ख्रिसमस नाताळ माहिती मराठी – Christmas Natal Information in Marathi

२५ डिसेंबर हा दिवस ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीने फार आनंदाचा आहे. कारण २४ डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन लोक ज्याला ईश्वराचा पुत्र मानतात, त्या येशू ख्रिस्ताचा- जीझसचा जन्म झाला. या दिवसाला नाताळ असे म्हणतात. पण मूळ शब्द ‘दियेस नातालिस’ म्हणजे जन्माचा दिवस असा आहे. हा मूळ शब्द लॅटिन आहे. पॅलेस्टाईनमधील बेथलहेम या गावी एका गुरांच्या गोठ्यात ख्रिस्ताचा जन्म झाला.

त्या वेळी पॅलेस्टाईनवर कैसर अगुस्तस याचे राज्य होते. राजाने हुकूम केला की, राज्यातील सगळ्या माणसांची शिरगणती करावयाची आहे. तेव्हा प्रत्येक माणसाने शिरगणतीसाठी आपल्या गावी जावे. या हुकुमानुसार जोसेफ आणि त्याची बायको मारिया बेथलहेमला गेले. मेरीला बाळ व्हायचे होते पण राजाच्या हुकुमामुळे हा प्रवास तिला करावा लागला. बेथलहेम लहानसे गाव होते. बाहेरगावी गेलेली सारी माणसे शिरगणतीसाठी तिथे आली होती. त्यामुळे जोसेफ आणि मेरीला राहायला कुठे जागा मिळेना. त्यामुळे ती दोघे एका गोठ्यात जाऊन बसली. त्याच गोठ्यात रात्री जीझसचा- येशू ख्रिस्ताचा जन्म झाला.

ख्रिसमस नाताळ

या घटनेची आठवण म्हणून लोक नाताळच्या दिवशी एक छोटासा गोठा बनवतात. गव्हाणीत बाळ जीझसचे आणि त्याच्या आई-वडिलांचे पुतळे ठेवतात.

जीझसचा जन्म झाला तेव्हा आकाशात एक तेजस्वी तारा उगवला. त्या तार्‍याचा मागोवा घेत पूर्वेकडून तीन विद्वान आणि काही मेंढपाळ तिथे आले. त्या तीन विद्वानांना तशी दैवी सूचना मिळाली होती. म्हणून गोठ्याच्या सजावटीत या सर्वांचे पुतळे तसेच गाई मेंढ्यांची मातीची चित्रेही ठेवतात. त्या तेजस्वी तार्‍याची आठवण म्हणून घरावर तार्‍याच्या आकाराचा आकाशकंदील लावतात.

२४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये खास प्रार्थना करून ख्रिस्तजन्माचा आनंद व्यक्त केला जातो.

२५ डिसेंबर हा दिवस फार उत्साहाने साजरा केला जातो.

लोक आपली घरे सुरेख सजवतात. उत्तम जेवण बनवतात व परस्परांना शुभेच्छा देतात. ‘नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद व शांती आणो’ अशी इच्छा या दिवशी व्यक्त करतात. या दिवशी आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येतात व नाच-गाणे, खाणे-पिणे यांत मोठ्या आनंदाने दिवस घालवतात.

लहान मुलांसाठी नाताळचा महत्त्वाचा भाग म्हणजे सान्ता क्लॉज. सान्ता क्लॉज हा लाल कपडे घातलेला, पांढर्‍या दाढी-मिशा असलेला प्रेमळ आजोबा रेनडियरने ओढलेल्या बर्फावरील घसरगाडीतून येतो. तो मुलांसाठी खेळणी आणतो व रात्री गुपचूप ती घरात ठेवून जातो, अशी गोष्ट मुलांना सांगतात. सान्ता क्लॉज आपल्याला काय आणील याची मुले आतुरतेने वाट पाहतात.

या गोष्टीची सुरुवात फार जुन्या काळी झाली. निकोलस नावाचा एक दयाळू संत गरिबांना दरवर्षी काही खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू अशा भेटी देत असे. या निकोलसचे पुढे सान्ता क्लॉजच्या गोष्टीत रूपांतर झाले.

नाताळची आणखी एक सुंदर सजावट म्हणजे ‘ख्रिसमस ट्री’. एक सुरूचे झाड सोनेरी धाग्यांनी व रुपेरी चांदण्यांनी सजवतात. झाडावर छोटी खेळणी टांगतात. झाडाखाली एकमेकांना द्यायच्या भेटी ठेवतात. असे सजलेले ख्रिसमस ट्री, नाताळचे झाड, घरोघर असते.

या झाडाचीही एक गोष्ट आहे. ख्रिसमस ट्रीसाठी सुरूचेच झाड का? बेथलहेमगावी एका गोठ्यात येशूचा जन्म झाला, तेव्हा लोक त्या सुंदर बाळासाठी भेटी घेऊन येऊ लागले. त्या गोठ्याच्या दारात तीन झाडे होती. ताडाचे, ऑलिव्हचे आणि सुरूचे. त्या झाडांनाही वाटले की, आपण बाळाला भेटी द्याव्यात.

ताडाचे झाड म्हणाले, “मी माझे पान बाळाला देईन. त्याला वारा घालायला पंखा म्हणून ते उपयोगी पडेल.”

ऑलिव्हचे झाड म्हणाले, “मी माझे सुगंधी तेल बाळाच्या केसांना लावीन.”

सुरूचे झाड बिचारे हिरमुसले झाले. कारण त्याची पाने होती सुयांसारखी. ते काय देणार? पण हे सारे एका देवदूताने पाहिले. त्याने आकाशातले काही तारे घेतले आणि सुरूच्या झाडावर ठेवले. चमचमणार्‍या तार्‍यांनी खुलून दिसणार्‍या सुरूच्या झाडाकडे पाहून बाळ येशू खुदकन हसला. बाळाच्या त्या गोड हसण्याची आठवण म्हणून सुरूच्या झाडाला ‘ख्रिसमस ट्री’ चा मान मिळाला.

तसेच झाडाभोवती गुंडाळलेले ते सोनेरी धागे. त्यांचे महत्त्व काय?

गोठ्यात जन्मलेल्या बाळ येशूला थंडी वाजू लागली. तो रडू लागला. बाळ गारठेल अशी भीती मेरीला वाटू लागली. तिथे भिंतीवर एक कोळी जाळे विणत बसला होता. त्याने बाळ रडताना पाहिले आणि आपले उबदार जाळे पांघरुणासारखे बाळाच्या अंगावर घातले. बाळाला ऊब आली. मेरीला फार आनंद झाला. त्या चिमुकल्या कोळ्याची आठवण म्हणून ख्रिसमस ट्री सोनेरी धाग्यांनी सजवतात.

थंड प्रदेशात रॉबिन नावाचा छोटासा पक्षी असतो. त्याचा गळा व छातीचा भाग लाल असतो. त्यासंबंधी अशी गोष्ट आहे की, जीझसचा गोठ्यात जन्म झाला त्या रात्री फार थंडी होती. गोठ्यात एक लाकडाचा ओंडका धुमसत होता. पण आणखी लाकडे आणायला जोसेफजवळ पैसे नव्हते. थंडीमुळे मेरी आणि तिचे बाळ गारठून गेले होते. तेव्हा एका चिमुकल्या रॉबिन पक्ष्याने आपल्या पंखांनी वारा घालून तो ओंडका पेटता ठेवला. आगीच्या धगीने रॉबिनचा गळा व छाती लाल झाली. तेव्हापासून त्याला रॉबिन रेडब्रेस्ट- लाल छातीचा रॉबिन- असे म्हटले जाऊ लागले.

असा हा आनंदाचा सण- नाताळ.

पुढे वाचा:

Leave a Reply