पतेती सण माहिती मराठी – Pateti Festival Information in Marathi

पारशी लोकांसाठी पतेती हा एक महत्त्वाचा धार्मिक दिवस आहे. आपल्या पंचांगाप्रमाणेच पारशी म्हणजेच पर्शियन- सध्याचे इराणी- लोकांचे पंचांग हे चांद्रमासानुसार आहे. त्यांच्या सनाला ते ‘यजदे जर्दी’ म्हणतात.

पतेती, नवरोज व खोरदाद साल हे पारशांचे महत्त्वाचे सण एका पाठोपाठच येतात. पतेती हा वर्षाअखेरीच्या दिवशी, नवरोज हा नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि खोरदाद साल – झरतुष्ट्राचा जन्मदिन – हा पहिल्या महिन्यातल्या सहाव्या दिवशी येतो.

पतेती

त्यांपैकी पतेती हा सण होऊन गेलेल्या वर्षाचा आढावा आणि येत्या वर्षाचे शुभसंकल्प करण्याचा, अशा दोन्ही अर्थाने महत्त्वाचा आहे. पतेती हा शब्द पतेतपासून बनला आहे. पतेत ही एक पश्चात्तापदर्शक प्रार्थना असून, कळत-नकळत हातून घडून गेलेल्या पातकांच्या क्षालनार्थ ती केली जाते. ३६० दिवसांच्या वर्षअखेरीचे सहा दिवस हे या प्रार्थनेचे असतात. यांपैकी शेवटचा दिवस म्हणजे पतेती. हा प्रार्थनेचा दिवस आहे.

पतेती किंवा कोणत्याही पारशी सणाची तारीख चार वर्षांनी एक दिवस अलीकडे येते.

पारशी लोक सणाच्या दिवशी घर-अंगण साफ करतात, ते फुलांनी शृंगारतात; आपल्याप्रमाणेच रांगोळ्या घालण्याची, धूप-दीपाचीही पद्धत त्यांच्यामध्ये आहे. देवळाप्रमाणे ‘आतश-बेहराम’ या त्यांच्या अग्यारीला भेट देऊन तेथे प्रार्थनेचाही प्रघात प्रत्येक सणाला असतो. पतेतीच्याच दिवशी पारश्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, त्यांचीही आठवणही केली जाते.

पारशी वर्षारंभ दिनाला नवरोज म्हणतात. तो ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या आरंभी येतो. पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे नवरोज. या दिवशी पारशी लोक त्यांच्या देवळात म्हणजे अग्निमंदिरात जातात. तिथे पवित्र अग्नी अहोरात्र पेटत असतो. तिथे प्रार्थना करून नंतर उरलेला दिवस आप्तेष्टांना भेटण्यात, खाण्या-पिण्यात व नाटक, सिनेमा बघण्यात आनंदाने घालवतात.

नवरोजपासूनचा सहावा दिवस म्हणजे खोरदाद साल. हा पारशी धर्माचे संस्थापक झरतुष्ट्र यांचा जन्मदिन होय. हाही दिवस प्रार्थना करून साजरा केला जातो.

पारशी लोक मूळ इराणचे. इसवी सन ६००च्या आसपास महंमद पैगंबरांच्या अनुयायांनी इस्लामचा आक्रमक प्रसार सुरू केला. जे इस्लामचा स्वीकार करायला तयार नसत, त्यांची कत्तल करायलाही ते मागेपुढे पाहत नसत. अशा स्थितीत आपला समाज व आपला धर्म इराणमध्ये सुरक्षित राहणार नाही हे जाणून पारशी लोकांनी इराण सोडायचे ठरवले. आपला धर्म हिंदुस्थानात नक्की सुरक्षित राहील व तेथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा विश्वास वाटल्याने त्यांनी हिंदुस्थानात यायचे ठरवले. इराणहून ते समुद्रमार्गे प्रथम गुजरातमध्ये आले व संजान या ठिकाणी किनार्‍याला लागले.

अशी गोष्ट सांगतात की, त्यांनी तेथील राजाकडे आश्रय मागितला, तेव्हा राजाने त्यांना दुधाने भरलेला एक प्याला दिला. त्याचा अर्थ असा की, या राज्यात आता आणखी लोकांना जागा नाही. पारश्यांच्या प्रमुखाने त्या पेल्यात चमचाभर साखर टाकली आणि सुचवले की, आम्ही येथील लोकांत मिळून मिसळून राहू. तेव्हा राजाने त्यांना आपल्या राज्यात आश्रय दिला. अशा तर्‍हेने पारशी लोक प्रथम गुजरातमध्ये स्थायिक झाले. त्यांनी गुजराती भाषा व वेशभूषेचा स्वीकार केला आणि ते भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले.

पुढे वाचा:

Leave a Reply