मोहरमची संपूर्ण माहिती – Muharram Information in Marathi

मुहर्रम (मोहरम) हा मुसलमानांच्या कालगणनेतील पहिला महिना. मुहर्रम या शब्दाचा अर्थ ‘निषिद्ध’ असा आहे. पूर्वी हा महिना पवित्र मानला जायचा. पण पैगंबरांचे नातू हजरत हुसेन यांच्या मृत्यूनंतर तो अपवित्र मानला जाऊ लागला. या महिन्याचा दहावा दिवस मुहर्रमचा असतो; पण हा दिवस सणाचा नसून शोकाचा आहे. या मागे एक कथा आहे.

हजरत महंमद या प्रेषिताने अरबस्तानात इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लाम धर्म स्थापन केला. धर्माबरोबर इस्लामचे राज्यही तेथे निर्माण झाले. पैगंबरांच्या हयातीत धर्माची व राज्याचीही सर्व व्यवस्था त्यांच्याकडेच होती. मात्र आपल्यानंतर राज्याचा कारभार लोकमतानुसार चालावा अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यानुसार एक कायदे करणारे मंडळ, एक कार्यकारी मंडळ व या सर्वांचा प्रमुख म्हणजे खलिफा. या सर्वांनी कारभार पाहायचा होता.

मोहरम

पण पैगंबरांनंतर कोणी खलिफा व्हावे यावरून वाद उत्पन्न झाला. खलिफा बहुमताने निवडून यावा असे एका गटाचे मत होते- या गटाच्या लोकांना सुन्नी म्हणतात.

या मतानुसार तीन खलिफा होऊन गेले. त्यानंतर महंमद पैगंबरांचे जावई हजरत अली हे खलिफाच्या गादीवर बसले.

दुसर्‍या गटाच्या मते खलिफा होण्याचा खरा मान हा चौथे खलिफा हजरत अली साहेब यांचाच होता. हे लोक पहिल्या तीन खलिफांना मानत नाहीत. या पंथाच्या लोकांना शिया म्हणतात.

हजरत अली साहेबांचा खून झाल्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे पैगंबरांचा नातू हजरत हसन हा खलिफा झाला. पण यावेळी खलिफा होण्याची मआविया यांची इच्छा होती. मआविया हे एका प्रतिष्ठित घराण्याचे असून त्यावेळी शाम प्रांताचे सुभेदार होते. त्यांनी हसन यांच्याशी लढाई करण्याचे ठरवले. लढाई टाळण्यासाठी हसन यांनी त्यांना गादी दिली; पण अशी अट घातली की, त्यांच्यानंतर गादी पुन्हा महंमदांच्या घराण्याला मिळावी.

परंतु खलिफा झाल्यावर मआवियाने आपला शब्द मोडला. त्याने आपला मुलगा याजिद याला आपला वारस नेमले. ही गोष्ट लोकांना आवडली नाही. हजरत हसन यांचा तोपर्यंत मृत्यू झालेला होता. त्यामुळे लोकांनी हसनचे भाऊ हजरत हुसेन यांना आमंत्रण दिले की, त्यांनी येऊन गादीवर बसावे.

हे आमंत्रण स्वीकारून हुसेन आपली बायको-मुले, नातेवाईक व मित्र यांना घेऊन निघाले; पण वाटेत करबला येथील मैदानात याजिदच्या फौजेने त्यांना वेढा घातला. दहा दिवस त्यांनी हा वेढा चालवला व अन्न-पाण्यावाचून हालहाल करून बायका-मुलांसह हजरत हुसेन यांना ठार केले. या दुःखद घटनेची आठवण म्हणून मुहर्रमचा दिवस पाळला जातो.

मुहर्रमच्या दिवशी मुसलमान लोक उपवास करतात. त्यास ‘अशुरा’ म्हणतात. कुराणाचे पठण करतात व मृतांच्या आत्म्यासाठी नमाजही पढतात. या दिवशी ताबूत किंवा डोले नाचवण्यात येतात.

ताबूत किंवा ताजिया हे हुसेनसाहेबांच्या कबरीचे (थडग्याचे) प्रतीक आहे. ताबूत बांबूच्या कामट्यांचा करून त्यावर रंगीबेरंगी कागद चिकटवलेले असतात. हे सगळे ताबूत वाजत गाजत गावाबाहेर नेतात व तेथे नदी-तळ्यात किंवा समुद्रात विसर्जन करतात किंवा जमिनीत पुरतात. जाता-येताना ‘या अली या हसन हाय हाय, या हुसेन हाय हाय’ असे म्हणत हाताने छाती बडवतात. ताबूत ठेवण्याच्या जागेसमोर एक खाई तयार करून त्यात आग पेटवतात. या खाईभोवती नाचण्याची व या आगीतून चालत जाण्याची प्रथाही काही ठिकाणी आढळते. भाविक लोक ताबूताची पूजा करतात व त्यांवर फुले, रेवड्या, खारका इत्यादी उधळतात.

हुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना तहानेने तडफडावे लागले म्हणून या दहा दिवसांत तहानलेल्यांना पाणी देण्याची पद्धत आहे.

मुसलमानांमधील शिया आणि सुन्नी हे दोन पंथ मुहर्रम वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. शिया पंथी फक्त शोक पाळतात.

सुन्नी ताबूत मिरवतात. ताबूत किंवा ताजिया याचा अर्थ रडणे, शोक करणे असा आहे. ताबूत विसर्जनाच्या तिसर्‍या दिवशी कुराणपठण व अन्नदान असा कार्यक्रम असतो.

पुढे वाचा:

Leave a Reply