प्रख्यात गायिका लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्याशी झुंज देत होत्या, त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवारी सकाळी निधन झाले. त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी ही माहिती दिली. गेल्या एक महिन्यापासून ती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारीला तिला कोरोनाची लागण झाली. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. नितीन गडकरींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘देशाचा अभिमान आणि संगीत जगतातील प्रमुख, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्या पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सर्व संगीत साधकांसाठी त्या नेहमीच प्रेरणादायी होत्या.

लता मंगेशकर यांची माहिती-Lata Mangeshkar Information in Marathi
लता मंगेशकर-Lata Mangeshkar

लता मंगेशकर यांची माहिती – Lata Mangeshkar Information in Marathi

लता मंगेशकर : दैवी स्वरांची कोकिळा (भारतरत्न 2001) (जन्म : 28.9.1929)

जिच्या स्वरांनी प्रत्येक भारतीयाला मोहून टाकले. असा एकही दिवस जात नाही की तिचे स्वर कानी पडत नाहीत. भारतीय चित्रपट संगीतात ती एका अढळस्थानी आहे. ती म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर!

लतादीदी या नावाने सुपरिचित लता मंगेशकरांना 2001 साली ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. तत्पूर्वी पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) असे सन्मानयोग लतादीदींना मिळाले.

28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौर येथे लतादीदी यांचा जन्म झाला. पं. दीनानाथ मंगेशकरांचा थोर संगीत वारसा, पं. दीनानाथ हे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते. या कुटुंबीयांचे मूळ आडनाव होते हर्डीकर; परंतु पंडितजींनी मंगेशीशी असलेलं नातं पुन्हा जोडत मंगेशकर आडनाव घेतलं. जसं आडनावाच्या बाबतीत आहे तसंच दीदींच्या नावाबाबतही घडलं. दीदींचे मूळ नाव ‘हेमा’ होते; पण पंडितजींच्या एका नाटकातील ‘लतिका’ या पात्रावरून दीदींचे नाव बदलून लता ठेवण्यात आले. पं. दीनानाथांच्या या ज्येष्ठ कन्या. हृदयनाथ, आशा, उषा आणि मीना ही लहान भावंडे.

लता मंगेशकरांचे पहिले गुरू त्यांचे पिता पं. दीनानाथ. पंडितजींच्या संगीत नाटकांमधून छोट्या लताने अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ती वयाच्या पाचव्या वर्षी. दीदींच्या शैलीत आजही पंडितजींची छाप जाणवते. तसेच कुंदनलाल सैगल यांच्याही शैलीचा पगडा दीदींवर जाणवतो. छोट्या लताने शाळेच्या पहिल्याच दिवशी सोबतच्या मैत्रिणींना गाणे शिकविण्यास प्रारंभ केला. शिक्षकांनी दीदींना रोखले. यावर ती इतकी रागावली की तिने शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला.

1942 साली पंडितजींचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा लतादीदी केवळ 13 वर्षांच्या होत्या. त्यानंतर पाचही मंगेशकर भावंडांना मास्टर विनायकांनी साथ दिली. विनायक कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक हे मंगेशकर कुटुंबीयांचे चांगले मित्र होते.

पंडितजी गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तशी दीदींवरच आली आणि त्यांनी चित्रपटांचा आसरा घेतला. त्यांचा पहिला चित्रपट (अभिनेत्री म्हणून) होता ‘पहिली मंगळागौर.’ 1942 साली हा चित्रपट आला होता आणि दीदींचे गायलेले पहिले हिंदी गीत मराठी चित्रपट ‘गजाभाऊ’ (1943) या मधील होते. गीताचे बोल होते, ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू.’

1945 साली लता मंगेशकर मुंबईत आल्या. दीदींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे उस्ताद अमानत अली खान यांच्याकडे गिरवले. 1946 साली ‘आपकी सेवा में’ हा हिंदी चित्रपट आला वसंत जोगळेकरांच्या या चित्रपटाला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते आणि दीदींचं पहिला खऱ्या अर्थाने हिंदी सिनेसृष्टीतलं गीत आलं. या गीताचे बोल होते, ‘पा लगुन कर जोरी’ इथून दीदींचा प्रवास सुरू झाला तो अव्याहतपणे आजही चालू आहे. देशाच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खान पाकिस्तानला गेले. दीदींनी मग अमानत खान, देवासवाले यांच्याकडे संगीत साधनेला प्रारंभ केला. पं. तुलसीदास शर्मा यांचेही मार्गदर्शन दीदींना काही काळ मिळाले. मास्टर विनायक यांच्या निधनानंतर गुलाम हैदर यांनी दीदींना हिंदी सिनेसृष्टीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 1948 साली त्यांनी ‘मजबूर’ या चित्रपटातून लतादीदींना संधी दिली ते गीत होतं, ‘दिल मेला तोडा.’ आरंभीच्या काळात दीदींवर नूरजहाँ यांच्या शैलीचा प्रभाव होता; पण नंतर त्यांनी आपली स्वत:ची शैली विकसित केली. हिंदी-उर्दू उच्चारांचा अभ्यास निष्ठेने केला. 1949 पासून लता मंगेशकर हे नाव पार्श्वगायनातील मुख्य प्रवाहात आलं ते अजून कायम आहे. लतादीदींचे पहिले सुपरहिट गाणे ‘महल’ (1949) या चित्रपटातील होते. मधुबालावर चित्रित गीताचे बोल होते, ‘आयेगा आनेवाला.’

हिंदी सिनेसृष्टीतील प्रत्येक संगीतकारासोबत लता मंगेशकर यांनी गाणी केली. या मध्ये अनिल बिश्वास, शंकर जयकिशन, नौशाद, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र, हेमंतकुमार, सलील चौधरी यात अपवाद होता तो फक्त ओ. पी. नय्यर यांचा. त्यांनी आशा भोसलेला प्राधान्य देत संगीत रचना केल्या.

दीदींना शास्त्रीय संगीतावर आधारित गीतांनाही तेवढाच न्याय दिला. 50 च्या दशकात या गायिकेची महानता सिद्ध होत गेली. बैजूबावरा, मुगल- ए- आजम, कोहिनूर, आग, आह, श्री 420, चोरी -चोरी, सजा, हाऊस नं 44, देवदास असे एकाहून एक सरस चित्रपटांतून पार्श्वगायन केले.

दीदींना पहिला ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’ मिळाला तो ‘आजा रे परदेसी’ या मधुमती चित्रपटातील गीताला. हा चित्रपट 1958 साली आला होता. संगीतकार होते सलील चौधरी. 60 च्या दशकात ‘दिल अपना और प्रित पराई’ हा सुपरहिट चित्रपट त्यांनी दिला. 1962 साली ‘कहीं दीप जले कही दिल’ या ‘बीस साल बाद’ या चित्रपटातील गीताने त्यांना पुन्हा फिल्मफेअर मिळवून दिले.

दीदींचे ते प्रख्यात गीत आजही रोमांच उभे करतात, डोळे पाणावतात ते गीत म्हणजे ‘ए मेरे वतन के लोगो’ प्रदीप यांच्या या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले होते. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात या गीताने अश्रू तरळले ही घटना होती 27 जून 1963 ची.

लतादीदींचा गीत प्रवास सुरू होता. एक-एक यशाचे टप्पे गाठत त्यांची अखंड संगीत सेवा सुरू होती. ‘गाईड,’ ‘ज्वेल थीफ.’ मदनमोहन यांच्या संगीत रचनेतील ‘अनपढ,’ ‘वोह कौ थी,’ ‘मेरा साया,’ इ. चित्रपट त्यांच्या स्वरांनी पुलकित केले. दीदींना स्वत: आनंदघन या नावाने संगीतकार रूपानेही आपली कलासाधना केली. सर्व प्रमुख गायकांसमवेत दीदींनी युगलगीते गायली. मुकेश, मन्नाडे, रफी, किशोरकुमार इत्यादींसोबतची अनेक गीते लोकप्रिय ठरली.

1970 च्या दशकात ‘चलते चलते,’ ‘इन्ही लोगों ने’ (पाकिजा), रंगिला रे (प्रेम पुजारी), ‘खिलते हैं गुल यहाँ,’ (शर्मिली), ‘पिया बिना’ (अभियान) ही गाणे आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. अमरप्रेम, कारवाँ, कटिपतंग, आँधी, कोरा कागज, परिचय (या चित्रपटांतील ‘बिती ना बिताये’ या गीतासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार) अशा कितीतरी चित्रपटांमधून दीदींनी गाणी अजरामर केली.

याच काळात लता मंगेशकर यांनी जाहीर कार्यक्रम सुरू केले. त्यांना प्रत्यक्ष ऐकणे ही रसिकांसाठी पर्वणीच ठरली. 1974 साली त्यांनी प्रथमच विदेशात लंडनमधील अल्बर्ट हॉलमध्ये आपली स्वरांजली सादर केली. भक्तिगीतांचे निवडक गाणी करण्यावर भर दिला. 1990 साली त्यांनी पहिला चित्रपट निर्माण केला ‘लेकिन’ या चित्रपटातील ‘यारा सिली सिली’साठी त्यांना तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. दीदींच्या नावाने अत्तराचा दरवळ पसरला. 1999 साली त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले आणि 2001 साली सर्वोच्च भारतरत्न!

लता मंगेशकर यांचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तारांकित करण्यात आले. 1974 ते 1991 या कालावधीत ‘सर्वाधिक रेकॉर्डिंग’साठी हा सन्मान लाभला. तेवढ्या काळात 25 हजार गाणी त्यांनी गायली होती.

20 भारतीय भाषांमधून त्यांनी आपल्या स्वरांनी प्रत्येक भारतीय रसिकांना मोहित केले आहे. मराठी चित्रपट ‘साधी माणसे’साठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार बहाल करण्यात आला. चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर दीदींनी स्वत: यापुढे हा पुरस्कार नव्या प्रतिभावंतांना देण्याचे सुचविले. 1993 साली त्यांना ‘फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड’ ने गौरविण्यात आले. मध्य प्रदेश शासनाने 1984 पासून त्यांच्या सन्मानार्थ ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली. तर महाराष्ट्र शासनाने 1992 पासून ‘लता मंगेशकर’ पुरस्कार सुरू केला.

एम. एस. सुब्बालक्ष्मी यांच्यानंतर प्रथमच भारतीय गायकाला हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान उपशास्त्रीय सुगम-चित्रपट. या क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रथमच लता मंगेशकर यांना देण्यात आला.

लता मंगेशकर यांचे खरे नाव काय होते?

लता मंगेशकर यांचे लाखो चाहते आहेत. पण तुमच्यापैकी फार कमी लोक असतील ज्यांना त्याच्या नावाशी संबंधित खरी कहाणी माहित असेल. खरं तर, गायकाच्या नावाचा किस्साही तिच्यासारखाच मनोरंजक होता. लतादीदींचे खरे नाव कुमारी लता दीनानाथ मंगेशकर होते. लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर होते. त्यांचे वडील मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यसंगीतकार होते.

त्यामुळेच संगीताची कला त्यांना वारसाहक्काने मिळाली. असे म्हटले जाते की लताजींचे वडील त्यांच्या वडिलांच्या बाजूपेक्षा त्यांच्या आईच्या बाजूने अधिक संलग्न होते. दीनानाथांची आई येसूबाई देवदासी होती. ती गोव्यातील ‘मंगेशी’ गावात राहायची. मंदिरात भजन-कीर्तन करून ती उदरनिर्वाह करत असे. येथूनच दीनानाथांना ‘मंगेशकर’ ही पदवी मिळाली. जन्माच्या वेळी लताजींचे नाव हेमा होते. पण एकदा वडील दीनानाथ यांनी ‘भावबंधन’ नाटकात अभिनय केला होता. ज्यामध्ये एका स्त्री पात्राचे नाव ‘लतिका’ होते.

लताजींच्या वडिलांना हे नाव इतकं आवडलं की त्यांनी पटकन आपल्या मुलीचं नाव ‘हेमा’ बदलून ‘लता’ असं ठेवलं. ही तीच छोटी ‘हेमा’ आहे, जिला आज संपूर्ण जग ‘लता मंगेशकर’ म्हणून ओळखते.

पुढे वाचा: आज लता मंगेशकर यांचे दुःखद निधन - Lata Mangeshkar Death Information Marathi

लता मंगेशकर यांची माहिती-Lata Mangeshkar Information in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply