बेरोजगारी निबंध मराठी – Berojgari Nibandh in Marathi

आपला आधुनिक भारत अनेक समस्यांशी झुंजत आहे. त्यापैकीच एक बेरोजगारीची समस्या आहे. राष्ट्रनिर्मिती व विकासामध्ये तरुण पिढीची महत्त्वाची भूमिका आहे. जर तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार न मिळाला तर एकूणच राष्ट्राची प्रगती मंदावते.

बेकारीचा संबंध मागणी आणि पुरवठ्याच्या असंतुलनात आहे. ही आपल्या आधुनिक समाजाची एक निर्मिती आहे. प्राचीन भारतात अशा प्रकारच्या समस्यांची उदाहरणे सापडत नाहीत. कारण त्यावेळी वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे जो तो आपल्या वर्णानुसार पंरपरांगत काम करीत असे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्नच निर्माण होत नसे. परंतु आता शिक्षणाच्या प्रसारामुळे व वर्णव्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळे पैतृक व्यवसायाकडे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पुत्र आपल्या पित्याचा व्यवसाय करण्यास तयार होत नाही. पण अशा प्रकारे सर्वांनाच दुसऱ्या प्रकारचा व्यवसाय मिळणे सोपे राहिलेली नाही.

इंग्रजांच्या आगमनानंतर भारतात बेरोजगारीची समस्या सुरू झाली. भारताचे वैभव पाहून इंग्रजांचे डोळे दिपले. त्यांच्याबरोबरच डच, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश लोकही आले होते. इतर फिरंगी निघून गेले पण इंग्रज मात्र इथेच पाय रोवून बसले. आपल्या राजवटीत इंग्रजांनी भारताची मुळे खिळखिळी करून टाकली. भारतातून सर्व कच्चा माल इंग्लंडला पाठविला आणि तिकडून पक्का माल आणून भारतीय बाजारपेठेत विकला. परिणामी भारतीय उद्योगधंदे नष्ट झाले. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जे शिक्षण लॉर्ड मेकॉलने भारतात सुरू केले त्यामुळे फक्त कारकूनच निर्माण झाले. कारण त्यात व्यावसायिक शिक्षणाचा अंतर्भाव नव्हता. हाताने काम करण्यात भारतीयांना अपमान वाटत होता. त्यामुळे बेरोजगारी हा कधीही न सुटणारा प्रश्न उभा राहिला.

भारतात कोट्यावधी तरुण तरुणांनी रोजगार कार्यालयात आपली नावे नोंदवून ठेवली आहेत. त्यांच्यापैकी कित्येक जण खाजगी व्यवसायात कार्यरत आहेत. तरी त्यांना सरकारी नोकरीची आशा आहे. अनेक बेकारांनी आपले नावही रोजगार कार्यालयात नोंदविलेले नाही. त्यामुळे भारतातील बेरोजगारांची नक्की संख्या उपलब्ध होऊ शकत नाही.

वेगवेगळ्या प्रकारची बेरोजगारी दिसून येते. १) शिक्षित/प्रशिक्षित असूनही बेकार, २) प्रकार अशिक्षित आणि अर्धशिक्षित बेकार, ३) वर्षातून काही महिनेच काम मिळणारे बेकार ही बेकारी ग्रामीण भागात दिसून येते. खेड्यात शेतकरी ६ महिने बेकार असतो. खेड्यामधील लघु व कुटिरोद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे बेकारी वाढली आहे. चौथा प्रकार असंतुष्ट बेकारांचा आहे. ज्यांना काम मिळते पण ते त्यांच्या योग्यतेप्रमाणे नसते.

बेकारीचे मूळ कारण वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी नव्या रोजगाराची सोय करणे. भारतासारख्या गरीब देशाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपली शिक्षणपद्धतीही बेकारीला तितकीच जबाबदार आहे. या पद्धतीमुळे कारकून मिळाले पण कर्णधार मिळाले नाहीत. ग्रामीण जनता शहराच्या मोहात पडून आपली कामे सोडून शहरात वास्तव्यास येते. भारतात येणारे घुसखोर, यांत्रिकीकरण, प्रशासनाचा गलथानपणा ही पण बेकारीची कारणे आहेत.

बेकारी आपल्या देशाला वाळवीप्रमाणे गिळंकृत करीत आहे. या समस्येमुळे बेशिस्त, भ्रष्टाचार, अराजकता, दहशतवाद इ. उत्पन्न होत आहेत. ‘रिकामे डोके सैतानाचे घर’ या म्हणीप्रमाणे एक बेकार व्यक्ती स्वत:चा आत्मविश्वास तर गमावतेच त्याबरोबरच कुंटुब आणि समाजावर पण ओझे बेनून राहते. त्याच्या मनात सर्वांबद्दल विद्रोहाची भावना निर्माण होते. व ती समाज व देशविरोधी कार्याला लागू शकते, व्यसनाधीन होऊ शकते, बेकार तरुण वर्गाचा स्वार्थी नेत्यांद्वारे वापर होतो. दहशतवादी कारवायाही त्यांच्याकडून करवून घेतल्या जातात.

बेकारीची समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने व्यावसायिक शिक्षण,लोकसंख्येवर नियंत्रण, कुटुंबनियोजनाचा प्रचार, कुटिर उद्योगांना प्रोत्साहन, बेकारी निवारण योजना इ. कार्यक्रम राबविण्यास सुखात केली आहे. बँकांमार्फत उद्योग-व्यवसायासाठी कर्जे, आर्थिक उदारीकरणाची नीती अवलंबिल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारत सरकारच्या अथक प्रयत्नानंतरसुद्धा ही समस्या सुटलेली नाही. त्यासाठी जनतेचेच मनोपरिवर्तन करावे लागेल. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे हा न राहता बौद्धिक विकास हा असला पाहिजे. एका पातळीपर्यंत बौद्धिक विकास झाल्यावर त्यानुसार रोजगार शोधला पाहिजे. लोकांना श्रमाचे महत्त्व कळाले पाहिजे. परिश्रमाने अन्न खाण्यात जो आनंद आहे तो इतर कशात नाही. खोटा स्वाभिमान सोडून वास्तवात जगावे. शहराकडे धावू नये. श्रमिकांच्या अधिकारांचे रक्षण करावे. संप; टाळेबंदीवर नियंत्रण ठेवावे. मजूर संघटनेने यासाठी तयार असावे.

एकापेक्षा एक चांगली ध्येये, उद्दिष्टे जनतेसमोर ठेवावीत. ज्यामुळे जनतेला उत्साह वाटेल. जर आपण आपल्या क्षमतेचा उपयोग समजून उमजून केला तर आपला देश एक महाशक्ती बनेल.

पुढे वाचा:

Leave a Reply