साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य – साखरपुडा कसा करावा – साखरपुडा समारंभ तयारी

हल्ली साखरपुडा ह्या समारंभाला फार महत्त्व येऊ लागले आहे. साखरपुडा ह्याचा अर्थ लग्न निश्चित करणे हा होय.

घरच्या घरी दोन्ही कुटुंबातील वीस-पंचवीस मंडळींना बोलावून हा समारंभ करता येईल. तुमची सांपत्तिक परिस्थिती चांगली असेल, दोन्ही कुटुंबात उत्साह असेल तर हा समारंभ हॉल घेऊनही करता येईल. थोडेफार डेकोरेशन व सनईची रेकॉर्ड लावून समारंभाच्या मंगल वातावरणात भर टाकता येईल.

औक्षवणासाठी तबक, निरांजन, कुंकवाचा करंडा, अक्षता, सुपारी, काड्यापेटी, फुलवाती व तूप अशी तयारी करावी.

साखरपुडा समारंभासाठी मुलीकडील मंडळींसाठी साहित्य

  1. मुलाला नारळ, फुलांचा गुच्छ व अंगठी, शर्ट-पँटचे कापड, पैसे व पेढ्यांचा पुडा देणे.
  2. मुलाचे औक्षवण करणे- अत्तर लावणे.
  3. मुलाच्या आईला साडी घेणे, ओटी भरणे.
  4. इतर मानकरी मंडळींना पैसे किंवा काहीतरी लहानशी वस्तू भेट म्हणून देणे (वडील, भाऊ, बहिण )

साखरपुडा समारंभासाठी मुलाकडील मंडळींसाठी साहित्य

  1. मुलीला साडी घेणे, फुलांची वेणी, ओटी भरणे, अंगठी घेणे. ह्याशिवाय एखादा लहानसा दागिना हौसेने द्यावा. साखरेचा त्रिकोणी पुडा देणे.
  2. मुलीचे औक्षवण करावे.
  3. मुलीची आई व इतर मानकरी मंडळींना पाकिटात घालून पैसे द्यावे किंवा भेटवस्तू द्यावी.

हे सर्व झाल्यावर मुलगा व मुलगी ह्यांना एकमेकांना अंगठ्या घालायला सांगाव्या. नंतर त्यांना पेढा देऊन त्यांचे तोंड गोड करावे.

फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आलेल्या मंडळींना चहा, कॉफी व फराळाच्या बशा द्याव्या. पेढे, फुले वैगेरे द्यावे. नंतर सर्वांना पानसुपारी द्यावी.

साखरपुड्याच्या दिवशी सकाळी देवाची पूजा झाली की गणपतीच्या व आपल्या कुलदैवताच्या नावाने नारळ ठेवावे. महालक्ष्मी किंवा आपली कुलदेवता ह्यांच्या नावाने खणा-नारळाची ओटी भरून ठेवावी. घरातल्या देवाला नारळ ठेवावा. घरातील सर्व फोटोंना हार घालावे.

मुलीला सकाळी हाताला केशर लावावे. हिरव्या बांगड्यांचा चुडा भरावा. तिच्यासाठी नवी साडी घ्यावी. औक्षवण करावे. डोळ्यात काजळ घालावे. हौसेने एखादा दागिना द्यावा.

त्या दिवशी जेवायला चांगला मेजवानीचा बेत करावा. जवळच्या नातेवाईक मंडळींना जेवायला बोलवावे.

साखरपुडा हॉलवर करायचा असेल तर जी वेळ ठरली असेल, त्यापूर्वी अर्धा तास तरी अगोदर हॉलवर जावे. जाताना देण्या-घेण्याचे सर्व सामान यादीप्रमाणे एकत्र करून बॅग तयार करावी. काहीही विसरले नाही, याची खात्री करावी.

मुलाच्या घरच्या मंडळींनीही मुलाच्या हाताला केशर लावावे. औक्षवण करावे. डोळ्यात काजळ घालावे. हौसेने सोन्याची चेन किंवा दुसरे काही घ्यावे व हॉलवर साखरपुडा असेल तर वेळेपूर्वी अर्धातास हॉलवर हजर व्हावे. जाताना देण्या-घेण्याच्या सर्व वस्तू नीटपणे एकत्र करून बॅग भरून हॉलवर उपस्थित राहावे.

साखरपुडा समारंभासाठी लागणारे साहित्य – साखरपुडा कसा करावा – साखरपुडा समारंभ तयारी

पुढे वाचा:

Leave a Reply