पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध – Purgrastache Manogat Marathi Nibandh
‘आणखी किती दिवस मला या धनादेशासाठी सरकारकडे खेटे घालावे लागणार आहेत. कोणास ठाऊक ? एक पूरग्रस्त म्हणून प्रत्येकाला सरकारने पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली, पण गेले सहा महिने ही मदत आमच्यापर्यंत पोचलेलीच नाही.
तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. सकाळी नेहमीप्रमाणे कमावर जायला निघणार होतो, पण आभाळ अंधारून आलं होतं. माझी बायको मला सांगत होती की आज शेतावर जाऊ नका, पावसाची चिन्हं दिसतायत. पण रोजंदारीवर पोट आमचं. शेतावर न जाऊन कसं चालेल ? गरीबीत दिवस काढले होते. दहावीपर्यंत शिकलो होतो, पण पुढच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून शिक्षण सोडावं लागलं होतं. शेतावर पोचेपर्यंत हळूहळू पावसाला सुरूवात झाली होती. पाऊस मुसळधार नव्हता, पण सतत पडत होता. शेतावर पोचलो आणि पावसाचा जोर वाढू लागला. विजा कडाडू लागल्या आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. बघता बघता पाणी वाढू लागलं. पाऊलभर, गुडघाभर म्हणता म्हणता कमरेभर पाणी साचलं. पाऊस थांबण्याच चिन्हं दिसेना. जवळच्या छत्रीचा उपयोग काय होणार ? शेतातल्याच एका खोपट्यात आसऱ्याला गेलो, पण त्या खोपट्यातही पाणी शिरलं.
घरी काय होईल ? आपली कारभारीण काय करत असेल या विचारानं जिवाचं पाणी-पाणी झालं. त्याच पाण्यातून वाट काढत काढत घराच्या दिशेनं निघालो. कमरेभर पाण्यातून वाट काढणं फार जिकीरीचं होतं. शेतातल्या पिकांचा फार काला झाला होता. घराच्या ओढीनं पुढे जात होतो. पण थोडं अंतर चालून गेल्यावर कळलं की पुढची सगळी वाटच बंद झाली होती. मनात विचार आले, बायकोचं ऐकायला हवं होतं. निदान संकटाच्या वेळी ती आणि मी तरी बरोबर असतो. इथे ती घरात आणि मी बाहेर अशी परिस्थिती होती. तासन्तास जात होते. शेवटी संध्याकाळी पावसाचा जोर कमी झाला. पाणी ओसरू लागलं. जिवाच्या आकांतानं पायवाट तुडवत तुडवत घरी पोचलो. त्या पावसात आमच्या छोट्याशा घरातही पाण्यानं थैमान घातलं होतं घरात बायको नाही, हे पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली. बाजूच्या घरातही कोणीच नव्हतं. कुठे गेले असतील सगळे ? नाही नाही ते विचार मनात येऊ लागले. मी सैरावैरा फिरू लागलो होतो. संवाद साधणार तरी कोणाशी ?
अशात काही तास गेले. दूर अंतरावरून शेजारची रखमा येत होती. तिनं वर्दी दिली की पावसाचं पाणी वाढू लागल्यावर गावातल्या बायकांनी काही कोसावर उंचावर असलेल्या एका मंदिरात स्थलांतर केलं होतं. जिवात जीव आला. पाऊस शांत झाला होता. मंदिरात जाऊन समोर बायकोला पाहिल्यावर हायसं वाटलं.
दुसऱ्या दिवशी सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्याचं कळलं. पण ती मदत कधी मिळणार, अशी शंका तेव्हाच मनात आली होती. ज्या शेतावर काम करत होतो, ते तर उद्ध्वस्त झालं होतं. शेताची रयाच गेली होती. घरातला चिखलगाळ काढण्यातच काही दिवस गेले. त्या पुराच्या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. आज सहा महिने झाले या गोष्टीला. हळूहळू मन खंबीर होऊ लागलं. पण तरीही आज कोणाची तरी आधाराची थाप पाठीवर असावी असं वाटतं.
शाळेत शिकलेल्या ‘कणा’ या कवितेच्या दोन ओळी आजही प्रेरणा देतात.
‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा
“पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा’
पुढे वाचा: