माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

गोस्वामी तुलसीदास माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सर्व साहित्यकृती मला आवडतात. परंतु मला सर्वात जास्त त्यांचे ‘रामचरित मानस’ आवडते. त्यातील कित्येक दोहे आणि चौपदया मला तोंडपाठ आहेत. ते गाताना, गुणगुणताना मला आनंद होतो. ते मला मार्गदर्शन करतात. दु:ख संकटात निकटच्या मित्राप्रमाणे मला साथ देतात. त्यातील शिकवण आणि उपदेश यांच्याबरोबर जो संगीताचा वापर केलेला आहे तो वर्णन करणे शब्दापली- कडचे आहे. ‘रामचरित मानस’ रामकथा आणि रामचरित्रावर आधारित अतुलनीय एक महाकाव्य आहे. मागील कित्येक शतकांपासून याचा भारतीयांवर गाढ प्रभाव आहे. सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री-पुरुष सर्व जातीधर्मांचे व वर्गाचे लोक यापासून प्रेरणा, सामाजिक मर्यादा व नैतिकतेचे धडे घेतात. त्यातील आदर्शाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. भारतातील धर्मप्रवण जनतेत हे महाकाव्य एका अद्वितीय दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणास्त्रोत्राच्या रूपात ओळखले जाते. त्याची लोकप्रियता आणि व्यापक प्रभावाची अनेक कारणे आहेत. हा ग्रंथ आज ही तितकाच महत्त्वपूर्ण व प्रासंगिक आहे जितका तो त्याच्या रचनेच्या वेळी होता.

तुलसीदास एक महान लोकनायक होते. त्यांनी लोकहितासाठी आणि जनकल्याणसाठी ‘रामचरित मानस’ ची रचना केली होती. त्यांच्या अन्य साहित्यकृतीतही लोकसंग्रहाचा भाग मुख्य आहे. खंडन-मंडनाच्या प्रवृत्तीपासून दूर राहून या महान कवीने लोकधर्म, सहजभक्ती समन्वय आणि आदर्शाचा एक अद्वितीय संगम प्रस्तुत केला आहे. या घोर कळीकाळात मनुष्य रामाची समर्पण भावाने भक्ती करून या भवसागराला सहज पार करू शकतो.

सगुण भक्ती, ज्ञान आणि समन्वययाच्या दृष्टीने ‘रामचरितमानस’ अतुलनीय आहे. त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच अशा प्रकारच्या ग्रंथाशी करता येत नाही. जीवनात ज्या आदर्शाची कल्पना तुम्ही करू शकता ती यात आहे. राम आदर्श पुत्र, पती, राजा, मित्र, धनी आहे. भरतामध्ये भावाच्या आदर्शाची पराकाष्ठा आहे. तर हनुमान सेवा, त्याग, तपश्चर्या आणि वीरतेची महान् मूर्ती आहे. सीता पत्नीचे अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ उदाहरण. आहे. भारतातील प्रत्येक स्त्रीची इच्छा सीतेप्रमाणे त्यागी, तपस्विनी, पतिव्रता, दृढव्रता, व्यवहार-कुशल, विनम्र आणि एकनिष्ठ होण्याची असते. लक्ष्मणाचा त्याग आणि तपश्चर्या अद्वितीय आहे. बंधू राम आणि मातृस्वरूप सीतेच्या सेवेसाठी त्याने सर्व राजविलासाचा त्याग केला, इतकेच नव्हे तर आपली नवविवाहित पत्नी ऊर्मिलेलाही त्याने अयोध्येलाच सोडले. सुग्रीव आणि केवट ही मित्रत्वाची अजोड उदाहरणे आहेत. तर दशरथ हे पुत्रप्रेमाचे. रामाचे राज्य एक आदर्श राज्य होते. गांधीजी भारतात याच रामराज्याच्या स्थापनेचे स्वप्न पाहत होते. कविश्रेष्ठ तुलसीदास म्हणतात

जासुराज प्रिय प्रजा दुखारी सो नर
प्रवसि नरक अधिकारी।

आधुनिक राजकीय पुढारी, राजकारणी मुत्सद्यांनी यातून प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊन त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

रामाने निर्वासित असूनही रावण, कुंभकर्ण, मेघनादासारख्या अतिबलवान, पराक्रमी आणि मायावी राक्षसांचा संहार करून जनतेला व ऋषिमुनींना भयमुक्त केले. राम हे, असीम. आत्मशक्ती, चारित्र्य आणि तपश्चर्येमुळेच प्राप्त झालेल्या सिद्धीचे साकार रूप होते. त्याच क्षमतांमुळे ते अंजिक्य ठरले आणि अनेक राक्षसांचा, दैत्यांचा, असुरांचा त्यांनी संहार केला. तरीही ते अत्यंत उदार विनम्र, सहिष्णु आणि मोठ्या मनाचे होते. स्वार्थ आणि अभिमान यांचा तर त्यांना स्पर्शही झाला नव्हता. वानर, निषाद, भिल्ल इत्यादी आदिवासी जमातींकडून मदत घेण्यात व त्यांच्याशी मैत्री करण्यात त्यांना यकिंचितही संकोच वाटला नाही. उलट रामाला त्यांचा अभिमान वाटला. जटायुसारख्या पक्ष्यालाही त्यांनी हृदयाशी धरले व आदरपूर्वक आपला मित्र बनविले. शबरीची बोरे खाऊन स्वत:ला धन्य मानले. शिळा झालेल्या अहिल्येचा त्यांनी उद्धार केला. सर्वाचेच हित त्यांनी केले.

‘रामचरितमानस’ समन्वयाचा एक विराट प्रयत्न आहे. यात सगुण-निर्गुण, शैव-विष्णु, भक्ती, ज्ञान, भक्ती-कर्म, गाहेस्थ-वैराग्य शासक आणि शासित इत्यादीचा समन्वय दिसून येतो. अवधी आणि ब्रज या भाषांमध्ये त्यांनी आपले लेखन केले. तुलसीदासाची कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे. माझ्याप्रमाणे अनेकांचा हा साहित्य भक्ती ग्रंथ आहे. संस्कृतीदर्शन, संगीत इत्यादी दृष्टिकोनातून रामचरितमानस एक अद्वितीय ग्रंथ आहे. ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply