Set 1: माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध – My Favourite Animal Tiger Essay in Marathi

दिवाळी सुट्टीत मी आईबाबांसोबत कान्हा येथील अभयारण्यात गेलो होतो. कान्हा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध असले तरी तो आहे जंगलचा राजा. तो असा केव्हाही दर्शन थोडाच देणार? परंतु आमचे नशीब खूपच थोर होते म्हणूनच केवळ आम्हाला वाघाचे दर्शन घडले. तो मस्तपैकी तळ्यात पाणी पित होता. आमची उघडी जीप बरीच लांबवर होती.

त्याला पाहून चालकाने जीप थांबवली. पाणी पिऊन झाल्यावर वाघमहाराज ऐटीत रस्त्यावरूनच आमच्या पुढून चालू लागले. त्यांच्यामागून सुरक्षित अंतर ठेवून आमची जीप जात होती. दहापंधरा मिनिटे चालल्यावर वाघमहाराज बाजूच्या दाट गवतात घुसले आणि दिसेनासे झाले.

खरोखर वाघ हा मोठा राजबिंडा प्राणी आहे. त्याच्या अंगावरील काळेपिवळे पट्टे, त्याची तुकतुकीत फर, तीक्ष्ण दात आणि अणकुचीदार नख्या ह्यामुळे तो जंगलातील सर्व जनावरांच्या काळजात धडकी भरवतो हेच खरे ! त्याची चाहूल लागल्यावर माकडे किचकिच करून सर्व जनावरांना इशारा देतात. पक्षीही ओरडू लागतात. त्यामुळे जंगलात चरत असलेली हरणे आणि रानम्हशींचे थवे सावध होतात. जीव घेऊन पळणे हेच त्यांचे काम असते. त्यांच्यातील जो मागे पडतो तो वाघाच्या तावडीत सापडतो.

परंतु एक मात्र आहे. ते म्हणजे वाघ भूक लागली की शिकारीला निघतो. अन्नाचा साठा करून ठेवण्याची पद्धत त्याच्यात नाही. त्यामुळे एकदा शिकार केलेली दोनतीन दिवस पुरते. म्हणूनच तर पोट भरून झोपलेल्या वाघाजवळ जाऊन हरीण निर्धास्तपणे चरते. त्याला माहिती असते की पोट भरलेला वाघ आपल्यावर हल्ला करणार नाही.

प्रत्येक नर वाघाची जंगलातली हद्द ठरलेली असते. त्या हद्दीत तो दुस-या नराला पायही ठेवू देत नाही. वाघ हा कुटुंबवत्सल प्राणी नाही. वाघीण एकटीच छाव्यांना सांभाळते. आईच्या छत्राखाली बछडे शिकार करायला शिकतात.

आजकाल वाघांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे त्यांच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. परंतु त्यांच्या चामड्याला आणि दातांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असल्यामुळे त्यांची बरीच चोरटी शिकार होते. हे फारच वाईट आहे.

Set 2: माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध – My Favourite Animal Tiger Essay in Marathi

वाघ जंगलचा राजा आहे. तो रूबाबदार आणि राजबिंडा दिसतो. तो खूप शक्तिवान असतो. खूप वेगाने पळतो. त्याच्या अंगावर पिवळे पट्टे असतात त्यामुळे गवतात तो लपून राहू शकतो.

वाघ हा मांसाहारी प्राणी आहे, त्याचे दात आणि सुळे खूप तीक्ष्ण असतात. तो हरीण, ससे इत्यादी पशू खातो. मात्र भूक लागली असेल तरच वाघ शिकार करतो. पोट भरलेले असले तर तो उगाचच शिकार करीत नाही.

घनदाट जंगलात त्याचा निवास असतो. माणूस वाघाला घाबरतो तसाच वाघही माणसाला घाबरतो. हल्ली आपण बरेचदा ऐकतो की वाघ माणसांच्या वस्तीत येतो पण ते खरे नाही. आपण जंगले तोडतो त्यामुळे वाघाला मानवी वस्तीत यावे लागते.

इंग्रजांच्या काळात वाघांची खूप शिकार झाली त्यामुळे हे देखणे जनावर पृथ्वीवरून नाहीसे होते की काय असे वाटू लागले. म्हणून मग स्वातंत्र्य मिळाल्यावर वाघांसाठी खास अभयारण्ये निर्माण केली गेली. रणथंबोर, कान्हा, ताडोबा इत्यादी अभयारण्यात आज आपल्याला वाघ पाहायला जावे लागते.

साहसी पुरूषाला वाघ म्हणण्याची पद्धत आहे. असा हा रूबाबदार प्राणी मला खूप आवडतो.

Set 3: माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध – My Favourite Animal Tiger Essay in Marathi

माणूस माणसांवर जसा प्रेम करतो, तसे प्राण्यांवरही करतो. मग तो प्राणी पाळीव असो की जंगली असो. कुणाला कुत्रा आवडतो, तर कुणाला मांजर! कुणाला बैल आवडतो, तर कुणाला हरिण! कोणाला सिंह तर कोणाला हत्ती! माणूस आपल्या आवडत्या प्राण्यावर खूप प्रेम करतो.

मला मात्र खूप आवडणारा प्राणी म्हणजे वाघ. शिकारीमुळे आणि जंगलतोडीमुळे वाघांची संख्या खूप कमी झाली आहे, असे मी कुठेतरी वाचतो किंवा ऐकतो, त्यावेळी मनाला खूप वाईट वाटते. वाघाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. भविष्यातील मुलांना वाघ केवळ चित्रातच किंवा खेळण्यातच पाहायला मिळेल असे मला तरी वाटते. वन्य प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शिकारीवर बंदी घालूनही त्यांची शिकार होते हे दुर्दैव आहे. म्हणूनच वन्य प्राण्यांचे आणि वाघांचे सर्वांनी मिळून रक्षण केले पाहिजे.

वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ म्हणजे शूराचे प्रतीक दणकट आणि बळकट शरीर, धाडसी वृत्ती आणि जबरदस्त आक्रमकता या गुणांमुळे वाघ प्रसिद्ध आहे. म्हणूनच म्हटले जाते.

‘झेप असावी चित्त्यासारखी आणि छाती असावी वाघासारखी.’

वाघ विविध प्रकारचे आहेत. पट्ट्याचा बंगाली वाघ, आफ्रिकन टायगर, बिबट्या, बिबळ्या, चित्ता, पँथर अशा विविध प्रकारचे वाघ प्रसिद्ध आहेत. वाघ हा मार्जार कुळातील असल्याने मांजरीला वाघाची मावशी म्हणतात. माझ्या आवडत्या प्राण्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यांचे सर्वांनीच रक्षण करायला हवे.

माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध – My Favourite Animal Tiger Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply