मना घडवी संस्कार मराठी निबंध

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिन्हीसांजेची वेळ होती. लहान मुलगा शाळेतून घरी आला. हातपाय धुतले. शुभंकरोती म्हणून तो मुलगा अभ्यासाला बसला. काळे बदलला. वेळ तिन्हीसांजेचीच. असाच एक मुलगा शाळेतून घरी आला आणि दफ्तरचपला भिरकावून तो मुलगा हातात ‘रिमोट कंट्रोल’ घेऊन टीव्ही पुढं बसला. हे असं का घडलं ? काळ बदलला म्हणून की संस्कार बदलले म्हणून ! अर्थातच संस्कार बदलले म्हणून.

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार दयावा तशी मूर्ती घडते आणि म्हणूनच योग्य वयात मुलांच्या संवेदनशील मनाला आकार दयावा लागतो. ती जबाबदारी प्रामुख्यानं पाळतात ते काही घटक. संस्कार करणारा पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे आईवडिल, यानंतर शिक्षक, मग समाज आणि प्रसारमाध्यम. पालकांनी मुलांना योग्य वळण लावावं लागतं. प्रसंगी कठोरही व्हावं लागतं, आपल्या पाल्यांना कधीकधी शिक्षा देखील करावी लागते. हल्ली आपण पाहिले तर बऱ्याचदा पालक मुलांचे सगळे हट्ट पुरवतात. त्यांचे खूप लाड करतात, आपलं मूल जे मागेल ते सर्व जे काही त्याला सहजासहजी उपलब्ध करून देतात. पण त्यामुळे मुलांना कधीकधी पैशाची किंमतच कळत नाही.

शाळेतल्या शिक्षकाचीही मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी असते. शिक्षक शब्दात तीन अक्षरं आहेत. त्यावरून शिक्षकाची व्याख्या करता येईल.

शि – जो मुलांना शिक्षण देतो, शिस्त लावतो, प्रसंगी शिक्षाही करतो
क्ष – जो प्रसंगी क्षमाशील होतो.
क – ज्याच्या व्यक्तिमत्वात कला आणि कर्तृत्वाचा संगम असतो.

हा खरा शिक्षक ! मुलांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम हा शिक्षक, गुरू करत असतो.

समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद नकळत मुलांच्या मनावर उमटतात. समाजात घडणाऱ्या जातीय दंगली, बॉम्बस्फोट अशा मानवनिर्मित आपत्तीमुळे मुल अस्वस्थ होतात. ऐकू नये, बघू नये अशा गोष्टींचं समाजात प्रदर्शन होत असल्यानं या गोष्टी बालमनावर विपरीत परिणाम करतात.

वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक, चित्रपट, संगणक, मोबाईलही आजच्या काळातील प्रमुख प्रसारमाध्यमं म्हणावी लागतील. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्र, नाटक, चित्रपटांनी जनजागृती आणि समाजप्रबोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. आजही या प्रसारमाध्यमांचा उपयोग चांगल्या कामासाठी केला जाऊ शकतो.

दुर्दैवाची गोष्ट ही की आज समाजात आदर्शच उरले नाहीत. (काही अपवाद वगळता) ज्याच्या पायावर आदराने डोकं ठेवावं, असे पायच आज कुठे सापडत नाहीत. संगणक, मोबाईलचा प्रसारमाध्यमांचा उपयोग चांगल्या गोष्टींऐवजी वाईट गोष्टींच्या प्रसारासाठी, गुन्हेगारी जगतासाठी केला जाताना दिसतो. हे चित्र बदलण्याची आज गरज आहे. खरं तर कठीण काहीच नाही, फक्त चांगलं करण्याची प्रेरणा दयायला कुणीतरी हवं. जीवनाच्या शाळेत अनुभव हे गुरू ठरतात. ती बिनभिंतीची उघडी शाळा निश्चितच संस्कार करते. फक्त तो दृष्टीकोन मनात असायला हवा.

म्हणतात ना,

तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षा असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार

पुढे वाचा:

Leave a Reply