अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी
अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी

अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी

दरवर्षी आम्ही कोजागिरी पौर्णिमा आमच्या घराच्या गच्चीवर साजरी करतो; पण यंदा सर्वानुमते समुद्रकिनारी सहलीला जाण्याचे ठरले. सहल म्हटली म्हणजे आधीच आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात, त्यात ही चांदण्यातील सहल म्हणजे आटीव दुधात केशराचीच भर!

अखेर जिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती कोजागिरीची रात्र उगवली. मोठ्या अधीरतेने आम्ही समुद्रकिनारी जायला निघालो. सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. जी तो खाऊच्या पिशव्या आणि पाण्याच्या बॅगा खांदयावर अडकवून सहलीसाठी सज्ज झाला होता.

ठरल्याप्रमाणे आम्ही समुद्रकिनारी पोचलो. चांदण्याने नटलेले किनाऱ्यावरचे नयनरम्य दृश्य पाहून माझे भान हरपले. सारा सागर आणि किनाऱ्यावरील पुळण चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाली होती. सागराच्या पाण्याचा तो रुपेरी वर्ण पाहून मला बोरकरांच्या पंक्ती आठवल्या- ‘माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी !’

पायांशी लडिवाळपणे बिलगणाऱ्या लाटा जणू चांदीच्या लडीच आणून आमच्यापुढे पसरवत होत्या. समुद्राने आमच्या पुढ्यात उधळलेले ते चंदेरी वैभव पाहून त्या क्षणी वाटले की, आपल्याइतके श्रीमंत आपणच !

एव्हाना आमच्याबरोबरची काही मंडळी समुद्रकाठच्या वाळूत चक्क आडवी झाली होती. कोणत्याही अंथरुणाची वा पांघरुणाची त्यांना गरज नव्हती. खाली रुपेरी वाळूची बिछायत, अंगावर रुपेरी आकाशाचे पांघरूण. तेव्हा जाणवले या चांदण्यात वाळू नुसतीच सजलेली नाही, तर ती मृदू मुलायमही झाली आहे. वाळूप्रमाणे साऱ्यांची मनेही अतिशय हळुवार झाली होती. हास्यविनोद, थट्टामस्करी, गप्पा, गाण्यांची मैफल यांत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. पहाटेला पाखरांच्या किलबिलाटाने चांदणी रात्र सरल्याची जाणीव आम्हांला झाली आणि ‘पुनवे ‘च्या सहलीचा आनंद मनात साठवून आम्ही घरी परतलो.

पुढे वाचा:

Leave a Reply