Badminton Information in Marathi: बॅडमिंटन एक मनोरंजक आणि सुंदर खेळ आहे. या पोस्टमध्ये बॅडमिंटन खेळाचा इतिहास, नियम आणि माहिती बद्दल आहे. हा खेळ शारीरिक क्षमता दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे. बॅडमिंटन जगभरात खेळले जाते. हा खेळ भारतातही खूप लोकप्रिय आहे.
तुम्ही सायना नेहवालचे नाव ऐकले असेल जे बॅडमिंटनची मास्टर आहे. सायना व्यतिरिक्त, पी.व्ही सिंधू देखील खूप प्रसिद्ध आहे. या दोन्ही महान बॅडमिंटन खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदके देखील आणली आहेत. तसे, बॅडमिंटन हा खेळ टेनिस सारखाच आहे.
बॅडमिंटन ऑलिम्पिक व्यतिरिक्त अनेक स्पर्धांमध्ये खेळले जाते. वर्ल्डकप, उबेर कप, ऑल इंग्लैंड चैंपियनशिप ही त्याची प्रमुख स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये जसे बॅट आणि बॉल महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे बॅडमिंटनमध्ये कॉक आणि रॅकेट महत्त्वाचे असतात. या पोस्टमध्ये बॅडमिंटन खेळाची माहिती आणि बॅडमिंटन खेळाची नियम “Rules Of Badminton” जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.
बॅडमिंटन खेळाची माहिती – Badminton Information in Marathi
Table of Contents
बॅडमिंटन खेळाचा इतिहास मराठी
बॅडमिंटन बॅडमिंटन खेळाचा इतिहास फार जुना नाही. हा खेळ ब्रिटिश राजवटीत खेळला गेला. ब्रिटीश अधिकारी बॅडमिंटन सारखा खेळ खेळत असत ज्याला शटलकॉक असे म्हणतात. या खेळात लोकर बनवलेला चेंडू वापरला जात असे. हे १८७० च्या आसपास होते. आधी हा खेळ जास्तीत जास्त ४-४ लोकांनी खेळला होता पण नंतर तो एकेरी आणि दुहेरी मध्ये बदलला गेला.
सन १९३४ च्या आसपास, “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन” ची पायाभरणी झाली आणि या खेळाचे अनेक नियम बनवले गेले. या महासंघाचे संस्थापक सदस्य आयर्लंड, फ्रान्स, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड होते. ब्रिटिश भारत १९३६ मध्ये बॅडमिंटन स्पोर्ट्स फेडरेशनचा सदस्य झाला.
आशिया आणि युरोपमध्ये बॅडमिंटन खेळ खूप प्रसिद्ध आहे. भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे बॅडमिंटनचे प्रमुख आहेत. भारताने बॅडमिंटनमध्ये अनेक ऑलिम्पिक पदके देखील जिंकली आहेत. सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, श्रीकांत, पुलेला गोपीचंद हे भारताचे प्रमुख खेळाडू आहेत ज्यांनी जागतिक मंचावर आपली छाप पाडली आहे.
बॅडमिंटन शटल
हे हंस पंखांपासून बनलेले असावे, त्यापैकी १६ (अधिकृत नसल्यास किंवा नवीन ग्रेडमध्ये आपण प्लास्टिकमध्ये देखील शोधू शकता, जे जास्त काळ टिकते), ज्याचे वजन ४.७ आणि ५.५ ग्रॅम दरम्यान असते.
त्याचा आधार कॉर्क किंवा पॉलीयुरेथेनचा बनलेला आहे आणि मध्यभागी त्याची दिशा राखण्यात प्रमुख भूमिका आहे. ते हलके आणि नाजूक असल्याने, विशेषतः पंखांपासून बनवलेले, अधिकृत खेळात ते ७ ते १० शटलकॉकमध्ये वापरले जातात आणि ३०० किमी/ताशी वेगाने पोहोचू शकतात.
बॅडमिंटन रॅकेट
बॅडमिंटन रॅकेट सहसा बळकट पण कार्बन फायबर किंवा टायटॅनियम सारख्या हलके पदार्थांनी बनलेले असतात, १०० ग्रॅम बद्दल विचार करा. त्याची जास्तीत जास्त मोजमाप लांबी ६८ सेमी आहे आणि दोर उभ्या आणि आडव्या वळवल्या जातात. हे बॅडमिंटन रॅक ७ ते ११ पौंड शक्ती सहन करू शकतात.
बॅडमिंटन खेळाचे मैदान / क्रीडांगण
दुहेरीसाठी – ४४ फूट × २० फूट (१३.४० मी. × ६.१० मी.)
एकेरीसाठी – ४४ फूट × १७ फूट (१३.४० मी. × ५.१८ मी.)
१) शॉर्ट सर्व्हिस लाइन व लाँग सर्व्हिस लाइन या रेषा सर्व्हिस कोर्टातच समाविष्ट असतात. बाजूच्या अंतिम रेषा क्रीडांगणाचाच भाग असतात.
२) सर्व रेषा पांढऱ्या अगर पिवळ्या रंगाने आखलेल्या असतात. रेषेची जाडी १.५ इंच असते. (४ सें.मी.)
३) अंगणाचे दोन विभाग करणाऱ्या मध्य रेषेचा २ सें.मी. भाग डाव्या अंगणात‚ २ सें.मी. भाग उजव्या अंगणात समाविष्ट असतो.
४) जाळ्याच्या दोन्ही बाजूंना जाळ्यापासून ६ फूट ६ इंच अंतरावर शॉर्ट सर्व्हिस लाइन असते. एकेरी सामन्यात लाँग सर्व्हिस लाइन जाळ्यापासून २२ फूट अंतरावर असते आणि तीच त्या बाजूची अंतिम रेषा असते. दुहेरी सामन्यासाठी लाँग सर्व्हिस लाइन जाळ्यापासून १९ फूट ६ इंच अंतरावर असते व लाँग सर्व्हिस लाइनपासून २ फू. ६ इंच अंतरावर अंतिम रेषा असते.
खांब – दोन्ही बाजूंच्या अंतिम रेषेवर मध्यभागी ५ फूट १ इंच (१.५५ मी.) उंचीचे खांब असतात. जाळे ताणून बांधण्यासाठी खांबांचा उपयोग होतो.
जाळे – जाळ्याची लांबी २० फूट असते. (६.१० मी.) जाळ्याची रुंदी २ फूट ६ इंच असते. क्रीडांगणात मध्यभागी जाळ्याची जमिनीपासूनची उंची ५ फूट असते. (१.५२० मी.) खांबाजवळ जाळ्याची उंची ५ फूट १ इंच असते. जाळ्याचा रंग गडद असतो. जाळ्याच्या वरच्या भागात ७.५ सें.मी. उंचीची पांढरी पट्टी असते. जाळ्याच्या आणि खांबाच्या मध्ये अंतर नसते.
शटल किंवा फूल (Shuttle) – शटलचे वजन ४.७४ ग्रॅम ते ५.५० ग्रॅम असते. १६ पिसे २.५० सें.मी. ते २.८० सें.मी. व्यासाच्या बुचामध्ये घट्ट बसविलेली असतात. बुचापासून पिसाची उंची ६.२ सें.मी. ते ७ सें.मी. असते. (खेळाडूने मागील अंतिम रेषेवरून साधारण ताकदीने बाजूच्या अंतिम रेषेला समांतर असा अंडरहँड स्ट्रोक (Underhand Stroke) मारल्यावर ते दुसऱ्या बाजूच्या अंतिम रेषेच्या १ ते २.५ फूट आत पडले‚ तर ते शटल खेळावयास योग्य मानले जाते.)
टीप – १) बॅडमिंटन खेळण्यासाठी बंद हॉल वापरावा. हॉलची उंची किमान ३० फूट असावी. क्रीडांगणाच्या बाजूच्या अंतिम रेषेच्या बाहेर ३ फूट आणि मागील अंतिम रेषेच्या बाहेर ५ फूट मोकळी जागा असावी.
२) प्रत्येकी २०० वॉट (watt) ५ दिव्यांचा एक गट याप्रमाणे क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूंना दिव्यांचे प्रत्येकी दोन गट असावेत. दिवे जमिनीपासून १६ फूट उंचीवर असावेत. दिवे अंतिम रेषेच्या ३ फूट बाहेर असावेत.
बॅडमिंटन खेळाचे नियम
१) एकेरी सामन्यात प्रत्येक बाजूने एक-एक खेळाडू खेळेल. दुहेरी सामन्यात प्रत्येक बाजूने दोन-दोन खेळाडू खेळतील.
२) नाणेफेक जिंकणारा खेळाडू/संघ पुढीलपैकी एका पर्यायाची निवड करील :
अ) प्रथम सर्व्हिस करणे.
ब) बाजूची निवड करणे.
बॅडमिंटन सर्व्हिस
१) प्रत्येक डावातील (Game) पहिली सर्व्हिस अंगणाच्या उजव्या भागातून सुरू होईल.
२) एकेरी सामन्यात सर्व्हिस करणाऱ्याचे शून्य किंवा सम गुण असतील त्या वेळी तो आपल्या अंगणाच्या उजव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या उजव्या अंगणात सर्व्हिस करतो.
सर्व्हिस करणाऱ्याचे विषम गुण असतील त्या वेळी तो अंगणाच्या डाव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या डाव्या अंगणात सर्व्हिस करतो. सर्व्हिस स्वीकारणाऱ्याचा नियमभंग झाला‚ तर सर्व्हिस करणाऱ्याला गुण मिळतो व सर्व्हिस त्याच्याकडेच राहते. गुण मिळताच सर्व्हिस करणारा अंगणाच्या दुसऱ्या भागातून सर्व्हिस करतो. सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग झाला‚ तर सर्व्हिस बदल होतो आणि प्रतिपक्षाला एक गुण मिळतो.
३) दुहेरी सामन्यात प्रथम सर्व्हिस कोणी करावी किंवा प्रथम सर्व्हिस कोणी स्वीकारावी‚ हे संबंधित संघ परस्पर ठरवतील. दुहेरी सामन्यात त्या संघाकडे सर्व्हिस आल्यावर दोघांपैकी एकालाच सर्व्हिस करता येईल.
ज्या संघाकडे सर्व्हिस करण्याची पाळी आहे‚ त्या संघातील त्यांच्या उजव्या अंगणातील खेळाडू कोणताही नियमभंग न करता प्रतिस्पर्ध्याच्या उजव्या अंगणातील खेळाडूकडे सर्व्हिस करतो. त्याने सर्व्हिस परतविल्यावर सर्व्हिस करणाऱ्या संघातील कोणताही खेळाडू ते शटल जाळ्यावरून प्रतिस्पर्ध्याच्या अंगणातील कोणत्याही भागात मारेल व प्रतिस्पर्धी संघातील कोणताही खेळाडू ते शटल खेळून प्रतिस्पर्ध्याच्या कोणत्याही अंगणाच्या भागात परतवेल.
संघाच्या उजव्या अंगणातून सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूने गुण मिळवला तर पुढील गुणासाठी तो खेळाडू आपल्या अंगणाच्या डाव्या भागातून प्रतिस्पर्ध्याच्या डाव्या अंगणातील खेळाडूकडे सर्व्हिस करेल.
सर्व्हिस स्वीकारणाऱ्या संघाने रॅली जिंकल्यास त्यांना एक गुण मिळतो आणि सर्व्हिस त्याच्याकडे जाते. सर्व्हिस बदल झाल्यावर संघातील खेळाडू आपल्या अंगणातील बाजू बदलत नाहीत.
४) सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या रॅकेटचा शटलला स्पर्श होताच शटल खेळात येते. शटल खेळात येताच दोन्ही बाजूंचे खेळाडू शॉर्ट सर्व्हिस लाइनच्या पुढील भागात खेळू शकतात. कोणत्याही संघाचा नियमभंग होईपर्यंत किंवा‘लेट्’ म्हणेपर्यंत शटल खेळात राहते.
५) सर्व्हिस करताना सर्व्हिस करणाऱ्याने व सर्व्हिस स्वीकारणाऱ्याने आपापल्या सर्व्हिस अंगणातच उभे राहिले पाहिजे. सर्व्हिसच्या वेळी सर्व्हिस करणाऱ्याचा शॉर्ट सर्व्हिस लाइन‚ लाँग सर्व्हिस लाइन‚ मध्य रेषा व बाजूच्या अंतिम रेषा यांना स्पर्श झाला असेल‚ तर तो त्याचा नियमभंग आहे. (दुहेरी सामन्यात त्यांच्या साथीदारांना प्रतिस्पर्ध्याला अडथळा येणार नाही‚ अशा तऱ्हेने कोठेही उभे राहता येईल.)
६) सर्व्हिस करताना सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या आणि सर्व्हिस स्वीकारणाऱ्या खेळाडूच्या दोन्ही पायांचा / पायांच्या भागांचा स्थिर स्थितीत सर्व्हिस कोर्टाशी संपर्क पाहिजे.
७) सर्व्हिसच्या वेळी रॅकेटचा शटलला स्पर्श होताना शटल सर्व्हिस करणाऱ्याच्या कमरेपेक्षा अधिक उंचीवर नसावे आणि त्या वेळी रॅकेटचे डोके (Head) रॅकेट पकडलेल्या हाताच्या पातळीपेक्षा वर नसावे.
८) सर्व्हिसनंतर खेळाडू आपल्या बाजूच्या अंगणात कोठेही खेळू शकतात.
९) दुहेरी सामन्यात एका खेळाडूला सलग दोनदा सर्व्हिस स्वीकारता येणार नाही. (अपवाद – लेट्) एकाच संघाच्या दोन्ही खेळाडूंना शटलला स्पर्श करता येणार नाही. एकाच खेळाडूला त्याच्या अंगणात आलेले शटल सलग दोनदा खेळून परतवता येणार नाही.
१०) दुहेरी सामन्यात सर्व्हिस स्वीकारणाऱ्यानेच शटल प्रथम परत मारले पाहिजे. त्याच्या साथीदाराचा त्या वेळी शटलला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग आहे.
११) सर्व्हिस केलेले शटल जाळ्याच्या पलीकडे गेले नाही‚ जाळ्याच्या खालून पलीकडे गेले किंवा जाळ्यात अडकले‚ चुकीच्या बाजूच्या अंगणात पडले‚ शॉर्ट सर्व्हिस लाइनच्या आत पडले‚ लाँग सर्व्हिस लाइनच्या बाहेर पडले किंवा बाजूच्या अंतिम रेषेच्या बाहेर पडले; तर तो सर्व्हिस करणाऱ्याचा नियमभंग होय.
१२) सर्व्हिस करताना फसवे आविर्भाव करणे‚ सर्व्हिस करण्यास किंवा सर्व्हिस स्वीकारण्यास अकारण विलंब करणे या बाबी नियमबाह्य आहेत.
१३) सर्व्हिसचे शटल योग्य सर्व्हिस कोर्टाच्या रेषेवर पडले‚ तर तो नियमभंग नाही. (तसे न करण्याबाबत पंच त्याला ताकीद देतील) केवळ शटलचा जाळ्याला स्पर्श झाला म्हणून सर्व्हिस चुकीची होत नाही.
१४) प्रतिस्पर्धी तयार नसताना सर्व्हिस करू नये. प्रतिस्पर्ध्याने सर्व्हिस परत करण्याचा प्रयत्न केला‚ तर तो तयार होता असे मानले जाईल.
१५) गेम जिंकणारा खेळाडू / संघ पुढील गेममध्ये प्रथम सर्व्हिस करील. (दुसऱ्या गेममध्ये दुहेरी सामन्यात संबंधित संघाचा कोणताही खेळाडू प्रथम सर्व्हिस करील आणि प्रतिस्पर्धी संघाचा कोणताही खेळाडू सर्व्हिस स्वीकारील.)
पुढे वाचा: क्रिकेट मराठी माहिती
बॅडमिंटन खेळाचे इतर नियम
१) क्रीडांगणाच्या रेषेवर पडलेले शटल क्रीडांगणात पडले‚ असे मानले जाते.
२) खेळाडूच्या रॅकेटचा‚ शरीराचा किंवा कपड्याचा जाळ्याला किंवा खांबाला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग आहे. (शटल मारल्यानंतर ते क्रीडांगणाच्या बाहेर जमिनीवर पडल्यावर किंवा जाळ्याला स्पर्श होऊन मारणाऱ्याच्याच अंगणात पडल्यावर किंवा शटल जाळ्यामध्ये अडकल्यानंतर जर प्रतिस्पर्ध्याचा जाळ्याला स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही.)
३) शटल जाळ्यावरून आपल्या अंगणात येण्यापूर्वी मारता येणार नाही.
४) शटल मारल्यानंतर रॅकेट जाळ्याच्या वरून पलीकडे गेली‚ तर तो नियमभंग नाही.
५) शटलला शरीराचा किंवा कपड्याचा स्पर्श झाल्यास तो त्या खेळाडूचा नियमभंग होतो.
६) रॅकेटच्या फ्रेमला शटलचा स्पर्श झाला‚ तर तो नियमभंग नाही. बूच आणि पिसे यांचा एकाच वेळी रॅकेटला स्पर्श झाला (Simultaneous touch) तर तो नियमभंग नाही.
७) जाळ्याच्या जवळ उंच शटल जोरात खाली मारण्याची संधी खेळाडूला मिळाल्यास प्रतिस्पर्ध्याने शटल परिवर्तित (Rebound) व्हावे म्हणून रॅकेट समोर वर धरू नये. चेहऱ्याच्या संरक्षणासाठी रॅकेट समोर धरावयास हरकत नाही.
८) शटल मारताना ते रॅकेटमध्ये अडकले‚ तर तो त्या खेळाडूचा नियमभंग आहे.
९) खेळातील शटल क्रीडांगणाबाहेर पडले‚ जाळ्याच्या पलीकडे गेले नाही‚ जाळ्यात अडकले‚ जाळ्यामधून किंवा जाळ्याखालून पलीकडे गेले; तर तो शटल मारणाऱ्याचा नियमभंग आहे.
१०) खेळातील शटल जाळ्याला स्पर्श करून पलीकडे गेले‚ तर ते बरोबर समजावे.
बॅडमिंटन लेट् (Let)
पुढील प्रसंगी‘लेट्’ होऊन तो गुण पुन्हा खेळविला जातो.
१) सर्व्हिसच्या वेळी सर्व्हिस करणाऱ्याचा व स्वीकारणाऱ्याचा एकाच वेळी नियमभंग झाला.
२) अनपेक्षित अडथळा आल्यामुळे किंवा अपघात घडल्यामुळे खेळ थांबला.
३) शटल जाळ्याच्या वरून पलीकडे जाताना जाळ्यावर (top) अडकले.
४) दुहेरीमध्ये खेळाडूने चुकीच्या क्रमाने सर्व्हिस केली किंवा चुकीच्या क्रमाने सर्व्हिस स्वीकारली. (चुकीच्या क्रमाने सर्व्हिस करून गुण जिंकला असेल आणि पुढील सर्व्हिस करण्यापूर्वी लेट्ची मागणी केली असेल त्या वेळी लेट् समजून त्या गुणासाठी पुन्हा खेळ सुरू होतो. चुकीच्या क्रमाने सर्व्हिस करून खेळाडू रॅली हरला‚ तर तो निर्णय मान्य होईल आणि खेळाडूंच्या जागा न बदलता खेळ सुरू राहील.)
५) खेळात असलेल्या शटलची पिसे बुचातून निसटल्याचे लक्षात आले.
६) रेषेवर असलेले शटल अंगणात की अंगणाच्या बाहेर पडले‚ हे रेषापंच निश्चितपणे सांगू शकत नसेल आणि पंचालाही त्याबाबत निश्चित निर्णय देता येत नसेल त्या वेळी लेट् अमलात येतो.
बॅडमिंटन गुण व निकाल माहिती
१) एकेरी व दुहेरी सामन्यांत प्रत्येक गेम २१ गुणांची असेल.
२) प्रत्येक गेमनंतर खेळाडू बाजू बदलतील. अंतिम गेममध्ये २१ गुणांच्या सामन्यात ११ गुणांनंतर बाजू बदलाव्यात (योग्य गुणांनंतर बाजू बदलण्याचे लक्षात आले नाही‚ तर चूक लक्षात येताच बाजू बदलाव्यात. गुणसंख्या तीच राहील.)
३) सामना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत खेळ अखंड सुरू राहील. (पहिल्या व दुसऱ्या गेममध्ये दोन मिनिटांची विश्रांती आणि दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये दोन मिनिटांची विश्रांती द्यावयास हरकत नाही.)
४) अपरिहार्य कारणामुळे सामना तात्पुरता थांबवावा लागला‚ तर सामना पुढे सुरू करताना ज्या गुणावर सामना थांबला असेल‚ त्या गुणापासून खेळ सुरू करावा. विश्रांतीसाठी किंवा सल्ला घेण्यासाठी सामना थांबविला जाणार नाही.
५) जो खेळाडू / संघ दोन गुणांच्या आधिक्याने प्रथम २१ गुण मिळवितो‚ तो खेळाडू / संघ तो गेम जिंकतो. दोघांचेही २०-२० गुण झाले असतील‚ तर प्रथम दोन गुणांचे आधिक्य मिळविणारा खेळाडू / संघ तो गेम जिंकतो. (२२-२०‚ २३-२१‚ २४-२२‚ २५-२३….) दोघांचे २९-२९ असे समान गुण असतील‚ तर ३० वा गुण मिळविणारा खेळाडू / संघ विजयी ठरतो.
६) तीनपैकी दोन गेम्स जिंकणारा खेळाडू / संघ सामन्यात विजयी होतो.
बॅडमिंटन सामना अधिकारी माहिती
सामन्यासाठी सरपंच‚ एक पंच‚ एक किंवा दोन सर्व्हिस पंच आणि तीन रेषापंच असतात.
बॅडमिंटन पंच
पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. नियमभंग सांगणे‚ गुण सांगणे‚ गेमचा व सामन्याचा निकाल जाहीर करणे इ. कामे पंचाला करावी लागतात. सूचना देऊनही खेळाडूकडून सातत्याने गैरवर्तन घडत असेल‚ तर त्याबाबत पंच सरपंचाला सांगतील. खेळाडूला बाद करावयाचे की कसे‚ याबाबतचा निर्णय सरपंच घेतील.
पंचाने आपला निर्णय नि:संदिग्धपणे‚ मोठ्याने व तत्काळ द्यावा. निर्णयात चूक असल्यास ती ताबडतोब दुरुस्त करावी. निर्णय देणे अशक्य असेल‚ तर तो गुण पुन्हा खेळवावा.
सर्व्हिस पंच‚ रेषापंच यांच्या नेमणुका करणे‚ जाळ्याची उंची तपासून पाहणे‚ गुणपत्रक भरणे‚ शटल्सबाबत खेळाडूंचे एकमत होत नसेल तर शटल्स तपासून निर्णय देणे इ. बाबी पंचाला कराव्या लागतील.
बॅडमिंटन सर्व्हिस पंच
एकच सर्व्हिस पंच नेमला असेल‚ तर तो पंचाच्या विरुद्ध बाजूस बसेल. आवश्यकता भासली‚ तर तो पंचाच्या बाजूसही बसू शकतो. दोन सर्व्हिस पंच असतील‚ तर ते दोन्ही बाजूंना मागील अंतिम रेषेच्या बाहेर किंवा पंच सांगतील तेथे बसतील.
सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूची कृती सर्व्हिस पंच बारकाईने पाहतील. खेळाडू सर्व्हिस करताना रॅकेटने शटल मारतो त्या वेळी त्याच्या पायांचा जमिनीशी असणारा संपर्क‚ रॅकेटचा शटलला स्पर्श होताना शटलची व रॅकेटची स्थिती‚ सर्व्हिस करताना केलेले फसवे आविर्भाव यासंबंधी घडणाऱ्या नियमभंगाबाबतचे निर्णय सर्व्हिस पंचाने तत्काळ व पंचाला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने द्यावयाचे असतात.
खेळाडू शटलचा वेग कमी-जास्त करण्यासाठी हेतुपुरस्सर शटलमध्ये बदल किंवा नुकसान करण्याची कृती करणार नाहीत. अशी कृती करणाऱ्या खेळाडूला पंच सक्त ताकीद देईल.
बॅडमिंटन रेषापंच
संबंधित रेषेवरील रेषापंचाचा निर्णय अंतिम मानला जाईल. एखादी बाब रेषापंचाच्या नजरेस आली नाही‚ तर पंच निर्णय देईल किंवा तो गुण पुन्हा खेळविला जाईल. शटल अंतिम रेषेच्या बाहेर पडले‚ तर रेषापंच दोन्ही हात बाजूला करून इशारा करील व ‘आउट्’ असे म्हणेल.
(रेषापंचाचा निर्णय अयोग्य वाटला‚ तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार पंचाला आहे.)
पुढे वाचा: