गुरू नानक जयंती विषयी माहिती – Guru Nanak Jayanti Information In Marathi

गुरु नानक हे शीखधर्माचे संस्थापक मानले जातात. १५ एप्रिल १४६९ ला त्यांचा जन्म पंजाबमधील तलवंडी गावात झाला. आज हे गाव पाकिस्तानात आहे आणि त्याला ‘नानकाना साहेब’ असे नाव आहे. गुरु नानकांच्या वडिलांचे नाव कल्याणराय होते. काही लोकांच्या मते ते काणूचंद असे आहे. हे कुटुंब बेदी कुळातील क्षत्रिय होते. बेदी म्हणजे वेदी. या कुलातील एक पुरुष अमृतराय याने काशीला जाऊन वेदविद्या प्राप्त केल्याने त्याला वेदी ही पदवी मिळाली.

लहानपणापासूनच नानक हा मुलगा इतरांपेक्षा वेगळा असल्याचे जाणवू लागले. तो अतिशय दयाळू होता. दारावर येणार्‍या याचकाला काहीतरी दिल्याशिवाय तो राहत नसे. तो इतर मुलांत विशेष मिसळत नसे. साधुसंतांकडे जाऊन तो उपदेश ऐकू लागला, अरण्यात जाऊन चिंतन करू लागला. लहानपणीच त्याने संस्कृत व फारसी भाषेचा अभ्यास केला.

गुरू नानक जयंती

अकराव्या वर्षी वडिलांनी नानकांचे उपनयन करण्याचे ठरवले. पण उपनयन हा केवळ उपचार बनला आहे, यज्ञोपवीताचा अर्थ समजून न घेता ते घालणे हे ढोंग ठरेल असे सांगून नानकांनी उपनयन करून घेण्याचे नाकारले.

पुरोहितांना ते म्हणाले की, “आदर्श जानवे म्हणजे ज्यात दया हाच कापूस, संतोष हेच सूत आणि संयम हीच त्या जानव्याची ब्रह्मगाठ आहे. असे जानवे तुमच्याकडे असेल तर मी ते घालीन.” त्या लहान मुलाचे हे विचार ऐकून सारे चकित झाले.

वडिलांनी अठराव्या वर्षी त्यांचे लग्न करून दिले. त्यांच्या पत्नीचे नाव सुलखनी. त्यांना दोन मुले झाली. त्यांची नावे श्रीचंद व लक्ष्मीदास अशी होती. पण नानकांचे मन संसारात वा उद्योगात रमले नाही. एके दिवशी स्नानानंतर ते एका गुहेत जाऊन ध्यानाला बसले असता त्यांची समाधी लागली. पुढे तीन दिवस ते त्याच अवस्थेत होते. तेव्हा त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला. नंतर त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी घर सोडायचे ठरवले. श्रीमंतांकडे न जाता ते गोर-गरिबांच्या घरी राहिले. एका कुष्ठरोग्याची त्यांनी सेवाही केली. गुरु नानकांच्या काळात हिंदुस्थानावर बाबराचे आक्रमण झाले. तेव्हा अशा परकीयांच्या अत्याचारांपासून आपल्या देशाचे आणि संस्कृतीचे रक्षण करणे जरूर होते. त्यासाठी नानकांनी देशविदेशांचा प्रवास केला व अनेक ठिकाणी विखुरलेली संतांची वाणी एकत्र केली. त्यात सर्व धर्मांचे संत होते. पुढे शीखांचे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी आदिग्रंथ संपादित केला, तेव्हा गुरु नानकांनी जमवलेल्या संतवाणीचाही त्यात समावेश केला. महाराष्ट्रातील संत नामदेव यांचीही वचने या ग्रंथात आहेत. पुढे दहावे व शेवटचे गुरु गोविंदसिंहांनी या आदिग्रंथाला ‘ग्रंथसाहिब’ म्हणून गुरुपदावर स्थापन केले.

नानकांनी अरबस्तान, पॅलेस्टाईन, इराक, आफ्रिका, चीन, तिबेट अशा अनेक देशांत प्रवास केला. चीनमध्ये त्यांच्या आगमनाचे प्रतीक म्हणून त्या गावाचे नाव ‘नानकिंग’ असे ठेवण्यात आले.

समाजाची एकता गुरु नानकांना फार महत्त्वाची वाटे. ते म्हणत की, कुंभार जसा एकाच मातीपासून वेगवेगळ्या आकारांची भांडी बनवतो, तसेच देवाने एकाच प्रकारच्या पाच तत्त्वांपासून वेगवेगळे देह बनवले आहेत. तेव्हा त्यांच्यांत फरक कसा करता येईल? सर्व समानच आहेत. कोणी हिंदू नाही की मुसलमान नाही. धर्माचे भेद त्यांना अमान्य होते.

त्या काळी स्त्रियांची अवहेलना केली जात असे. पण गुरु नानकांना ते मान्य नव्हते. ते म्हणत, “मोठमोठ्या राजांना जी जन्म देते, त्या स्त्रीला वाईट कसे म्हणता येईल?”

त्याकाळी लोकांत संन्यास घेण्याची प्रवृत्ती होती; पण गुरु नानक म्हणत की, माणसाने मन ईश्वरचरणी ठेवावे, हातांनी मात्र संसारातील कर्तव्ये करत राहावे. गुरु नानकांना दोन मुले होती; पण त्यांनी आपल्या मुलांऐवजी त्यांचा शिष्य लहाणाजी उर्फ अंगद यास आपला वारस नेमले.

अशी कथा सांगतात की, ७ सप्टेंबर १५३९ रोजी जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांचे हिंदू व मुसलमान भक्त भांडू लागले. दोघांनाही आपल्या धर्मानुसार नानकांचे अंत्यसंकार करण्याची इच्छा होती. परंतु भक्तांनी त्यांच्या पार्थिवावरील चादर काढली, तेव्हा त्यांच्या मृतदेहाऐवजी तिथे फक्त फुले होती. ती फुले त्यांच्या हिंदू व मुसलमान शिष्यांनी वाटून घेतली आणि आपापल्या पद्धतीने त्यांचा अंत्यविधी केला.

पुढे वाचा:

Leave a Reply