Relay Game Information in Marathi: आज आम्ही तुम्हाला रिले खेळाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत, जर तुम्हाला रिले खेळ खेळायचा असेल तर त्याचे नियम काय असतात आणि कसा खेळायचा याबद्दल सांगणार आहोत.
रिले शर्यत हा धावण्यातला सांघिक खेळ आहे. यात चार धावपट्टू भाग घेतात व स्पर्धेचे अंतर सम-समान भागात पार करतात. या प्रकारच्या शर्यतीत 4 X 100, 4 X 200 व 4 4 X 100 मीटरच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
रिले खेळाची माहिती मराठी – Relay Game Information in Marathi
१) ४ × १०० मी. आणि ४ × ४०० मी. या रिलेसाठी आरंभ रेषेच्या पुढे स्टॅगर्स द्यावेत.
२) रिले शर्यतीमध्ये वापरावयाचा दांडू (Baton) लाकडी अगर धातूचा असावा. दांडू रंगीत असावा. दांडूची लांबी २८ सें.मी. पेक्षा कमी नसावी आणि ३० सें.मी. पेक्षा अधिक नसावी. दांडूचा परीघ १२ सें.मी. ते १३ सें.मी. असावा. वजन ५० ग्रॅमपेक्षा अधिक नसावे.
३) पूर्ण शर्यतीमध्ये स्पर्धकाच्या हातामध्ये दांडू असला पाहिजे.
४) धावताना अगर दांडूची अदलाबदल करताना दांडू खाली पडल्यास ज्याच्याकडून तो खाली पडला असेल‚ त्यानेच तो परत उचलून घेतला पाहिजे. अदलाबदलीच्या वेळी दांडू टॉस करता येणार नाही.
५) दांडूच्या अदलाबदलीनंतर दांडू दिलेल्या स्पर्धकाने काही अंतर आपल्याच पट्ट्यात राहावे. अदलाबदलीनंतर लगेच आपला पट्टा सोडल्यास इतर संघाच्या स्पर्धकांना अडथळा होतो व अडथळा आणणारा स्पर्धक आणि पर्यायाने त्याचा संघ बाद होण्यास पात्र ठरतो.
६) रिले स्पर्धा सुरू झाल्यावर नंतरच्या फेरीसाठी दोन बदली खेळाडू (खेळाडूंच्या यादीतील) घेता येतील.
७) पुढील फेरीत खेळाडूंचा क्रम बदलता येईल.
८) एका फेरीत एका खेळाडूला दोनदा धावता येणार नाही.
४ × १०० मी. रिले
१) ४ × १०० मी. रिलेसाठी पुढीलप्रमाणे स्टॅगर्स द्यावेत :
पट्टा | अंतर (मीटर्स) |
---|---|
१ | ०.०० |
२ | ७.०४ |
३ | १४.७० |
४ | २२.३७ |
५ | ३०.०४ |
६ | ३७.७१ |
७ | ४५.३८ |
८ | ५३.०५ |
२) प्रत्येक पट्ट्यात स्टॅगर्सच्या पुढे प्रत्येक १० मीटरवर खूण करावी. खुणेच्या पुढे व मागे प्रत्येकी १० मी. असे एकूण २० मीटरचे अदलाबदल क्षेत्र (Exchange Zone) आखावे. या अदलाबदल क्षेत्रातच दांडूची अदलाबदल होते. अदलाबदल क्षेत्राच्या बाहेर दांडूची अदलाबदल झाली‚ तर तो फाउल समजावा आणि तो संघ बाद करावा. (अदलाबदल क्षेत्र दाखविणाऱ्या रेषा अदलाबदल क्षेत्रातच समाविष्ट असतात.)
(दांडूची अदलाबदल होताना दांडूची स्थिती विचारात घ्यावी. अदलाबदल होताना दांडू अदलाबदल क्षेत्रात असेल व स्पर्धक अदलाबदल क्षेत्राच्या बाहेर असला तरी तो फाउल मानू नये. दांडू फक्त घेणाऱ्याच्या हातात असेल‚ त्याच वेळी अदलाबदल पूर्ण झाली‚ असे म्हणतात.)
३) अदलाबदल क्षेत्राच्या पाठीमागे १० मीटर अंतरावर खूण असेल त्या खुणेपासून अदलाबदल क्षेत्रापर्यंतच्या मुक्त क्षेत्राचा (Free zone) दांडू घेणाऱ्याला वापर करता येईल. मात्र‚ या मुक्त क्षेत्रात दांडूची अदलाबदल झाल्यास तो फाउल मानावा. पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला मुक्त क्षेत्राचा वापर करता येणार नाही.
४ × ४०० मी. रिले
१) ४ × ४०० मी. रिलेमध्ये संघाचा प्रत्येक खेळाडू ४०० मी. अंतर धावतो.
२) प्रत्येक संघाने पहिली पूर्ण फेरी आणि त्यानंतरचा एक पूर्ण वक्र (curve) आपापल्या पट्ट्यातूनच धावावयाचे असते. वक्र संपल्यानंतर बाहेरील पट्ट्यातील खेळाडू आतील पट्ट्यात येऊ शकतात.
३) वक्र संपल्यानंतर स्पर्धक ज्या ठिकाणी आपले पट्टे सोडतात‚ त्या ठिकाणी ५ सें.मी. जाडीची रेषा मारावी आणि त्या रेषेच्या दोन्ही बाजूंना १.५ मीटर उंचीची निशाणे लावावीत.
४) स्पर्धक एक पूर्ण फेरी आणि एक पूर्ण वक्र एवढे अंतर आपापल्या पट्ट्यातूनच धावणार असल्याने आणि बाहेरील पट्ट्यातील स्पर्धकांना आतील पहिल्या पट्ट्यात येण्यासाठी अधिक अंतर धावावे लागणार असल्याने या रिलेमध्ये पुढीलप्रमाणे स्टॅगर्स द्यावेत –
पट्टा | स्टॅगर्स (मीटर्स) |
---|---|
१ | ०.०० |
२ | १०.५७ |
३ | २२.०८ |
४ | ३३.६४ |
५ | ४५.२० |
६ | ५६.७९ |
७ | ६८.३९ |
८ | ८०.०१ |
५) पहिला आणि दुसरा खेळाडू यांच्यामध्ये होणाऱ्या दांडूबदलासाठी पुढीलप्रमाणे अदलाबदल क्षेत्र आखावे :
- १ ला पट्टा – आरंभ रेषेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- २ रा पट्टा – आरंभ रेषेपासून पुढे ३.५३ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- ३ रा पट्टा – आरंभ रेषेपासून पुढे ७.३९ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- ४ था पट्टा – आरंभ रेषेपासून पुढे ११.२७ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- ५ वा पट्टा – आरंभ रेषेपासून पुढे १५.१७ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- ६ वा पट्टा – आरंभ रेषेपासून पुढे १९.०९ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
- ७ वा पट्टा – आरंभ रेषेपासून २३.०२ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर
- ८ वा पट्टा – आरंभ रेषेपासून २६.९८ मीटर अंतरावरील खुणेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर.
(दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडू दांडू घेऊन एक वक्र आपल्याच पट्ट्यातून पळतात आणि वक्र संपताच आतल्या पट्ट्यात येतात.)
६) सर्व संघांतील क्रमांक दुसरा व तिसरा‚ तिसरा व चौथा यांच्यामध्ये होणारा दांडूबदल हा पहिल्या पट्ट्यात होणार असल्याने तेथे आरंभ / अंतिम रेषेच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० मीटर्स असे एकूण २० मीटर्सचे अदलाबदल क्षेत्र राहील. या वेळी पहिल्या पट्ट्याच्या बाहेर दांडूबदल केल्यास फाउल मानू नये.
पुढे वाचा:
- हर्डल्स शर्यत माहिती मराठी
- मॅरेथॉन शर्यत माहिती
- मैदानी शर्यती व स्पर्धा माहिती मराठी
- क्रिकेट मराठी माहिती
- विराट कोहली माहिती मराठी
- महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती
- डेव्हिड वॉर्नर माहिती
- रोहित शर्मा मराठी माहिती
- शिखर धवन माहिती मराठी
- ए. बी. डिव्हिलियर्स माहिती मराठी