Samarth Ramdas Information in Marathi: समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदासांचा जन्म २४ मार्च १६०८ मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीला रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर झाला. जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. ते रोज “आदित्यहृदय” या स्तोत्राचा पाठ करीत असत. नारायण सात वर्षांचा असतानाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता.

अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर, पण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला.

समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी-Samarth Ramdas Information in Marathi
Samarth Ramdas Information in Marathi

समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी – Samarth Ramdas Information in Marathi

नावनारायण सूर्याजीपंत ठोसर
जन्म२४ मार्च १६०८ (चैत्र शु. ९ शके १५३०)
गावजांब जिल्हा जालना महाराष्ट्र
वडीलसूर्याजीपंत ठोसर
आईराणूबाई सूर्याजीपंत ठोसर
संप्रदायसमर्थ संप्रदाय
साहित्यरचनादासबोध, मनाचे श्लोक, आरती
वचनजयजय रघुवीर समर्थ
समर्थांचे कार्यजनजागृती, ११ मारुतींच्या स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार मठांची व समर्थ संप्रदायाची स्थापना.
निर्वाण१३ जानेवारी १६८१ (माघ कृ. ९ शके १६०३) सज्जनगड जिल्हा सातारा महाराष्ट्र
Samarth Ramdas Information in Marathi

रामदास स्वामी कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. धर्मरक्षणार्थ समर्थ रामदासांनी समर्थ संप्रदाय स्थापण केला. अखंडपणे सावध राहून कार्य करावे हे त्यांच्या शिकवणुकीचे सूत्र होते. सजग राहून त्यांनी राजकारण, धर्मकारणात आपला वेगळा ठसा उमटवला.

संत परंपरेतील रामदासांचं स्थान स्वतंत्र होतं. समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा विशाल होता. पर्यावरणावरही त्यांनी प्रबोधन आणि लिखाण केले. स्वत:च्या लग्नमंडपातून पळून जाणारे रामदास स्वामी म्हणतात, “आधी प्रपंच करावा नेटका । मग करावा परमार्थ विवेका ।।” संसारातील चिंता दूर झाल्या तरच संसारी माणूस ईश्वरचिंतन करू शकेल.

अखंडपणे सावधान राहून धर्मप्रसाराचे कार्य त्यांनी केले. धर्मरक्षणासाठी समाज बलवान झाला पाहिजे, असे त्यांना वाटे. आधी केले मग सांगितले अशी त्यांच्या मनाची धारणा होती. ते स्वतः नित्य सूर्यनमस्कार करत असत.

रामाची उपासना करून भक्तिमार्ग पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी ‘समर्थ’ संप्रदाय सुरू केला. हनुमंत ही शक्तीची देवता मानतात. हनुमानालाच कुळदैवत मानून त्यांची ते आराधना करतात. हनुमंताप्रती असलेली श्रद्धा खालील रचनेतून व्यक्त होते.

आमुचे कुळी हनुमंत । हनुमंत आमुचे दैवत ।
तयाविण आमुचा परमार्थ । सिद्धांते न पावे की ।।

सर्वसामान्य जनतेचे दु:ख दूर व्हावे म्हणून देवीसमोर संकल्प करून कार्यासाठी शक्ती मागितली. संत रामदासांनी तुळजाभवानी स्तोत्रं लिहिली त्यावरून लक्षात येते. खालील स्तोत्र पाहा –

अंतरी कल्पना केली । एकांती बोलिले बहू ।
रक्षिता देव देवांचा । त्याचा उच्छाव मांडिला ।।

आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्याच्या नादाला लागू नका. अभ्यासाने प्रत्येक गोष्ट साध्य होते. कर्मच केलं नाही तर फळ कसं मिळणार? हे सोप्या भाषेत रामदासांनी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं ते असं…

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।।

प्रपंच असो किंवा साधना, कोणतेही कार्य करण्यासाठी सुरुवात करून मग त्याचा सराव करावा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. सर्व नशिबावर सोडून चालणार नाही. नशीबही शेवटी आपल्या कर्मातूनच घडते. त्यामुळे नशीब चांगले घडवण्यासाठी सदैव सावध राहिले पाहिजे. या ठिकाणी संत रामदास म्हणतात –

“संसारी असावे सावध ” कर्म करायच्या वेळेला जर आपण गाफील राहिलो तर कर्म कराताना चूक होऊ शकते. पुढे त्याचे वाईट परिणाम भोवे लागतील. त्यामुळे सदैव सावध राहून कार्य करावे.

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।।
तजविजा करीत बसावे । एकांत स्थळी ।।

शके १५७१मध्ये रामदासांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिले ते असे –

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांचा आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा।।
देव धर्म गोब्राम्हण । करावया सरंक्षण |
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ।।

अशा प्रकारे ओवीरूपात असलेल्या पत्रात शिवाजीराजांची स्तुती केली. आणि संभाजी महाराजांना पत्र लिहिलं, त्यामध्ये शिवरायास आठवावे अशी त्यांनी सूचनाही केली. यावरून संत रामदासांचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व लक्षात येते. वेगळेपणामुळेच महाराष्ट्रातील संतपरंपरेतील रामदासाचे स्थान अतिशय स्वतंत्र असे आहे. मनाला शुद्ध करण्यासाठी त्यांनी मनाचे श्लोक लिहून विचारांना शुद्ध केले. त्याकाळी समाजात अनेक पंथ होते आणि सर्व संप्रदाय आपापल्या परीने समाजप्रबोधनाचे कार्य करत होते, त्यामध्ये विठ्ठलभक्ती असलेला वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे कार्य करत होता, त्याच काळात रामदासांनी ‘दासबोध’ ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये प्रपंच आणि

परमार्थ यांची सांगड घालून नवा भक्तीसंप्रदाय स्थापन करण्यासाठी लोकसंग्रह करावा असे ठरविले. त्यासाठी त्यांनी स्री पुरूष असा भेदभाव न करता अनेक शिष्य निर्माण केले आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. रामदासांनी समाजाला सतत सावधतेचा इशारा दिला. कुलदेवतेच्या स्तोत्रांमध्ये रामदास म्हणतात,

राम उपासना माझी । त्रैलोक्य सुख पावले ।
सोडिले देव इंद्रादी । तोडिली बंधने बळे ।

दांभिक लोक भोळ्याभाबड्या लोकांना फसवत असत. त्यांचे शोषण करत. समर्थ रामदासांच्या जय जय रघुवीर समर्थ” या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगरकपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे, तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसे मठमहंत निर्माण करून, निःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्रउभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्तिउपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला.

तुळजाभवानी स्तोत्रातील खालील ओळी –

अंतरी कल्पना केली । एकांती बोलिलो बहू ।।
रक्षिता देव देवांचा । त्याचा उच्छाव मांडिला ।।

परधर्मीय राज्यकर्ते पराभूत करून महाराष्ट्रात रामराज्य स्थापन व्हावे ही रामदासांची इच्छा होती. हिंदवी स्वराज्य स्थापण करणाऱ्या शिवरायांना रामदासांच्या भक्तिसंप्रदायाने साहाय्य केले.

शेकडो मारुतीमंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यांत, घळीत राहून समाजाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थांवर संत एकनाथांच्या वाङमयाचा प्रभाव असल्याने दिसून येते. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले. रामाचा आदर्श समोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.

“सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।।
परंतु, तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे । “

या त्यांच्याच सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले.

संत रामदास स्वामी एकदा मुलांबरोबर खेळत होते, मुलांबरोबर समर्थ खेळत आहेत हे पाहून काही मंडळींस आश्चर्य वाटले. एकाने त्यांना विचारले, “ हे काय आज आपण करीत आहात?” समर्थ म्हणाले,

वयें पोर ते थोर होऊन गेले ।
वयें थोर ते चोर होऊन ठेले ।

वय वाढलं की शिंगं फुटतात. मोठ्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही. लहान मुलांच्या मनावर लेप नसतो, त्यामुळे त्यांची बुद्धी निर्मळ असते. मुले म्हणजे विशुद्ध परमेश्वराच्या मूर्ती आहेत, म्हणूनच मुलांना परमेश्वराचे रूप मानतात. लहान मुलांच्या ठिकाणी असलेले गुण आपण ओळखले तर माणसाचं मनही तसंच निर्मळ, शुद्ध राहील. मनाचे श्लोकमध्ये रामदास स्वामी म्हणतात,

मना सज्जना पूर्वसंचित केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ।

ज्याप्रमाणे कर्म करतो, त्याप्रमाणे आपले संचित तयार होते; त्याला आपण नशीब असे म्हणतो.

जशी क्रिया, तशी प्रतिक्रिया यालाच इंग्लिशमध्ये ॲक्शन रिॲक्शन असं म्हटलं जातं. यामध्ये विचारांचा भाग फार मोठा असतो. सकारात्मक विचार केला तर तसेच कर्मही घडते. आपलं जीवन हे सकारात्मक तयार होतं. आपल्याच कर्मातून दैव घडत असतं ही गोष्ट आपल्या चांगली लक्षात आली पाहिजे की, आपल्याला जर सुख, आनंद, यश पाहिजे असेल, तर आपले विचारही त्याप्रमाणे स्वच्छ, निर्मळ सकारात्मक असायला पाहिजे. तरच आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. संत रामदासांच्या एका एका मनाच्या श्लोकामध्ये इतकं सामर्थ्य आहे की, ते समजून घेऊन अंगीकारले तर जीवनाची दिशा आणि दशा बदलू शकते. प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालणारा ग्रंथ म्हणजे, ‘दासबोध’ होय.

राम उपासना माझी । त्रैलोक्य सुख पावले ।।
सोडिले देव इंद्रादि । तोडिली बंधने बळे ।।

राम उपासनेमुळे त्रैलोक्याचे सुख मिळते असे समर्थ म्हणतात. रामदासांनी समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी भिक्षेचा मार्ग स्वीकारला.

एकदा असेच ते भिक्षा मागायला गेले असता. एका घरात त्यांना आक्रोश ऐकायला मिळाला. त्यांच्या दुःखाची वेदना रामदासांच्या हृदयाला भिडली. ते अस्वस्थ झाले. दुःखाचे कारण विचारले असता, त्यांना समजले की, त्या घरातील सुंदर स्री घरातील पुरूषांदेखत पळवून नेली आहे. हे ऐकूण त्यांच्या जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, स्वरक्षण करण्यासाठी समाज असमर्थ झाला आहे. त्यांचा पुरूषार्थ जागवला पाहिजे. निराश, मेलेल्या मनाला चैतन्य देण्याचे काम समर्थांनी मनाच्या श्लोकांमधून केले. लोकांची वैचारिकता बदलत अखंड भ्रमण केले.

समाजातील दुःख, दारिद्र्य, लाचारी पाहून उदास झालेले रामदास स्वामी श्रीरामाशी मुक्त संवाद करतात. अतर्मुख होऊन मनातील खंत व्यक्त करतात. “हे रघुनायका तू भक्त वत्सल आहेस. नुसत्या बुद्धीच्या सामर्थ्यावर माझे दोन हात फार तोकडे पडतात. मी आता काय करू? मला काहीच सुचत नाही. रघुनाथा तूच काय तो मार्ग दाखव.” खालील रचनेतून त्यांच्या मनातील भावना व्यक्त होतात –

अन्न नाही वस्र नाही । सौख्य नाही जनामध्ये।।
आश्रयो पाहता नाही । बुद्धी दे रघुनायका ।।
उदास वाटते जीवी । आता जावे कुणीकडे ।।
तू भक्त वत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ।।

त्यांच्या तेजेस्वी, ओजस्वी कार्यातून बुद्धीचे तेज अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला सदैव प्रेरणा देत राहिले. असे हे युगपुरूष या महाराष्ट्रात जन्मले आणि अमर झाले.

कोण आहेत समर्थ रामदास स्वामी, Shri Samarth Ramdas Swami, Story of Ramdas Swami, रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी माहिती मराठी, Samarth Ramdas Information in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply