१२ जानेवारी १८६३ रोजी बंगालमध्ये दत्त कुटुंबात विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. त्यांचे वडील विश्वनाथबाबू. ते वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरीदेवी धार्मिक प्रवृत्तीची होती. आईच्या धार्मिकतेचा प्रभाव नरेंद्रनाथांवर लहानपणापासूनच पडला.

बी.ए. पास झाल्यावर नरेंद्रनाथांनी कायद्याचे शिक्षण घ्यायचे ठरवले; पण वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्यांचे शिक्षण पुरे होऊ शकले नाही. याच वेळी त्यांची गाठ रामकृष्ण परमहंसांशी पडली. या भेटीने नरेंद्रनाथांचे सारे आयुष्यच बदलून गेले.

स्वामी विवेकानंद माहिती मराठी–Swami Vivekananda Information in Marathi
स्वामी विवेकानंद माहिती मराठी, Swami Vivekananda Information in Marathi

रामकृष्ण परमहंस कालीमातेचे भक्त होते. नरेंद्रनाथांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. नरेंद्रनाथांना कालीमातेच्या दर्शनाची ओढ लागली होती. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना देवीचा साक्षात्कार घडवला. त्यानंतर रामकृष्णांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली.

नरेंद्रनाथांनी आता विवेकानंद हे नाव धारण केले, भगवा वेष घालणे सुरू केले. विवेकानंदांची प्रकृती अतिशय उत्तम होती. ते दिसायलाही अतिशय देखणे होते. त्यात आता त्यांच्या चेहर्‍यावर ज्ञानाचे तेज दिसू लागले.

रामकृष्णांनी त्यांना सांगितले की, जगाला खर्‍या धर्माची ओळख करून देण्याचे कार्य तू करायचे आहेस. रामकृष्णांच्या निधनानंतर विवेकानंद सार्‍या देशभर हिंडले. त्यांनी देशातल्या परिस्थितीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपले राष्ट्र आत्मविश्वास गमावून बसले आहे. विवेकानंदांना दुबळेपणाची, आळसाची चीड होती. माणसाने कष्ट केले पाहिजेत, शक्तीची उपासना केली पाहिजे असे त्यांना वाटे.

वयाच्या तिसाव्या वर्षी १८९३मध्ये विवेकानंद अमेरिकेत शिकागो येथे सर्वधर्म परिषदेला हजर राहिले. तेथे अनेकांची भाषणे झाली. दुपारनंतर स्वामीजींची पाळी आली. विवेकानंद बोलायला उभे राहिले. त्यांच्या भगव्या रंगाच्या पोशाखाकडे पाहूनच अनेकांची मने भारावल्यासारखी झाली. त्यांच्या तोंडून गोड पण खणखणीत शब्द बाहेर पडले,

“माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो!”

हे शब्द ऐकताच श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते साधे शब्द नव्हते. त्या शब्दांमागे त्याग, तपश्चर्या, प्रेम या गोष्टी होत्या. त्यामुळे ते शब्द ऐकताच लोकांना असे वाटले की, आपल्या देहात विजेचा संचार झाला आहे. अगदी भारावल्यासारखे होऊन ते पुढील भाषण ऐकू लागले.

“आज तुम्ही माझे इतक्या प्रेमाने स्वागत केले आहे. मी तुम्हांला माझ्यातर्फे तर धन्यवाद देतोच पण जगातील अतिप्राचीन अशा संन्यासी पंथाचा प्रतिनिधी म्हणूनही मी तुमचे आभार मानतो. अनेक धर्माचे आदिपीठ असा जो सनातन हिंदूधर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुमचे आभार मानतो. सगळ्या पृथ्वीवरील सगळ्या वर्णांच्या आणि संप्रदायांच्या कोटी कोटी स्त्री-पुरुषांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.

“माझ्यापूर्वी ज्या वक्त्यांनी सहिष्णुतेचे मोठेपण वर्णन केले, त्यांचे मी आभार मानतो. माझा धर्म सगळ्या जगाला नेहमी सहिष्णुता शिकवीत आला आहे. जगातील सर्वच पंथांना आमचा धर्म चांगला म्हणतो. इतर धर्मांविषयी आम्ही नुसती सहिष्णुताच बाळगत नाही; तर आम्हांला ते सगळेच धर्म खरे वाटतात.

“लाखो हिंदू स्त्री-पुरुष शिवमहिम्न नावाचे एक स्तोत्र म्हणत असतात. त्यातील दोन ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनाना पथजुप्पाम्
नृणाम् एको गम्यः त्वमसि पयसामर्णव इव।

“म्हणजे निरनिराळ्या ठिकाणांहून निघणारे निरनिराळे नदीनाले ज्याप्रमाणे समुद्रात मिळून एक होऊन जातात त्याप्रमाणे आपापल्या आवडीनुसार निरनिराळ्या पंथांनी जाणारे भक्तिमार्गाचे वाटसरू, हे ईश्वरा, शेवटी तुलाच येऊन मिळतात…”

विवेकानंदांनी आपल्या गुरूकडून अध्यात्माचे ज्ञान मिळवले होते; पण आता अमेरिकेतून परत आल्यावर आपल्या वैदिक धर्माचा प्रचार करायचा असे त्यांनी ठरवले. आपल्या देशातल्या दरिद्री-नारायणाची सेवा करायची अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. देशात ठिकठिकाणी अद्वैताश्रम व सेवाश्रम स्थापन केले. यामुळे सुशिक्षित लोक आणि विद्यार्थी आपल्या कार्याकडे ओढले जातील, त्यांच्यांत आत्मगौरव निर्माण होईल असे त्यांना वाटत होते.

त्यांचे कार्य आजही चालू आहे. रामकृष्ण मिशनचे स्वयंसेवक देशात ठिकठिकाणी जनसेवेचे कार्य करतात.

‘भारताचा राष्ट्रभक्त संत’ अशा उचित शब्दांत लोकमान्य टिळकांनी विवेकानंदांचा गौरव केला होता. ‘उठा, जागे व्हा आणि कार्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका’ असा विवेकानंदांचा संदेश आहे.

कन्याकुमारी येथे विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.


Swami Vivekananda Information in Marathi: स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. १८९३ मध्ये शिकागो, अमेरिका येथे भरलेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंदांच्या वक्तृत्वामुळेच भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोपातील प्रत्येक देशात पोहोचला. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती जी अजूनही कार्यरत आहे. ते रामकृष्ण परमहंस यांचे सक्षम शिष्य होते. शिकागो मधील “माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिणींनु” त्यांच्या संबोधनातील या पहिल्याच वाक्याने सर्वांची मने जिंकली.

स्वामी विवेकानंद माहिती मराठी – Swami Vivekananda Information in Marathi

Table of Contents

“उठा, जागे व्हा आणि अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत ध्येयपथावर चालत राहा, थांबू नका.” हा संदेश भारतीय युवकांना देणारा तेजस्वी महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद! संपूर्ण जगात एक नवे आध्यात्मिक चैतन्य फुलविणारा हा स्फूर्तिस्रोत! भारतीय तत्त्वज्ञानात अंतर्भूत असणारी मानवतेची शिकवण जनमानसात रुजविणारा एक महामानव! एक आगळीवेगळी अनुभूती, स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला दिली. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या दलदलीतून भारतीय समाजाला बाहेर काढले. प्रेमाचा अखंड स्रोत दु:खितांच्या दु:खावर फुकर घालण्यासाठी त्यांनी प्रवाहित केला. आसेतुहिमाचल भारताच्या प्रत्येक प्रांतात भ्रमण करून दु:खितांना दिलासा दिला. अभिजनांना अध्यात्माच्या अधिष्ठानाने अनुग्रहित केले. निराधारांचा आधार बनण्याची प्रेरणा त्यांना दिली. पाश्चिमात्य देशातील लोकांना भारतीय तत्त्वज्ञान सांगून प्रभावित करण्याचे कार्य सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनीच केले.

तारीखजीवन प्रवास
12 जानेवारी 1863कलकत्ता येथे जन्म
1879प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश
1880महासभा संस्थेत प्रवेश केला
नोव्हेंबर 1881श्रीरामकृष्णासोबत पहिली भेट
1882-86श्री रामकृष्णाशी संबंधित
1884पदवीधर परीक्षा उत्तीर्ण; वडिलांचा मृत्यू
1885श्री रामकृष्ण यांचा शेवटचा आजार
16 ऑगस्ट 1886श्री रामकृष्ण यांचे निधन
1886राह नगर मठाची स्थापना
जानेवारी 1887वराह नगर मठात संन्यासाचे औपचारिक व्रत
1890-93परिव्राजक म्हणून भारत दौरा
25 डिसेंबर 1892कन्याकुमारी येथे
13 फेब्रुवारी 1893सिकंदराबाद येथे पहिले जाहीर व्याख्यान
31 मे 1893मुंबई सोडून अमेरिकेला
25 जुलै 1893कॅनडातील व्हँकुव्हर येथे आगमन
30 जुलै 1893शिकागो येथे आगमन
ऑगस्ट 1893हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा. जॉन राइटशी भेट
11 सप्टेंबर 1893जागतिक धर्म परिषदेत पहिले व्याख्यान, शिकागो
27 सप्टेंबर 1893जागतिक धर्म परिषदेत अंतिम व्याख्यान, शिकागो
16 मे 1894हार्वर्ड विद्यापीठात भाषण
नोव्हेंबर 1894न्यूयॉर्कमध्ये वेदांत समितीची स्थापना
जानेवारी 1895न्यूयॉर्कमध्ये धार्मिक वर्ग सुरू झाले
ऑगस्ट 1895पॅरिसमध्ये
ऑक्टोबर 1895लंडनमध्ये व्याख्यान
6 डिसेंबर 1895न्यूयॉर्कला परत
मार्च 22-25, 1896लंडनला परत
मे-जुलै 1896हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यान
15 एप्रिल 1896लंडनला परत
मे-जुलै 1896लंडनमधील धार्मिक वर्ग
मे 28, 1896ऑक्सफर्ड येथे मॅक्स म्युलरशी भेट
डिसेंबर 30, 1896नेपल्स ते भारत
15 जानेवारी 1897कोलंबो, श्रीलंकेत आगमन
6-15 फेब्रुवारी 1897मद्रासमध्ये
19 फेब्रुवारी 1897कलकत्ता येथे आगमन
1 मे 1897रामकृष्ण मिशनची स्थापना
मे-डिसेंबर 1897उत्तर भारताला भेट
जानेवारी 1897कलकत्त्याला परत
19 मार्च 1899मायावतींच्या अद्वैत आश्रमाची स्थापना
20 जून 1899पश्चिमेला दुसरी भेट
31 जुलै 1899न्यूयॉर्कमध्ये आगमन
22 फेब्रुवारी 1900सॅन फ्रान्सिस्को येथे वेदांत समितीची स्थापना
जून 1900न्यूयॉर्कमधील शेवटचा वर्ग
26 जुलै 1900रोप सोडला
24 ऑक्टोबर 1900व्हिएन्ना, हंगेरी, कुस्तुनतुनिया, ग्रीस, इजिप्त इत्यादी देशांना भेट.
26 नोव्हेंबर 1900भारतासाठी रवाना
9 डिसेंबर 1900बेलूर मठ येथे आगमन
जानेवारी 1901मायावतींची भेट
मार्च-मे 1901पूर्व बंगाल आणि आसामची तीर्थयात्रा
जानेवारी-फेब्रुवारी 1902बोधगया आणि वाराणसीला भेट
मार्च 1902बेलूर मठात परत
4 जुलै 190महासमाधी
Swami Vivekananda Information in Marathi

हिंदू धर्म ही एक अत्यंत व्यापक, विशाल, सर्वसमावेशक, सहिष्णू अशी जीवनप्रणाली आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती स्वामी विवेकानंदांच्या सहवासात, त्यांच्या व्याख्यानात, त्यांच्या आचरणात पाश्चिमात्य लोकांनी घेतली. ‘माझ्या अमेरिकन बंधू-भगिनींनो’ अशा अत्यंत आत्मीयतेच्या भावपूर्ण शब्दांनी स्वामीजींनी शिकागो धर्मपरिषदेतील त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात केली आणि संपूर्ण सभागृह जिंकून घेतले. त्यानंतर अमेरिकेत आणि संपूर्ण युरोप खंडात स्वामी विवेकानंदांची शेकडो व्याख्याने झाली. भारतीय तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व युरोपियन लोकांच्या लक्षात आले. स्वामीजींच्या ज्वलंत उपदेशाने प्रेरित झालेले शेकडो युवक, युवती, देशविदेशातील अनाथ, निराश्रित पीडितांची, गोरगरिबांची सेवा करायला लागले. अनेक विदेशी स्त्री-पुरुषांनी स्वामीजींची दीक्षा घेतली आणि त्यांच्या कार्याला वाहून घेतले. मानवतेच्या सेवेतच परमार्थाचे फलित सामावलेले आहे, या नव्या विचाराचे वारे संपूर्ण जगात वाहायला लागले. मॅक्सम्युलर आणि पॉल डायस, मागरिट नोबल (भगिनी निवेदिता) सारख्या अनेक पाश्चिमात्य विद्वानांना व विदुषींना स्वामीजींच्या महान तत्त्वज्ञानाने अनुग्रहित केले. एवढी प्रचंड आध्यात्मिक उंची दत्त कुटुंबात जन्मलेल्या नरेंद्राने कशी संपादन केली? त्यांच्या जीवनकार्याचे नेमके महत्त्व काय?

मानवाच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच त्याच्या आध्यात्मिक उत्थानासाठी कार्य करणेही महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथाचे अध्ययन करून, परमार्थाचे आचरण करून जनसेवेला वाहून घेणाऱ्या थोर विभूतीदेखील त्यामुळेच वंदनीय ठरतात. भारतीय तत्त्वज्ञानाची विजयपताका संपूर्ण जगात फडकविणारा हा अवतारी पुरुष कसा घडला, हे पाहणे जेवढे अगत्याचे तेवढेच आनंदाचे आहे. त्यामुळे प्रत्येकच विवेकी व्यक्तीला स्वत:मध्ये वसत असलेल्या दिव्यत्वाचा शोध घेता येणे शक्य आहे. स्वामी विवेकानंदांनी स्वत:च म्हटले आहे – “Educational is the manifestation of the divinity already present in man” स्वत:मधील दिव्यत्वाचे अन्वेषण करूनच स्वामीजींनी भारताच्या गौरवशाली युगाची पुन:स्थापना केली. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा तेजमार्ग खुला केला. त्यामुळेच स्वामी विवेकानंद हे एकोणिसाव्या शतकातील आध्यात्मिक क्रांतीचे जनक ठरले. त्यांच्या अमृतमय जीवनप्रवासाचा संक्षिप्त वृत्तांत इथे देत आहे.

स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी बालपण

कलकत्ता शहरातील उत्तर भागात शिमुलिया या उपनगरात विश्वनाथबाबू दत्त हे अत्यंत ख्यातनाम वकील. भुवनेश्वरीदेवी ही त्यांची अत्यंत पुण्यवान पत्नी. विश्वनाथ दत्त यांच्या वडिलांनी ऐन तारुण्यात संन्यास घेतला होता; पण विश्वनाथबाबू मात्र उत्तम वकील आणि कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख होते. त्यांची कमाई बऱ्यापैकी होती आणि खर्चही भरपूर होता. भुवनेश्वरीदेवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची उपासना केली. काशी विश्वेश्वराच्या कृपाप्रसादाने या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली. 12 जानेवारी, 1863 रोजी सूर्योदयाच्या वेळी भुवनेश्वरीदेवींच्या पोटी एका सुंदर व गोंडस पुत्राने जन्म घेतला. वीरेश्वर असे भगवान शंकराचे नाव त्याला देण्यात आले; पण नरेंद्र या नावानेच तो अधिक परिचित झाला.

आई-वडील त्याला प्रेमाने बिले असे म्हणायचे. नरेंद्र हा बालपणी अत्यंत खोडकर आणि हट्टी स्वभावाचा होता. त्याच्या आईच्या स्वभावातील दानशूरता त्याच्या अंगी पूर्णपणे बाणलेली होती. स्वत:च्या घरातील हातात येईल ती वस्तू तो दान करायचा. दारावर येणाऱ्या साधुसंतांना, बैराग्यांना, फकिरांना, गरिबांना, भिकाऱ्यांना संतुष्ट करून पाठविणे हा त्याचा स्वभावच झाला होता. त्या काळात कलकत्ता शहरामध्ये प्रत्येक श्रीमंत व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोडागाडी असायची. विश्वनाथबाबूंकडेही एक शानदार घोडागाडी होती. ती गाडी हाकणारा कोचमन खूप ऐटदार आणि रुबाबदार दिसायचा. चुडीदार पायजमा, जॅकेट, फेटा, त्यावर तुरा असा त्याचा पोशाख असायचा. नरेंद्रला त्याचे मोठे आकर्षण वाटायचे.

नरेंद्र मोठा झाल्यावर त्याने आपल्यासारखाच वकील व्हावे असे विश्वनाथबाबूंना वाटायचे. त्या उद्देशाने त्यांनी छोट्या नरेंद्रला विचारलं, “बिले, तू मोठा झाल्यावर कोण होणार?’ नरेंद्रने चटकन उत्तर दिले, “मोठेपणी मी कोचमन होणार.” विश्वनाथबाबूंचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे ते बिलेला रागावतील असे वाटल्यामुळे भुवनेश्वरीदेवीने चटकन बाजू सावरून नेली. समोरच्या भिंतीवर अर्जुनाचे सारथ्य करत असलेल्या श्रीकृष्णाचे चित्र टांगलेले होते. त्या चित्राकडे बोट दाखवून भुवनेश्वरीदेवीने त्याला म्हटले, “बिले, तू भगवान श्रीकृष्णासारखा कोचमन हो.” त्या महान मातेला काय कल्पना असणार की, तिचा हा कुलदीपक संपूर्ण जगाचाच दीपस्तंभ ठरणार आहे. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील युवापिढीच्या जीवनरथाचा हा तिचा तेजस्वी पुत्र सारथी होणार आहे आणि अर्जुनाप्रमाणेच गलितगात्र झालेल्या लाखो युवकांना चैतन्याचा मार्ग दाखविणार आहे. त्यांचे हे सहज केलेले भाकीत पुढे तंतोतंत खरे ठरले.

नरेंद्राच्या बालपणी विश्वनाथबाबूंकडे मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, शीख अशा वेगवेगळ्या धर्मांचे पक्षकार येत असत. त्यांच्यापैकी अनेकांशी बालक नरेंद्र गप्पागोष्टी करत असे. त्यांच्याकडून कथा ऐकत असे. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मातील कथा व पुराणांसोबत वेगवेगळ्या आचार-विचारांचा परिचयही त्याला झाला. नरेंद्रचे आई-वडीलसुद्धा त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विस्ताराने देत असत. त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेचे, स्मरणशक्तीचे आणि चिकित्सक वृत्तीचे त्यांना कौतुक वाटत असे. स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला पटल्याशिवाय नरेंद्र कोणतीच गोष्ट मान्य करीत नसे. लहानपणापासून नरेंद्र हा जातिभेदाच्या विरुद्ध होता. त्याला स्पृश्य-अस्पृश्यता व असमानतेचा तिटकारा होता.

धार्मिक वृत्तीच्या आईने नरेंद्राला अनेक धार्मिक कथा सांगितलेल्या होत्या. त्यामुळे साधुसंतांबद्दल नरेंद्रला बालपणापासून कुतूहल वाटत असे. एखादा संन्यासी दिसला की, नरेंद्र त्याच्याजवळ जाऊन त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करत असे. त्यातला प्रमुख प्रश्न एकच असे, ‘तुम्ही देव पाहिले का?’ देवाचा शोध घेण्यासाठी नरेंद्रने अनेक वेळा भ्रमंती केली. त्यासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. असाच एकदा हरदासाचे कीर्तन ऐकून नरेंद्र हनुमंताच्या शोधात केळीच्या एका बनात जाऊन चार-पाच तास बसला होता. शेवटी आईने त्याची समजूत काढली, ‘कधी तरी तुला देव नक्कीच भेटेल’ असे सांगून त्याचे समाधान केले होते.

स्वत:च्या घरीच एका खासगी गुरुजींकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर नरेंद्र मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ लागला. शाळेत शिकत असताना नरेंद्रचे अवांतर वाचन, मनन, चिंतन, खेळ, भ्रमंती, वादविवाद, चर्चा चालू असायची. त्यातच विश्वनाथबाबूंना व्यवसायाच्या निमित्तानं मध्यप्रदेशातल्या रायपूर या गावी जावे लागले. त्यांनी पूर्ण कुटुंब रायपूरला स्थलांतरित केले. प्रवासात मध्यप्रदेशातील नैसर्गिक सौंदर्य नरेंद्रने पाहिले. त्यामुळे त्याच्या मनात प्रवासाची ओढ निर्माण झाली. रायपूरला शिक्षणाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे विश्वनाथबाबू नरेंद्रला स्वत:च घरी शिकवीत असत. रायपूरच्या या दोन वर्षांच्या वास्तव्यात नरेंद्रने वडिलांकडून ज्ञान तर मिळविलेच; पण त्यासोबतच धैर्यशीलता, वात्सल्यता, गरिबांच्या बाबतीत कणव, बाणेदारपणा, आत्मनिष्ठा, ज्ञानलालसा, संगीत-साहित्य आणि कला यांच्याबद्दल आस्था हे गुणही वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळात नरेंद्र पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होता, तरीही त्या दोन वर्षांच्या काळात शाळेत न जाता त्याने भरपूर ज्ञान मिळविले. लवकरच त्याने या आजारावरही मात केली. 1879 साली नरेंद्रसह विश्वनाथबाबू पुन्हा कलकत्त्याला राहायला आले. बुडालेला दोन वर्षांचा अभ्यासक्रम त्याने एकाच वर्षात पूर्ण केला आणि मॅट्रिकची परीक्षा तो प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाला.

स्वामी विवेकानंद देवत्वाच्या शोधात

प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर नरेंद्रचे पहिले वर्ष आजारात गेले. त्यानंतर त्याने जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूटमध्ये बी.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. आकर्षक व्यक्तिमत्त्व, मधुर वाणी, उच्च विचारसरणी, सखोल ज्ञान या गुणांमुळे अनेक सहअध्यायी मित्रांना आणि त्या कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या प्राध्यापकांना नरेंद्रबद्दल आकर्षण वाटत असे. तत्त्वज्ञान हा नरेंद्रचा आवडता विषय. या विषयाच्या क्रमिक पुस्तकाशिवाय सर ह्यूम, सर हर्बर्ट स्पेन्सर या तत्त्ववेत्त्यांची पुस्तके नरेंद्रनी वाचून काढली होती. जिज्ञासू वृत्ती आणि उत्तम वक्तृत्व या गुणांमुळे त्या कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी यांना नरेंद्र खूप आवडायचा. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाच्या निमित्ताने नरेंद्रने भरपूर वाचन केले; पण त्याच्या मनात ईश्वर या संकल्पनेबाबत नेहमी प्रश्न निर्माण व्हायचे. पंचेंद्रिय ग्राह्य जड जगताच्या पलीकडे सर्व शक्तिमान अशी काही प्रेरणा, असा कुणी परमेश्वर आहे काय? या सृष्टीचा नियंता कोण आहे? तो कुठे आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात दाटू लागले.

राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजाचे आकर्षण नरेंद्रला काही दिवस वाटले. जातिभेद नष्ट करण्याचा त्यांचा संकल्प, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व धार्मिक आणि सामाजिक अधिकार देण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांची भूतदया या बाबी त्याच्या मनाला पटत असल्या तरी परमेश्वरदर्शनाची त्याच्या मनाला लागलेली ओढ तो मार्ग पूर्ण करू शकत नव्हता. महर्षी देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्या सहवासातही नरेंद्र काही दिवस होता. एके दिवशी महर्षी देवेंद्रनाथांना त्याने विचारले, महर्षी, आपण ईश्वर पाहिला आहे का? त्याला स्पष्ट शब्दात उत्तर मिळाले नाही. महर्षी देवेंद्रनाथांच्या सान्निध्यात नरेंद्रने ध्यानधारणेचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी सीमित आहार, जमिनीवर झोपणे, साधी राहणी या बाबींचे निष्ठापूर्वक पालन तो करीत असे. स्वत:च्या आजीच्या घरी एका खोलीत त्याचे सखोल चिंतन चालत असे; पण तरीही त्याला ईश्वर भेटला नाही.

ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार घडविणारा कोण महापुरुष आपल्याला भेटेल, चिंतेत नरेंद्र असतानाच त्याच्या कॉलेजात एक प्रसंग घडला. प्राचार्य विल्यम हेस्टी हे विल्यम वर्डस्वर्थ यांची एक कविता शिकवीत होते. कवितेचे स्पष्टीकरण करताना त्याच्या स्पष्टीकरणात ‘एक्स्टेसी’ हा शब्द आला. सर म्हणाले, “एक्स्टेसी म्हणजे समाधी आणि ज्या व्यक्तीला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती झालेली असते ती व्यक्ती ‘समाधी’च्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते.”

कविता शिकवून झाल्यानंतर सरांनी प्रश्न विचारला, “कुणाला काही शंका विचारायची आहे का?” नरेंद्र चटकन उभा राहिला आणि त्याने प्रश्न केला, “सर, तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का?’ सरांनी उत्तर दिले, “मी ईश्वर पाहिलेला नाही; पण ज्यांनी ईश्वर पाहिलेला आहे अशी मला एक विभूती माहीत आहे.” उत्कटतेने नरेंद्र म्हणाला, “सर कोण आहे ती व्यक्ती?” सर म्हणाले, “दक्षिणेश्वराच्या कालीमातेचा पुजारी रामकृष्ण परमहंस.” रामकृष्णांची भेट घेण्याचा नरेंद्रने निश्चय केला; पण बी.ए. प्रथम वर्षाची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे तो अभ्यासाला लागला.

परीक्षा संपताच वडिलांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. त्याने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांचे जवळचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त यांना नरेंद्राने सांगून टाकले, “मी जन्मभर अविवाहित राहणार आहे. ईश्वरप्राप्ती हेच माझे ध्येय आहे.’ त्यावर डॉ. रामचंद्र दत्त त्याला म्हणाले, “रामकृष्ण परमहंस हेच तुझी इच्छा पूर्ण करू शकतील.” नरेंद्रला विल्यम हेस्टीसरांनीदेखील हेच सांगितल्याचे आठवले. तो रामकृष्णांच्या दर्शनाची प्रतीक्षा करू लागला.

एके दिवशी त्याच वस्तीत राहणाऱ्या सुरेंद्रनाथ मित्र यांच्याकडे रामकृष्ण परमहंस यांना निमंत्रित करण्यात आल्याचे नरेंद्रला कळले. तिथे त्याला रामकृष्ण यांचे पहिले दर्शन झाले. त्या ठिकाणी नरेंद्रनी गायिलेले एक गीत रामकृष्णांना आवडले आणि त्यांनी त्याला दक्षिणेश्वरी येण्याचे सूचित केले. त्याप्रमाणे 15 जानेवारी, 1882 या दिवशी नरेंद्रने दक्षिणेश्वरी जाऊन रामकृष्ण परमहंसांची भेट घेतली. सुरेंद्रनाथ त्याच्यासोबतच होते. रामकृष्ण सुरेंद्रनाथाला म्हणाले, “हा नरेंद्र, मानवदेह धारण केलेला प्रत्यक्ष ईश्वर आहे.” त्यानंतर परीक्षेच्या तयारीसाठी नरेंद्र घरी परतला.

नरेंद्रचा बी.ए.चा अभ्यास चालू असतानाच त्याच्या वडिलांचे म्हणजे विश्वनाथबाबूंचे अचानक निधन झाले. आईची आणि भावंडांची जबाबदारी नरेंद्रवर आली. त्याचं मन कमालीचं विषण्ण झालं. आर्थिक परिस्थिती अचानक खालावली. नरेंद्र नोकरीच्या शोधात फिरू लागला. पैशासाठी ओढाताण व्हायला लागली. त्यातच घराच्या मालकी हक्काचा वाद कोर्टात सुरू झाला. नरेंद्रची बाजू खरी असूनही त्याला खूप संघर्ष करावा लागत होता. मनाची विवंचना घालविण्यासाठी त्याचे मन रामकृष्णांकडे धावायला लागले. त्याचे दक्षिणेश्वरी जाणे-येणे वाढले. नोकरी, अभ्यास, कोर्ट-कचेया आणि अध्यात्माची ओढ हे सारे सोबतच चालू होते. अशा परिस्थितीत 1884 साली नरेंद्रने बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली.

एका भेटीत नरेंद्रने रामकृष्णांना विचारले, “आपण ईश्वर पाहिला आहे का?’ रामकृष्णांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “होय, मी ईश्वर पाहिला आहे आणि तुझी इच्छा असेल तर मी तुलादेखील ईश्वरदर्शन घडवू शकतो.” नरेंद्रच्या या प्रश्नाला एवढे आश्वासक उत्तर यापूर्वी कुणीही दिले नव्हते. नरेंद्र पहिल्यांदाच रामकृष्णांच्या समोर नतमस्तक झाला. त्याची मन:स्थिती रामकृष्णांनी ओळखली होती; पण त्याच्या घरची त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता रामकृष्णांनी त्याला घरी परत जाण्याची आज्ञा केली.

स्वामी विवेकानंद यांना देवाचा साक्षात्कार

त्यानंतर अधून-मधून रामकृष्ण आणि नरेंद्र यांचा भावनिक, आध्यात्मिक संवाद चालू असायचा. ईश्वरदर्शनाची नरेंद्रची व्याकुळता, मनाची विकलता लक्षात घेऊन स्वामी रामकृष्णांनी एके दिवशी नरेंद्राला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती दिली. एका आगळ्या-वेगळ्या चैतन्याचा अनुभव नरेंद्रला त्यावेळी आला. त्याची उत्कटता पाहून रामकृष्णांनी त्याला प्रत्यक्ष कालीमातेचे दर्शन घडविले होते. एके दिवशी नरेंद्र रामकृष्णांना म्हणाला, “गुरुदेव माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी धन आणि सौख्य देण्याची प्रार्थना कालीमातेला करा.” त्यावर रामकृष्ण म्हणाले, “तू स्वत:च तुला पाहिजे असेल ते माग.” नरेंद्र कालीमातेसमोर हात जोडून ध्यान लावून बसला आणि कालीमातेचे दिव्य रूप पाहताच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, “हे माते, मला ज्ञान, विवेक आणि वैराग्य दे.’ हाच प्रकार तीन वेळा घडला. त्याच्या अंतर्मनाला जे हवे होते तेच त्याच्याकडून मागितले जात होते. स्वामी रामकृष्णांनी त्याला आश्वस्त केलं, “अरे, तू मातेचा खरा भक्त आहेस. माता तुला कधीही कमी पडू देणार नाही.”

या घटनेनंतर नरेंद्रच्या बऱ्याचशा विवंचना संपल्या. काही दिवस अॅटर्नी कार्यालयात आणि काही दिवस ईश्वरचंद विद्यासागर यांच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करून त्याने घरची आर्थिक गरज भागविली. घराच्या खटल्याचा निकालही त्याच्या बाजूने लागला. नरेंद्राचे वैराग्य मात्र दिवसेंदिवस वाढत होते. रामकृष्णांच्या सहवासात नरेंद्राने असिधाराक्रत धारण केले. स्वामी रामकृष्णांनी त्याला भावसमाधीच्या अवस्थेपर्यंत जाण्याची पात्रता मिळवून दिली. रामकृष्णांनी एके दिवशी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला संन्यासाची दीक्षा दिली. संन्यास ग्रहण केल्यानंतर नरेंद्रचे तपस्वी जीवन सुरु झाले.

उपनिषदे, अष्टवक्रसंहिता, पंचदशी, विवेक चुडामणी इत्यादी ग्रंथांचे त्यांनी तन्मयतेने वाचन केले. रामकृष्णांच्या अमृतमय बोधवचनात भरलेला गूढार्थ नरेंद्रला दिसत असे. त्यांच्या शब्दात सर्व अध्यात्माचे सार सामावले असल्याची प्रचीती नरेंद्रला येत असे. एके दिवशी रामकृष्णांनी त्याला सांगितले, “तपश्चर्येच्या बळावर मला मिळालेल्या सर्व सिद्धी मी तुला दिल्या आहेत. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. प्राणिमात्रावर प्रेम करा. ईश्वर सर्वव्यापी आहे. दु:खी, दरिद्रीपीडित मानवजातीची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे,’ हा मोलाचा उपदेश आपल्या सर्व शिष्यांना करून स्वामी रामकृष्ण 16 ऑगस्ट, 1886 रोजी स्वर्गस्थ झाले.

स्वामी विवेकानंद अध्यात्माच्या जगात

केशवचंद्र सेन, प्रतापचंद्र मुजुमदार, विजयकृष्ण गोस्वामी, सुरेंद्रबाबू यांसारखे ख्यातनाम लोक स्वामी रामकृष्णांच्या उपदेशाने अनुग्रहित झाले होते. या सर्वांच्या इच्छेप्रमाणे कलकत्त्याजवळ वराहनगर येथे नरेंद्रांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. 1886 ते 1890 ही चार वर्षे नरेंद्रचे प्रचंड मानसिक, भावनिक ताणतणावात गेले. स्वामी रामकृष्ण यांच्या अस्थीच्या ताम्रकलशावरून त्यांच्या शिष्यांमध्ये जो संघर्ष चालू होता तो नरेंद्रांनी सर्वप्रथम मिटवला. काकूडगाच्छी येथील योगोद्यानात त्या ताम्रकलशाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर वराहनगर येथील मठाची व्यवस्था बघणे, आईकडे व भावंडांकडे लक्ष पुरविणे आणि ज्ञानसाधना व जनसेवेचे क्रत चालू ठेवणे यासाठी त्यांचे सतत भ्रमण चालू होते.

याच दरम्यान नरेंद्र श्रीक्षेत्र काशी येथे गेले. तेथील द्वारकादासांच्या आश्रमात वास्तव्य करून त्यांनी अनेक साधुसंतांच्या, ऋषिमुनींच्या, विद्वानांच्या भेटी घेतल्या. गंगा-यमुनेच्या तीरावरील लोकांचे जीवन जवळून पाहिले. अयोध्या, लखनौ, आग्रा या मार्गाने पदयात्रा करीत नरेंद्र पुन्हा वराहनगर येथील आश्रमात पोहोचले. त्या ठिकाणी ध्यानधारणा, योग समाधी, अध्यात्म अभ्यास या उपक्रमांची सुरुवात त्यांनीच केली. सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, विविध धर्मांचे धर्मग्रंथ, अध्यात्मासंबंधीचे ग्रंथ असे चौफेर वाचन, चिंतन, मनन, तपश्चर्या, लोकसेवा, लोकप्रबोधन आणि लोकांच्या शंकांचे निरसन असा कार्यक्रम त्यांचा सतत चालू असायचा. काशी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेशसह अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ज्ञानसाधना व योगसाधना केली.

स्वामी विवेकानंद निघाले खऱ्या भारताच्या शोधात

हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताचा पायी प्रवास करून लोकजीवन जवळून बघण्याचा संकल्प नरेंद्रांनी केला. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी जुलै 1890 मध्ये भारतभ्रमणास सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांची ही भारतयात्रा अनेक अद्भुत घटनांनी, असंख्य बोधप्रद प्रसंगांनी, अनेक ज्ञानयज्ञांनी भरलेली आहे. खेतडीचे राजे, महाराज अजितसिंग यांच्या आग्रहावरून त्यांनी ‘स्वामी विवेकानंद’ हे नाव धारण केले. ही घटनादेखील या प्रवासादरम्यानच घडलेली आहे. या पदयात्रेदरम्यान स्वामी विवेकानंद हे कधी एखाद्या राजाचे अतिथी बनून राहिले, तर कधी एखाद्या त्यावेळचा अस्पृश्याच्या घरची भाकरी त्यांनी अत्यंत प्रेमानं खाल्ली.

कधी रखरखत्या उन्हात तहानलेल्या-भुकेल्या अवस्थेत मैलोन्मैल वाळवंट तुडवीत फिरले, तर कधी एखाद्या भव्य रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मान, सन्मान, आदरातिथ्य यापैकी कशाचीही अपेक्षा न बाळगता भेटीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक, भौतिक, दैहिक, दैविक सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन स्वामीजींनी केले. लोकांशी बोलताना तहान, भूक, विश्रांती यापैकी कशाचीही तमा त्यांनी बाळगली नाही. सामान्य साधकापासून ते जगविख्यात विद्वानापर्यंत किंवा सामान्य मजुरापासून ते लोकमान्य टिळकांसारख्या श्रेष्ठ समाजपुरुषापर्यंत प्रत्येकाशी स्वामीजी सारख्याच आदराने, जिव्हाळ्याने आणि तळमळीने बोलत.

भारतभ्रमणादरम्यान या देशातील सामान्य जनतेचे दारिद्य, अज्ञान, अंधश्रद्धा, दुःख पाहून स्वामीजींचे मन व्यथित व्हायचे. या पददलितांच्या, दु:खितांच्या उद्धाराचे कार्य स्वामी रामकृष्णांनी आपल्या खांद्यावर दिले आहे, याची जाणीव ठेवून अनेकांना त्यांनी दु:खमुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांनी राजा-महाराजांचे आदरातिथ्य जसे स्वीकारले तसेच गरिबांचेही स्वीकारले. रुग्णांची शुश्रूषा केली, दु:खितांचे अश्रू पुसले. पंजाब, बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडचे सर्व प्रांत, सर्व प्रमुख शहरे, खेतडी संस्थान, म्हैसूरचे संस्थान, हैदराबाद संस्थान याशिवाय खेड्यापाड्यातूनही स्वामीजींनी पायी प्रवास केला. अनेक विद्वान धर्ममार्तंडांशी त्यांनी चर्चा केली. अनेकांशी तात्त्विक वादविवाद झाले. असंख्य व्यक्तींच्या भेटीगाठी, विविध प्रकारचे अनुभव घेतले. अनेक साक्षात्कारही घडविले.

इ.स. 1888 ते 1892 या चार वर्षांत अनन्यसाधारण अशा प्रकारचाही मानसिक आणि आध्यात्मिक विकास स्वामी विवेकानंदांच्या ठायी घडून आला. भारतातील विविध प्रकारच्या आचार-विचारांचा, व्यवहारांचा, समाजरीतींचा; तसेच जनसामान्यांच्या मानसिकतेचाही परिचय स्वामींना या काळात झाला. त्यांच्या या भारतभ्रमणाच्या दरम्यान घडलेले अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. त्यापैकी केवळ एकच प्रसंग या ठिकाणी उद्धृत करीत आहे.

खरा मानवधर्म

स्वामीजी एका गावात मुक्कामाला होते. एका मारुतीच्या मंदिरात त्यांच्या निवासाची व्यवस्था होती. स्वामीजींच्या सकाळच्या वैयक्तिक साधनेनंतर त्यांची लोकांशी चर्चा सुरू व्हायची. हे संपूर्ण दिवसभर चालायचे. प्रत्येक वेळी येणारी व्यक्ती वेगळी असायची. स्वामीजी प्रत्येकाचे शंका-समाधान करायचे; पण स्वामीजींच्या जेवणाची चौकशी कुणीही करीत नव्हते. संध्याकाळ झाली.

स्वामीजी सतत कामातच असल्यामुळे त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. एक चांभार (त्यावेळचा अस्पृश्य) पायऱ्यावर बसून हे सारे बघत होता. स्वामीजींना आपल्या घरची भाजी-भाकरी द्यावी अशी त्याची मनोकामना होती; पण अस्पृश्य आहोत. आपण कसे देणार? त्याला राजाची भीती वाटत होती. रात्री आठच्या दरम्यान लोकांच्या येण्यात किंचित खंड पडला. स्वामीजी स्वत:च्या जागेवरून उठले आणि त्या अस्पृश्य व्यक्तीपर्यंत चालत गेले आणि त्याला म्हणाले, “अरे, तुझी इच्छा आहे ना मला जेवण देण्याची. मग का संकोच करतो आहेस?” तो अस्पृश्य म्हणाला, “स्वामीजी, मी सकाळपासून तुम्हाला बघतो आहे. दिवसभरात तुमच्या पोटात अन्नाचा एकही कण गेलेला नाही. कुणीही तुम्हाला तुमच्या जेवणाबद्दल विचारले नाही. मला खूप इच्छा आहे तुम्हाला जेवण देण्याची; पण मी पडलो अस्पृश्य.” स्वामीजी म्हणाले, “अरे बांधवा, या जगात कुणीही अस्पृश्य नाही, आपण सर्व त्या परमेश्वराची मुले आहोत. तुझ्या घरची चटणी-भाकरी मला राजाकडच्या पंचपक्वान्नापेक्षाही जास्त प्रिय आहे.” तो अस्पृश्य अत्यंत आनंदित झाला आणि त्याने स्वामीजींसाठी भाजीभाकरी आणली. स्वामीजींनी त्याच्यासोबत बसून जेवण केले. ज्या काळात अस्पृश्यांच्या सावलीचादेखील विटाळ मानला जात असे त्या काळातली ही घटना आहे.

अनेक संस्थानिक राजांनी स्वामीजींना आग्रहपूर्वक निमंत्रित केले. अनेकांचे आतिथ्य स्वामीजींनी स्वीकारले. त्यांच्यापैकी अनेकांनी हजारो रुपये स्वामीजींच्या चरणी अर्पण केले; पण स्वामीजींनी त्याला स्पर्शही केला नाही. म्हैसूरच्या महाराजांनी स्वामीजींना अनेक मौल्यवान भेटवस्तू अर्पण केल्या. त्यातील एक लहानशी चंदनाची श्रीकृष्ण मूर्ती स्वीकारून स्वामीजींनी इतर सर्व वस्तू परत केल्या. स्वामीजींना संस्कारांची श्रीमंती आणि आदर्श विचारांची संपत्ती सर्वाधिक प्रिय होती.

मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजातील विज्ञानाचे प्राध्यापक सिंगरावेलू मुदलियार हे अत्यंत नास्तिक होते. त्यांना स्वत:च्या ज्ञानाचा गर्वही होता. अनेक उच्चविद्याविभूषित लोक स्वामी विवेकानंदांचे शिष्यत्व पत्करत आहेत, हे पाहून मुदलियार यांनी त्यांची खिल्ली उडविली. आपल्या काही विद्वान मित्रांना सोबत घेऊन ते स्वामीजींकडे तार्किक आणि तात्त्विक चर्चा करण्यासाठी आले. स्वामीजींशी झालेल्या वार्तालापात मुदलियार कमालीचे प्रभावित झाले. स्वामीजींचे प्रगाढ ज्ञान पाहून ते अचंबित झाले. मुदलियार यांच्या प्रत्येक मुद्द्याचे स्वामीजींनी अगदी तर्कशुद्ध आणि तात्त्विक खंडन केले.

या घटनेमुळे मुदलियार पूर्णपणे बदलून गेले. विशेष उल्लेखनीय बाब अशी की, त्यानंतर मुदलियार हे स्वामीजींचे अत्यंत श्रद्धाळू भक्त बनले. त्यांनी स्वामीजींचे शिष्यत्व पत्करले. पुढे स्वामीजी अमेरिकेत गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार ‘प्रबुद्ध भारत’ या नियतकालिकाचे संपादकत्वही स्वीकारले. एवढेच नव्हे तर स्वत:ची संपूर्ण संपत्ती स्वामीजींच्या कार्यासाठी दिली आणि स्वत:चे उर्वरित जीवन स्वामीजींच्या मानवकल्याणाच्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले. अशी असंख्य उदाहरणे स्वामीजींच्या भारतभ्रमणादरम्यान घडली आहेत. विलासात ऐशआरामात दंग असणाऱ्या अनेक राजांना, संस्थानिकांना स्वामीजींनी जनसेवेचे क्रत दिले; तसेच त्यांच्याजवळच्या संपत्तीचा विनियोग जनकल्याणासाठी रण्याची प्रेरणाही त्यांना दिली.

संपूर्ण भारताची अशी समाजयात्रा करून स्वामीजी डिसेंबर 1892 मध्ये कन्याकुमारी येथे पोहोचले. समोरची खाडी पार करून त्यांना ‘श्रीपाद’ शिलेवर जायचे होते. नावाड्याला द्यायला त्यांच्या जवळ पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी पोहत जाऊन ते खडक गाठले. त्या खडकावरून त्यांनी एकदा समोरच्या भारतभूमीकडे दृष्टिक्षेप टाकला. त्यानंतर मागच्या बाजूला असणाऱ्या विशाल समुद्राकडे त्यांनी पाहिले आणि त्यांचे मन चिंतनात गढून गेले. 25 ते 27 डिसेंबर, 1892 दरम्यान स्वामी विवेकानंद दिवस-रात्र ध्यान लावून चिंतन करीत होते.

साथीचे आजार, अज्ञान, महापूर, दुष्काळ, अनिबंध सत्ताधीश यांच्या जाचाने जर्जर झालेला भारताचा बहुजन समाज आणि गोरगरिबांचे शोषण करत असलेले सत्ताधीश आणि धनपती या सर्व बाबींवर चिंतन केले. खोट्या रूढीपरंपरेच्या नावाने, स्पृश्य-अस्पृश्यतेच्या कल्पनेने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अत्याचाराने हतबल झालेली आहे. या असहाय लोकांच्या उद्धाराचे कार्य याच देशातील उदात्त विचाराने प्रेरित झालेले युवकच करू शकतील. त्यांना प्रेरित करण्याची गरज आहे. सत्यधर्माची, मानवतेची आणि वेदांताच्या सर्वसमावेशकतेची शिकवण जनमानसात रुजवून भगवान रामकृष्णांनी आपल्यावर टाकलेले दीनदुबळ्यांच्या सेवेचे कार्य आपल्याला पूर्ण करायचे आहे. भारताच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण आणि वेदांताची शिकवण जगाला नव्याने सांगितली पाहिजे. असे विचार स्वामीजींनी ज्या ठिकाणी केले त्याच खडकावर आज विवेकानंदांचे भव्य शिलास्मारक उभे आहे.

स्वामी विवेकानंद यांचा विदेश दौरा

कन्याकुमारी येथील तीन दिवसांच्या चिंतनादरम्यान स्वामीजींनी विदेशात जाऊन भारतीयांच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे ठरविले होते. अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित सर्वधर्मपरिषदेस स्वामी विवेकानंदांनी जावे, असे भारतातील अनेक विद्वानांना वाटत होते. स्वामीजींच्या प्रबोधनाने आणि ज्ञानाने प्रभावित झालेल्या अनेक संस्थानिक राजांनाही तसे वाटत होते. स्वामीजींनी त्या परिषदेला जावे, यासाठी त्यांचे शिष्यही प्रयत्नशील होते. स्वामीजींनी शारदादेवींची अनुमती आणि आशीर्वाद घेतले. खेतडीच्या महाराजांच्या आग्रहास्तव त्यांनी खेतडी संस्थानला भेट दिली आणि शिकागोला जाण्यासाठी स्वामीजी मुन्शी जगमोहन यांच्यासह मुंबईला आले. त्यावेळी अनेक उच्चविद्याविभूषित लोक त्यांना निरोप द्यायला आले होते.

31 मे, 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी मुंबईहून पेनिनशूलर या बोटीने शिकागोसाठी प्रस्थान केले. व्हेक्युअरपर्यंतचा प्रवास बोटीने करून तिथून रेल्वेने स्वामीजी बोस्टनला पोहोचले. प्रवासात श्रीमती केंट यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या घरीच प्रा. जे. एम. राइट यांच्याशी स्वामीजींचा परिचय झाला. जे. एम. राइट हे हॉर्वर्ड विद्यापीठात ग्रीक भाषेचे प्राध्यापक होते. एक अत्यंत विद्वान प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक विषयांवर स्वामीजींची प्रा. राइट यांच्याशी चर्चा झाली. स्वामीजींची विद्वत्ता, त्यांचे ज्ञान आणि त्यांचे वाक्चातुर्य पाहून प्रा. राइट आश्चर्यचकित झाले. शिकागो येथे होणाऱ्या सर्वधर्मपरिषदेसाठी आपण आलो आहोत आणि त्यासाठी आपणास एखाद्या ख्यातनाम व्यक्तीचे ओळखपत्र हवे आहे, असे जेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, “To ask you, Swami, for your credential is asking the Sun to state its right to shine,” स्वामीजी, आपणास परिचयपत्र मागणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्यालाच प्रकाशित होण्यासाठी परवानगी मागायला लावण्यासारखे आहे.” प्रा. राइट यांचे परिचयपत्र घेऊन स्वामी विवेकानंद बोस्टनहून शिकागोला गेले. तिथे त्यांना जॉर्ज डब्ल्यू. हेल या महिलेची भरपूर मदत झाली. त्या महिलेने स्वामीजींचे आदरातिथ्य केले आणि त्यांना सर्वधर्मपरिषदेत पोहोचविले.

स्वामी विवेकानंद यांनी केले सहिष्णुतेच्या धर्माचे प्रतिनिधित्व

11 सप्टेंबर, 1893 रोजी शिकागो येथील आर्ट पॅलेस या इमारतीत सर्वधर्मपरिषदेला सुरुवात झाली. प्रत्येक धर्माचा प्रतिनिधी स्वत:चे लिखित स्वरूपातले भाषण वाचून दाखवीत होता. प्रत्येकाला ठराविक वेळ देण्यात आली होती. स्वामी विवेकानंद बोलायला उभे राहिले. “माझ्या अमेरिकन बंधूभगिनींनो.” भगवी वस्त्र परिधान केलेल्या एका तेजस्वी तरुण संन्याशाच्या अत्यंत गोड; पण भारदस्त आवाजातील हे शब्द ऐकून संपूर्ण सभागृह सद्गदित झाले. हे स्नेहपूर्ण संबोधन यापूर्वी त्यांनी कधीही ऐकले नव्हते. हे संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे ही भावना व्यक्त करणारे, आत्मीयतेने ओतप्रोत असे ते संबोधन होते. स्वामीजींचा प्रत्येक शब्द सभागृहातील लोकांच्या हृदयाला भिडत होता. त्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्यात एक नवीन विचार, एक नवीन दिशा त्या श्रोत्यांना मिळत होती. “

“सहिष्णुता आणि सर्व धर्मांचा आदर हा हिंदू धर्माचा मूलाधार आहे. ही सर्वसमावेशकताच गौरवाची बाब आहे. जगातील सर्वच धर्म मूलत: अत्यंत महान आहेत. सर्वशक्तिमान अशा परमेश्वराकडे जाण्याचे ते मार्ग आहेत. सर्व मार्गांचे अंतिम साध्य एकच आहे. मानवाची मुक्ती, सुख आणि आध्यात्मिक ” प्रगती यासाठी सर्वधर्मसमभाव आणि मानवताधर्माचा आदर करणे गरजेचे आहे. सनातन धर्म हा सर्व धर्मांचे मूळ आहे. देशकालपरत्वे धर्म प्रकट होत असतो आणि तरीही तो एका महान अंतिम सत्यामध्ये प्रतिबिंबित होत असतो.” अशा आशयाचे विवेकानंदांचे भाषण ऐकून सभागृहातील प्रत्येक व्यक्ती अत्यंत प्रभावित झाली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. उपस्थित असंख्य विद्वानांनी, अनेक पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांना गराडा घातला. न्यूयॉर्क लेव्हलँड, द प्रेस ऑफ अमेरिका, बोस्टन इव्हिनिंग ट्रान्स्क्रीप्ट, पायोनियर व इतर अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रांची पहिली पाने, स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानाच्या स्तुतीने भरलेली होती. भारतीय लोक भारतीय संस्कृती याबद्दल असणारे अमेरिकन लोकांचे सगळे गैरसमज त्यावेळी चुकीचे ठरले. भारत देश आणि हिंदू धर्म यांच्याबद्दल अमेरिकन लोकांच्या मनात आदरभाव जागृत झाला.

त्यानंतर स्वामी विवेकानंदांची अनेक व्याख्याने त्या सर्वधर्मपरिषदेत झाली. प्रत्येक वक्त्याला असणारे वेळेचे बंधन, श्रोत्यांच्या आग्रहामुळे स्वामीजींना मात्र नव्हते. त्यांचे भाषण सर्वांच्या शेवटी ठेवले जात असे. श्रोते केवळ त्यांच्या भाषणासाठी म्हणून शेवटपर्यंत थांबत असत. सर्वधर्मपरिषदेच्या सतरा दिवसांच्या कालावधीत एक अत्यंत विद्वान हिंदू संन्यासी म्हणून स्वामी विवेकानंद संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले.

स्वामी विवेकानंद यांचे भाषण ऐकून भारावलेले जग

जगातील सर्व देशांनी त्यांच्या सर्वाधिक महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर स्वामीजींच्या छायाचित्रासह व्याख्यानांचे वृत्तांत छापले. त्यांच्या व्याख्यानांना सर्वाधिक प्रसिद्धी दिली. स्वामीजींच्या अद्भुत यशाची बातमी भारतीय वर्तमानपत्रांनी प्रकाशित करताच संपूर्ण भारतात एका चैतन्याचा संचार झाला. स्वामीजींना अभिनंदनाची पत्रं पाठविण्यात आली. स्वामीजींची लोकप्रियता वाढत गेली.

अमेरिकेतील वेगवेगळ्या भागातून विवेकानंदांना व्याख्यानासाठी निमंत्रणे यायला लागली. त्यांच्या व्याख्यानासाठी त्यांच्या आगमनाच्या अगोदरच संपूर्ण सभागृह श्रोत्यांनी भरून जात असे. स्वामीजी रस्त्यावर दिसताच हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होत. विचारांची भव्यता, कथानकांची सुरसता, भाषेचे सौंदर्य यामुळे स्वामीजींचे व्याख्यान म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच वाटायचे. स्वामीजींच्या या ज्ञानयज्ञाने संपूर्ण जगात भारतीय तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठा वाढली. जॉर्ज डब्ल्यू. हेल, रॉबर्ट इंगरसोल, मॅडम मेरी लुइस, मागरिट नोबेल (भगिनी निवेदिता), डॉ. लॅड्सबर्ग, डॉ. अॅलन डे, गुडविन, प्रा. राइट यासारखे अनेक विद्वान, मित्र आणि शिष्य स्वामीजींना अमेरिकेत लाभले. अनेक शहरात त्यांची प्रचार केंद्रे अमेरिकन लोकांनी स्थापन केली.

अमेरिकेप्रमाणेच इंग्लंडमध्येही स्वामीजींची अनेक व्याख्याने झाली. इंग्लंडमध्येही त्याचे प्रचारकेंद्र स्थापन झाले. स्वत:च्या प्रचंड ज्ञानाच्या आणि स्वच्छ तत्त्वज्ञानाच्या बळावर संपूर्ण जगावर सत्ता गाजविणाऱ्या अमेरिका आणि इंग्लंड या राष्ट्रांना विवेकानंदांनी जिंकून घेतले. जगत्विख्यात विद्वान प्राध्यापक मॅक्सम्युलर यांनी स्वामी विवेकानंदांची भेट घेतली. प्रा. स्टर्डी यांनी स्वामीजींची व्याख्यानं, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे पुस्तकरूपानं प्रकाशित केले. प्रा. स्टर्डी यांनी मार्गारेट नोबेल यांच्याप्रमाणेच संन्यासाची दीक्षा ग्रहण केली. स्वामीजींनी त्यांना योगानंद असे नाव दिले. भोगवादाने पछाडलेल्या अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशातील हजारो स्त्री-पुरुषांनी स्वामीजींचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्यापैकी अनेकांनी संन्यासही ग्रहण केला. पाश्चिमात्य देशातील लोकांनी समर्पणवृत्तीने स्वामीजींना भरपूर द्रव्यही अर्पित केले; पण स्वामीजींनी ते मिळताक्षणीच दान केले. भारताशिवाय अमेरिका आणि इंग्लंडमधील जनसेवेला वाहिलेल्या संस्थांना स्वामीजींनी भरपूर आर्थिक साहाय्य केले.

इंग्लंडशिवाय फ्रान्स आणि जर्मनीतही स्वामीजींची व्याख्याने झाली. पाश्चिमात्य जगाला जीवनाचा तेजस्वी सत्यमार्ग-अध्यात्ममार्ग शिकवून, मातृभूमीसाठी उज्ज्वल भवितव्याचा उदंड विश्वास सोबत घेऊन स्वामी विवेकानंद चार वर्षांच्या प्रदीर्घ विदेशयात्रेहून 1897 मध्ये भारतात परत आले. भारतभूमीवर पाऊल ठेवताच त्यांनी मातृभूमीला वंदन केले. संपूर्ण देशभर स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. कोलंबो, कँडी, जाफना, रामेश्वर, परमकुडी, मानसदुरा, मदुरा, त्रिचनापल्ली, तंजावर, मद्रासमध्येही स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. सर्व ठिकाणी त्यांची भावपूर्ण व्याख्याने झाली. मद्रासमध्येही स्वामी विवेकानंदांचे भव्य स्वागत करण्यात आले. सर्व ठिकाणी त्यांची भावपूर्ण व्याख्याने झाली. मद्रासहून स्वामीजी कलकत्याला पोहोचले. हजारो स्त्री-पुरुषांनी कलकत्ता शहरात त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली.

रामकृष्ण मिशनची स्थापना

त्यानंतर स्वामीजींनी प्रत्यक्ष सेवाकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. त्यासाठी समर्पणवृत्तीने कार्य करणाऱ्या चारित्र्यसंपन्न, सेवाभावी युवकांचा एक संघ त्यांनी गठित केला. भगवान रामकृष्णांच्या, देशविदेशातील सर्व शिष्यांना एकत्र आणून ‘श्री रामकृष्ण मिशन’ची स्थापना करण्याचा विचार स्वामी विवेकानंदांनी जाहीर केला आणि लगेच सर्वांनी तो मान्य केला. स्वामीजींच्या प्रेरणादायी व्याख्यानानंतर 1 मे, 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ ही संस्था स्थापन करण्यात आली. ‘ज्ञान, उपासना आणि सेवा’ या कार्याला वाहून घेण्याचा संकल्प सर्वांनी केला. मानवजातीचे कल्याण हा त्या संस्थेचा प्रमुख उद्देश ठरला. त्यानंतरही स्वामीजींचे अविश्रांत परिश्रम चालूच होते. दीनदुबळ्यांची सेवा रुग्णांची शुश्रूषा, व्याख्याने, चर्चा, वैयक्तिक शंका-निरसन सतत चालू होते.

अविश्रांत कार्य

स्वामीजी अनेक वर्षे या कार्यात सतत कार्यरत होते. सततच्या दगदगीमुळे त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हवापालट करण्यासाठी स्वामीजी अल्मोडा येथे गेले. तिथे वास्तव्य असतानाही मुर्शिदाबाद येथील कार्यावर त्यांचे लक्ष होते. मुर्शिदाबाद येथे स्वामी अखंडानंद यांच्या . देखरेखीखाली दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे कार्य चालू होते. याशिवाय कलकत्ता येथील रामकृष्ण मिशनचे सामाजिक कार्यदेखील व्यवस्थित चालू होते.

प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा होताच स्वामीजींनी पुन्हा दौरे सुरू केले. काश्मीर, जम्मू, पंजाब, जयपूर, खेतरीसह अनेक ठिकाणी स्वामीजींची व्याख्याने झाली. या सर्व व्याख्यानांमधून वेदांतासंबंधीच्या लोकांच्या चुकीच्या कल्पना स्वामीजींनी मिटवून टाकल्या. वेदांत हे सर्वांना समान लेखणारे, स्वावलंबी व सामर्थ्यवान बनवणारे सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आहे, हे त्यांनी लोकांना समजावून सांगितले. जानेवारी 1898 मध्ये भगीरथी नदीच्या काठावर ‘बेलूर’ या ठिकाणी भव्य भूभागावर रामकृष्ण मठ उभारणीचे कार्य स्वामीजींनी सुरू केले. स्वामीजींच्या देश-विदेशातील शिष्यांनी लाखो रुपयांचा निधी एकत्रित केला आणि अत्यंत भव्य असा रामकृष्ण मठ स्थापन करण्यात आला. भगिनी निवेदिता (मारिट नोबेल) यांनी स्त्री-शिक्षणाचे, जनसेवेचे कार्य सुरू केले. हातात खराटा घेऊन अस्पृश्यांच्या वस्त्या स्वच्छ करण्याचे कार्य त्यांच्यासह अनेक शिष्यांनी केले. प्लेग झालेल्या रुग्णांची शुश्रूषा, उपचार, प्लेगनियंत्रण, सार्वजनिक स्वच्छता, भुकेल्यांना अन्न अशा प्रकारच्या सेवाकार्यात रामकृष्ण मठातील संन्यासी सतत कार्यरत असत. पुढे ‘शारदा मठा’चीही स्थापना करण्यात आली.

स्वामीजींचे महानिर्वाण

रामकृष्ण मिशनचे कार्य विदेशातही चालू होते. त्यामुळे स्वामीजींना पुन्हा विदेशात जावे लागले. 31 जुलै, 1899 रोजी स्वामीजी लंडनला पोहोचले. लंडन, न्यूयॉर्क, लॉस एजेंलीस व कॅलिफोर्नियातील अनेक शहरात स्वामीजींची दुसऱ्यांदा व्याख्याने झाली. अनेक ठिकाणी रामकृष्ण मठाची स्थापना करण्यात आली. याशिवाय जर्मनी, ऑस्ट्रिया, सर्बिया, इस्तंबूल या देशातही त्यांची व्याख्याने झाली. विवेकानंदांनी असंख्य स्नेही आणि शिष्य जोडले. मातृभूमीची ओढ आणि स्वदेशातील सामाजिक कार्याची चिंता यामुळे डिसेंबर 1900 मध्ये स्वामीजी भारतात परत आले. ते थेट बेलूरच्या मठात दाखल झाले.

त्यानंतरही स्वामीजींची व्याख्याने, समाजकार्य, विविध प्रांतांचे दौरे आणि सेवाकार्य चालूच होते. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. सततची दगदग, कष्ट, व्याख्याने यामुळे त्यांचे शरीर साथ देत नव्हते. स्वत:च्या मृत्यूची स्वामीजींना कल्पना आली होती. त्यामुळे स्वामीजींनी वेगवेगळ्या ठिकाणचे कार्य वेगवेगळ्या शिष्यांना सोपवून दिले. सर्वांनाच स्वामी रामकृष्णांचा ‘जनसेवा’ करण्याचा संदेश पुन्हा एकदा विवेकानंदांनी दिला. एके दिवशी आपल्या शुद्धानंद नावाच्या एका शिष्याला बोलावून स्वामीजी त्याला म्हणाले,

“4 जुलै, 1902 या दिवशी मी या जगाचा निरोप घेणार आहे. माझ्या शरीराचे हे जीर्ण झालेले वस्त्र मी फक्त टाकून देत आहे; पण माझा आत्मा अमर आहे.” 2 जुलै या दिवशी स्वामीजींनी उपवास केला. 4 जुलै रोजी ते प्रसन्न होते. त्या दिवशी रात्री 9 वाजता त्यांचे महानिर्वाण झाले. केवळ 39 वर्षांचे ते तेजस्वी जीवन जगलेला एक महान आत्मा अनंतात विलीन झाला.

मानवाचा मुक्तिदाता, महायोगी, कर्मयोगी, विश्वधर्माचा प्रवक्ता, वेदांतांचे चालते-बोलते विद्यापीठ, मानवतेचा महान पुजारी, जगज्जेता तत्त्वज्ञ, द्रष्टा राष्ट्रपुरुष, विद्वत्तेचा सूर्य, दीनदलितांचा उद्धारकर्ता, एक महान तेजस्वी सेवाभावी संन्यासी प्रस्थान करता झाला. रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन आणि विवेकानंद शिलास्मारक समितीच्या माध्यमातून चालू असलेल्या विविध सामाजिक कार्यांच्या रूपाने, जनसेवेच्या रूपाने, स्वामी विवेकानंदाचे अस्तित्व, त्यांच्या महान विवेकानंदांचे अस्तित्व, त्यांच्या महान तत्त्वज्ञानाचे अस्तित्व आपण अनुभवत असतो. स्वामी विवेकानंदांची संपूर्ण व्याख्याने, त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान आज वाङ्मयरूपात उपलब्ध आहे. देश-विदेशातील ज्ञानसंग्रहाचे एक प्रचंड भव्य असे स्वतंत्र दालनच स्वामी विवेकानंदांच्या विवेकपूर्ण वाङ्मयाने निर्माण केले आहे. त्यांची अमृतवचने प्रत्येक काळातील युवकांना सातत्याने प्रेरणा देत राहतील.

“सीमोल्लंघन खरेच केले, अमृत सिंचन दीन जनावरी वेदांताचे मर्म सांगता, विवेक मंथन मना-मनावरी ।
मानवतेचा थोर पुजारी, करुणा सागर जना-जनांचा इंद्रनरांचा सेवा धारी, विवेक आगर मना-मनांचा ॥” “

स्वामी विवेकानंद के अनमोल विचार मराठी

 1. उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका – स्वामी विवेकानंद
 2. समजदार व्यक्ती सोबत केलेली काहि वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
 3. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.
 4. हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
 5. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
 6. जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.
 7. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.
 8. स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.
 9. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 10. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे, जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
 11. एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
 12. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
 13. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
 14. सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.
 15. सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 16. बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
 17. शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

स्वामी विवेकानंद माहिती मराठी-swami vivekananda information in marathi

पुढे वाचा:

प्रश्न.१ विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?

उत्तर- स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी होते.

प्रश्न.२ स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?

उत्तर- श्री रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते.

प्रश्न.३ स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना कोणता संदेश दिला?

उत्तर- स्वामी विवेकानंदांनी “उठा, जागे व्हा आणि अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत ध्येयपथावर चालत राहा, थांबू नका.” हा संदेश भारतीय तरुणांना दिला.

प्रश्न.४ स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?

उत्तर- स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला.

प्रश्न.५ स्वामी विवेकानंदांचा मृत्यू कधी झाला?

उत्तर- स्वामी विवेकानंदांचा मृत्यू ४ जुलै, १९०२ रोजी झाला.

प्रश्न.६ स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय

उत्तर- स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

This Post Has One Comment

 1. राजेश्री जाधव

  खूपच छान ! आनंद देणारा लेख आहे

Leave a Reply