एक पेलाभर कोमट पाण्यात चवीपुरते मीठ टाकून प्यावे व मग आसनांचा अभ्यास करावा. यामुळे आतड्यांच्या स्नायूंना चालना मिळून शौचास साफ होते.

15) आसनांच्या अभ्यासानंतर एक प्रकारची स्फूर्ती व उत्साह वाटला पाहिजे. थकवा, आळस, जडपणा किंवा कंप यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अभ्यासात काहीतरी चुकत आहे, हे जाणून तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

आसने कुणाही स्त्री-पुरुषांना मार्गदर्शनाशिवाय करता येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीवर आसने करताना दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करून योग्य ती दक्षता घ्यायला हवी. नौली ही क्रिया थोडीशी अवघड असून तिचा अभ्यास अभ्यासकाची प्रकृती, अभ्यासाचा नियमितपणा व चिकाटी या गोष्टींवर अवलंबून आहे.

नौली क्रिया शक्यतो एखाद्या तज्ज्ञ व माहीतगार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केल्यास अधिक लवकर साध्य होऊन कोणताही धोका अथवा विलंब पत्करावा लागत नाही. कोणत्या स्नायूंना धक्का देऊन पोटाचे नळ पुढे कसे आणावेत याची कल्पना निव्वळ वाचून व पाहून येत नाही. तरीसुद्धा कुणी मार्गदर्शक न भेटल्यास सांगितलेल्या गोष्टीची काळजी घेऊन, घाईगडबड न करता हा प्रकार पुस्तकाच्या मार्गदर्शनानेही आत्मसात करता येतो. अशी पुष्कळ उदाहरणे आहेत. नौली क्रिया ही सर्व क्रियांत अत्यंत महत्त्वाची आहे. नौली क्रियेचा अभ्यास उत्तमरीतीने करता आल्यास बस्ती, शंखप्रक्षालन, धौती इत्यादी क्रिया अत्यंत सुलभतेने करता येतात.

अजून वाचा:

Leave a Reply