दिनदर्शिका निबंध मराठी – Dindarshika Nibandh Marathi

दरवर्षी वर्ष संपत आले की प्रसार माध्यमे अटी-तटीच्या स्पर्धेने दिनदर्शिकेच्या जाहिराती करत असतात. प्रत्येकाच्या घरात आजकाल दिनदर्शिका असतेच. दिनदर्शिका नाही असे एकही घर, कार्यालय, उद्योग घटक सापडणार नाही. कारण दिनदर्शिका ही आपली दैनंदिन गरज आहे. घरात दिनदर्शिका नसली की, काही तरी कमी असल्याची जाणीव होते. इतके दिनदर्शिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दिनदर्शिकेच्या इतिहासाकडे नजर टाकल्यास तो फार मनोरंजक असल्याचे आपल्या ध्यानात येते.

अतिप्राचीन काळी कालमापनाचे कोणतेही साधन नव्हते. त्यावेळी दिवसरात्र, वेळ, वर्ष याचे ज्ञान माणसाला नव्हते. गणितशास्त्राचा शोध लागला आणि दिवसरात्र मोजता येऊ लागले. त्यावरून आठवडा, महिने, वर्ष, युग ठरविण्यात आले. दिवस, वार, महिने, निश्चित करण्यात आले. वर्षाची व्याख्या तयार झाली. इसवी सनाची सुरवात येशू खिस्ताच्या जन्मापासून झाली. पाश्चात्य लोकांची ती दिवस मोजण्याची पद्धती आहे. हिंदू धर्मात वेगवेगळ्या राजांच्या नावाने शक (म्हणजे १०० वर्षे) सुरू झालेले दिसतात. शक आणि इसवी सनाच्या सहाय्यानेच कालमानानुसार इतिहास लिहिला जातो.

आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या प्रत्येक दिवसाच्या आठवणी आपल्या मनात तारखेच्या रूपाने नोंदविल्या जातात. जेव्हा जेव्हा ती तारीख येईल तेव्हा-तेव्हा आपल्याला त्या दिवसाच्या घटनांची, प्रसंगांची आठवण करून देते. दर महिन्यात येणारी एक तारीख नवे स्वप्न, आशा, उमेद घेऊन येते. मोठमोठ्या संत-महात्म्यांचे वाढदिवस, पुण्यतिथी यांची नोंद तारीखवार दिनदर्शिकेत केलेली असते. हिंदी दिवस, जागतिक लोकसंख्या दिवस इ. साजरे केले जाणारे दिवस त्या त्या महिन्याच्या तारखेवर नोंदवून ठेवलेले असतात. भारतीय दिनदर्शिकांमध्ये पूर्ण वर्षाचे पंचांग दिलेले असते. त्यामुळे कोणता दिवस शुभ व कोणता अशुभ आहे, आपण साजरे करत असलेले वेगवेगळे उत्सव, सण याचीही नोंद यात केलेली असते. दिनदर्शिकेतील चटकन नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे लाल अक्षरात लिहिलेल्या तारखा. प्रत्येक जण त्याकडे आशाळभूतपणे पाहत असतो, कारण त्या दिवशी सुटी असते. वर्षभरात आपल्याला काय काय करायचे आहे? त्याचे नियोजन दिनदर्शिकेच्या सहय्याने चांगल्या प्रकारे करता येते.

भारतात जवळपास सर्व प्रादेशिक भाषांतील, दिनदर्शिका प्रकाशित केल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मानुसार, पंथानुसार त्या-त्या धर्माच्या कालगणनेप्रमाणे वेगवेगळ्या दिनदर्शिका असतात. दिनदर्शिकेचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे खिशात ठेवता येणाऱ्या, ऑफिस बॅगेत ठेवत येणाऱ्या दैनंदिनीच्या रूपात असणाऱ्या छोट्या दिनदर्शिका. यातही वरीलप्रमाणेच सर्व माहिती असते. बऱ्याच लोकांना दिवसभरात घडलेल्या घटनांची नोंद दिनदर्शिकेत करून ठेवण्याची सवय असते. या नोंदीत इतिहास, संस्कृतीचे समाजजीवनाचे प्रतिबिंब पडलेले दिसते.

माझ्याही जीवनात भिंतीवरील दिनदर्शिकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उगवणारा प्रत्येक दिवस मला किती कामे उरकायची याची जाणीव करून देतो व मी दुप्पट जोमाने कामाला लागते.

पुढे वाचा:

Leave a Reply