अंधश्रद्धा निबंध मराठी – Andhashraddha Nibandh Marathi
पूर्वी माणसाला ब-याच गोष्टींमागील कारणे समजत नसत. त्यातूनच मग भीती निर्माण झाली. त्या भीतीतूनच अंधश्रद्धा निर्माण झाली. ही अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी आपले प्राण दिले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील सीमारेषा अगदी पुसट असते. परंतु विज्ञानवादी विचारसरणीची कास धरली तर अंधश्रद्धा शिल्लक राहात नाही. परंतु लहानपणापासूनच ते संस्कार मुलांवर करावे लागतात.
मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. ह्या जगात तो अस्तित्वात आला तेव्हापासूनच त्याला ब-याच गोष्टींचे आश्चर्य वाटायचे. म्हणजे रोज सकाळी सूर्य उगवतो. त्यापूर्वी पूर्व दिशेला लाल रंग येतो. त्या रंगालाच त्याने उषा असे नाव दिले. आकाशातील चंद्रचांदण्या, ऊनपाऊस, भूकंप, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, कळीचे उमलणे, कोकिळेचे ठराविक काळात होणारे कूजन आणि आंब्याला येणारा मोहर ह्या आणि अशासारख्या निसर्गात घडणा-या वेगवेगळ्या घटना तो पहात होता आणि त्या त्या काळातील आपल्या ज्ञानाप्रमाणे त्या गोष्टींचा अर्थ काय ते समजून घेत होता. ज्या गोष्टी त्याला समजत नव्हत्या त्यामागे काहीतरी दैवी शक्ती आहे असे तो मानू लागला. जन्म आणि मृत्यू ह्या तर त्याला फारच अचंबित करणा-या गोष्टी होत्या. रात्रीच्या वेळेस अंधार पडला की रोजच्याच झाडांचे आकार अक्राळविक्राळ भासू लागतात. त्यातूनच भूत ह्या कल्पनेचा उगम झाला. ह्या सगळ्या मागे माणसाचे मन आणि त्याची अद्भूत कल्पनाशक्तीच होती.
ह्या त्याच्या कल्पनाशक्तीतूनच त्याने अनेक अंधश्रद्धांना जन्म दिला आहे. मांजर आडवे गेले की काम होत नाही, पाल चुकचुकली की ते अशुभ असते, बाहेर जाणा-याला कुठे जातो असे विचारू नये, तसे विचारल्यास त्याचे काम होत नाही हे ह्या अंधश्रद्धांचे काही नमुने आहेत. मांजर वाटेने जाऊ शकतेच ना, तिच्या वाटेत आपणही आडवे येतोच की. चुकचुकणे ही पालींची एकमेकींना संदेश देण्याची भाषा आहे. आपले अशुभ व्हावे म्हणून ती चुकचुकत नसते. पूर्वी देवी आल्या की मरीआईचा प्रकोप झाला असे मानत. प्लेगच्या आणि पटकीच्या साथीत भरपूर माणसे मरायची. त्यावेळेसही भगताला बोलावून उपचार केले जात. महारोग झाला की ते मागच्या जन्मीचे पाप आहे असे समजले जाई आणि त्या माणसाला वाळीत टाकले जाई. आता हे आजार कुठल्या विषाणूंमुळे होतात ते विज्ञानाने शोधून काढले आहे आणि त्यावरचे उपायही शोधून काढले आहेत. त्यामुळे कित्येकांचा जीवही वाचतो आहे.
एखादा माणूस वेड्यासारखे वागू लागला की त्याला भूत लागले आहे असे समजून मारहाण केली जाते. ते अगदी चुकीचे आहे. त्याऐवजी त्याला मानसोपचार तज्ञाकडे न्यायला हवे. गुप्त धन मिळवण्यासाठी लहान मुलाला बळी द्यावे अशासारख्या कित्येक अघोरी अंधश्रद्धाही समाजाच्या काही वर्गात अजूनही आहेत.
ह्या अंधश्रद्धांचा बीमोड झाला पाहिजे. माणसाने विज्ञानाची आणि प्रयत्नवादाची कास धरली पाहिजे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा केव्हातरी मरणार असतोच. त्यामुळे कुणाच्याही मरणातूनही भलतेसलते अर्थ काढू नयेत. आपले मन सक्षम करणे हेच सर्वात महत्वाचे असते हे लक्षात ठेवावे आणि अंधश्रद्धांच्याजळमटांची त्यातून हकालपट्टी करावी हेच उत्तम.
पुढे वाचा: