भारताची अंटार्टिक मोहीम मराठी निबंध – Bharatachi Antarctica Mohim Essay Marathi

१५० वर्षांपूर्वी अंटार्टिक आणि दक्षिण ध्रुवाबद्दल आपणास नगण्य माहिती होती. १७ व्या शतकात कित्येक साहसी नावाड्यांनी या प्रदेशाचा प्रवास सुरू केला आणि अनेक नव्या द्विपांचा शोध लावला. १७७३-७४ मध्ये कॅप्टन जेम्स कुकने अंटार्टिक बेटाला प्रदक्षिणा घातली. १८४० मध्ये जेम्स क्लार्क रॉस तिथे गेले आणि त्यांनी बरीच माहिती गोळा केली. १९०१ ते ३ च्या दरम्यान स्कॉट आणि शेकल्टन तीनदा या प्रदेशात जाऊन ते आले. दक्षिण ध्रुवावर सर्वप्रथम जाणारे नॉर्वेचे अमंडसन होते. त्यांच्यानंतर लगेच रॉबर्ट स्कॉटने १७ जानेवारी १९१२ रोजी दक्षिण ध्रुवावर पाय ठेवला. १९२८ मध्ये बायर्डने अंटार्टिक मोहिमेचे नेतृत्व केले. १९३५ मध्ये एल्सबर्थने प्रथमच दक्षिण ध्रुवाच्या पलीकडे उड्डाण केले होते. १९५७ नंतर तर या प्रदेशाच्या प्रवासाची एक परंपराच सुरू झाली.

हा संपूर्ण प्रदेश म्हणजे एक आश्चर्यकारक संग्रहालयच आहे. इथे सारे काही विशाल आणि व्यापक आहे. मग ते बर्फ, निर्जनता, दुर्गमता, सौंदर्य, आकर्षण, भयानकता, थंडी काही असो. सगळेच आपल्या चरम सीमेवर आहेत. या प्रदेशाचा ९८% भाग हिमाच्छादित आहे. तो ३ कोटी घन किलोमीटर आहे. त्याच्या चहूबाजूस असणारा अंटार्टिक महासागर हिवाळ्यात गोठतो व या प्रदेशाचे क्षेत्रफळ कित्येक लाख चौरस किलोमीटर वाढते. सगळ्या जगातील बर्फापैकी ७०% बर्फ या प्रदेशात आहे. जर हा सर्व बर्फ वितळला तर जगातील सर्व समुद्राची पातळी ६० मीटरपेक्षा जास्त होईल. येथील हिमखंड भीमकाय असतात. हा जगातील सर्वात थंड प्रदेश आहे. येथील तापमान कधी कधी-८८० सेल्सियसपर्यंत पोहोचते. येथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. येथील प्राकृतिक सौंदर्य अलौकिक आहे. अंटार्टिकचा अंतर्गत प्रदेश निर्जन आहे. येथे पेंग्विन पक्षी पाहावयास मिळतात. एम्परर पेंग्विन खूप मोठा आणि रूबाबदार असतो. हा पक्षी बर्फावर चालण्यात, घसरण्यात व पोहण्यात तरबेज असतो. ते उडू शकत नाहीत पण वेगाने धावू शकतात. चालतांना तर ते माणसासारखेच दिसतात. येथील समुद्रकिनाऱ्यावर विशालकाय सील मासे सापडतात. येथील समुद्रात मासे आणि इतर जलचर प्राण्यांचे जणू भांडारच आहे.

शास्त्रीय अभ्यास, शोध, प्रयोग आणि इथे भूगर्भात असलेली खनिज व सागरी संपत्ती यामुळे या प्रदेशाला खूपच महत्त्व आले आहे. यास्तव सर्व विकसित देशांनी या प्रदेशात आपापली संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. त्याचबरोबर अनेक विकसनशील देशांनीही आपली अभ्यास व संशोधन केंद्रे याठिकाणी स्थापन केली आहेत. भारत त्यापैकी एक आहे. प्रथम भारतीय शोध पथकाने या प्रदेशात जाण्यासाठी २४ जुलै १९८१ ला गोव्याहून प्रयाण केले. ३४ दिवसांच्या कठीण जलप्रवासानंतर ७ जानेवारी १९८२ ला पथक आपल्या इच्छित स्थळी पोहोचले. यात २१ सदस्य होते. पथकाचे नेतृत्व सागर विकास विभागाचे सचिव डॉ. सय्यद जदूर कासिम यांनी केले. या शोधपथकाने तिथे किती तरी महत्त्वाचे शास्त्रीय प्रयोग व अध्ययन केले आणि आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकावला. यानंतर दरवर्षी भारतीय शोध पथके तिकडे जात असतात. या दलात देशातील निरनिराळे शास्त्रज्ञ, सैनिक, संशोधन संस्थाचे लोक निवडून पाठविले जातात.

पहिल्या भारतीय शोध पथकाने या ठिकाणी ‘दक्षिण गंगोत्री ‘नामक एक स्थायी केंद्र स्थापन केले. नंतर ‘मैत्री’नामक दुसरे स्थायी केंद्र स्थापन केले. प्रत्येक शोध पथकातील काही सदस्य उरलेल्या नऊ महिन्यांसाठी तेथेच राहतात. बाकीचे सदस्य परत येतात. जे मागे राहतात ते निरनिराळे महत्त्वाचे प्रयोग करतात. या सर्व मोहिमा आपल्या उद्देशात सफल झाल्या आहेत. ही एक फार मोठी प्राप्ती आहे. ही सर्व योजना आणि कार्यक्रम एका दूरगामी दीर्घकालीन फायद्यासाठी आहे. निकटच्याच भविष्यात यामुळे काही चमत्कारिक लाभ होईल अशी आशा आपण ठेवू नये. पृथ्वीचे वातावरण, सागर, जल, प्रदूषणासंबंधीच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्याचे उत्तर शोधून काढण्यासाठी या मोहिमा महत्त्वाच्या आहेत. हेच त्या प्रयोगाचे ठिकाण आहे. जिथे भारत व जगातील इतर राष्ट्रे एकत्र मिळून पायाभूत शोध लावतील व संशोधन करतील. आपल्या पृथ्वीचा अस्पष्ट भूतकाळ समजून घेण्यात अंटार्टिक एका महत्त्वाच्या किल्लीचे काम करू शकेल. तेथील विशाल बर्फाखाली पर्यावरणाच्या इतिहासाची असंख्य पृष्ठे गाडलेली असतील., तेथील सागरात संपूर्ण मानव जातीला पुरेल इतक्या खनिज संपत्तीचे अपार स्त्रोत. असतील. त्यात अनेक मौल्यवान धातू, वायू, तेल आदींचे. भरपूर साठे आहेत.

अंटार्टिकच्या आर्थिक व व्यावसायिक शक्यता अमर्याद आहेत. तेथील वातावरणामुळे सा-या जगातील ऋतू प्रभावित होतात. ते वादळे आणि मोसमी पावसाला जन्म देते. पृथ्वीच्या तापमानाला संतुलित ठेवते. भारतातील मान्सून वाऱ्यांना प्रभावित करते. वरील सर्व कारणांमुळे भारताचा अंटार्टिकाशी जवळचा संबंध आहे. म्हणून तेथे अभ्यास संशोधन, शोध करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमांचे मूल्य पैशात मोजता येत नाही. कारण याचे दूरगामी परिणाम आर्थिक मूल्यांकनाला खूप मागे सोडतील.

पुढे वाचा:

Leave a Reply