‘जय हिंद’ ही घोषणा आपण नेहमी देतो. ही घोषणा जनतेला देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक अतिशय धाडसी आणि देशप्रेमी नेते होते. २३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन. ओरिसातील कटक या ठिकाणी १८९७ साली सुभाषचंद्रांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती होते.

लहान असल्यापासूनच सुभाषचंद्र अतिशय धीट होते. त्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज इथल्या लोकांशी उर्मटपणे वागत असत. सुभाषचंद्रांनी शाळेत असताना एका इंग्रज मुलाशी या कारणावरून झगडा केला होता. पुढे प्रेसिडेन्सी कॉलेजात शिकत असताना एका शिक्षकाने हिंदी लोकांबद्दल तुच्छतेचे उद्गार काढले म्हणून सुभाषचंद्रांनी त्यांच्या थोबाडीत दिली. या कारणासाठी त्यांना कॉलेजातून काढून टाकण्यात आले होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी-Netaji Subhash Chandra Bose information in Marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी, Netaji Subhash Chandra Bose information in Marathi

सुभाषचंद्र हुशार विद्यार्थी होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इंग्लंडमध्ये आय.सी.एस. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. सुभाषचंद्र ती परीक्षा उत्तम गुणांनी पास झाले, पण इंग्रज सरकारची नोकरी करण्यास त्यांनी नकार दिला.

इंग्लंडहून परत आल्यावर बंगालमधील अत्यंत लोकप्रिय पुढारी बॅरिस्टर चित्तरंजन दास यांच्याबरोबर सुभाषचंद्र काम करू लागले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांची एक सेना उभारली. इंग्रज सरकारने सुभाषचंद्र यांना अनेकदा तुरुंगात डांबले. तुरुंगात त्यांचे फार हाल झाले व त्यांची प्रकृती खालावली. त्यांचे येथील कार्य बंद व्हावे म्हणून सरकारने असे सुचवले की, त्यांनी उपचारांसाठी परदेशी जावे. त्याप्रमाणे सुभाषचंद्र युरोपला गेले. नंतर त्यांचे वडील अतिशय आजारी असताना सुभाषचंद्र हिंदुस्थानात परत आले पण वडिलांचा लगेचच मृत्यू झाला व सरकारने त्यांना परत युरोपला जायला लावले.

त्या काळात जर्मनीत हिटलरचे व इटलीत मुसोलिनीचे वर्चस्व होते. हे दोन्ही देश इंग्लंडचे शत्रू होते. सुभाषचंद्रांनी असा विचार केला की, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र.’ त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशांची मदत घ्यायची असे त्यांनी ठरवले.

सुभाषचंद्र परत आल्यावर सरकारने त्यांना अटक करून स्थानबद्ध केले; पण सुभाषचंद्र पठाणाचा वेश घेऊन तेथून निसटले व पेशावरमार्गे काबूलला व तेथून जर्मनीला गेले. त्यांनी हिटलरची भेट घेऊन त्याकडून मदतीचे आश्वासन मिळवले. भारतातील सैन्याचीही सहानुभूती मिळवली.

हिंदुस्थानातील एक पुढारी रासबिहारी बोस त्यावेळी जपानला होते. त्यांनी सुभाषचंद्रांना जपानला बोलावले. सुभाषचंद्र तिकडे गेले व त्यांनी जपानचीही मदत मिळवण्याचे ठरवले.

त्यानंतर सुभाषचंद्र सिंगापूरला गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र उठाव करण्याचे ठरवून ७ जुलै १९४३ला त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. अनेक लोक त्यांच्या सेनेत दाखल झाले. ‘चलो दिल्ली’ अशी घोषणा करून आझाद हिंद सेना दिल्लीकडे निघाली. सेनेत पुरुषांच्या तीन आणि स्त्रियांची एक अशा एकूण चार तुकड्या होत्या.

त्याकाळात आझाद हिंद सेनेने ‘आझाद हिंद सरकार’ स्थापन केले. ‘जय हिंद’चा नारा देत तिरंगी झेंडा फडकावला. ब्रह्मदेशात एक आझाद हिंद बँकही स्थापन केली. लोकांनी पुढे येऊन त्यांना पैसा दिला. स्त्रियांनी आपले दागिने सेनेच्या मदतीसाठी दिले.

तिथून पुढे भारताच्या दिशेने जाताना आराकानच्या जंगलात आल्यावर मात्र सेनेचे हाल होऊ लागले. पैसा संपला. इतके दिवस जर्मनी व जपानचे विजय होत होते; पण आता जर्मनीची पीछेहाट सुरू झाली. अमेरिका युद्धात उतरली. जपान हरू लागला. आझाद हिंद सेना ब्रह्मदेशात लढत होती. इंग्रज सरकारने खोटी आश्वासने देऊन आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकार्‍यांना अटक केली.

अखेरचा प्रयत्न म्हणून सुभाषचंद्र जपानच्या सम्राटाला भेटायला विमानाने टोकियोला निघाले. पण वाटेतच १८ ऑगस्ट १९४५ या दुर्दैवी दिवशी त्यांच्या विमानाला अपघात झाला. सुभाषचंद्रांचे त्या अपघातात निधन झाले असावे; पण पुढेही अनेक वर्षे लोकांना आशा होती की, सुभाषचंद्र वाचले असतील व परत येतील.

आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकार्‍यांवर इंग्रज सरकारने खटला भरला. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू व भुलाभाई देसाई यांनी या देशभक्तांचे वकीलपत्र घेतले.

आझाद हिंद सेनेने इंग्रज सरकारला मोठाच धक्का दिला. त्या सेनेच्या संस्थापकाला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपला देश कधीही विसरणार नाही.


Netaji Subhash Chandra Bose information in Marathi: सुभाषचंद्र बोस हे भारतीय इतिहासातील असे युगपुरुष आहेत ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवे वळण दिले. भारताला स्वतंत्र करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन करून इंग्रजांना धक्का दिला. सुभाषचंद्र बोस हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास आणि देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न ही अजरामर गाथा म्हणून ओळखली जाते.

सुभाषचंद्र बोस हे भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक होते, त्यांनी देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले. ओरिसाच्या बंगाली कुटुंबात जन्मलेले सुभाषचंद्र बोस हे एका संपन्न कुटुंबातील होते, परंतु त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या नावासाठी समर्पित केले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओरिसा येथील एका संपन्न बंगाली कुटुंबात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटकचे लोकप्रिय वकील होते. प्रभावती आणि जानकीनाथ बोस यांना एकूण 14 मुले होती, त्यापैकी 6 मुली आणि 8 मुले होती. सुभाषचंद्र हे त्यांचे नववे अपत्य आणि पाचवे पुत्र होते. त्यांच्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्राची सर्वाधिक ओढ होती. आज आपण या लेखात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मराठीत घेणार आहोत.

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी – Netaji Subhash Chandra Bose information in Marathi

क्रमाहिती
पूर्ण नावनेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म२३ जानेवारी १८९७
जन्म ठिकाणकटक, ओरिसा
आई वडीलप्रभावती, जानकीनाथ बोस
पत्नीएमिली (१९३७)
कन्याअनिता बोस
मृत्यू18 ऑगस्ट 1945 जपान

शहिदों की चिताओं पर जुटेंगे हर बरस मेले
वतन पर मिटने वालों का बाकी यही निशां होगा

मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले, जे शहीद झाले, हुतात्मा झाले, जे हसतमुखाने फासावर गेले, त्यांचे कायम स्मरण होत राहते. देशवासीयांच्या मनात त्यांच्याविषयी असणारी भक्तीची भावना आणि आदरयुक्त कृतज्ञता हीच त्यांची स्मृती असते, तेच त्यांचे कायम स्मारक असते. भारतमातेच्या अशाच एका महान पुत्राचे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महानायकाचे असेच चिरकालीन स्मारक प्रत्येक भारतवासीयाच्या मनात उभे आहे. ते महानायक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस!

नेताजी सुभाष चंद्र बोस 2
नेताजी सुभाष चंद्र बोस

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हजारो क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान! भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिपर्वाचे तेज:पुंज सूर्यबिंब! नेताजी सुभाषचंद्र बोस! ज्यांच्या केवळ नामोच्चाराने अंगावर रोमांच उभे राहावेत, बाहू स्फुरण पावावेत, देशासाठी जीवन सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा व्हावी, ते नेताजी! नेताजींचे संपूर्ण जीवनच धगधगते यज्ञकुंड होते. देशभक्तांची एक प्रचंड मोठी फळी नेताजींनी उभारली. मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे वेड लागलेले देशभक्त-शेवटच्या श्वासापर्यंत भारतमातेला प्रणिपात करणारे आणि पुन्हा तिच्याच उदरात जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करणारे देशभक्त!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन् आईला कळवा आमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी मुले तुझी ही या अंधारात
बद्ध करांनी शेवटचा तुजं करीत प्रणिपात
तुझ्या मुलां हे होते वेड, वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’ या अत्यंत गाजलेल्या कवितेतील या ओळी. या ओळी वाचताना मला आठवतो तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 16 ऑगस्ट, 1945 रोजी आझाद हिंद सेनेतील शूर स्वातंत्र्यसैनिकांना दिलेला संदेश. क्रूर नियतीने नेताजींचे ते शब्द शेवटचे शब्द ठरविले; पण ते शब्द सर्वार्थाने खरे ठरले. ते शब्द अजरामर झाले. सर्व बाजूंनी प्रचंड संकटांनी घेरलेले असताना नेताजींचा दुर्दम्य आशावाद त्यांच्या या संदेशातून ठळकपणे जाणवतो. नेताजी म्हणाले होते.

“तात्पुरत्या पराभवाने दबून, खचून जाऊ नका. तुमची प्रेरणा, तुमची चेतना सदा जिवंत ठेवा. भारताच्या भवितव्यावरची गाढ श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत क्षणभरही ढळू देऊ नका. भारताला गुलामगिरीत जखडू शकेल अशी एखादीही शक्ती जगाच्या पाठीवर जन्मलेली नाही. भारत स्वतंत्र होईल! भारत अजरामर राहील!”

केवढा आत्मविश्वास! असामान्य त्याग, अलौकिक पराक्रम आणि जाज्वल्य देशभक्ती याचेच दुसरे नाव – नेताजी सुभाषचंद्र बोस! निर्धाराचा महामेरू, साहसाचा सागर! शब्दांचे सामर्थ्य आणि प्रतिभेची प्रकाशकिरणेही ज्या महान जीवनासमोर नतमस्तक होऊन उभी राहतात, ती महान जीवनगाथा शब्दबद्ध करताना मन कमालीचे हळवे बनते. 1963 ते 1977 च्या दरम्यान माझे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्या काळात रस्त्यावर पडलेल्या एखाद्या वर्तमानपत्राच्या रद्दी कागदावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी काही छापलेले असेल तर तो कागद वाचून, जपून ठेवल्याचे कितीतरी प्रसंग मला आठवतात. नेताजी जिवंत आहेत, नेताजी कुठल्याही क्षणी प्रकट होतील, अशा आशयाच्या बातम्या अधूनमधून वाचनात यायच्या आणि एका आगळ्याच उमेदीने मनाचा ताबा घेतलेला असायचा.

माझ्यासारख्या लाखो युवकांची त्या काळात हीच अवस्था होती. देशविदेशातील कोट्यवधी भारतीयांना नेताजी परत यावेत, देशाचे सर्वोच्च पद त्यांनी भूषवावे असे वाटायचे. खरेच असे घडले असते तर काय झाले असते! भारताचे दुर्दैवी विभाजन टळले असते का? दुभंगलेली मने जुळली असती का? खरंच त्यांच्या नेतृत्वात ही शक्ती होती, हे सामर्थ्य होते. कदाचित त्यांच्याबद्दल असणाऱ्या आत्यंतिक भक्तीमुळे वाटत असेल; पण तसे वाटते हे मात्र खरे आहे. हिमालयासारखे उत्तुंग साहस, धबधब्याच्या प्रवाहासारखा सळसळता उत्साह, कर्ण परंपरेतील अतुलनीय त्याग आणि उत्कट देशभक्ती यांनी ओतप्रोत भरलेले, अवघ्या 49 वर्षांचे ते तेजस्वी जीवन! अनेक गूढ वलयांनी व्यापलेले, अनाकलनीय घटनांनी भरलेले! त्या जीवनाचा हा वृत्तांत.

सुभाष चंद्र बोस यांचे बालपण आणि शिक्षण

ओरिसा प्रांतातील कटक या शहरात सुप्रसिद्ध बोस कुटुंबात 23 जानेवारी, 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. सुसंस्काराचे माहेरघर असणाऱ्या प्रभावतीदेवी आणि ख्यातनाम वकील जानकीनाथ बोस हे त्यांचे आई-वडील. सुभाषचंद्राचे प्राथमिक शिक्षण कटकमधील बॅप्टिस्ट मिशनने चालविलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी 1909 मध्ये सुभाषला रेव्हेनशाँ कॉलेजिएट स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला. त्या शाळेचे मुख्याध्यापक वेणी माधवदास यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बराचसा प्रभाव सुभाषच्या बालमनावर पडला. आपल्या मुलाने उच्चशिक्षित होऊन ब्रिटिशांच्या शासनात अधिकारी व्हावे असे वडिलांना वाटत असे; पण सुभाष मात्र हायस्कूलमध्ये शिकत असतानाच ‘अनुशीलन समिती’सारख्या क्रांतिकारी संघटनेशी जोडला जात होता. खुदीराम बोसला फाशी दिल्याची बातमी वाचून त्याला रडू कोसळलं होतं. रासबिहारी बोस यांच्या मदतनिधीला त्याने सढळ हाताने मदत केली होती.

शालेय शिक्षण घेत असतानाच त्याला अवांतर वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली होती. विशेषत: विवेकानंदांचे सर्वच्या सर्व ग्रंथे त्याने वाचून काढले. विवेकानंदाजवळ असणारा दीनदुबळ्यांचा कणव सुभाषने स्वत:च्या जीवनात उतरवला होता. कटकजवळच्या एका खेड्यात पटकीची साथ आली तेव्हा दहावीच्या वर्गात शिकणारा सोळा वर्षांचा सुभाष त्या खेड्यातील गोरगरिबांच्या शुश्रूषेसाठी धावून गेला. सुभाषचे अवांतर वाचन, समाजसेवेची आवड पाहून घरच्या मंडळींना सुभाषच्या अभ्यासाची चिंता वाटायला लागली. वडिलांना तर तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण करेल किंवा नाही याची काळजी लागली होती; पण सुभाष दहावीच्या परीक्षेत संपूर्ण बंगाल प्रांतात गुणानुक्रमे दुसरा आला. वयाच्या सोळाव्या वर्षी 1913 साली सुभाषने हे प्रचंड यश संपादन केले. अचाट बुद्धिमत्ता, विलक्षण स्मरणशक्ती आणि उत्कृष्ट योजकता हे सुभाषचे विशेष गुण आणि अद्भुताची ओढ हा छंद!

उच्चशिक्षणासाठी सुभाष यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तत्त्वज्ञान हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय. सुभाष यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अभ्यासपूर्ण विवेचनशैली, भारदस्त आवाज यामुळे कॉलेजमध्ये त्यांना अनेक मित्र लाभले आणि त्या सर्वांचे नेतृत्वही त्यांच्याकडेच आले. विवेकानंदांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणे चालू होते. योगसाधना, ध्यानधारणा, मानवता, अध्यात्म, ईश्वरप्राप्ती, सद्गुरु शोध या सर्व गोष्टींचा सतत ध्यास त्यांच्या मनाला लागला. पुढे ‘विवेकानंद मेळा’ स्थापन करण्यात आला. या मेळ्याचे सर्व सदस्य सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली गुरुच्या शोधात हिमालयाकडे निघाले.

दुर्दम्य इच्छाशक्ती, अमर्याद आकांक्षा, अद्भुताची, ईश्वरशक्तीच्या साक्षात्काराची ओढ यामुळे भटकंतीला मर्यादा उरली नाही. दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, गया, काशी, हृषिकेश आणि हिमालयाच्या कडेकपारी भटकंती सुरू झाली. अनेक साधुसंतांच्या भेटी घेतल्या. भारतीय समाजातील दांभिकता, उच्चनीचता, स्पृश्य-अस्पृश्यता हे सगळे पाहून सुभाषचे मन विषण्ण झाले. शेवटी एका साधूने सांगितले, “परमेश्वर, असा डोंगराच्या कडेकपारी नसतो. तो तिथे असतो जिथे श्रमिक कष्ट करतात. स्वत:मध्ये वसत असलेल्या दिव्यत्वाचा शोध घ्या.” ܙܙ

स्वामी विवेकानंदांचेच विचार तो साधू बोलून दाखवीत होता. त्याच साधूने सुभाष आणि त्यांच्या मित्रांना कोलकात्याला परत पाठविले. पूर्ववत अभ्यास सुरु झाला. दरम्यान, कॉलेजमध्ये एक घटना घडली. प्रा. ओटन यांनी काही विद्यार्थ्यांना छड्या मारल्या. संपूर्ण विद्यार्थी वर्तुळात तो विषय चर्चिला गेला. सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. ओटन यांना घेराव घातला. धक्काबुक्की केली. सुभाष त्यांच्यासोबत नव्हता; पण तो वर्गप्रतिनिधी होता. त्यामुळे प्राचार्यांनी त्यालाच बडतर्फ केले. त्यानंतर त्यांचे एक वर्ष वाया गेले; पण सुभाषने स्वाभिमान कधीच सोडला नाही.

आय.सी.एस. चा राजीनामा

आशुतोष मुखर्जी यांच्या शिफारसपत्रावरून दुसऱ्या वर्षी सुभाषला कोलकात्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन सुभाषने 1919 मध्ये पदवी परीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण केली आणि एम.ए.चा अभ्यासही सुरु केला; पण त्यांच्या वडिलांना सारखे वाटे सुभाषने आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण करावी. केवळ वडिलांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी सुभाष इंग्लंडला गेला. केवळ आठ महिन्यांच्या अभ्यासावर सुभाष आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाला, एवढेच नव्हे तर त्या तो परीक्षेत गुणानुक्रमे चौथा आला. ब्रिटिश शासनात सनदी अधिकाऱ्याचे सर्वोच्च पद प्राप्त करून देणारी ती परीक्षा होती.

ब्रिटिशांच्या सेवेत प्रवेश करून एखाद्या सरंजामदारासारखे शाही जीवन जगणारे आय.सी.एस. अधिकारी अवतीभोवती होते; पण केवळ वडिलांच्या इच्छेखातर सुभाषने ही परीक्षा दिली होती. सरकारी नोकरी तो कुठल्याही परिस्थितीत स्वीकारणार नव्हता. आजन्म अविवाहित राहून देशवासीयांची सेवा करायची, मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे, जातिभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, अनारोग्य या ‘पंचासुरा’पासून देशाला मुक्त करायचे आणि ब्रिटिशांचे जालीम शासन देशातून हद्दपार करायचे, हा निश्चय सुभाषचंद्रांनी केव्हाच केला होता. इंग्लंडमधील वास्तव्यातच आय.सी.एस.चा राजीनामा देऊन सुभाषचंद्र बोस भारतात परतले. संपूर्ण सुखाचा, संपत्तीचा त्याग करून सुभाषचंद्रांनी हे सतीचे वाण बुद्धिपुरस्सर स्वीकारले आणि आयुष्याच्या अस्तापर्यंत ते जपले, किंबहुना स्वत:च्या संपूर्ण आयुष्याचाच होम केला.

ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाला सुरुवात

आय.सी.एस.चा त्याग करून भारतात परत आल्यानंतर त्यांनी महाकवी टागोरांच्या सूचनेनुसार मुंबईत गांधीजींची भेट घेतली. भारतीय राजकारणावर मोकळ्या मनाने त्यांच्याशी चर्चा केली. केवळ देशसेवेसाठी आय.सी.एस.चा त्याग करणारा हा तेजस्वी युवक पाहून गांधीजी प्रभावित झाले. तिथेच विठ्ठलभाई पटेल यांचा आणि सुभाषचा परिचय झाला. गांधीजींनी सुभाषला कोलकाता येथे जाऊन देशबंधू चित्तरंजनदास यांच्यासोबत कार्य करण्याचा सल्ला दिला. देशबंधू चित्तरंजनदास यांनी स्वत:ची हजारो रुपये कमाई करून देणारी वकिली सोडून देऊन स्वत:ला असहकार आंदोलन आणि स्वदेशी शिक्षणाचा प्रसार या कार्यांना वाहून घेतले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सुभाषने असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

स्वदेशी शिक्षणाच्या प्रचारासाठी कोलकाता येथे नॅशनल कॉलेजची स्थापना केली. त्या कॉलेजमधील युवकांना देशभक्तीची शिकवण देण्यासाठी सुभाषचंद्र बोस हे योग्य आहेत याची खात्री पटल्यामुळे नॅशनल कॉलेजचे प्राचार्यपद सुभाषचंद्रांना बहाल करण्यात आले. प्राचार्यपदावरून सुभाषचंद्रांनी त्या कॉलेजमध्ये शैक्षणिक सुधारणा तर केल्याच त्याचबरोबर तेथील युवकांच्या मनावर देशभक्तीचे संस्कारही केले. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा एक खूप मोठा संघटित चमूच त्यांनी तयार केला.

नेताजी सुभाष चंद्र बोस AND GANDHI

1922 साली ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ भारतभेटीवर येणार होते. जालियनवाला बागेतील हत्याकांड भारतीय जनता विसरलेली नव्हती. प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनावर बहिष्कार टाकण्याची योजना गांधीजींनी जाहीर केली. युवराजाच्या कोलकात्यातील आगमनाचा निषेध नोंदविण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी खूप मोठे स्वयंसेवक दल निर्माण केले. आय.सी.एस.चा राजीनामा दिल्यामुळे ब्रिटिश शासनाला सुभाषचंद्रांविषयी अगोदरच राग होता. त्यांनी सुभाषचंद्रांना लगेच अटक केली. चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस दोघांनाही प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सुभाष कारावासातून सुटले तेव्हा बंगाल प्रांतात नद्यांच्या महापुराने जनता हवालदिल झालेली होती.

सुभाषचंद्रांनी डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांच्यासोबत पूरग्रस्तांची सेवा केली. निर्वासितांना सर्वतोपरी मदत केली. त्याच्याच पुढच्या वर्षी चित्तरंजनदास यांनी ‘स्वराज्य पक्षा’ची स्थापना केली. पक्षाच्या प्रचारासाठी ‘फॉरवर्ड’ नावाचे मुखपत्र सुरू केले आणि त्याच्या संपादकपदाची जबाबदारी सुभाषचंद्र बोस यांच्यावर सोपवली. बंगाल प्रांतातील निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाने प्रचंड यश मिळविले. चित्तरंजनदास कोलकाता शहराचे महापौर म्हणून निवडून आले. सुभाषचंद्र बोस यांना कोलकाता महानगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचे पद देण्यात आले. सुभाषचंद्र यांनी तेथील पूर्ण प्रशासन भारतमय करून टाकले. सर्वांना खादीचा पोशाख देण्यात आला. शिक्षण विनामूल्य करण्यात आले.

ब्रिटिश अधिकाऱ्यांचे सत्कार करण्याची पद्धत बंद करण्यात आली. देशासाठी त्याग व समाजसेवा करणाऱ्यांचे सत्कार व्हायला लागले. हे सर्व पाहून ब्रिटिश अधिकारी अधिकच क्रोधीत झाले. त्यातच नोकरी भरतीसाठी सुभाषचंद्रांनी दिलेल्या जाहिरातीमुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. सुभाषबाबूंनी मुख्याधिकारी म्हणून दिलेली जाहिरात अशी होती, “ज्या देशबांधवांनी स्वदेशासाठी यातना सहन केल्या असतील, त्यांनी नोकरीसाठी कोलकाता महापालिकेकडे अर्ज करावेत.” सुभाषबाबूंनी ज्यांना नोकऱ्या दिल्या त्यांची चौकशी झाली. गोपीनाथ सहाय या क्रांतिकारकाविषयी आदरभाव व्यक्त करणारा ठराव बंगाल प्रांतिक परिषदेत पास करण्यात आला.

25 ऑक्टोबर, 1924 रोजी कोणतेही कारण न देता सुभाषचंद्र बोस यांना अटक करून अलिपूरच्या कारागृहात डांबण्यात आले. दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा संशय त्यांच्यावर व्यक्त करण्यात आला अलिपूर, बेहरामपूर आणि कोलकाता येथील कारागृहात दोन वर्षे ठेवून 25 जानेवारी, 1925 रोजी सुभाषबाबूंना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. सुभाषबाबू तुरुगांत असताना बाहेर बंगाल प्रांताच्या कायदेमंळाच्या निवडणुकीत लोकांनी त्यांना निवडून दिले. मंडालेच्या तुरुंगातील रोगट व क्लेशदायक वातावरणामुळे सुभाषबाबूंना ब्रांकोनिमोनियासारखा भयंकर आजार झाला. संपूर्ण बंगाल प्रांतात त्यांच्या सुटकेची मागणी होऊ लागली.

संपूर्ण देशभरात ब्रिटिश शासनाच्या विरोधात जनक्षोभ उफाळून येत आहे, हे पाहून ब्रिटिश शासनाने 16 मे 1927 रोजी सुभाषबाबूंची बिनशर्त मुक्तता केली. बंगालसह संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सुभाषबाबूंचे सर्वत्र स्वागत झाले. सुभाषबाबू तुरुंगात असतानाच देशबंधू चित्तरंजनदास यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूने बंगाल प्रांतात निर्माण झालेली पोकळी फक्त सुभाषबाबूच भरून काढू शकणार होते.

बंगाली जनतेने त्यांना बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्षपद बहाल केले. सर्व देश त्यांच्या उदयोन्मुख नेतृत्वाकडे आशेने पाहत होता. मद्रास येथे 1928 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सुभाषबाबूंना काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडण्यात आले. त्याच वर्षी सुभाषबाबूंनी पं. जवाहरलाल नेहरूंसोबत ‘इंडिया इंडिपेन्डन्स युथ लीग’ ही युवकांची संस्था स्थापन केली. महाराष्ट्रासह अनेक प्रांतांच्या प्रांतिक परिषदेचे अध्यक्षपद सुभाषचंद्र बोस यांना मिळाले होते. त्यांची लोकप्रियता सतत वाढत होती.

1928 साली कोलकाता येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. यात अध्यक्ष मोतीलालजी नेहरू यांनी वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मांडला. त्या ठरावाला सुभाषचंद्र बोस आणि पं. नेहरू यांनी विरोध दर्शविला. त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मांडण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांचा ठराव फेटाळला गेला. पुढे 1929 मध्ये लाहोर येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरूंना देण्यात आले. त्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. या अधिवेशनातील भाषणात सुभाषबाबूंनी संपूर्ण बहिष्काराची कल्पना मांडली. ती मागणी अधिक जहाल ठरवून नाकारण्यात आली.

नेताजी सुभाष चंद्र बोस 1
नेताजी सुभाष चंद्र बोस

26 जानेवारी, 1930 हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जावा, असेही राष्ट्रीय सभेने ठरविले. त्या दिवशी संपूर्ण स्वातंत्र्याचा जयजयकार होणार होता. सुभाषबाबूने त्यापूर्वीच प्रतिसरकारच्या स्थापनेचीही कल्पना मांडली होती. त्यांच्या जहाल विचारांचा धसका घेतलेल्या इंग्रज सरकारने त्यांना नियोजित कार्यक्रमाच्या अगोदरच अटक केली आणि अलिपूरच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. तिथे त्यांच्यावर एका वार्डरने दंडुक्याने प्रहार केला. संपूर्ण देशभर त्याचा निषेध नोंदविण्यात आला. जनतेने सुभाषबाबूंना कोलकाता महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून दिले.

महापौरपदावरून त्यांनी जनतेची नि:स्वार्थ सेवा केली. 26 जानेवारी, 1931 रोजी सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली कोलकाता शहरात एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. इंग्रज सरकारने मिरवणुकीवर लाठीहल्ला केला. सुभाषबाबू त्यात जखमी झाले. मात्र सरकारने उलट सुभाषबाबूंनाच दोषी ठरवून त्यांना सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

दरम्यान, इंग्रज सरकारने 23 मार्च, 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फासावर चढवले. संपूर्ण देशातील तरुण त्यामुळे हळहळले. सुभाषबाबूंनी या तीन क्रांतिकारकांचा जाहीर गौरव केला. भगतसिंगांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय नवजवान भारत’ सभेने खास अधिवेशन भरविले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद बहाल केले. अध्यक्षीय भाषणात सुभाषबाबूंनी समाजवाद, स्त्रियांची उन्नती, जातिसंस्थेचे निर्मूलन, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचा योजनाबद्ध कार्यक्रम, भगतसिंग यांच्या महान बलिदानाचा गौरव असे काही मुद्दे मांडले. त्यांनी गांधी-आयर्विन करारालाही विरोध दर्शविला.

1931 च्या डिसेंबर महिन्यात सुभाषबाबूंनी महाराष्ट्रात झंझावाती दौरे केले. संपूर्ण महाराष्ट्र एक नव्या चैतन्याने भारावून गेला. 1932 च्या जानेवारी महिन्यात सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. त्यांना गुप्तपणे शिवणी येथील तुरुंगात टाकले. तुरुंगातील प्रतिकूल वातावरणामुळे ते गंभीररीत्या आजारी झाले. त्यांना दररोज ताप यायचा. वारंवार भोगाव्या लागलेल्या तुरुंगवासामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांना क्षयरोगासारख्या भयंकर आजाराने ग्रासले. संपूर्ण देशभरातून त्यांच्या सुटकेची मागणी केली जात होती. शेवटी शासनाने त्यांना काही निर्बंध लादून उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली. मात्र भारतात येण्याची त्यांना परवानगी नव्हती.

1933 ते 1936 या तीन वर्षांच्या कालावधीत सुभाषबाबूंचे वास्तव्य ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे होते. प्रकृतीच्या उपचारासोबतच त्यांनी युरोप खंडातील राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. डी. व्हिलेरा, केमाल व इतर अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी जागतिक मदतीचे काही आराखडे मनात बांधले. आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास त्यांनी नीट अभ्यासला. याच दरम्यान विठ्ठलभाई पटेल यांनी सुभाषबाबूंना त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे विश्वस्त नेमले. दरम्यान, सुभाषबाबूंचे वडील जानकीनाथजी बोस अत्यवस्थ असल्याची तार त्यांना मिळाली आणि हद्दपारीचा आदेश मोडून सुभाषबाबू भारतात परतले. त्यांनी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवताच विमानतळावरच त्यांना अटक करण्यात आली आणि कडक बंदोबस्तात घरी नेण्यात आले. शेवटच्या क्षणीही वडिलांची भेट होऊ शकली नाही. त्या करुणप्रसंगीही कपटी ब्रिटिश शासनाने त्यांच्या हातात एक शासकीय आदेश सोपविला.

त्यात लिहिले होते, “आपणास, आपल्या एल्गिन रोडवरच्या घरात स्थानबद्ध करण्यात येत आहे. कुटुंबीय वगळता तुम्हाला कुणालाही भेटता येणार नाही. पत्रव्यवहार, फोन संभाषण बंद राहील.” जानकीनाथजींच्या अंत्ययात्रेला हजारोंचा समुदाय जमला होता. तिथे ‘राम नाम सत्य है’ च्या ऐवजी ‘वंदे मातरम्’चा मंत्रघोष करीत लोक चालले होते. तीन आठवड्यानंतर सुभाषबाबूंना 10 जानेवारी, 1935 रोजी पुन्हा युरोपात जावे लागले. जाताना भारतीय जनतेला त्यांनी जड अंत:करणाने निरोप दिला. स्वातंत्र्याचा लढा अधिक तीक्र करण्याचे त्यांनी आवाहन केले. युरोपात पोहोचल्याबरोबर सुभाषबाबूंनी आयर्लंडच्या स्वातंत्र्याचे प्रणेते डी.व्हेलेरा यांची भेट घेतली.

युरोपात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी कसा करून घेता येईल यासंबंधी ते विचार करू लागले. त्याचवेळी भारतात सुभाषबाबूंची प्रचंड उणीव जाणवत होती. जवाहरलाल नेहरूंनी सुभाषबाबूंवर लादलेले निबंध उठविण्याची मागणी केली. सुभाषबाबू भारतात येण्यासाठी बेचैन झाले होते. अखेर हद्दपारीचा आदेश धुडकावून सुभाषबाबू एका इटालियन बोटीने भारतात यायला निघाले. मुंबईच्या ‘अलेक्झांड्रा’ बंदरावर त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. सर्वत्र ‘वंदे मातरम्’चा जयघोष निनादत होता. स्वागतासाठी जमलेल्या लोकांना आपल्या लाडक्या नेत्याला पुष्पहारदेखील अर्पण करता आले नाहीत. बंदरावर उतरताच सुभाषबाबूंना अटक करून आर्थर रोडवरील तुरुंगात नेण्यात आले. तीनच दिवसानंतर पोलिसांनी त्यांना येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात नेऊन डांबले.

सुभाषबाबूंच्या या अटकेविरुद्ध संपूर्ण देशात प्रचंड आंदोलन छेडण्यात आले. 10 मे, 1936 हा दिन ‘सुभाष दिन’ म्हणून पाळण्यात आला. पंडित नेहरूंसह अनेक नेत्यांनी सुभाषबाबूंच्या सुटकेची मागणी रेटून धरली. जनक्षोभ लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने सुभाषबाबूंना 17 मार्च, 1937 रोजी मुक्त केले. ‘फॉरवर्ड

ब्लॉक’ची स्थापना

शिक्षण संपल्यापासून सुभाषबाबू सतत स्वातंत्र्यलढ्यात प्राणपणाने सहभागी झालेले होते. सतत तुरुंगवास, अटक, छळ, हालअपेष्टा, वैयक्तिक सुखाचा संपूर्ण त्याग सुभाषबाबूंनी सहन केला होता. त्यांची लोकप्रियता परमोच्च शिखरावर पोहोचलेली होती. काँग्रेस अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना मिळावा, अशी सर्वांची अपेक्षा होती. 19 फेब्रुवारी, 1938 रोजी हरिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या दिवशी अध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण हे त्यांच्या वैचारिक बैठकीचे संपूर्ण दर्शन घडविणारे होते. समाजवादाचा पुरस्कार, साम्राज्यवादाचा विरोध, जगातील परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांची सत्ता भारतातून संपुष्टात आणण्याचे निकराचे प्रयत्न, इंग्रजांच्या फोडा आणि झोडा नीतीची निंदा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव, सर्वांना समान हक्क असे अनेक महत्त्वाचे मुद्दे सुभाषबाबूंनी या भाषणात विस्ताराने मांडले.

नेताजी सुभाष चंद्र बोस

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुभाषबाबूंनी सबंध देशभर झंझावाती दौरे केले. काँग्रेसने जहाल भूमिका घ्यावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळेच 1939 च्या त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात गांधीजींचा विरोध असूनही सुभाषबाबूंनी पट्टाभिसितारामय्या यांचा पराभव केला आणि ते पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर सुभाषबाबूंना जहाल ठरवून काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे दिले. त्या वेळी सुभाषबाबूंना 103 डिग्री ताप असूनही ते अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यांचे भाषण शरद बोस यांनी वाचून दाखविले. ते अत्यंत संतुलित भाषण होते. काँग्रेसचे ऐक्य अबाधित राहावे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला होता. गांधीजींबद्दल त्या भाषणात त्यांनी अत्यंत आदराची भावना व्यक्त केली होती.

संपूर्ण स्वातंत्र्याची निर्वाणीची मागणी ब्रिटिश शासनाकडे करावी, त्यासाठी त्यांना ठराविक कालमर्यादा द्यावी. संपूर्ण स्वातंत्र्य दिले नाही तर त्यासाठी देशव्यापी सत्याग्रह आणि लढा उभारावा, जगातील राजकीय परिस्थितीचा फायदा घ्यावा असे मुद्दे सुभाषबाबूंनी मांडले होते. सुभाषबाबूंनी सुचविलेला हा निकराचा लढा काँग्रेसने पुढे 1942 मध्ये उभारला; पण 1939 च्या या अधिवेशनात मात्र सुभाषबाबूंना जहाल ठरविण्यात आले. ज्या दुर्दैवी पद्धतीने त्यांना एकाकी पाडण्यात आले, त्यामुळे पुढचा इतिहास बदलला. सुभाषबाबूंनी नाइलाजास्तव ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना केली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढा तीक्र केला.

मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रांत अशा सर्व प्रांतांत फॉरवर्ड ब्लॉकच्या सभा झाल्या. सुभाषबाबूंसोबत काँग्रेसमधील पुरोगामी नेते आणि सेनापती बापट, श्री. कामत, कॉ. रुईकर, सरदार शार्दुलसिंग व इतर कार्यकर्ते कार्यरत होते. फॉरवर्ड ब्लॉकच्या रामगड येथील अधिवेशनात राष्ट्रव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.

1940 मध्ये नागपूरच्या अधिवेशनात अस्थायी सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण देशभरातून सुभाषबाबूंच्या सभांना लाखो लोक जमू लागले. ब्रिटिश शासनाने सुभाषबाबूंना लगेच अटक केली. “The Day of Reckoning’ या लेखाचे कारण सांगून अटक झाली असली तरी खरे कारण मात्र वेगळेच होते. ब्रिटिश शासनाला सुभाषबाबूंची धास्ती वाटत होती हे खरे कारण होते. युद्ध सुरू झाले होते. युद्धासंबंधीचे सुभाषबाबूंचे आराखडे ठरलेले होते. युद्धाचा फायदा घेऊन ब्रिटिशांना भारतातून कायमचे पाठविण्याचे आंदोलन अधिक प्रखर करण्याची भाषा सुभाषबाबू करीत होते.

सुभाषबाबूंनी पत्रके काढून स्वत:च्या अटकेचा विरोध केला. “माझ्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी कार्य करता येत नसेल तर मी जगून काय करणार आहे. माझी मुक्तता केली नाही तर मी अन्नत्याग करून प्राणार्पण करीन,” असे त्यांनी जाहीर केले. सुभाषबाबूंची लोकप्रियता ब्रिटिश शासनाला माहीत होती. जनक्षोभाला सामोरे जाणे त्यांना शक्य नव्हते. सरकारने सुभाषबाबूंना 5 डिसेंबर, 1940 रोजी मुक्त केले आणि कलकत्ता येथील त्यांच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवले. हा क्रांतिसूर्य शांतपणे स्थानबद्ध कसा होऊ शकेल? एका कवीने म्हटलेच आहे – बंदिस्त राहतो का नरसिंह नित्य मुक्त क्रांतीच जन्म त्याचा, क्रांतीच एक सत्य

अलौकिक पराक्रम

स्थानबद्ध असताना सुभाषबाबूंनी भविष्यातील योजनांची आखणी करायला सुरुवात केली. आपण आता ज्ञानसाधना करीत आहोत, त्यामुळे कोणालाही भेटणार नाही, अशी बातमी त्यांनी सर्वत्र प्रसारित केली. किरकोळ पत्रव्यवहार आणि काही महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत असे भासविण्यात आले. 19 जानेवारी 1941 रोजी पठाणाचा पोशाख करून झियाउद्दीन हे नाव धारण करून सुभाषबाबू स्वत:च्या घरातून अदृश्य झाले. सोबत भगतराम तलवार हा एक मित्र तेवढा होता.

26 जानेवारी 1941 रोजी ही बातमी सर्वत्र झळकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वत:ची आग्र्याहून सुटका करून घेतली होती त्याच पद्धतीने सुभाषबाबू नजरकैदेतून निसटले. सुभाषबाबू कुठे गेले याबद्दल तर्कवितर्क लढविले गेले. प्रत्यक्षात मात्र सुभाषबाबू एका खाजगी मोटारीने चाळीस मैल अंतरावरील एका छोट्याशा स्टेशनवरून फ्रांटियर मेलमध्ये बसले.

17 जानेवारीला ते पेशावरला पोहोचले. तिथून जमरूदपर्यंत मोटारीने आणि पुढे पायी चालत जाऊन त्यांनी काबूल शहर गाठले. काबूल शहरात लालचंद उत्तमचंद या व्यापाऱ्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. हा दोन ते तीन महिन्यांचा कालावधी सुभाषबाबूंसाठी एक अग्निदिव्यच मानावा लागेल. त्यांचे बुद्धिकौशल्य, साहस, जिद्द, निर्धार, ध्येयनिष्ठ या सर्वच गुणांचे भव्यदिव्य स्वरूप या काळातील त्यांच्या संकटमय प्रवासात दिसून आले. त्यांच्या अत्यंत रोमांचकारी जीवनाला आता सुरुवात झाली होती. काबूलमधून खरे तर सुभाषबाबूंना रशियाला जायचे होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी रशियाची मदत घ्यायची होती; पण रशियन वकिलातीने ते सुभाषचंद्र बोस आहेत हे त्यांचे म्हणणे स्वीकारले नाही. अधिक वेळ वाया जाऊ नये म्हणून सुभाषबाबूंनी जर्मनीतच प्रत्यक्ष कार्य सुरु केले.

जर्मनीतील हिंदी लोकांना त्यांनी संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले. ब्रिटिश शासनाविरुद्ध सशस्त्र लढा देण्याचे आता सुभाषबाबूंनी निश्चित केले होते. बर्लिन आकाशवाणीवरून भारतीय जनतेने त्यांच्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ आणि ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा ऐकल्या. सर्वत्र आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले. बर्लिन रेडिओवरून सुभाषबाबू भारतातील आणि भारताबाहेरील सर्व भारतीयांना संघटित करून ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्याचे आवाहन करीत होते. सुभाषबाबूंनी हिटलर आणि मुसोलिनी दोघांचीही भेट घेतली; पण अपेक्षित मदत मिळाली नाही.

‘भारतीय स्वातंत्र्य’ हे सुभाषबाबूंचे एकमेव ध्येय होते. त्यासाठी ते कुणाचीही मदत घ्यायला तयार होते; पण त्यांनी कोणाचीही, कोणतीही जाचक किंवा देशाला घातक असणारी अट स्वीकारली नाही हे आता सिद्धच झाले आहे. जर्मनीशी मैत्री करताना त्यांनी एक सरळ आणि स्पष्ट सूत्र वापरले होते. ते सूत्र होते – ‘ब्रिटनचे शत्रू ते आपले मित्र.’ बहादूरशहा जफर यांनी ब्रिटिशांना दिलेले एक आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केले. बहादूरशहा म्हणाले होते –

गाजियो में जबतलक
बू रहेगी इमान की
तब तो लंदन तक चलेगी
तेग हिंदुस्तान की.

आझाद हिंद सेनेचा साहसपूर्ण लढा

खरोखरच लंडनला गदगदा हलवून सोडणारा सामर्थ्यशाली स्वातंत्र्यलढा सुभाषबाबूंनी उभारला. जर्मनीकडून पराभूत झालेल्या ब्रिटिशांच्या फौजेतील भारतीय सैनिकांना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या शिपायांना घेऊन सुभाषबाबूंची पहिली आझाद हिंद फौज जर्मनमधील ड्रेस्टन येथे उभी राहिली. तो शुभ दिन होता 26 जानेवारी, 1942. आपला सध्याचा प्रजासत्ताक दिन! या फौजेचे नेतृत्व करण्यासाठी स्वत: सुभाषबाबूंनी एक वर्षभर लष्करी शिक्षण घेतले. सुभाषचंद्र बोस यांच्या उदात्त हेतूवर संशय घेणाऱ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की, स्वत: हिटलरने सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख ‘स्वतंत्र हिंदुस्थानचे अध्यक्ष हिज एक्सलन्स सुभाष’ अशा शब्दांत केला होता. या सशस्त्र लढ्यामागील नेताजींचा उद्देश स्पष्ट व्हावा म्हणून त्यांनी जून 1942 मध्ये बर्लिन आकाशवाणीवरून केलेल्या भाषणातील छोटासा अंश इथे देत आहे.

नेताजी म्हणाले होते, “बहादूर सैनिकांनो, शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढण्याची शपथ तुम्ही आज तिरंगी झेंड्याच्या साक्षीने घेतली आहे. तुम्ही स्वत: होऊन आपल्या चाळीस कोटी देशबांधवांची जबाबदारी शिरावर घेतली आहे… मातृभूमीच्या चरणी सेवा रुजू करण्याची दैवदुर्लभ संधीही तुम्हाला लाभली आहे… जरी आपण परकीय भूमीवर असलो तरी आपली मने आणि हृदये भारतभूमीवर आहेत… एक दिवस असा उगवेल की, याच तिरंगी झेंड्याला दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तुम्ही गर्वाने मानवंदना द्याल.”

नेताजी सुभाष जरी जर्मनीत असले तरी भारतातील प्रत्येक घटनेवर त्यांचे संपूर्ण लक्ष होते. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी नेताजी सुभाष यांची भाषणे सुरुवातीला बर्लिन नभोवाणीवरून व नंतर पूर्वतील नभोवाणीवरून सतत चालू होती. त्या भाषणापासून भारतातील हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी प्रेरणा घेतली होती.

तिकडे जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी ‘आझाद हिंद’ सेनेची स्थापना केली होती. त्यात प्रामुख्याने जपानला शरण गेलेल्या ब्रिटिशांच्या फौजेतील भारतीय शिपाई होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हेच या आझाद हिंद सेनेला योग्य नेतृत्व देऊ शकतील याची खात्री असल्यामुळेच रासबिहारी बोस यांनी नेताजींना जपानमध्ये येण्याची विनंती केली.

बँकॉक येथे जून 1942 मध्ये भरलेल्या पूर्व आशियायी भारतीयांच्या परिषदेत ही विनंती नेताजींना करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेपर्यंत जर्मन ‘यू’ बोटीने आणि त्यानंतर जपानमधील पेगैंगपर्यंत जपानी पानबुडीने साहसपूर्ण प्रवास करून नेताजी जपानला आले. पेनँग ते टोकिओ हा प्रवास विमानाने करून नेताजी 16 मे, 1943 रोजी जपानमधील आझाद हिंद फौजेसमोर दाखल झाले. आझाद हिंद फौजेत प्रचंड उत्साहाला उधाण आले. आझाद हिंद सेनेच्या जवानांसह सुभाषबाबूंनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा हा अनेक साहसांनी, प्रचंड पराक्रमाच्या अनेक गाथांनी, कारुण्यमय घटनांनी भरलेला असा लढा आहे. जाज्वल्य देशभक्तीचा प्रत्यय आणून देणारे असंख्य प्रसंग, निर्धार आणि निष्ठा यांचा साक्षात्कार घडविणाऱ्या अनेक प्रसंगांनी हा रोमांचकारी लढा भरलेला आहे. तो एक स्वतंत्र कादंबरीचा विषय आहे. काही मोजक्या घटना मी इथे देत आहे.

1943 ते 1945 या कालावधीत नेताजी सुभाष यांनी स्वातंत्र्यलढ्याची दुसरी आघाडी उघडली. सनदशीर मार्गाने स्वदेशात त्यांनी जो स्वातंत्र्यलढा उभारला होता त्या लढ्याने ब्रिटिश शासन खिळखिळे झाले होते. या दुसऱ्या सशस्त्र लढ्यामुळे ते हादरून गेले. भारतमाता स्वतंत्र होईल असा आत्मविश्वास नेताजी त्यांच्या प्रत्येक भाषणातून व्यक्त करीत होते. नेताजींच्या आवेशपूर्ण भावनांनी प्रभावित होऊन हजारो युवक-युवती आझाद हिंद सेनेत भरती झाले. कु. लक्ष्मी स्वामिनाथन, जानकी दावर यासारख्या अनेक युवतींनी स्वयंस्फूर्तीने आझाद हिंद सेनेत प्रवेश मिळविला.

पूर्वेकडील देशात राहणाऱ्या हजारो भारतीयांनी आपले तनमनधन नेताजींच्या आझाद हिंद सेनेला अर्पण केले. एका पारड्यात नेताजींना बसवून दुसऱ्या पारड्यात स्वत:चे सौभाग्य अलंकार टाकून, त्याची तुला करून त्यांनी आझाद हिंद फौजेला अर्पण केली. गरीब, श्रीमंत, म्हातारे, तरुण, स्त्री-पुरुष सर्व आपले सर्वस्व अर्पण करायला सिद्ध झाले. स्वातंत्र्ययुद्धाची पहिली महिला सेना कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली नेताजींनी उभारली. जात, धर्म, पंथ, भाषा हे सर्व भेद विसरून जाऊन ‘वंदे मातरम्’, ‘चलो दिल्ली’ या घोषणा देत पुढे जाणारी देशभक्तीने भारावलेली ती फौज होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवनाच्या शेवटच्या सापर्यंत लढण्याचा निर्धार प्रत्येकाने व्यक्त केलेला.

या फौजांची विजयी आगेकूच चालू होती. 21 ऑक्टोबर, 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार’ ची स्थापना करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या या हंगामी शासनाला जपान, जर्मनी, ब्रह्मदेश, इटलीसह एकूण अकरा देशांनी मान्यता दिली. याप्रसंगी नेताजींनी केलेल्या भावपूर्ण भाषणातील फक्त एकच वाक्य इथे उद्धृत करीत आहे. नेताजी म्हणाले, “शस्त्रबद्ध आणि कटिबद्ध होऊन आम्ही व आमचे बहादूर सहकारी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या सौख्यासाठी आणि जगामध्ये तिची मान उंचावण्यासाठी आत्मसमर्पणाची शपथ घेत आहोत.” या आझाद सरकारचे आझाद मंत्रिमंडळही होते. या सरकारने इंग्लंडविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धाची घोषणा केली. स्वत:ची तिकिटे आणि नोटाही काढल्या. जपानने जिंकलेली अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींच्या ‘आझाद हिंद सरकार’ला बहाल केली. नेताजींनी त्या बेटांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद बेट’ आणि ‘स्वराज्य बेट’ असे केले.

ब्रह्मदेशातून आझाद हिंद सेनेने भारताच्या दिशेने आगेकूच केले. ‘चलो दिल्ली’, ‘दिल्ली अब दूर नहीं’, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ या नेताजींच्या घोषणा सर्वत्र निनादत होत्या. भारताच्या भूमीवर पाऊल ठेवताच ‘आझाद हिंद सेने’तील सैनिक आनंदाने नाचायला लागले. यांनी भारताचा ‘तिरंगी झेंडा’ उंच फडकावला. ‘चलो दिल्ली’च्या घोषणेने आसमंत दणाणून गेले.

18 मार्च, 1944 हा तो शुभदिन होता. आपल्या सर्व शूर शिपायांसोबत नेताजी प्रत्यक्ष युद्धाच्या आघाडीवर असायचे. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या पराभवासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेले होते. आझाद हिंद सेनेला प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता. अन्नपाण्याचा, शस्त्रास्त्रांचा तुटवडा, शबूंचे प्रचंड सैन्यबळ अशा अनेक समस्या समोर होत्या; परंतु स्वातंत्र्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मनाशी बाळगून प्रत्येक शिपाई लढत होता. कंदमुळं खाऊन शिपाई लढत होते. नेताजींचे स्फूर्तिदायक शब्द त्यांना प्रेरणा देत होते. त्याच वेळी नेताजी रंगून आकाशवाणीवरून भारतीय जनतेला स्वातंत्र्यलढा नेटाने चालू ठेवण्याचे आणि कुठल्याही परिस्थितीत फाळणी न स्वीकारण्याचे आवाहन करीत होते.

भारतातून मिळविलेल्या आर्थिक आणि लष्करी मदतीच्या बळावर असंख्य अंदाज! कित्येक वर्षांपर्यंत भारतीय जनतेच्या मनाचे पाखरू आशेच्या आकाशात घिरट्या घालीत होते; पण ते वास्तव शेवटी देशाला पचवावे लागले. सर्व चौकशी समित्यांनी नेताजी विमान अपघातात गेले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. एक महान आत्म्याचे महानिर्वाण-महाबलिदान! नेताजी सुभाष यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी जपानी मदत घेतली म्हणून त्यांच्या कार्याचे मोल कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केवळ दुर्दैवीच मानावा लागेल.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे काही एखादे अविचारी लष्करप्रमुख नव्हते. आय.सी.एस.च्या परीक्षेत सबंध इंग्लंडमध्ये गुणानुक्रमे चौथा क्रमांक सहज मिळविणारे व त्याचा त्याग करणारे एक अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले विद्वान! स्वातंत्र्य, समता, बंधुता या महान तत्त्वांचा पुरस्कार करणारे एक महान लोकनेता! नि:धर्मी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ, बलदंड, सुसंस्कृत, साम्यवादी, लोकशाहीप्रधान, श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी धडपडणारे द्रष्टे राजकारणी! स्वत:च्या प्राणापेक्षाही मातृभूमीवर नितांत प्रेम करणारे देशभक्त! अशी त्यांची प्रतिमा होती.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच ते जगले आणि त्या प्रयत्नातच त्यांचा अंत झाला. उपोषणे, आंदोलने, निदर्शने यापासून ते ते सशस्त्र क्रांतीपर्यंतच्या सर्व मार्गांचा त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अवलंब केला. गांधीजींपासून हिटलरपर्यंत सर्वांचेच सहकार्य घेतले. भारताचे स्वातंत्र्य हे एकच उदात्त ध्येय त्यांनी ठरविले होते. त्यांचे नाव उच्चारताच सहज बोल उठतात.

तो क्रांतिसूर्य लढला – करण्यास मुक्त माता
क्रांतीच श्वास त्याचा – क्रांतीच स्फूर्तिदाता
ब्रिटिशांस धाक त्याच्या – आझाद सैनिकांचा
काहूर या मनाला – त्याचीच स्फूर्ती गाथा

सुभाष चंद्र बोस जयंती 2022

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारीला झाला होता, म्हणून हा दिवस दरवर्षी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 2022 मध्ये, 23 जानेवारी हा त्यांचा 124 वा वाढदिवस म्हणून साजरा केला जाईल.

नेता सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल मनोरंजक माहिती

  • 1942 मध्ये नेते सुभाषचंद्र बोस हिटलरकडे गेले आणि त्यांनी त्यांच्यासमोर भारताला स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु हिटलरला भारत मुक्त करण्यात रस नव्हता आणि त्याने नेताजींना कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
  • सुभाषचंद्र बोस जी यांना स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांना वाचवायचे होते आणि त्यांनी गांधीजींना इंग्रजांना दिलेले वचन मोडण्यास सांगितले, परंतु ते त्यांच्या उद्दिष्टात अयशस्वी झाले.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय नागरी परीक्षेत चौथा क्रमांक पटकावला होता, पण देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करता त्यांनी ही आरामदायी नोकरीही सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
  • जालियनवाला बाग हत्याकांडाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून नेताजी खूप प्रभावित झाले आणि नंतर ते स्वतःला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यापासून रोखू शकले नाहीत.
  • 1943 मध्ये नेताजींनी बर्लिनमध्ये आझाद हिंद रेडिओ आणि फ्री इंडिया सेंट्रलची यशस्वी स्थापना केली.
  • 1943 मध्येच आझाद हिंद बँकेने 10 रुपयांच्या नाण्यापासून ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या नोटा जारी केल्या होत्या आणि एक लाख रुपयांच्या नोटेवर नेते सुभाष चंद्रजींचे चित्रही छापण्यात आले होते.
  • नेताजींनीच महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते.
  • सुभाषचंद्र बोस यांना 1921 ते 1941 या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात 11 वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
  • नेते सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी दोनदा निवडून आले.
  • नेते सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजपर्यंत एक गूढच राहिला आहे आणि त्यावरून आजपर्यंत कोणताही पडदा उचलला गेला नाही आणि भारत सरकारही या विषयावर चर्चा करू इच्छित नाही.

नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी-Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न.१ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला?

उत्तर – २३ जानेवारी १८९७

प्रश्न.२ सुभाषचंद्र बोस यांना नेताजी का म्हणतात?

उत्तर – सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा, की त्यांनी भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचे जोरदार समर्थन केले. 1942 मध्ये आझाद हिंद फौजेच्या भारतीय सैनिकांनी जर्मनीत त्यांना ‘नेताजी’ ही पदवी मिळवून दिली. ते देशाचे एक महान आणि शूर नेते होते, जे नेताजींच्या नावाने त्यांच्या कठोर संघर्षासाठी प्रसिद्ध होते.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply