ब्रेकिंग न्यूज निबंध मराठी

“एका शिष्याला गुरूनं एकदा प्रश्न विचारला, “कोणता क्षण आपल्या हातात आहे?’ शिष्य पटकन म्हणाला, “कुठलाही क्षण खरोखरच आपल्या हातात नाही.” या वाक्याचा प्रत्यय आला २६ नोव्हेंबर या दिवशी. रात्री ९ ।। नंतर सगळ्यांच्या घरी टी.व्ही.च्या वाहिन्या सुरू झाल्या होत्या. ताज, ओबेरॉय हॉटेलला अतिरेक्यांनी वेढल्याची बातमी घरोघरी पोहोचली. सगळ्यांच्या घरचे फोन आणि मोबाईलही खणखणू लागले होते. प्रत्येकजण चिंतेत होता. एकमेकांना फोन करून खुशाली विचारत होता. कट्ट्यांवर, नाक्यांवर, वसाहतीत चर्चा रंगत होत्या. चॅनलवाल्यांना पुन्हा एकदा ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाली होती.

सरकारी अधिपत्याखाली येणारे दूरदर्शन चॅनल्स आणि खाजगी चॅनल्स यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. खाजगी वाहिन्यांवरून (काही अपवाद वगळता) जी काही दृश्यं दाखविली जात होती, ती मन विषण्ण करणारी होती. ओबेरॉयमधून जेव्हा लोकांची सुटका करण्यात आली, तेव्हा चॅनल्स रिपोर्टर त्यांच्यामागे धावून “अतिरेकी ‘ कसे दिसत होते ? किती अतिरेकी आहेत ? आता तुम्हांला कसं वाटतंय ?” असे प्रश्न विचारत होते. ओबेरॉयच्या आतमध्ये अडकलेली माणसं काय परिस्थितीत होती, याचा विचार त्या रिपोर्टर्सना करता येत नव्हता का ?

एका खाजगी वाहिनीवर बघितलेलं दृश्य. ओबेरॉयमधून एक जर्मन पर्यटक सुखरूप बाहेर पडतो. तो मुंबईची सफर करायला आला होता. त्याला त्या पत्रकार महिलेनं विचारलं “कशी वाटली तुम्हांला मुंबई ? मुंबईत तुम्हांला परत यावंसं वाटेल का?” हे काय प्रश्न झाले ? पत्रकारिता नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे ? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.

ओबेरॉय, ताजमध्ये जी धुमश्चक्री चालू होती, ती आमच्याच चॅनलने कशी छान (?) टिपली, यासाठी चॅनेलमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. “मुंबईकरांवर पसरलं आहे भितीचं सावट….”, “अतिरेकी समुद्रीमार्गानं आले मुंबईत….” या गोष्टी नाट्यमय रितीनं चॅनलवर दाखविल्या जात होत्या. राजकारणी लोकांच्या प्रतिक्रिया मिळविण्यासाठी पत्रकार, छायाचित्रकार यांची धावपळ चालू होती. दूरदर्शनवर मात्र सातत्याने या बातम्या दाखविल्या जात नव्हत्या. हीच गोष्ट आकाशवाणीच्या वाहिन्या व खाजगी रेडिओ वाहिन्या यांच्या बाबतीत होत होती. खाजगी वाहिन्या ‘डायल-इन’ कार्यक्रमातून श्रोत्यांना बोलण्याची संधी देत होत्या. रेडिओ जॉकी म्हणून
खाजगी वाहिनीवर काम करणारी निवेदक मंडळी आम्हांला चॅनलनं गाडी पाठवली. आम्ही जिवावर उदार होऊन रेडिओ स्टेशनवर कसे आलो, अशा आशयाचं विनेदन करत होती आणि श्रोतेही, ‘ताज’ हॉटेल परिसरात ‘पिकनिक’ (?) ला गेल्यासारखे आम्हाला वाटलं, अशी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत होती. आकाशवाणी मुंबई केंद्राद्वारे मात्र या घटनेला एवढी प्रसिद्धी देण्यात आली नव्हती.

आकाशवाणी व दूरदर्शन ही दोन सरकारी माध्यमं आहेत. त्यांना सरकारचे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे २६-११-२००८ च्या त्या घटनेला या दोन माध्यमातून वारंवार प्रसिद्धी दिली जात नव्हती. खाजगी वाहिन्या, मग त्या रेडिओच्या असोत किंवा दूरदर्शनच्या, तिथे सेन्सॉर बोर्ड असावं, असं वाटतं. काल-परवा फक्त पत्रकारितेचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करणारा मुलगा/मुलगी स्वतःला ‘रिपोर्टर” म्हणू लागतो, तेव्हा प्रचंड चीड येते. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी जिवाची बाजी लावून अतिरेक्यांशी लढताना वीरमरण पत्करले, त्यांच्या बलिदानाबद्दलही त्या अधिकाऱ्यांची पत्नी, आई यांच्या प्रतिक्रिया चॅनलवाल्यांना हव्या होत्या. दोन दिवसांहून अधिक काळ सातत्यानं देशासाठी लढणाऱ्या जवानांबद्दल, कमांडोबद्दल किती जणांना आस्था वाटत होती ? ‘सेलीब्रेटी’ (?) सुद्धा शहीद झालेल्या जवानांबद्दल प्रतिक्रिया द्यायला उत्सुक (?) होते. हे सगळं दर्शन संतापजनक होतं. पण…

पण बोलून काय फायदा आहे ? आम्ही काय करू शकतो? फक्त चर्चा, आणि चर्चा… काही दिवसांनी पुन्हा एखादी खळबळजनक घटना घडेल आणि पुन्हा टी.व्ही. ऑन होतील…. “या घटनेला पहिल्यांदा प्रसिद्धी दिली फक्त आमच्या वाहिनीने, बघत रहा आमची वाहिनी……”

२६ जुलैच्या महापूराच्या वेळी आणि ११ जुलैच्या बॉम्बस्फोटाच्या वेळीही नेमकं हेच घडलं होतं. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. त्या बॉम्बस्फोटात तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, तुम्हाला सरकारविषयी काय वाटतं असे प्रश्न विचारले जात होते. पत्रकारितेचं हे दर्शन मन विषण्ण करणारं होतं. टीव्हीवरच्या ‘रिअॅलिटी शो’ज मध्येही तेच आहे. एखादा स्पर्धक बाद होताना ‘तुला कसं वाटतं ?” असं विचारणं म्हणजे परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला ‘आता तुला काय वाटतं?’ असं विचारण्यासारखं आहे. आता बाद झालेली व्यक्ती, “आनंद झाला” असं उत्तर देईल का ? आणि त्या बाद झालेल्या स्पर्धकानं “तुमच्या वाहिनीच्या करारातून मी मुक्त झाल्याचा मला आनंद आहे’ असं म्हटलं, तरी ते एडिटींगच्या वेळी ‘कट’ करण्यात येईल. ही रिअॅलिटी आपल्यासमोर येत नाही. .

गेल्या महिन्यात आय.एन.टी. नाट्यस्पर्धांचा वादही गाजला. कॉलेजमधल्या हेवेदाव्यात एका निरपराध विद्यार्थ्याला मारहाण झाली. टी.व्ही. चॅनलनं त्या घटनेला ‘ब्रेकिंग न्यूज’ करण्याचा प्रयत्न केला. साधारपणे वर्षभरापूर्वी ‘इट्ज दी ब्रेकिंग न्यूज’ नावाचा हिंदी चित्रपट झाला होता. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. त्याचप्रमाणे ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटातही बॉम्बस्फोटात एका तरुणाचा मृत्यू होतो, ही घटना आहे. त्या मुलाचं लग्न चॅनल रिपोर्टरशी ठरलेलं असतं. त्या निवेदिकेलाच या संदर्भात चॅनल मॅनेजर प्रतिक्रिया द्यायला सांगतो. ती निवेदिका कशी प्रतिक्रिया देईल ? वास्तवतेचं चित्रण करणारा हा चित्रपटही लोकप्रिय झाला.

आमची संस्था अन्यायग्रस्तांना मदत करेल, असा दिलासा देणाऱ्या किती संस्था खरोखरच न्याय मिळवून देतात ? ‘कुसुम मनोहर लेले’ नाटक आठवून पहा. नाटक प्रेक्षकांच्या समाधानासाठी सुखांत केलं आहे. पण नाटक संपताना विनय आपटेंचं निवेदन आहे, “प्रत्यक्षात मात्र खऱ्या ‘कुसुम मनोहर लेले’ ला न्याय मिळवून द्यायला कोणतीही स्त्री मुक्ती संघटना यशस्वी होऊ शकली नाही. खरी ‘कुसुम’ एका आश्रमात वेडी होऊन जीवन जगत आहे…” हे निवेदन ऐकताच डोळ्यांत पाणी येतं.

सध्या वृत्तपत्रं आणि येणारी चॅनल्स यांचं प्रमाण वाढणार आहे. येत्या सहा महिन्यात किमान पाच मराठी चॅनल्स सुरू होतील, असं म्हणतात. तरुण पिढीकरिता नोकरीच्या प्रचंड संधी मिळतीलही. पण त्यातले किती पत्रकार खरोखर ‘जागरूक’ असतात, अभ्यासू असतात ? एक किस्सा सांगावासा वाटतो. ‘फिर हेराफेरी’ चित्रपटात शूटींगला गेलो होतो. एका हिंदी चॅनलच्या पत्रकाराने परेश रावलना प्रश्न विचारला ‘तुम्हाला विनोदी भूमिका करण्याचा कंटाळा येत नाही ?” परेश रावलने त्या पत्रकाराला उत्तर दिलं, “आधी मी ज्या चित्रपटात सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका केली आणि ज्या चित्रपटात मी खलनायकाच्या भूमिका केल्या, त्या चित्रपटांची माहिती मिळवा आणि मग माझी मुलाखत घ्या”. सर्व पत्रकारांच्या घोळक्यातून तो बिच्चारा पत्रकार निघून गेला.

असे अनेक अनुभव सांगता येतील. ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या निमित्तानं जो विचारांचा प्रवाह मनात आला, तो मांडावासा वाटला.

पुढे वाचा:

Leave a Reply