रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा माहिती मराठी – Raksha Bandhan Information Marathi

श्रावण पौर्णिमा हा दिवस सर्वत्र ‘रक्षाबंधन’ म्हणून साजरा केला जातो. समुद्र किनार्‍याच्या प्रदेशात हा दिवस ‘नारळी पौर्णिमा’ म्हणूनही साजरा करण्यात येतो.

श्रावण पौर्णिमेला वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करावा असे शास्त्रात सांगितले आहे, म्हणून श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. ही प्रथा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे.

रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा माहिती मराठी | Raksha Bandhan Information Marathi

प्राचीन काळापासून भारतीय लोक सागरी मार्गाने व्यापार करत होते, अशी वर्णने वेदांतही आढळली आहेत. भारतातील लोकांनी पूर्वेकडील देशात प्रवास केला होता. तेथील देशात रामकथेसारख्या भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही आढळतात.

मृग नक्षत्राबरोबर पावसाळ्याला सुरुवात होते. सुरुवातीचे दोन महिने समुद्र खवळलेला असतो. जुन्या काळी जेव्हा शिडाची गलबते होती, तेव्हा पावसाळ्याचे पहिले दोन महिने समुद्रातील वाहतूकच बंद होई व या काळात व्यापार बंद राहत असे. अजूनही मच्छीमारांच्या लहान होड्या खवळलेल्या समुद्रात जाऊ शकत नाहीत व दोन महिने मच्छीमारीचा उद्योग बंद असतो. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होऊ लागतो. नदी-नाल्यांना उतार पडतो. या दिवशी जलदेवतेला संतुष्ट करण्यासाठी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात व त्याला नारळ अर्पण करून होड्या पाण्यात लोटतात. या वेळी ते नाचून आणि गाऊन आपला आनंद व्यक्त करतात.

हे दोन महिने मासेमारी बंद ठेवण्यामागे एक शास्त्रीय कारणही आहे. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो- माशांची नवीन जन्मणारी पिले कोळ्यांकडून मारली जाऊन समुद्रातील पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून या काळात मासेमारी बंद ठेवणेच योग्य असते.

श्रावणातल्या या पौर्णिमेचे आणखीही एक महत्त्व आहे. या दिवशी करावयाचा श्रावणी हा विधी प्राचीन काळापासून ब्राह्मण समाजात चालत आलेला आहे. पूर्वी मुलगा आठ वर्षाचा झाला की त्याची मुंज करून त्याला गुरुगृही पाठवीत. तो गुरुगृही शिक्षण पूर्ण होईपर्यंत राही. पण मध्ये सुट्ट्या असत. माघ महिन्यात सुटी सुरू होऊन मुलगा घरी येई. तेव्हा उत्सर्जन नावाचा विधी होम पेटवून केला जाई. श्रावण पौर्णिमेला मुलगा सुटी संपवून परत जाई तेव्हा होम पेटवून उपाकर्म विधी करत. म्हणजे दरवर्षी अभ्यासाची सुरुवात व शेवट दर्शवणारे हे विधी होते. आता हे दोन्ही विधी एकत्रच करतात.

अध्ययन व अध्यापनाला सुरुवात करणे हा त्याचा मूळ अर्थ होता; पण आता मुंज झाल्यावर ब्राह्मण मुलाला जे यज्ञोपवीत किंवा जानवे घातले जाते, ते या दिवशी मंत्र म्हणून शास्त्रशुद्ध रीतीने बदलायचे म्हणजे नवे जानवे घालायचे अशी रूढी आहे.

श्रावण पौर्णिमेला ‘राखी पौर्णिमा’ किंवा ‘रक्षाबंधन’ असेही म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून शुभेच्छा देते.

जुन्या काळी बहिणीने भावाला राखी बांधणे एवढ्यापुरतीच ही पद्धत मर्यादित नव्हती.

पुराणात अशी कथा आहे की, एकदा देव व दानवांचे युद्ध सुरू असताना देवांचा पराभव होऊ लागला, तेव्हा देवांचे गुरु बृहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेला इंद्राच्या हातात अपराजिता नावाचे कवच बांधले व त्यामुळे तो ती लढाई जिंकला. राक्षसांचा राजा बलि याला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली व त्यामुळे देवांशी झालेल्या एका लढाईत तो जिंकला.

आणखी एक कथा अशी आहे की विष्णूने वामनावतार घेऊन बलिराजाला पाताळात ढकलले. या पापामुळे विष्णूला बलिराजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. त्याची ही अवस्था पाहून लक्ष्मीला फार वाईट वाटले. तेव्हा विष्णूला सोडवण्यासाठी नारदमुनींनी एक युक्ती सांगितली.

त्यानुसार लक्ष्मी बलिराजाला भेटायला गेली. आपल्या घरी लक्ष्मी आलेली पाहून राजाला फार आनंद झाला. त्याने तिचे स्वागत केले आणि म्हणाला, “देवी, आपण आल्याने मला फार आनंद झाला. मी आपली काय सेवा करू?”

लक्ष्मी म्हणाली, “मी आज तुम्हांला राखी बांधायला आले आहे.” लक्ष्मीने बलिराजाला राखी बांधली. बहिणीला परतभेट द्यायला हवी म्हणून बलिराजाने विष्णूला द्वारपाल होण्यापासून मुक्त केले. लक्ष्मी विष्णूसह आनंदाने घरी परतली.

तसेच इंद्र वृत्रासुराशी लढायला गेला, तेव्हा इंद्राणीने त्याच्या हातात राखी बांधली होती.

पूर्वी राजा लढाईला निघाला, की पुरोहित त्याच्या हातात राखी बांधत असे.

रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा माहिती मराठी – Raksha Bandhan Information Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply