गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती मराठी – Gokulashtami Information in Marathi
गोकुळाष्टमी श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी. या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. कृष्ण जन्माचा हा दिवस सर्व भारतभर साजरा होतो. पण मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.
श्रीकृष्ण हा दशावतारांतील आठवा अवतार मानतात. मथुरेचा राजा कंस याला आपल्या बळाचा गर्व होऊन तो प्रजेला फार त्रास देऊ लागला. त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला.
कंसाला एका ज्योतिषाने सांगितले होते की त्याच्या बहिणीचा म्हणजे देवकीचा पुत्र त्याचा नाश करेल, म्हणून त्याने देवकी व तिचे पती वसुदेव यांस तुरुंगात ठेवले होते. त्यांचा जन्माला येणारा प्रत्येक पुत्र तो मारून टाकत असे. त्यांच्या आठव्या पुत्राचा म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला, तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. कृष्णाचे वडील वसुदेव यांनी दुथडी भरून वाहणार्या यमुनेतून रातोरात त्याला गोकुळात मावशीकडे पोचवले, ती कथा चित्तथरारक आहे.
कृष्णाच्या गोकुळातील बाललीला, मित्रांसह दूध-दही पळवणे अशा खोड्यांचे कौतुक वाटून गोजिरवाण्या लहान मुलाला कौतुकाने आपण बाळकृष्ण म्हणतो.
पूतना या राक्षसीचा व इतर अनेक राक्षसांचा वध, कालिया नागाला शरण आणणे, कंसवध असे अनेक पराक्रम कृष्णाने बालपणी केले. मोठेपणी त्याने द्वारकेला आपले राज्य स्थापन केले. पांडवांना पदोपदी मदत केली आणि कौरव-पांडवांचे युद्ध सुरू झाले, तेव्हा अर्जुनाला गीतेच्या रूपाने उपदेश करून त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. भगवद्गीता हा हिंदू धर्मातील फार पवित्र ग्रंथ आहे.
लहान-थोरांना अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाचा जन्म मंदिरात जन्मोत्सव करून मध्यरात्री साजरा करतात. पूजा, भजन, प्रवचन अशा धार्मिक कृत्यांमध्ये सारे सामील होतात. तो दिवसभर उपवास असतो, त्याचे पारणे दुसर्या दिवशी होते.
दुसरा दिवस असतो दहीहंडीचा. गोकुळ हे गवळ्यांचे गाव होते. घरोघरी गाई होत्या. त्यांचे दूध, तूप, लोणी मथुरेच्या बाजारात विकणे हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता. घरोघरी मडक्यात घालून शिंक्यावर टांगून ठेवलेले दही व लोणी मडके फोडून चोरून खाणे हा कृष्ण आणि त्याच्या मित्रांचा आवडता उद्योग होता.
श्रीकृष्णाच्या या खोड्यांची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी दहीहंडी फोडायचा कार्यक्रम होतो. रस्तोरस्ती दहीहंड्या टांगलेल्या असतात. ‘गोविंदा आला रे आला’ असे म्हणत मुले घोळक्या-घोळक्यांनी नाचत, गात फिरतात व दहीहंड्या फोडतात. फुटलेल्या हंड्यांचे तुकडे लोक शुभ म्हणून घरी घेऊन जातात.
कृष्णाची कथा इतकी अद्भुतरम्य आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व इतके अलौकिक आहे, की त्याने हजारो वर्षे भारतवासीयांना भारून टाकले आहे. अनेक परदेशी लोकही कृष्णभक्त आहेत.
पुढे वाचा: